स्टिव्हन स्पीलबर्गचा ‘लिंकन’ हा चित्रपट सध्या जगभर चर्चेचा विषय झाला आहे. कुठल्याही प्रचलित संघर्षनाटय़ाविना हा चित्रपट लोकशाही व्यवस्थेतील राजकारणाचे सम्यक दर्शन घडवतो. राजकारणाचे गुंतागुंतीचे पैलू, ते करताना लोकहितासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक बऱ्यावाईट तडजोडी आदी तपशील त्यातून कळतातच; परंतु त्याचबरोबर राजकारणाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी त्यातून बदलू शकेल असं खूप काही त्यात आहे. ‘लिंकन’ चित्रपटाच्या निमित्तानेच आजवरच्या लक्षवेधी चरित्रपटांची, ते बनवण्यामागील हेतूंची, त्यांच्या यशापयशाची चिकित्सा करणारा अन्य लेख..
इसवी सन १८६५.
अमेरिका.
सर्वत्र प्रचंड बेदिली माजली आहे. एकाच देशातली राज्यं एकमेकांविरुद्ध सैन्यं उभी करून आपापसातच लढताहेत. एकमेकांच्या रक्तासाठी सगळेच आसुसलेत. अमेरिका आतून-बाहेरून उद्ध्वस्त झालेली आहे, तुटलेली आहे. त्यातल्या काही राज्यांना वंशभेद मिटवायचा आहे, तर काहींना काळ्या नीग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करणं अयोग्य वाटतंय. या मुद्दय़ावरच अमेरिकेत यादवी युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हजारोंच्या संख्येने सैनिक नाहक मरताहेत. या अनर्थयुद्धाला आता चार वर्षे होत आलेली आहेत.
इकडे अब्राहम लिंकन पुन्हा एकदा अध्यक्ष होऊन दोनच महिने झालेत. आणि अमेरिकेच्या संसदेत वंशभेदाचे निर्मूलन करण्याविषयीचा एक महत्त्वाचा ठराव दोन-चार दिवसांतच येऊ घातला आहे. सर्वत्र तणाव आहे. लिंकन यांना तो ठराव चर्चेस आणून मंजूर करायचा आहे आणि त्याचवेळी युद्धही संपवायचं आहे. दोन्हीही एकाच वेळी. एक आधी, दुसरं नंतर- असं नाही. कारण एकाच वेळी दोन्ही गोष्टी झाल्या तरच वंशभेदाचा गहन प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे. अन्यथा तो लटकणार आहे.. रेंगाळणार आहे. सर्वत्र घोर निराशा दिसतेय. आणि यातून काही चांगलं घडू शकेल असं कुणालाच- म्हणजे कुणालाही वाटत नाहीए.
या परिस्थितीत काहीतरी सकारात्मक वाटतंय ते फक्त अब्राहम लिंकन आणि त्यांच्या निवडक साथीदारांना. अगदी निवडकच!
खरं म्हणजे गुलामगिरी नष्ट व्हावी असं बहुसंख्यांना वाटतंय; पण मार्ग दिसत नाहीए. व्हावी अशी इच्छा आहे, पण होईल असं वाटत नाहीए. इच्छा असणं आणि प्रत्यक्ष घडणं यात अंतर दिसतंय. सर्वत्र घोर आणि दाट निराशा. याशिवाय घनघोर युद्धाने सगळे खचलेत, ते वेगळेच.
परिस्थिती ही अशी आहे.
याच परिस्थितीत अब्राहम लिंकन यांची मात्र अव्याहत धडपड चालू आहे. त्यांना लागणारी दोन-तृतीयांश मतं त्यांच्याकडे नाहीत. त्यासाठी त्यांना विरोधी पक्षाचेही काही लोक फोडावे लागणार आहेत. युद्ध संपवणं आणि हा कायदा मंजूर करून घेणं, अशी दोन्ही अवघड कामं लिंकन यांच्या पुढय़ात आहेत. आता ही चर्चा संसदेत येणार म्हणून आपल्या घरीच- म्हणजे व्हाइट हाऊसमध्ये त्यांनी थेडियस स्टिव्हन्स यांना बोलावलं आहे चर्चेसाठी. स्टिव्हन्स यांना हा कायदा यायलाच पाहिजे आणि वंशभेद नष्ट व्हायलाच पाहिजे असं वाटतंय. अगदी मनापासून.
व्हाइट हाऊसच्या शांत स्वयंपाकघरात उतरत्या संध्याकाळी लिंकन आणि स्टिव्हन्स बोलण्यामध्ये गढून गेले आहेत. वातावरण गंभीर आहे.
‘‘तुमचं म्हणणं तुम्ही फार जोरकसपणे नका मांडू. त्यानं लोक बिथरतील. त्यांच्या कलाकलानं घेत राहा, सबुरीने बोलत राहा..’’ लिंकन म्हणताहेत.
‘‘एकदा हे युद्ध संपू दे, मग यातल्या प्रत्येक अन्याय आणि अत्याचाराचा हिशेब लावू आपण. संपत्तीचं वाटप करून टाकू. समता आणू..’’ स्टिव्हन्स कट्टर आहेत आणि आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्याची गरज त्यांना वाटते आहे.
‘‘तसं नको. ते बोलूच नका आत्ता. जेव्हा तीव्र मतभेद असतात तेव्हा हळू जाण्याची गरज असते. लोकांच्या कलाकलानं. अगदी हळुवार. जसा वेळ पुढे सरकत जातो तशी मग सर्वाच्या मनाची तयारी होत जाते..’’ लिंकन म्हणताहेत.
‘‘मला एक गोष्ट कळत नाही,’’ स्टिव्हन्स अस्वस्थ आहेत- ‘‘लोकांच्या मनात काय चांगलं आणि काय वाईट याचं काही सोयरसुतक असतं की नाही? गुलामगिरीसारखी प्रथा वाईट आहे, ती घालवली पाहिजे असं त्यांच्या मनातल्या होकायंत्राला कळत नाही का? खरी उत्तर दिशा कुठली आणि कुठं गेलं पाहिजे, हे त्यांचं होकायंत्र त्यांना सांगत नाही का?’’ स्टिव्हन्सना राहवत नाही. न्यायाच्या आणि चांगुलपणाच्या साध्या साध्या गोष्टी लोकांना का समजत नाहीत, आणि नको तेव्हा नको त्या गोष्टींत राजकारण का आणलं जातं, यावर त्यांना बोलायचं असतं. पण लिंकन त्यांना थांबवतात. म्हणतात, ‘‘तुमची तळमळ मला समजते- स्टिव्हन्स. पण मी तुमचं ऐकलं असतं तर आपण युद्धही हरलो असतो आणि आत्ता आलो आहोत तसे वंशभेद संपविण्याच्या जवळही आलो नसतो.’’
लिंकन पुढे म्हणतात, ‘‘होकायंत्राचं एक असतं. ते फक्त तुम्हाला दिशा दाखवतं. पण त्या दिशेवर असलेले काटेकुटे, खाचखळगे कुठे आहेत आणि त्यावरचा उपाय काय, हे ते नाही सांगत. तुमची दिशा योग्य आहे, पण त्या दिशेने चालताना तुम्हीच खड्डय़ात पडलात तर? संकटात सापडून बुडालात तर? नुसती दिशा माहीत असून उपयोगाचं नसतं, त्यावरच्या अडचणींवर मात करण्याची युक्तीपण माहीत असायला हवी असते..’’ लिंकन बोलता बोलता सत्य सांगून जातात.
हे करायला हवं, तसं व्हायला हवं, तिकडे जायला हवं, तसं उद्दिष्ट ठेवायला हवं, असं आपण सारखं बोलत असतो किंवा ऐकत असतो. हे खरं आहे की, त्याविषयी बोलणारे अत्यंत मनापासून बोलत असतात. आपल्याच आसपास त्यांच्या त्यांच्या मनातल्या होकायंत्रांनी दाखविलेल्या दिशेने जाणारे, धडपडणारे काहीजण आपल्याला दिसतात. त्यांच्या कामाविषयी मग आपल्याला नितांत आदर वाटतो. ही मंडळी समाजाला दिशा देतील किंवा देत आहेत असंही आपल्याला वाटतं. त्यांना पाहिलं की आपल्याला ‘नवी पहाट झाली’ असंही वाटायला लागतं. मग त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना पुरस्कार वगैरे देतो. पुरस्कार दिल्यानं समाजात चांगुलपणा टिकेल आणि समाजाला दिशा मिळेल असं आपल्याला वाटत असतं. अर्थात इतकं सगळं झालं तरी प्रश्न मात्र जिथे होता तिथेच असतो. होकायंत्रही दिशा बरोबर दाखवत असतं; पण दरम्यान तिकडे जाण्याचा मार्ग अधिक भीषण आणि गुंतागुंतीचा झालेला असतो.
स्टिव्हन स्पीलबर्ग यांचा ‘लिंकन’ चित्रपट पाहिला आणि मनात विचारांचं काहूर माजलं. त्याची संगती मन आपल्याकडच्या सद्य:परिस्थितीशी लावू लागलं. आपण महाराष्ट्रात प्रश्न सोडवण्यापेक्षा ते कुरवाळत बसलोय का? अवघड प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी मनोभूमिका आपल्याकडे आहे का? लोकशाही चौकटीत राहून त्यात दिलेल्या आयुधांचा वापर करत मोठे बदल आपण करू शकतोय का? तशी आपली तयारी आहे का?
‘लिंकन’ या चित्रपटात प्रश्नांना असं कुरवाळत बसणं आढळत नाही, तर ते सोडवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आहेत. आग्रह आहेत. प्रसंगी लवचिकता आहे. पटवापटवी आहे. लोकांना विकत घेणं आहे. लालूच दाखवणं आहे. सभागृहातील वाद आहेत. चर्चा आहे. शिव्या घालणं आहे. लोकशाही चौकटीतल्या राजकारणात लागणारे सगळे भाव, स्वभाव आणि डावपेच त्यात आहेत.
हा चित्रपट एक चित्रपट म्हणून किती लोकांना आवडेल किंवा या चित्रपटाला किती पुरस्कार मिळतील हे सांगता येत नाही. स्टिव्हन स्पीलबर्गसारखा माणूस या चित्रपटाचा सूत्रधार, दिग्दर्शक आणि निर्माता असल्याने या चित्रपटाची नोंद तर घेतली जाईलच. शिवाय तो अमेरिकेच्या एका महत्त्वाच्या राष्ट्राध्यक्षांवर आहे, वंशभेदाच्या निर्मूलनाच्या विषयावर आहे; त्यामुळे या चित्रपटाची यथायोग्य आणि सांगोपांग चर्चा सर्वत्र होणार, हेही नक्की आहे.
एक मात्र खरंय, की चित्रपटाचं नाव जरी ‘लिंकन’ असं असलं तरी सर्व कथानक हे लिंकन आणि त्यांचे सहकारी अमेरिकन यादवी युद्धाच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेच्या घटनेत १३ वी दुरुस्ती कशी करवून घेतात, या एका घटनेभोवतीच गुंफलेलं आहे.
ही घटनादुरुस्ती अर्थातच साधीसुधी नाही. संपूर्ण देशातून वंशभेद संपवण्याबाबतची ही घटनादुरुस्ती आहे. आणि लिंकन यांच्याकडे ती घटनादुरुस्ती करण्यासाठी लागणारं संख्याबळ नाही. आहे ती- हा प्रश्न सोडवण्याची दुर्दम्य इच्छा! अगदी त्यांच्या स्वत:च्या पक्षातले सगळे लोकही एकदिलानं त्यांच्याबरोबर आहेत असं नाही. अशा परिस्थितीत त्यांनी हे संख्याबळ कसं मिळवलं, लोकांना कसं पटवलं, कुठल्या युक्त्या वापरल्या, हे सारं सारं या चित्रपटात आहे.
राजकारण रक्तबंबाळ आहे. राजकारण म्हणजे एक व्यवहार आहे. राजकारण म्हणजे चातुर्य आहे. त्यात भावना आहेत. आकांक्षा आहेत. त्यात विविध प्रकारचे मानवी आविष्कार आहेत. ते सर्व जाणून, प्रसंगी त्यांचा उपयोग करून राजकारणातलं ईप्सित कसं साध्य करावं लागतं, याचं उत्तम चित्रण या चित्रपटात आहे. ‘लिंकन’मध्ये खासदारांची मतं जमा करणारा, सौदेबाजी करणारा एक गट आहे. तो कुणाकुणाला काय काय पदं देऊन वंशभेदाच्या निर्मूलनासाठी लोकांची मतं कशी फिरवतो, हे पाहण्याजोगं आहे. राजकारणात राहूनही, लोकांना पटवापटवी करूनही, लोकांमध्ये स्पर्धा, ईष्र्या करायला लावूनही स्वत:चे तात्त्विक अधिष्ठान कसं राखायला लागतं, कसं राखायला पाहिजे, याचं यापेक्षा चांगलं दर्शन अन्यत्र कुठंही झाल्याचं मला तरी माहीत नाही.
हा चित्रपट थोडा शब्दबंबाळ आहे. यात खूप बडबड आहे. पण हा चित्रपट लोकशाहीवर आहे आणि लोकशाहीत शब्द हवेतच. चर्चा हवीच. त्याशिवाय मतं कळणार कशी? मतं मांडणार कशी? आणि निर्णय घेतले जाणार कसे? ही शब्दबंबाळता थोडी सहन केली, तर लोकशाहीतील आशा-आकांक्षांच्या विविध छटा इथे आपल्याला दिसतात. अवघड, गहन, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपलं सर्वाचं सामूहिक मन कसं असायला हवं आहे, हेही या चित्रपटातून आपल्याला दिसतं.. समजतं.
काठावर उभं राहून राजकारणाला आणि राजकारण्यांना नावं ठेवणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गासाठी एक महत्त्वाचा संदेश या चित्रपटातून आपल्याला मिळतो. तो अर्थात तसा घेणं मात्र आवश्यक आहे. आपण लोकशाहीची चौकट स्वीकारली आहे. समाजात कारभाराची तीच पद्धत सर्वार्थानं योग्य आहे असं दिसतं. मग लोकशाहीत आपल्याला चांगले बदल करायचे असतील तर नुसती बडबड उपयोगाची नाही. त्यासाठी काम करावं लागेल. लोकांचं ऐकून घेण्याची कला आत्मसात करायला हवी. आज नाही, पण उद्या लोकांना पटेल म्हणून थांबण्याची तयारी हवी. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना ते पटावं म्हणून सातत्याने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी उपलब्ध कायद्यांचा उपयोग करायला हवा. तसे कायदे नसतील तर कायदे बनवायची प्रक्रिया करायला हवी. ते कायदे पाळले जातात की नाही, हे सतत दक्ष राहून पाहायला हवं. बोलत, ऐकत राहायला हवं. बदल करताना काहींना छोटय़ा गोष्टी, काहींना चणे, तर काहींना फुटाणे आणि काहींना तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान लागतं; ते ओळखायला हवं आणि ते द्यायला हवं. त्यातूनच मग लोकशाहीच्या चौकटीत मोठा सामाजिक बदल करता येऊ शकतो, हे आपल्याला ‘लिंकन’मध्ये दिसतं.
अब्राहम लिंकन या माणसाची फारशी ओळख नव्हती. या चित्रपटामुळेही लिंकन या व्यक्तिमत्त्वाचं संपूर्ण दर्शन होतंच असं नाही. हा चित्रपट इतिहासाच्या मापदंडावर किती खरा उतरतो, हेदेखील माहीत नाही. आपण हे एक कल्पनाचित्र आहे असं जरी मानलं, तरी लोकशाहीच्या, लोकशाहीतील नेतृत्वाच्या आणि राजकारणाच्या एका अगदी वेगळ्या बाजूचं दर्शन ‘लिंकन’मध्ये होतं. ते दर्शन ज्यांनी आपल्याला करून दिलं त्या स्टिव्हन स्पीलबर्ग, लेखकद्वय टोनी कुशनर आणि डोरीस केर्न्‍स गुडविन, अभिनेते डॅनियल डे-लुइस, सॅली फिल्ड, संगीतकार जॉन विल्यम्स आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानले पाहिजेत.
आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर अगदी महत्त्वाच्या क्षणी हा चित्रपट आलेला आहे. सध्या बिकट प्रश्न ‘आ’ वासून आपल्यासमोर आहेत. आपल्याकडेही लोकशाही चौकट आहे. त्या चौकटीत आपण किती शहाणपणा दाखवतो, ते महत्त्वाचं आहे. त्या शहाणपणाकडे जाणारा रस्ता हा चित्रपट आपल्याला नक्की दाखवू शकतो. ते शिकण्याची आपली तयारी मात्र हवी.

No action has been taken against unauthorized boards due to pressure of political leaders
पालिका आयुक्तांच्या आदेशाला कोणी दाखविली केराची टोपली
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Uddhav Thackerays next challenge is not the third aghadi but the challenge of strike rate
उद्धव ठाकरेंपुढे तिसऱ्या आघाडीचं नव्हे, ‘स्ट्राइक रेट’चं आव्हान…
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
inspirational story of Renowned poet and former IPS officer Keki N Daruwalla
व्यक्तिवेध : केकी दारूवाला
Dharmaveer movie shiv sena hindutva
शिवसेनेतील बंडाचे कारण केवळ हिंदुत्व, ‘धर्मवीर’ मध्ये हेच अधोरेखित
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध