‘लोकरंग’(१२ ऑगस्ट)मधील ‘सारे काही बोलाचेच’ हा गिरीश कुबेर यांचा अण्णा हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वावर व त्यांच्या आंदोलनाबाबत मांडलेला लेखाजोखा आवडला.
अण्णा हजारे यांनी भ्रष्ट व्यवस्था बदलण्याबाबत जे जनआंदोलन केले व त्यांद्वारे लोकपाल विधेयक सरकार दरबारी पोहोचले आहे. तसेच राज्यांतील लोकायुक्त यांच्या नियुक्तीबाबतही काही सकारात्मक/ नकारात्मक वातावरण यावर झालेले आहे. अलीकडच्या आंदोलनाला योग्य प्रतिसाद सरकारने दिला नाही. म्हणून टीम अण्णांनी त्यांची टीम रद्द केली आहे व राजकारणात उतरून याचा सामना करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय योग्य आहे व जनतेने ७५ टक्के त्याचा पाठिंबा दर्शविला आहे. भ्रष्ट व्यवस्था बदलण्यासाठी लोकशाही मार्गाने मुकाबला करणे केव्हाही योग्यच आहे. त्यासाठी स्वतंत्र पक्ष – संघटना उभी करणे हेही क्रमप्राप्त आहे. परंतु अशी यंत्रणा उभी करण्यासाठी व त्याचे पुढारीपण कोण करणार असा प्रश्नही त्यांच्यापुढे आहे.
आज भारतात अनेक विचारवंत आहेत. त्यापैकी गांधी विचारांचा आग्रह धरणारेही अनेक ख्यातनाम विचारवंत आहेत; ज्यांना भ्रष्ट व्यवस्था बदलाबाबत खूप काही वाटते. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली असतानाही देश सुराज्य आणू शकत नाही. आजही अनेक खेडय़ांत विकासगंगा पोहोचलेली नाही, ही वस्तुस्थिती विचारात घेता व गावपातळीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत जी भ्रष्ट व्यवस्था वाढत चाललेली आहे, त्याचा मुकाबला करणे आता गरजेचे वाटते. अण्णांना याची तळमळ आहे. ती सुधारण्याची हीच वेळ आहे असे वाटते. योगायोगाने याचवेळी अडवाणींनीही येत्या निवडणुकीत तिसरी आघाडी येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांच्यावर पक्षांतून टीका होत असली, तरी लोकशाही वाचविण्यासाठी यापुढील काळात – सर्वच विचारवंतांनी गांधीवादी कार्यकर्ते यांनी एकाच मंचावर येऊन-याबाबत विचारमंथन केले पाहिजे. त्याशिवाय भ्रष्ट व्यवस्थेमुळे-महागाईला प्रोत्साहन न मिळता-आपली वाट सुराज्यकडे वळली पाहिजे. अण्णांनीही या दृष्टीने त्याच्या कार्यकर्त्यांनी-टीम अण्णा सदस्य, कोअर कमिटी साऱ्यांनीच विचार केला पाहिजे. आता बोलाचे सोडून विचारमंच व विचारवंतांची भूमिका याकडे लक्ष दिले पाहिजे.
– शरदचंद्र जोशी, पिंपरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा