मडोना लुईस व्हेरोनिका चिकोअ्ने या नावाची सुकन्या इटालियन बापाचा वारसा घेऊन मिशिगन राज्यामध्ये सरळमार्गी, कॅथॉलिक वळणाच्या घरात जन्मली तेव्हा मोठेपणी ती प्रचंड प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना,
आजही पन्नाशीमधली मडोना तशीच आहे. हुशार, अभ्यासू, धोरणी, चलाख पण बेधडक, बेफाट आणि पुष्कळदा आचरटही. आजही तिच्या देखण्या सौंदर्याची जादू ओसरलेली नाही. आजही ती अपशब्दांचा मारा करत असते. डेव्हिड लेटरमननं तिची मुलाखत घेतली होती. त्याचं प्रसारण झालं तेव्हा सेन्सॉरच्या धाकानं केवळ बीप-बीप एवढंच ऐकू येत होतं, इतके वेळा मडोनानं ‘फक् ’ हा शब्द उच्चारला होता. आजही ती चांगलंच गाते-नाचते. तिची आई तिच्या बालपणीच कर्करोगानं वारली; तिचा बाप कडक इटालियन बाप होता. तिला पुष्कळ पुरुष भेटले-समजले, तिची स्वत:ची दोन मुलं आहेत, पण तिचं सारं वैयक्तिक आयुष्य तिच्या गाण्यापासनं जणू ठरवून बुद्ध्याच अंतरावर राहतं. तिची गाणी ही मूलत: ‘एंटरटेनिंग’ असतात. तिचा आवाज मला खूप आवडतो असं नाही, तिच्या कविता बऱ्या असतात, ती मायकेल जॅक्सनइतकी नर्तनात कुशल नाही. पण या साऱ्याचा मिळून जो एकसंध ‘डीस्कोर्स’ होतो, तो मात्र मला आवडतो. तिचे म्युझिक व्हिडीओ, तिचा परिवेश, तिचं हसणं, तिचा व्यासपीठावरचा वावर हे सारंच त्या ‘मडोना डीस्कोर्स’मध्ये सामावलेलं असतं. खरं तर, या जागतिकीकरणाच्या काळात कुठलंच गाणं हे निखळ गाणं राहिलेलं नाही. गाण्याच्या आसपास पुष्कळ गोष्टी असतात आणि त्या साऱ्याचा मिळून एक अनुभव रसिकाला मिळतो. अगदी शास्त्रीय संगीतातही बोटातल्या अंगठय़ा, भरजरी साडय़ा, चकाकणारे तंबोरे, वादकांची बैठक आणि गायकासोबतचं साहचर्य हे सारं मिळून जो डीस्कोर्स उत्पन्न होतो, त्याला आपण रसिक सामोरं जातो.
मडोना तर उघडउघड ‘पॉप’ गाण्यातली. तिचा आणि तिच्या गाण्याचा परिसर भव्य असावा, चकाकता असावा यात शंका नाही. पण तिच्या गाण्याचं एक वैशिष्टय़ असं की या साऱ्यापलीकडेही तिची कविता तगून राहते. पुष्कळदा त्यात सामाजिक आशयही असतो. ‘पापा डोंट प्रीच’ हे तिचं गाणं त्याचं द्योतक आहे. कुमारी माता बापाला म्हणते आहे की ‘बाबा, मला रागवू नका. माझ्या पोटातलं बाळ मी वाढवणार आहे.’ (Oh, I’m gonna keep my baby.) बॉबकटमधली मुळीच न नटलेली मडोना हे गाणं गाऊ लागली तेव्हा अमेरिकेमध्ये चांगलीच खळबळ माजली. कॅथॉलिक पंथाला मुळातच गर्भपात अमान्य असल्यानं त्यानं या गाण्याला पाठिंबा दिला (पुढे बदलत गेलेल्या मडोनावर पोपनं व्हॅटिकन सिटीत बंदी घालण्याइतपत गाडी गेली तो भाग वेगळा.) पण पुष्कळांना ते अनैतिकतेची पाठराखण करणारं गाणं वाटलं. केवढा तरी गदारोळ उठला. टिप्पर गोरसारख्या चळवळीतल्या स्त्रीनं कधी नव्हे तो मडोनाला पाठिंबा दिला. आता मागे वळून बघताना मडोनाला ते आठवून हसू येत असेल नाही? नैतिकतेच्या व्याख्या किती पालटत गेल्या आहेत. आताच्या २०१३च्या ब्लाँड अॅम्बिशन टूरमध्ये मडोना एकेक वस्त्र काढून फेकते तरी कुणाला काही वाटत नाही. तिची बंडखोरी तिनं स्टेज शोवर जास्त उघडपणे दाखवली. कधी ती सूचक हावभाव गाताना करे, कधी तिचा पदन्यास उत्तानतेकडे झुके, पुष्कळदा स्कर्टखालून अंतर्वस्त्र काढून प्रेक्षकांमध्ये फेकून देई आणि ते झेलायला प्रेक्षक अधीर असत. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष जेकस् चिराग त्या शौकीन मंडळींमध्ये असत आणि एकदा ते तसेच अंतर्वस्त्र मांडीवर घेऊन बसून राहिलेले होते अशी ‘गॉसिप’ सर्वत्र फिरत होती. (बाकी हे फ्रेंच रसिकतेला साजेसंच आहे!)
या तिच्या वर्तनाची अमेरिकेला एव्हाना सवय झाली होती पण ‘ब्लॉड अॅम्बिशन टूर’मध्ये तिनं कळस गाठला कारण ‘रोलिंग स्टोन’सारख्या विख्यात संगीत मासिकानंही त्या टूरला ‘Sexually provocative extravaganza’ असं संबोधलं. त्या टूरमध्ये ‘लाइक अ व्हर्जीन’ या गाण्यावर नाचताना तिनं स्टेजवरच्या पलंगावर दोन पुरुषांसोबत प्रणयनर्तन केलं आणि हस्तमैथुनसदृश हालचाली अथवा अभिनय केला. तिची ‘बॅड गर्ल’ इमेज नव्यानं बळावली. खूपदा तिला यापूर्वीही उथळ, वेश्या, गणिका असं संबोधलं गेलं होतं, त्याची उजळणी पुन्हा झाली. पुष्कळ स्त्रीवादी संघटनांनी तिला ‘विमुक्त स्त्री’ म्हणून गौरवलं. बेट्टी फ्रिडन ही स्त्रीवादी लेखिका म्हणाली होती, ‘‘एम.टी.व्ही.वर वावरणाऱ्या बाकी बायांपेक्षा मडोना केवढी धाडसी वाटते, केवढी जिवंत वाटते. तिच्या आयुष्यावर आणि तिच्या लैंगिकतेवर तिचाच ताबा आहे.’’
पण मडोनाचं ते मुळातलं ‘लाइक ए प्रेयर’ गाणं केवढं वेगळं आहे, केवढय़ा सशक्त जाणिवांचा उद्गार त्या गाण्यामधून होतो! चर्चमध्ये एक काळा संत दाखवला आहे. त्याच्या पावलांचं चुंबन घेणारी गोरी मडोना, हे अमेरिकेतल्या असंख्य कृष्णवर्णीयांना भावलेलं चित्र होतं. गोऱ्या बाईनं काळ्या पुरुषाजवळ होता होईतो जायचं नाही या संकेताला जणू त्या गाण्यानं तडाखा दिला होता.
“Life is a mystery, Everyone must stand alone
I Hear you call my name, and it feels like home”
(जगणं एक कोडं असतं, एकटंच उभं राहायचं असतं
सध्या, तू घालतोस साद, तेव्हा शांत शांत वाटतं)
असं म्हणणारी मडोना ही मायकेल जॅक्सन या तिच्या समकालीन पुरुष गायकापेक्षा पुष्कळच वरच्या स्तरावर आहे हे उघडच आहे. आणि म्हणूनच अमेरिकेतलं एक जनमत हे तिच्या ‘बॅड गर्ल’ इमेजपेक्षा विरुद्ध आहे. पुष्कळांना ती कणखर, झुंजार, पन्नाशीतही दोन मुलांना घेऊन जगण्याशी लढणारी स्त्री वाटते. वृद्धांनाही ती आवडते कारण तिला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. ती मद्याला स्पर्श करीत नाही, तेव्हा ड्रग्ज वगैरे गोष्टी लांबच राहिल्या. पॉप संगीतामधले अनेक गायक-गायिका व्यसनांमध्ये अडकून अंती मेलेलेही आहेत. या पाश्र्वभूमीवर मडोना ही लोकांना आवडत असावी यात शंका नाही. आणि (त्यामुळेही) ती पन्नाशीतही तिशीतल्या तरुणीइतकी ‘फिट’ आणि सुंदर असावी हेही लोकांना आवडतं.
मडोनाची जगण्याकडे बघण्याची नजर तिच्या व्यासपीठावरच्या वावराइतकी उथळ नक्कीच नाही. हिंदू संस्कृतीचं तिला आकर्षण आहे, थोडा अभ्यासही आहे. ज्यू धर्मातल्या ‘कबाला’ या उपपंथामधल्या प्रार्थना आणि आराधनाही ती करीत असते आणि म्हणून अनेकांना मडोना हे कोडं सुटत नाही. नैतिकतेच्या पारंपरिक पट्टय़ांना तिनं सहज वाकवलेलं आहे आणि या युगातल्या तरुणाईला तर इतका समग्र विचार करण्याची गरजही बहुतांश वेळेला वाटत नाही. समोर गाणारी गायिका त्या क्षणाला कसं गाते-नाचते आहे हेच त्यांच्या लेखी महत्त्वाचं असतं. पण कलाकार मात्र इतका घट्टपणे वर्तमानाला धरू शकत नाही. त्याचं उभं पुढचं-मागचं आयुष्य त्याच्या अभिव्यक्तीपाशी उभं असतंच. शेक्सपियरनं शायलॉकच्या संदर्भात ज्यू जमातीविषयी म्हटलंय, ‘‘For Suffarance is the badge of all our tribe’’ कलाकारांना गायक-गायिकांना तो सोसण्याचा बिल्ला डकवावा लागतोच. मडोनानं तिचा तो ‘बॅज्’ किती चतुराईनं लपवून लोकाभिरुचीला सांभाळलं आहे! आणि तरी बेसावध क्षणी ‘ती’ दिसतेच. ‘पापा डोंट प्रीच’ म्हणताना तिच्या इटालियन बापाचं अस्तित्व त्या स्वरांवर तरंगताना मला तरी दिसतं. जेव्हा मडोनाचं पन्नास वर्षांनंतर मूल्यमापन केलं जाईल तेव्हा हे सारं विरेल, पण एक नोंद मात्र राहील- जेव्हा पॉपचं प्रांगण एल्व्हीस, फ्रॅक सिनात्रपासून बीटल्स ते मायकेल जॅक्सन हे पुरुष गाजवत होते, तेव्हा त्या पुरुषी चौकटीत मडोनानं एका स्त्रीचा आवाज फार घट्टपणे ठोकून बसवला. तो आवाज फार ताकदीचा नव्हता, दूरदर्शीही नव्हता. पण त्या आवाजानं मरीया कॅरे, बियॉन्से, स्पाइस गर्ल्स अशा अनेक गायिकांची पायवाट मोकळी केली. माझ्या मते हे मडोनाच्या आयुष्याचं श्रेयस आहे आणि त्या आयुष्याचं प्रेयस तर तिला पुरतंच मिळालेलं आहे, नाही? जॉर्ज कलॉड गिलबर्ट या संगीत अभ्यासकानं मडोनाला ‘Great prostitute of mytn, the whore of Babylon’ असं म्हटलं आहे, ते योग्य वाटतं. साधीसुधी वेश्या, गायिका नव्हे तर मंदिरातली (बॅबिलॉनच्या) अतिपवित्र पुजारी वेश्या! ती वेश्या पोस्ट-मॉडर्न जगण्याला साजेशी आहे आणि चौकटीत जगणाऱ्या आपल्यासारख्यांना त्या पवित्र अभिसारिकेचं संगीत-दर्शन हे केवढं जाग आणणारं, समृद्ध करणारं आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा