रघुनंदन गोखले
बुद्धिबळ खेळणारे तर्कटी असतात हा एक अपसमज सामान्य माणसांमध्ये रुजवला जातो. पण बुद्धिबळ खेळणारे मात्र त्यात जगण्याचे तत्त्वज्ञान शोधत असतात. प्रख्यात राजकारण्यांनी, जग बदलणारे सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांनी, मान्यवर लेखकांनी या खेळाविषयी असलेला बंध कसा स्पष्ट केला, त्याविषयी..
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणतात की, बुद्धिबळामुळे माणूस शहाणा आणि एकाग्रचित्त बनतो. ते स्वत: एक बुद्धिबळपटू आहेतच, पण त्यांचे अनेक राजकारणी आणि सेनानी उत्कृष्ट बुद्धिबळ खेळतात. सध्याचे जागतिक बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्कादि डॉरकोविच हे रशियाचे माजी उपपंतप्रधान आहेत. रशियातील काल्मिकीया प्रांताचे अध्यक्ष किरसान इल्युमजिनोव हे १९९५ ते २०१७ पर्यंत जागतिक संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या काल्मीकिया प्रांतात बुद्धिबळ खूप प्रगत केलं. आपले माजी पंतप्रधान नरसिंह राव हेसुद्धा बुद्धिबळप्रेमी होते आणि त्या वेळची आशियाई विजेती अनुपमा त्यांच्या आमंत्रणावरून त्यांच्याशी बुद्धिबळ खेळायला जात असे. क्युबाचा प्रख्यात क्रांतिकारक चे गव्हेरा चांगला बुद्धिबळपटू होता आणि गुणग्राहकही होता. चेक रिपब्लिकचा ग्रँडमास्टर लुडेक पॅकमन याच्याशी खेळल्यानंतर तो म्हणाला, ‘‘लुडेक, मी मंत्री आहे, पण मला यात काहीही रस नाही. त्यापेक्षा मी तुझ्यासारखं छान बुद्धिबळ खेळणं पसंत करीन.’’ थोडक्यात, बुद्धिबळ आणि राजकारणी जीवन यांमध्ये खूप साधम्र्य आहे.
बुद्धिबळ आणि जीवन याविषयी अनेक खेळाडू आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. अमेरिकेचा राष्ट्रपिता म्हणता येईल असा शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन याने नमूद केले आहे की, ‘‘जीवन म्हणजे बुद्धिबळाचा डाव आहे- कायम लढाई, स्पर्धा, चांगले आणि वाईट प्रसंग त्यामध्ये येतात.’’ बेंजामिनने या खेळामुळे आपल्याला काय मिळाले ते सांगितले आहे. तो म्हणतो, ्न‘‘बुद्धिबळामुळे मी काय शिकलो? तर -१. दूरदृष्टी २. परीक्षण आणि ३. सावधगिरी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सद्य परिस्थितीतील संकटांमुळे बावरून न जाता चिकाटीनं मार्गक्रमण करत राहायचं आणि उज्ज्वल भविष्याची आशा धरायची.’’
आंतरराष्ट्रीय म्हणी आणि सुभाषितं..
एका चिनी म्हणीनुसार, आपलं जीवन हे बुद्धिबळच असतं- प्रत्येक क्षणी बदलत राहणारं! आयरिश म्हणीनुसार, बुद्धिबळ हा खेळ खऱ्या अर्थानं जीवनाचं सार आहे. कारण एकमेकांशी लढत असणारे सगळे मोहरे- मग तो राजा असो वा साधं प्यादं असो- सर्वाना खेळ संपला की एकाच पिशवीत जावं लागतं; जसं मृत्यूनंतर सगळय़ांची एकच गत होते. एका प्राचीन भारतीय म्हणीनुसार, बुद्धिबळ असा समुद्र आहे की ज्यामध्ये माशी पाणी पिते आणि हत्ती अंघोळ करू शकतो. एक फ्रेंच सुभाषित सांगतं की, तुम्ही मनानं कणखर असाल तरच बुद्धिबळ खेळा; कारण घाबरट लोकांसाठी बुद्धिबळ नाही.
सहाव्या शतकातील शिरीन आणि फरहाद यांची प्रेमकथा सर्वाना आठवत असेलच. शिरीन ही खुसरो या राजाची राणी होती. खुसरो बुद्धिबळाचा चाहता होता (बहुधा त्यामुळेच तर त्याचं शिरीनकडे दुर्लक्ष झालं नसावं ना?). त्यानं म्हटलं आहे की, बुद्धिबळाच्या खेळात पटाईत नसाल तर तुम्ही राज्य करूच शकत नाही.
महान शास्त्रज्ञ (आणि माजी जगज्जेत्या इम्यानुएल लास्कर यांचा मित्र) अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणतो, ‘‘बुद्धिबळ आपल्या मालकाला स्वत:च्या बंधनात बांधून ठेवतं; त्याचं मन आणि मेंदूला बेडय़ा ठोकतं, जेणेकरून सर्वात बलवान व्यक्तीच्या आंतरिक स्वातंत्र्यालाही त्रास सहन करावा लागतो.’’ सतत बुद्धिबळाचा विचार करणारे आणि त्याच विश्वात राहणारे काही खेळाडू बघितले की आइन्स्टाइनचं म्हणणं पटतं. यावर वाचकांना एका मनस्वी खेळाडूची गंमत सांगायची आहे. तो आहे युक्रेनचा ग्रँडमास्टर वासिली इवानचुक! गोष्ट आहे २०१६ सालची! कतारची राजधानी दोहा इथं जागतिक जलदगती स्पर्धा भरली होती. इवानचुकनं मॅग्नस कार्लसनला पराभूत करून जगज्जेतेपद मिळवलं. सगळे खेळाडू जमले होते बक्षीस समारंभासाठी आणि इवानचुक ग्रँडमास्टर बादुर जोबावाविरुद्ध चेकर नावाचा खेळ खेळत बसला होता. तिकडे रौप्य विजेता ग्रीसचुक आणि कांस्य विजेता कार्लसन यांना पदकं देऊन झाली तरी इवानचुकचा पत्ता नाही. अखेर त्याला धावतपळत जाऊन आपलं सुवर्ण घ्यावं लागलं. तिथंही हा पठ्ठय़ा आपल्या पटावरील परिस्थितीचा विचार करत उभा होता. आपण जगज्जेते झालो आहोत यापेक्षा त्याला त्या कोपऱ्यातील डावाचं आकर्षण होतं. बक्षीस समारंभ संपल्या संपल्या त्यानं जोबावाविरुद्धचा डाव पूर्ण करण्यासाठी धाव घेतली. वाचकांना हा सगळा प्रसंग यू-टय़ूबवर बघायला मिळेल. फक्त टाइप करा- ‘इवानचुक फनी मोमेंट्स.’
लेखकांची विचारमते..
१८ व्या शतकातील जर्मन साहित्यिक जोहान वूल्फगॅन्ग म्हणतो की, आपल्या आयुष्यात आपण जोखीम पत्करतो ते प्रसंग म्हणजे बुद्धिबळातील हल्ल्याची योजना असते. त्यासाठी काही बळी द्यावे लागतात, पण अंतिम विजय आपलाच होतो. जोहाननं सांगितलेलं नाही, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की जर आपली योजना सुनियोजित नसली तर बुद्धिबळातील हल्ल्याप्रमाणे ती आपल्यावर उलटू शकते. बुद्धिबळातील रोमहर्षकता आणि बुद्धिबळातील सुंदर प्रसंग अशी पुस्तकं लिहिणारा असियक नावाचा लेखक लिहितो, जगातील सर्व मादक पदार्थापेक्षा बुद्धिबळाचा आनंद जास्त आहे. चार्ल्स डार्विननंतर उत्क्रांतीवादात प्रगती करणारे रिचर्ड डॉकिन्स हे लेखक / शास्त्रज्ञ अनेक वर्षांपूर्वी लिहून गेलेत- ‘‘मला स्वत:ला संगणकानं मनुष्यप्राण्याला हरवलेलं आवडेल, कारण स्वत:ला जादा समजणाऱ्या मानवजातीला नम्रतेची गरज आहे.’’ त्यांचं स्वप्न डॉकिन्सना जिवंतपणी बघायला मिळालं. डीप ब्लू नावाच्या संगणकानं १९९७ साली त्या वेळच्या जगज्जेत्या गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला. ब्रिटिश सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्थेचे जनक सर जॉन सिमोन सुमारे दीडशे वर्षांपूर्वी लिहून गेलेत की, बुद्धिबळ खेळणं म्हणजे आपल्या मनाला घातलेली गार पाण्याची अंघोळ आहे.
महान खेळाडू काय म्हणतात?
गेल्या शतकाच्या सुरुवातीला डॉ. सिगबर्ट ताराश हे सर्वोत्तम खेळाडू असावेत, कारण त्यावेळच्या जगज्जेत्या विल्हेम स्टाइनिट्झ याला ते नित्यनेमाने हरवत असत. पण स्वत:च्या वैद्यकीय व्यवसायातून त्यांना जगज्जेतेपदासाठीचा महिनोन्महिन्याचा वेळ काढता येत नसे. असे हे डॉ. ताराश आपल्या लिखाणासाठी प्रसिद्ध होते. मी त्यांची काही चटपटीत वाक्ये देतो . १. प्रेम आणि संगीत याप्रमाणे बुद्धिबळात लोकांना आनंदी करण्याची शक्ती आहे. २. अनेक लोक बुद्धिबळाचे मास्टर्स आणि ग्रॅण्डमास्टर्स या पदव्यांचे मालक असतात, पण बुद्धिबळावर खऱ्या अर्थानं मालकी मिळवणं कोणालाही शक्य नाही. ३. संशयी स्वभाव हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. ४. बुद्धिबळ खेळता न येणाऱ्या मानवाची मला दया येते.
बॉबी फिशर उवाच- ‘‘बुद्धिबळ म्हणजे युद्ध आहे आणि ते माझं जीवन आहे.’’ माजी जगज्जेता बोरिस स्पास्की म्हणतो, ‘‘बुद्धिबळ जीवनासारखे आहे, पण जीवन नाही.’’ ग्रँडमास्टर गुफेल्डच्या मते, ‘‘प्रत्येक डाव हा आपल्या आयुष्यासारखा असतो आणि प्रत्येक खेळाडूला आपल्या आयुष्यात अनेक आयुष्यं जगायला मिळतात.’’ याच गुफेल्डनं आपल्या बुद्धिबळ खेळाडू प्रेयसीला प्रेमपत्रात लिहिलं होतं की, तू माझ्या बुद्धिबळातील राणी आहेस आणि मी एक सामान्य प्यादा आहे. माजी जगज्जेत्या कार्पोवचं मत त्याच्या गूढ खेळय़ांप्रमाणे चक्रावून टाकणारं आहे. तो म्हणतो, ‘‘बुद्धिबळ माझं जीवन आहे, पण माझं जीवन बुद्धिबळ नाही. बुद्धिबळ म्हणजे कला, विज्ञान आणि खेळ तिन्ही आहे.’’ बोटिवनीकचं मत थोडं गुंतागुंतीचं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, ‘‘बुद्धिबळ म्हणजे तर्कशास्त्राचं विज्ञान उलगडून सांगणारी कला आहे.’’ बोटिवनीकचा आव्हानवीर आणि आक्रमक खेळण्यासाठी प्रसिद्ध असणारा ग्रँडमास्टर डेव्हिड ब्रॉन्स्टाइन म्हणतो, ‘‘बुद्धिबळ म्हणजे निव्वळ कल्पनेची भरारी.’’ गॅरी कास्पारोव्ह म्हणतो, ‘‘बुद्धिबळ खेळणं म्हणजे डोक्याला यातना देणं आहे.’’ पहिला जगज्जेता विल्हेम स्टाइनिट्झ बुद्धिबळावर अपार प्रेम करायचा. त्याचं म्हणणं होतं, ‘‘बुद्धिबळ खेळणं इतकं प्रेरणादायी असतं की, चांगल्या खेळाडूच्या मनात खेळत असताना वाईट विचार येणं शक्यच नाही.’’ ऑस्ट्रियन ग्रँडमास्टर आणि कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवणारे डॉ. टारटाकोवर म्हणतात की, ‘‘या खेळात शेवटून दुसरी चूक करणारा विजेता असतो; त्यासाठी संपूर्ण डाव अचूक खेळायची गरज नसते.’’
शारीरिक तंदुरुस्ती..
आधुनिक बुद्धिबळ खेळाडूला स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. गेले ते दिवस ज्या वेळी गुफेल्ड, गेलर असे पोट सुटलेले ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धा जिंकायचे. त्या वेळी खेळ फार संथ गतीनं खेळला जात असे. प्रत्येकी २ तास ३० मिनिटांत ४० खेळय़ा झाल्या की मग उरलेला डाव दुसऱ्या दिवशी अशी आरामाची सोय असायची. आता जलदगती, विद्युतगती आणि बुलेट (संपूर्ण डावासाठी फक्त १ मिनिट – याला वाचक राजीव तांबे यांनी ‘गोळीबंद’ हा शब्द सुचवला आहे) अशा स्पर्धा वाढलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त नसाल तर तुमचं काही खरं नसतं.
माजी जगज्जेता मिखाईल बोटिवनीक म्हणत असे की, एक जगज्जेतेपदाचा सामना खेळणं म्हणजे मनावर आणि शरीरावर इतकं दडपण येतं की, खेळाडूंचं आयुष्य किमान दहा वर्षांनी कमी होत असेल. तोच बोटिवनीक पुढे म्हणतो की, कोणता खेळाडू आपलं आयुष्य जगज्जेतेपदाचा सामना खेळण्यासाठी पणाला लावणार नाही? स्वत: बोटिवनीक ८ वेळा जगज्जेतेपदाचे सामने खेळला आणि ८३ वर्षे जगला; त्यामुळे ही अतिशयोक्ती असावी, पण बुद्धिबळ खेळाडूंच्या मनावर आणि शरीरावर भयंकर दडपण येऊ शकतं हेच त्याला सूचित करायचं असावं. १९८४ साली अर्धवट सोडलेल्या कार्पोव- कास्पारोव्ह सामन्याचं कारण तेच होतं. तब्बल सहा महिने आणि ४८ डाव चाललेल्या या सामन्यादरम्यान आधीच बारीक असलेल्या अनातोली कार्पोवचं वजन १० किलोनं घटलं होतं आणि अखेर जागतिक संघटनेचे अध्यक्ष फ्लोरेन्सिओ कॅंपामानेस यांना मधे पडून सामना रद्द झाल्याचं जाहीर करावं लागलं होतं.
सगळय़ाच लोकांचं काही बुद्धिबळाविषयी चांगलंच मत होतं असं नव्हे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट या न्यायानं या खेळात गती नसल्यामुळे नोबेल पारितोषिक नाकारणारा प्रख्यात लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ रागानं म्हणाला होता की, ‘‘बुद्धिबळ हा निव्वळ आळशी लोकांचा खेळ आहे. त्यांना असं वाटतं की ते काहीतरी हुशारीचं काम करत आहेत, पण प्रत्यक्षात ते आपला वेळ फुकट घालवत असतात.’’ आता पिग्मॅलियनसारख्या अजरामर कलाकृतीचा निर्माता बुद्धिबळात हरत असल्यामुळे रागावला तर समजू शकतो, पण अनेक वेळा आव्हानवीर असलेला ग्रँडमास्टर व्हिक्टर कोर्चनॉय काय म्हणतो ते वाचलंत तर तुमचा आपल्या ग्रॅण्डमास्टर्सविषयी निष्कारण गैरसमज होईल. तो म्हणतो, ‘‘सगळे ग्रँडमास्टर डोक्यानं सटक असतात; फक्त त्यांचं वेडेपण कमी-जास्त असतं.’’ बुद्धिबळामुळे मिळणारे फायदे लक्षात घेता मला नाही वाटत वाचक जॉर्ज बर्नार्ड शॉ किंवा कोर्चनॉय यांच्या मताला फारशी किंमत देतील.
gokhale.chess@gmail.com