लोकरंग (३० डिसेंबर)मध्ये शफाअत खान यांनी हसतखेळत एक विदारक सत्य सांगितले आहे, ‘‘सतत उत्तेजीत करणारा टैमपास कुठे शोधावा? काही जण आता आमच्या डोळ्यासमोर उघडय़ावर फाशी द्या म्हणू लागले आहेत, तर त्याहीपेक्षा भारी टैमपासच्या शोधात असणारे काहीजण म्हणतात आम्ही सर्वाना फासावर लटकवतो.’’ तर ‘शब्दारण्य’मध्ये नीरजा लिहितात, ‘‘एकूण माणसाच्या मनात क्रौर्यच वाढत चाललेले आहे. रोजच घडत असतं असं विपरीत कुठे ना कुठे आपण ऐकतो. वाचतो. सुन्न होऊन जातो. काही क्षण आणि पुन्हा शिरतो आपल्याच कोशात.’’ हे सर्व काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि भारतभर चाललेल्या आंदोलनाशी जोडता येते. एका तरुणीवर भर बसमध्ये सामूहिक बलात्कार होतो. अत्याचारही होतात. त्यात ती तरुणी मृत्यू पावते. ही सर्वच लाजीरवाणी गोष्ट आहे. पण त्यावर उपाय शोधण्याऐवजी टोकाच्या भावना व्यक्त केल्या गेल्या. एका भगिनीने तिचे स्मारक उभे करण्याची मागणी केली. म्हणजे कोणत्याही घटनेचा आपल्या स्वार्थासाठी फायदा घ्यायला आपले राजकारणी मागेपुढे पाहणार नाहीत. आणि टैमपासच्या शोधात असणारे त्यांच्याभावेती गोळाही होतील.
हल्ली प्रत्येक गोष्टच सरकारने करावी असा आग्रह धरला जातो आहे. राजकीय पक्षही हीच मागणी उचलून धरून त्या वृत्तीला खतपाणी घालत आहेत. आकडे टाकून वीज चोरणाऱ्यांना पकडून देण्याऐवजी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणे, जाळपोळ करणे यामुळे प्रसिद्धी मिळते.
आजकाल कोणालाही बंधने नको आहेत. रोजच्या जीवनात मी रांग मोडून बसमध्ये घुसतो. सिग्नल नसताना गाडी पुढे दामटतो किंवा रस्ता ओलांडतो. मी माझ्या १०-१२ वर्षांच्या मुलाच्या हातात दुचाकी वाहनांची किल्ली देतो. एवढेच नव्हे तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत त्याच्या पाठीमागे बसून प्रवासही करतो. जेव्हा मी माझ्या मुलालाच असे नियमबाह्य़ वागण्याला प्रोत्साहन देतो, तेव्हा मोठेपणीही तो कोणतेही नियम पाळायचे कारण उरत नाही. अशा वेळी अपघात झाल्यास आंदोलन करायलाही आम्हीच पुढे असतो.
दिल्लीच्या आणि इतर ठिकाणच्या मोच्र्यामध्ये सामील झालेले तरुण-तरुणी ३१ डिसेंबर आणि नवरात्री कशा साजऱ्या करतात हे सर्वश्रुतच आहे. नवरात्रीनंतर आय-पिल्स आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते. हे दरवर्षीच पुढे येते. ६० टक्क्य़ांपेक्षा जास्त तरुण-तरुणींनी विवाहपूर्व लैंगिक संबंधांचा अनुभव घेतलेला असतो. लोकशाहीमध्ये ६० टक्के बहुमत असल्याने स्त्री ही सहज उपलब्ध होऊ शकते असा समजही पसरतो आहे. याउलट तरुणांनी योनीशुचितेचा आग्रह धरू नये असेच वारंवार सांगितले जाते. एवढय़ातेवढय़ा कारणांवरून सिनेमांवर बंदी घालणारे, ‘दबंग’सारख्या चित्रपटांना मात्र गर्दी करतात. फक्त वर्दीतील नायकानेच नव्हे तर सर्वानी हाताळले जाणारे स्त्रीशरीर हेच तरुण-तरुणी गर्दी करून बघतात.
तरुण स्त्रीकडे पुरुषाने आकर्षित होणे नैसर्गिकच आहे. पण अगदी आपल्या भावनांवर संयम ठेवणे ही सुसंस्कृतता असते. भावनांवर एका रात्रीत ताबा ठेवणे शिकता येत नाही, तर रोजच्या व्यवहारातील अगदी लानसहान गोष्टींपासून त्याची सुरुवात होत असते. आणि एकदा ही सवय लागली की आपल्या वर्तणुकीवर दंडुका घेऊन लक्ष ठेवायला सरकारची गरज लागणार नाही. आमच्या लहाणपणी आपल्या प्रत्येक गोष्टीची नोंद देव किंवा चित्रगुप्त ठेवत असतो अशी श्रद्धा होती. पण आता आम्ही देवाला रिटायर केले आहे. पापपुण्य भाकडकथा ठरल्या आहेत. बहुधा त्यामुळेच आमच्या वर्तनावर अंकुश ठेवायला सरकारची गरज भासते आहे.
– शशिकांत काळे, डहाणू रोड, जि. ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा