आनंद मोडक यांच्या ७ एप्रिलच्या ‘स्मरणस्वर’मधील लेखात दोन चुका झालेल्या आहेत. ‘जाऊ कहाँ बता ए दिल’ हे गाणं गीतकार शैलेंद्रने लिहिलेले नसून ते हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं आहे; तर ‘घर से चले थे हम तो.. यूं हसरतों के दाग’ हे गीत साहिर लुधियानवींचे नसून ते गीतकार राजेंद्रकृष्ण यांचे आहे.
– श्रृती देवपूरकर, नांदेड.
हे बुऱ्हानपूरवाला कोण?
‘गाण्यांचं पोळं’ (७ एप्रिल) हा आनंद मोडक याचा लेख वाचताना १९५०-६० च्या दशकांतील आठवणी मनात जागृत झाल्या. लेखात ज्यांचा उल्लेख केला गेला आहे, त्या एफ. बी. बुऱ्हानपूरवाला यांनी प्रकाशित केलेली चित्रपटगीतांची पुस्तकं आमच्या गिरगावात इम्पिरियल टॉकीजकडे विकत मिळत असत. माझा मोठा भाऊ हेमचंद्र हा हिंदी सिनेमा आणि त्यातील सुमधुर संगीताचा प्रचंड शौकिन असल्याने त्याने त्याकाळी या पुस्तकांचा मोठाच संग्रह केला होता. त्या संग्रहातील ‘मजबूर’ या चित्रपटाच्या गाण्यांचं वेगळं पुस्तक मला आजही आठवतं. या चित्रपटात श्याम या नटाने प्रमुख भूमिका केली होती आणि त्यातील ‘अंग्रेजी छोरा चला गया’ हे युगुलगीत खूपच गाजलं होतं. तेव्हा मनात प्रश्न उभा राहतो की, त्या काळातील चित्रपट रसिकांची गाण्यांची आवड जपणारे हे एफ. बी. बुऱ्हानपूरवाला नेमके कोण होते? चित्रपटांचा इतिहास लिहिणाऱ्या कुणीतरी त्यांची कधी दखल घेतली असेल का? आनंद मोडक यावर काही प्रकाश टाकू शकतील का?
– आरती पै, बोरीवली.
व्यवस्थाच भ्रष्ट व सडलेली आहे!
‘संस्थानचे कोंडवाडे, वंचितांचे मसणवटे’ हा डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा लेख (३१ मार्च) डोळ्यात अंजन घालणारा आहे. बाल, अंध, अपंग, अनाथ महिला आदी वंचित समाजासाठी शासकीय व स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या अनाथालयातील दुरवस्था, तेथील मुलामुली, महिला आदी लाभार्थीचे शोषण कसे व कोण करते, लैंगिकतेला बळी पडणारी मुले, मुली व महिला यांचे जीवन कसे उद्ध्वस्त होते हा सर्व वृतान्त घटनांसह व तारीख, सालासह कथन केला आहे. प्रस्थापित समाजाच्या परिघाबाहेर अंधारात जगणाऱ्या जगातील भयानक घटना नोंदवल्या आहेत.
वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा कारभार म्हणजे शोषकांची संस्थाने बनली आहेत. त्यांचे संस्थाचालक अनुदान मिळवणे, पैसा खिशात घालणे, राजकीय आश्रय मिळवणे यामध्ये अधिक रस घेतात. तेथील कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करतातच; शिवाय आश्रित मुलामुलींचे व महिलांचे लैंगिक शोषण करतात. याकडे राज्यकर्ते अगर पोलीस यंत्रणा तक्रार होऊनही डोळेझाक करतात. चालक पैसा, सामाजिक प्रतिष्ठा, राजकीय लाभ मिळवणे यातच स्वत:ला धन्य मानतात. समाजात प्रतिष्ठित नेता म्हणून वावरतात. आणि मग राजकारण्यांचा पाठिंबा मिळाला की, वाटेल ती मनमानी करतात.
अगदी अलिकडील ताजे उदा. ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी राजकीय आश्रयाने आमदारकी मिळवली. राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून वंचितांचे जीवन सुखी करण्यासाठी संस्था उभारली. शाळा, कॉलेज, अनाथालयं उभारली. समाजसेवेची झूल अंगावर पांघरून मनमानी कारभार केला. समाजातील परिवर्तनवादी चळवळीतील अनेक नेत्यांनी मानेंची सतत पाठराखण करून त्यांना उंचीवर नेऊन ठेवले. मानेंनी भरपूर शासकीय अनुदानंही मिळवली. माने म्हणतात, ‘मी गाढवावरून गाडीत बसलो. उकिरडय़ावरून बंगल्यात आलो.’ तेच माने अत्याचार व संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण या आरोपाखाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. हे, एकंदर व्यवस्था भ्रष्ट आणि सडलेली आहे याचेच द्योतक आहे.
– गुलाबराव दा. आवडे, कोल्हापूर.
अंगावर काटा येतो
लवटे यांचा लेख वाचून अंगावर काटा उभा राहिला आणि मन विषण्ण झालं. बलात्कार तर राजरोसपणे केले जात आहेत. आश्रमशाळा, विद्यार्थिनी वसतिगृह अशा ठिकाणी जे नको ते बिनधास्तपणे घडत आहे. बलात्काराच्या बातम्या वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांत नाहीत, असा एक दिवस जात नाही. महाराष्ट्रातल्या एका नामवंत लेखकाची अशाच लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पोलिसांकडून चौकशी चालू आहे. आता बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांच्या पंगतीत महाराष्ट्राचाही नंबर घालावा लागेल.
– सारंग गजानन कुलकर्णी, नाशिक.
सरकार मतिमंद आहे
‘संस्थांचे कोंडवाडे, वंचितांचे मसणवटे’ (३० मार्च) हा सुनीलकुमार लवटे यांचा लेख वस्तुनिष्ठ आहे. लेखकाचं आणि ‘लोकसत्ता’चं अभिनंदन. या संस्थांतील मुलींचं लैंगिक शोषण दिवसेंदिवस वाढतं आहे. कोणत्याही शिक्षणसंस्थेमध्ये सेवाभाव औषधालाही शिल्लकनाही. आर्थिक शोषण, लैंगिक शोषण, अन्याय, अत्याचार करण्यासाठीच या शिक्षणसंस्था जन्माला आल्या आहेत. ५० वर्षांपूर्वी सेवाभावी संस्थाचालक होते, पदरमोड करून संस्था चालवणारे होते. आज सरकारमधील मंडळीच बहुतेक संस्थामालक आहेत. कोणताही मंत्री प्रश्न सोडवत नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी, लाभासाठी मंत्री काम करतात. सरकारही मतिमंदासारखं आहे.
– आर. के. मुधोळकर, नांदेड.
आनंदी राहण्यासाठी टिप्स
‘लोकरंग’ (१० मार्च)मधील डॉ. राजीव शारंगपाणी यांचा ‘आवडता व्यवसाय’ हा लेख वाचनीय व स्फूर्तिदायक आहे. लहानपणापासूनच शिकताना पुढे आपल्याला काय करायला जमेल याचा अंदाज येण्यासाठी विविध व्यावसायिक आपला व्यवसाय कसा करतात हे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे हा लेखातला विचार मनाला पटतो. लेखात म्हटले आहे की उत्तम व्यावसायिक हा उत्तम विद्यार्थी असतो. अगदी शंभर टक्केखरे आहे. सतत शिकत राहण्यामुळे कामातील बारकावे कळतात व कामाचा दर्जा चांगला राहतो. उत्तम नोकरदारसुद्धा आपल्या बरोबरीच्या, आपल्यापेक्षा मोठय़ा पदावरील लोकांकडून सतत शिकत राहिला तर त्याच्या कामाचा दर्जा उंचावेल, पदोन्नतीही लवकर मिळेल. त्यामुळे प्रेरणा मिळून कामे उत्साहाने केली जातील व मनही आनंदित राहील.
– सविता आवारे, नाशिक.
मी फारशी जागरूक राहिले नाही
‘शोधनिबंधांची दुकानदारी’ (१७ मार्च) या लेखात नव्याने उगवलेल्या नियतकालिकांमध्ये सल्लागार समितीत ज्या अनेकांची नावे आहेत, त्यात माझेही नाव आहे व अशा व्यक्तींनी याबाबत काही खुलासा करावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
प्रा. शैलेश त्रिभुवन यांच्या ‘सक्षम समीक्षा’ या त्रमासिकात जी अनेक नावे सल्लागार म्हणून आहेत त्यात माझेही नाव आहे. सुरुवातीच्या काही अंकांमध्ये ते नव्हते, नंतर मध्येच केव्हातरी घातले गेले. या मासिकाचे आतापर्यंत तीन ते चार अंकच माझ्याकडे आलेले आहेत. एकदा सहज चाळल्यावर त्यात माझे नाव दिसले. आश्चर्य वाटले, थोडा रागही आला. मला न विचारताच माझे नाव कसे घातले याचे खरे तर स्पष्टीकरण मी त्यांना मागायला हवे होते, पण ही गोष्ट मी फार गंभीरपणे घेतली नाही (ते चुकले, असे आता वाटते म्हणून त्यांना नाव काढून टाकण्यासाठी कळवत आहे.). शैलेश त्रिभुवन हे एक धडपडे, सतत काही ना काही वाङ्मयीन उद्योग करणारे प्राध्यापक म्हणून मी त्यांना गेली दहा-बारा वर्षे ओळखते. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली आहेत, तसेच हा एक मासिक प्रपंच, एवढीच माझी समजूत होती. त्यामागचे हेतू काय, याचा मी सहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याने मला अंदाज आला नाही. हे गुणांचे गणित तेव्हा सुरू व्हायचे होते.
सल्लागार समिती ही शोभेचीच आहे व तसा काही सल्ला घेतला जात नाही. पण अंकातील निबंधांचा दर्जा लेखात म्हटल्याप्रमाणे अतिशय सुमार आहे हे तेव्हाच लक्षात आले होते. अशा प्रकारच्या अंकांचा किती खप असणार अशा विचारानेही नावाबद्दल मी फारशी जागरूक राहिले नाही ही गोष्ट खरी आहे. नीरज हातेकर, राजन पडवळ आणि राम जगताप यांचे लेख अतिशय वास्तवदर्शी व सडेतोड आहेत. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील उथळपणा, धंदेवाईक वृत्ती, वाङ्मयचौर्य चव्हाटय़ावर आणले गेले ही चांगली गोष्ट आहे.
– अश्विनी धोंगडे, पुणे.
अस्तित्वात नसलेला वर्गवाद
जयदेव डोळे यांचा ‘ब्राह्मणेतर बहुजनांची पत्रकारिता’ (७ एप्रिल) हा लेख वाचून खेद वाटला. शीर्षकापासूनच लेखकाची आकसबुद्धी दिसून येते. डोळेंच्या ओठी एक आहे, पण पोटात मात्र वेगळेच आहे. ब्राह्मण पत्रकार/ संपादकांवर जातीयतेचा तसेच यापुढे जाऊन श्रमाधिष्ठीत वर्गवाद माजवण्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
बाळशास्त्री जांभेकरांपासून लो. टिळक, गो. ग. आगरकर, शि. म. परांजपे, विद्याधर गोखले, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे तसेच नवीन काळातील गडकरी, तळवलकर, रायकर, गांगल या पत्रकारांनी जातीय दुही माजवणारे लेखन केल्याचे आढळत नाही. तसेच त्यांनी लेखकाने शोधलेला पत्रकारितेतील श्रमाधिष्ठीत वर्गवाद पसरवलेला नाही (संदर्भ – मानाची पदे आणि महत्त्वाची पदे तसेच पत्रकारितेतील कामांची विभागणी याबाबतचे लेखकाचे प्रतिपादन.).
उलट या पत्रकारांनी सर्वसमावेशक आणि लोककल्याणकारी पत्रकारितेचा आदर्शच घालून दिला आहे. सातव्या परिच्छेदात डोळे म्हणतात, ‘ब्राह्मण कसे वागतात याकडे बारीक लक्ष ठेवणारे बहुजन या संगणकविश्वाची माहिती करून घेऊ लागले.’ या वाक्यातून त्यांना कुणाचे श्रेष्ठत्व कबूल करायचे आहे? आजकाल ब्राह्मण-ब्राह्मणेतर संदर्भात लेखन करून प्रसिद्धी मिळवण्याची पद्धत रूढ होऊ पाहत आहे. साहित्य क्षेत्रापासून, कला, नाटय़, क्रीडा, इतिहास, अर्थ, संशोधन, शिक्षण क्षेत्रापर्यंत तसेच आता पत्रकारितेतही ब्राह्मणांवर टीका करणाऱ्यांची मांदियाळी निर्माण झाली आहे.
पुढे पुढे तर डोळेंचा लेख इतका भरकटला आहे की, ब्राह्मणांनी परदेशी नोकरी, धंदे, शोध यामुळे बहुजनांना संधी प्राप्त झाली असे विधान केले आहे. या संदर्भात त्यांनी कोणता पुरावा/आकडेवारी तपासली? हे लिहिताना ब्राह्मण पत्रकार-संपादकांनी लिहिते केलेले बहुजन लेखक त्यांना आढळले नाही का? प्रस्तुत लेखाचा शेवट काहीसा अचानक होतो. शेवटाकडे लेखकाचा गोंधळ उडालेला दिसतो. डोळेंना पत्रकारितेत अस्तित्वात नसलेला श्रमाधिष्ठित वर्गवाद समोर आणायचा आहे की ब्राह्मणेतरांची पत्रकारितेतील प्रगती मांडायची आहे हेच कळेनासे होते. पत्रकारितेतील लेखन हे कोणताही जातीय मापदंड लावून वाचले जात नाही.
कपिल काळे, चारुता प्रभुदेसाई, पुणे.