अवधूत परळकर
ऐतिहासिक कादंबरी हा एक चमत्कारिक प्रकार आहे. ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेणाऱ्यांना ना धड इतिहास समजत, ना कादंबरी वाचण्याचं समाधान मिळत. ऐतिहासिक कादंबरीकार रंजकता वाढवण्यासाठी काल्पनिक घटना आणि पात्रे त्यात घुसडतात. ऐतिहासिक सत्याचा अशा प्रकारे विपर्यास करणं हे वास्तविक गुन्हेगारी कृत्य. नाटय़पूर्णता वाढवण्यासाठी केलेला हा हस्तक्षेप कालांतरानं इतिहासाचा भाग बनून समाजात रूढ होतो. हे वास्तव लक्षात घेता केवळ इतिहासाचे संदर्भ आहेत म्हणून ‘केला होता अट्टहास’ या कादंबरीला ऐतिहासिक कादंबरी म्हणणं अन्यायाचं ठरेल. हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या ‘एक और दुनिया होती’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद. या कादंबरीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पण कादंबरीकार सर्जनशीलतेच्या नावाखाली ऐतिहासिक घटना आणि आपण निर्मिलेली पात्रे यांत हेतुत: अंतर राखतो. इतिहास हा नाटकाला नेपथ्य असावं त्याप्रमाणे अस्तित्वात आहे. काळ आहे १९७० ते १९९० या दोन दशकांदरम्यानचा. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले संपूर्ण क्रांतीचे दिवस.
जयप्रकाश नारायण यांची चळवळ केवळ सरकार उलथून पाडण्यासाठी नव्हती. छात्र संघर्ष वाहिनीच्या एका मेळाव्यात आपल्याला कोणत्या प्रकारचं परिवर्तन अभिप्रेत आहे हे जयप्रकाश नारायण यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘संपूर्ण क्रांती ही गोष्ट केवळ आंदोलनातून साध्य होणारी नाही. त्यासाठी समाजमानस व समाजरचना या दोन्हींमध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणावे लागेल. आणि हे काम तुम्ही तरुण मंडळीच करू शकाल. जमीनदारी, सावकारी नष्ट केली पाहिजे. जात, धर्म आणि भेदांच्या पलीकडे जाऊन एकात्म राष्ट्र निर्माण होणे यालाच मी ‘संपूर्ण क्रांती’ म्हणतो.’

समाजपरिवर्तनाचं ध्येय समोर ठेवून वावरणाऱ्या तरुणांच्या मनावर ‘क्रांती’ या शब्दाचं किती गारूड असतं याची कल्पना तरुणवयात ज्यांनी परिवर्तनाच्या लढय़ात थोडाफार सहभाग घेतला आहे त्यांना निश्चितच आहे. परिवर्तनाच्या ध्येयाला वाहून घेण्यासाठी तळमळणारे तरुण त्याकाळी देशभर पसरले होते. सामाजिक परिवर्तनाच्या ध्यासाने पछाडलेल्या तरुणांचा एक लहानसा समूह या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या प्रथमपुरुषी निवेदनाद्वारे या गटात असलेले समविचारी तरुण सदस्य, त्यांच्या हालचाली, भेटीगाठी, आपसातली संभाषणे यातून ही कादंबरी आकार घेते. प्रेमच्या मित्रांची ओळख वेगवेगळ्या प्रसंगांतल्या त्यांच्या वर्तनातून, प्रतिक्रियात्मक बोलण्यातून आणि हालचालींमधून होत जाते. प्रेमच्या मनातल्या उलटसुलट विचारांनी, भोवतालच्या वातावरणानं मनात उमटणाऱ्या विविध विषयांवरील प्रतिक्रियांनी आणि प्रेमच्या स्वत:च्या मनात सदोदित चालणाऱ्या चिंतनानं कादंबरीचा बराच भाग व्यापलेला आहे. या तरुणांच्या उक्ती आणि कृतीवर जयप्रकाश नारायण यांच्या प्रबोधनाची अदृश्य छाया पडली आहे. देशात बऱ्याच राजकीय घडामोडी घडताहेत. त्याचे पडसाद तरुणांच्या विचार आणि कृतींतून उमटत राहतात. भोवतालच्या राजकारण व समाजकारणावर नायक मनातल्या मनात भाष्य करताना दिसतो. कादंबरी नायकाच्या आत्मकथनातून पुढे सरकत जाते तसतसे समविचारी तरुणांच्या मनातील गुंते स्पष्ट होत जातात. खरं तर हे समविचारी तरुण पूर्णाशाने समविचारी कधीच नसतात. प्रत्येकाच्या घरची पार्श्वभूमी, कौटुंबिक पर्यावरण आणि समस्या भिन्न असतात. परिवर्तनाचं काम कशा पद्धतीने पुढे न्यायचं यावर त्यांच्या चर्चा होतात. पण प्रत्यक्ष कृती करताना नायकासह सर्वाना व्यक्तिगत अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यातून ताणतणाव निर्माण होतात.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

एकीकडे हे तणावाचं वातावरण, दुसरीकडे कौटुंबिक जबाबदारीपासून मुक्त होऊन परिवर्तन चळवळीत झोकून देऊन सामाजिक विकासाला हातभार लावण्याची तीव्र आच अशा पेचात सापडलेल्या तत्कालीन तरुणांची ही कथा आहे. प्रेम सुस्वभावी आहे. क्रांतीच्या कल्पनेनं तो भारून गेलेला असला तरी आक्रमक वृत्तीचा नाही. त्याच्या बोलण्या-वागण्यात संयतपणा आहे. कुटुंबाचा सुरक्षित आयुष्य जगायचा आग्रह धुडकावून सामाजिक चळवळीत पडणं त्याला सहजी जमत नाही. बाहेरील संघर्षांबरोबर कुटुंबव्यवस्थेतील व्यक्तिगत संघर्ष त्याला गोंधळात टाकतात.

‘केला होता अट्टहास’ कादंबरी घटनाप्रधान नाही. तरीपण त्या काळातील जमिनीशी संबंधित लढय़ांची आणि चळवळींची कल्पना या कादंबरीतून येते. बव्हंशी संवाद आणि चर्चा या माध्यमातून कादंबरीचं कथानक पुढे सरकत जातं. १९७०च्या सुमारास मोठय़ा संख्येनं तरुणवर्ग चळवळीत उतरल्याचं दृश्य दिसू लागलं होतं. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, वशिलेबाजी ही प्रमुख कारणं या उद्रेकामागे प्रारंभी असली तरी व्यवस्थेत र्सवकष बदल होण्याची गरज आहे याचं तरुण समूहाला आकलन होत गेलं आणि चळवळीला व्यापक रूप प्राप्त झालं.

लेखक शिवदयाल स्वत: १९७४ ते ७७ या काळात जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सक्रिय सहभागी होते. त्यामुळे या चळवळीचं समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि त्यात उतरलेल्या तरुण पिढीची संवेदनशीलता यांचं त्यांना जवळून निरीक्षण करता आलं. स्वानुभवाची जोड असल्यानं या कादंबरीत तारुण्यसुलभ आशा-आकांक्षा आणि व्यवस्था बदलण्याची ऊर्मी हे सारं अस्सलपणे उतरलं आहे. या दशकात देशाने अनेक स्थित्यंतरं पाहिली. या बदलांचा परिणाम चळवळीवर होणं स्वाभाविक होते. कालांतरानं आपली परिवर्तनाची स्वप्ने प्रत्यक्षात उतरणं कठीण आहे याचं भान काही तरुणांना येत गेलं. कौटुंबिक सौख्य लाथाडून आपण परिवर्तनाचं वेड डोक्यात घेतलं हे आपलं चुकलं तर नाही ना, या शंकेने ते बेजार झाले. या अनुषंगाने चळवळीतलं दुर्दैवी राजकारण, व्यवस्थेकडून चळवळीतल्या तरुणांना गौण लेखणाऱ्या उद्योगसंस्था यांचं दर्शन वाचकांना घडतं. व्यवस्था प्रामाणिक नागरिकाला कशा प्रकारे वागवते याचा साक्षात्कार घडल्यानं कादंबरीचा नायक अस्वस्थ होतो. पण मूलत: तत्त्वनिष्ठ आणि निश्चयी असल्यानं शांतपणे नव्या वातावरणाला सामोरा जातो. प्रत्येक निर्णय उलटसुलट विचार करून घेण्याची चिंतनशील वृत्ती त्याला काही काळ समाधान देते. पण निराशेचे ढग चोहोबाजूंनी गोळा व्हायला सुरुवात झालेली असते.

जिद्द आणि उत्साहानं समाजपरिवर्तनाच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देणाऱ्या या तरुणांचं शेवटी काय होतं, याचं उत्तर कादंबरीच्या अखेरीस मिळतं. पण तो काही या कादंबरीचा गाभा नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवदयाल यांची ही कादंबरी समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या प्रेम नावाच्या एका तरुणाची जीवनकहाणी नाही. समाजसेवेच्या क्षेत्रात काम करताना सुरुवातीच्या काळात अपयश आल्याने हताश झालेले प्रेमसारखे कितीतरी तरुण देशात तेव्हा होते; आजही आहेत. प्रेम निराश मनाने स्वत:शी अधूनमधून संवाद साधत राहतो.‘‘मी काही केल्याने हे जग बदलणार नाहीये.. ते तर स्वत:च्या चालीने चालत राहणार. किती संत-महात्मे आले आणि गेले. जगानं कुणाची पर्वा केली का? या पददलित देशाला स्वातंत्र्याची नवी ऊर्जा मिळाली, पण त्यानं जग बदललं? व्यवस्था नावाचं मशीन तेच राहिलं, मशीन चालवणारे बदलले. ज्याचं समाधान वाटावे असे काहीच मिळवले नाही आपण.. सगळं व्यर्थ गेलं.’’
निराशेने घेरलेल्या या तरुण गटातली ही चर्चा देशाचं आजचं दारुण चित्र अचूक रेखाटते. ‘‘अवघ्या देशात काही ना काही चालू आहे. लोक वेगवेगळ्या मुद्दय़ांवर चळवळी करत आहेत. पण सगळ्यांचा मिळून एक सूर काही ऐकू येत नाहीये. आणि त्यात हे राजकारण! राजकारण दिवसेंदिवस अनुदार आणि जनताविरोधी होत चाललंय. बेकारांची एवढी मोठी फौज तयार झालीय.. त्यात शिक्षित- अशिक्षित दोन्ही आहेत. हे तरुण कुठे जाणार, काय करणार?’’

कादंबरी वाचून वाचकांच्या मनातही हा प्रश्न रेंगाळत राहतो.. ‘हे तरुण कुठे जाणार, काय करणार?’
लेखकापाशी या प्रश्नाचं उत्तर नाही. पण निराशामय वातावरणात सांगता व्हायला नको; परिवर्तनाचा झेंडा फडकत राहावा म्हणून आशावादी आणि सकारात्मक वातावरणात कादंबरीला पूर्णविराम द्यावा असं लेखकाला वाटलं असावं असं कादंबरीच्या शेवटापाशी आपण येऊन पोचतो तेव्हा वाटतं.
शिवदयाल यांच्या या कादंबरीचा अनुवाद रेखा देशपांडे यांनी इतका सुरेख केला आहे की वाचताना ही मूळ हिंदी कादंबरी आहे याची जाणीव कुठेही होत नाही. समाजपरिवर्तनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि त्यात भरीव कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणवर्गानं अवश्य वाचावी अशी ही कादंबरी आहे.

‘केला होता अट्टहास’, मूळ लेखक- शिवदयाल, अनु.- रेखा देशपांडे, साधना प्रकाशन, पाने- २७२, किंमत- २५० रुपये.