ज्येष्ठ साहित्यिक विलास सारंग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या साहित्यकर्तृत्वाचा धांडोळा घेणारा लेख..
विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिलं. त्यांनी इंग्रजीमध्येही लिहिलं. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचं इंग्रजीकरण केलं. प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचं मराठीकरणही केलं. द्विभाषिकतेच्या सीमारेषेवर वावरताना निर्माण झालेल्या गुंत्यात अडकवून घेताना कविता, लघुकथा, कादंबरी आणि समीक्षा अशा प्रकारांनी त्यांना गाठलं. मध्येच नाटकाचा आणि सारंगांचा संबंधही थोडाफार आला. २०१२ पर्यंत या विविध प्रकारांशी असलेला त्यांचा संवाद चालू होता. गेली दोनतीन वष्रे मात्र त्यांनी लिहिलेलं काही वाचायला मिळालं नाही. सर्जनाचा कालखंड अर्धशतक व्यापणारा असला तरी सारंगांनी विपुल लिहिलं असं म्हणता येणार नाही. त्यांनी मोजकंच लिहिलं. लिहिलं ते कसून लिहिलं. भाषिक पातळीवर अनौपचारिकता आणि वरवरचा साधेपणा असला तरी समजून घ्यायला अवघड लिहिलं. अनेकदा वाचावं तरी काहीतरी शिल्लक उरावं असं वाटायला लावणारं लिहिलं. यामुळेच त्यांच्या वाटय़ाला लोकप्रियता कधीही आली नाही. त्यांना अनुयायी लाभले नाहीत. त्यांची अनुकरणंही झाली नाहीत. मात्र त्यांच्या लिहिण्यातील अस्सलतेनं, खोलीनं आणि प्रयोगशीलतेनं सारंगांचं लेखक म्हणून आजूबाजूला असणं महत्त्वाचं ठरलं. मराठीत आणि इंग्रजीतही त्यांच्या लेखनाला अधिमान्यता मिळाली.
‘सोलेदाद’पासून ‘चिरंतनाचा गंध’पर्यंत, ‘एन्कीच्या राज्यात’पासून ‘अमर्याद आहे बुद्ध’पर्यंत, ‘सिसिफस आणि बेलाक्वा’पासून ‘लिहित्या लेखकाचं वाचन’पर्यंत आणि ‘कविता १९६९-१९८४’ पासून ‘घडत्या इतिहासाची वाळू’पर्यंत अनुक्रमे कथा, कादंबरी, समीक्षा आणि कविता या प्रकारांमध्ये सारंगांनी जे केलं त्याचं तपशीलवार विवरण इथं शक्य नाही. मात्र या सर्व लेखनामागील दृष्टीचा वेध थोडक्यात घेता येईल. तो घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.
‘माझं सारं समीक्षालेखन वाङ्मयविश्वाचा (मराठी व इंग्रजी) शोध घेण्यावर व त्या पाश्र्वभूमीवर मला स्वत:ला कसं लिहिता येईल, यावर केंद्रित केलेलं आहे. माझ्या सर्व समीक्षालेखनाची नाळ सर्जनाशी जुळलेली आहे,’ असं सारंगांनी त्यांच्या समीक्षालेखनाविषयी लिहिलं आहे. त्यांच्या या अवतरणातील शोध घेण्याची वृत्ती केवळ समीक्षालेखनापुरती मर्यादित नाही. त्यांच्या समग्र लेखनाचं स्पष्टीकरण करण्यासाठी शोध घेणं ही वृत्ती महत्त्वाची ठरते. मात्र हा शोध वाङ्मयविश्वापुरता मर्यादित नाही. तो विश्वाएवढा व्यापक आहे. शोधाच्या या असोशीमधूनच हे जग काय आहे, येथे मी काय करायचे आहे, मी म्हणजे आहे तरी काय, माझा या जगाशी काय संबंध आहे, या जगामध्ये मी काही अर्थपूर्ण कृती करू शकतो काय, यांसारखे प्रश्न निर्माण होतात. सारंगांचं सर्जनशील लेखन या प्रश्नांशी झटे घेण्याचा प्रयत्न करतं आणि त्यांची समीक्षा या शोधाची शक्याशक्यता, व्याप्ती, मर्यादा, संदर्भ या गोष्टींचा निर्मितिप्रक्रियेच्या अंगानं शोध घेण्याचा प्रयत्न करते.
मी आणि जग यांच्यातील संबंधांचा शोध घेताना सारंगांनी व्यक्तीच्या असतेपणाला अभिकर्तृत्वात्मक मूल्य दिलं आहे. साध्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या लेखनात व्यक्ती, तिचा आत्मशोध, अर्थपूर्ण किंवा अर्थशून्य कृती करण्याची तिची क्षमता या गोष्टींना मूल्ययुक्ततेचा संदर्भ आहे. हा एक प्रकारचा व्यक्तिवाद आहे असं म्हणता येईल. आपल्याकडे व्यक्तिवादी ही एक शिवीच झाली असली तरी व्यक्तिवादी म्हणजे स्वत:चा स्वार्थ पाहणारी व्यक्ती या समजुतीत अर्थ नाही. व्यक्तीचे असतेपण नेहमीच जगाच्या, समाजाच्या, समूहाच्या अस्तित्वाशी जोडलेलं असतं. समूहाच्या आक्रमकतेविरुद्धचा विद्रोह व्यक्तिवादी भूमिकेतून शक्य होत असतो. सारंगांच्या सर्व प्रकारच्या लेखनात ही जाणीव भिनलेली आहे आणि मराठी साहित्यामध्ये ही जाणीव अपवादात्मक अशी आहे. सारंगांच्या कथेत, कादंबरीत, कवितेत जाणवणारा एकाकीपणा या जाणिवेतून आलेला आहे. मात्र हा एकाकीपणा म्हणजे आजूबाजूला कोणीही नसणं नव्हे. हा एकाकीपणा स्वीकारलेला आहे आणि त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ आहेत. या एकाकीपणामध्ये मूल्यव्यवस्थेच्या आणि संस्थात्मकतेच्या पातळीवरील समाजाचे अस्तित्व सारंगांच्या लेखनातून सतत जाणवत राहतं. व्यक्ती आणि समाज यांच्यामधील ताण हा सारंगांच्या लेखनाला ऊर्जा पुरवणारा महत्त्वाचा स्रोत आहे.
सरधोपट वास्तववाद सारंगांना कधीही मानवला नाही. त्यामुळे व्यक्ती आणि समाज यांच्यामधील ताणतणावांचं चित्रण ढोबळ वास्तववादी पातळीवर ते कधीही घेऊन जात नाहीत. या ताणाचं चित्रण करण्यासाठी ते विशिष्ट मानवी परिस्थितीकडं वळतात. पात्रांच्या मनात उतरतात. तिथं चाललेल्या चित्रविचित्र हालचाली त्यांना महत्त्वाच्या वाटतात. हे सारे संहितेच्या पातळीवर आणण्याच्या अटोकाट प्रयत्नांमधून त्यांच्या संहितांचा रूपबंध निर्माण होतो. हे सर्व प्रयत्न सारंग विलक्षण तटस्थतेने करतात. यासाठी वरकरणी रंगहीन वाटणारी, पण विलक्षण लवचीक आणि संयत अशी भाषाशैली सारंगांनी घडवली आहे. वैयक्तिक शैलीबाजपणाचा मोह त्यांनी सतत टाळला आहे. या सर्व विशेषांमुळे खास मध्यमवर्गीय अशा अनुभवविश्वापलीकडे ते वाचकांना घेऊन जातात. १९६० दरम्यानच्या काळात मध्यमवर्गीय सांकेतिकतेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अशा लेखकांमध्ये सारंगांएवढे यश आणखी कोणाला मिळाले असं म्हणता येणं अवघड आहे. १९७५ नंतरच्या काळात नवा मध्यमवर्ग साहित्याच्या क्षेत्रात पुढे आला. जुन्या मध्यमवर्गाशी आपलं भांडण आहे असं सांगत या नव्या मध्यमवर्गानेही खास मध्यमवर्गीय आशयसूत्रं आणि शैली गिरवण्याचा प्रयत्न सुरू केला. या गिरवण्याला सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा आणि सांस्कृतिक पवित्रतेचा संदर्भ आहे. लेखकाच्या असतेपणाची धार बोथट करणाऱ्या या सापळ्यात सारंग कधीही अडकले नाहीत, त्यांनी तडजोडी केल्या नाहीत, समाजाशी जमवून घेण्याच्या तथाकथित उदात्त हेतूंचा मोह त्यांना कधीही पडला नाही. १९७५नंतरच्या काळात साहित्यनिर्मितीच्या पातळीवरील व्यक्तीच्या असतेपणाला असलेली प्रतिष्ठा उणावली आणि सर्व सूत्रं समाजाच्या हाती गेली. व्यक्ती आणि समाज घडवणारे या दोहोंतील ताणतणाव शिथिल झाले. अशा परिस्थितीतही सारंग वेगवेगळे मार्ग शोधत, या ताणतणावांची वेगळ्या पातळीवरील परिमाणं शोधत लिहीत राहिले. लेखक म्हणून सारंगांचा मोठेपणा या तडजोड न करण्याच्या वृत्तीमध्ये शोधता येईल.
व्यक्ती आणि समाज यांच्यातील ताणतणाव प्रभावी आहेत आणि त्याचे अनुभवाच्या पातळीवरील चित्रण जिथं आलं आहे तिथं सारंगांचं लेखन विलक्षण प्रभावी वाटतं. या दृष्टिकोनातून त्यांची ‘एन्कीच्या राज्यात’, त्यांची कविता, त्यांच्या अनेक कथा, त्यांचं समीक्षेवरचं ‘अक्षरांचा श्रम केला’ हे पुस्तक अशा लेखनाचा उल्लेख करता येईल. सारंगांच्या अलीकडं प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांमध्ये संघटनातत्त्व म्हणून व्यक्तीच्या जाणिवेचं महत्त्व काहीसं उणावलं आहे. ‘रुद्र’ ‘तंदूरच्या ठिणग्या’, ‘अमर्याद आहे बुद्ध’ या कादंबऱ्यांमध्ये व्यक्तीची जाणीव नव्हे, तर सादर होणारं जग महत्त्वाचं ठरलं आहे. मिथ्यकथांच्या जंगलात शिरताना वर्तमानाचं अस्तित्व सारंगांनी सतत जागतं ठेवलं असलं तरी व्यक्तीच्या जाणिवेचा लोप, ही या कादंबऱ्यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती आहे. कादंबरीतील जगाला महत्त्व देऊन, मात्र या जगाचं संकल्पन नेहमीच्या जगापेक्षा वेगळ्या पातळीवर ठेवून सारंग काही वेगळं करू पाहत होते असं म्हणता येईल. शेवटच्या काही वर्षांमध्ये सारंगांना बरं आरोग्य आणि स्वास्थ्य मिळालं असतं तर या नव्या प्रयोगाची अर्थसघनता अधिक प्रभावी रीतीनं होऊ शकली असती, असंही म्हणता येईल. तसं झालं नाही, हे खरं.
सारंगांच्या समीक्षेच्या बाबतीतही समांतर असं काही सांगता येईल. वाचनाचा अनुभव, सूक्ष्म वाचन (क्लोज रीिडग्ज) हे त्यांच्या समीक्षेचं बलस्थान आहे. वाचक व्यक्तीला किती विलक्षण गोष्टी जाणवू शकतात याचं प्रत्यंतर घडवून सारंग त्यांच्या वाचकाला थक्क करून सोडतात. छोटी छोटी, पण मूल्ययुक्त अशी निरीक्षणं, संहितांचे एरव्ही कोणाच्या लक्षात येणार नाहीत असे विशेष, कल्पनाशक्तीच्या साहाय्यानं केलेली नवी अर्थनिर्णयणं या गोष्टी सारंगांच्या समीक्षेतून पुढे येतात तेव्हा अनौपचारिक भाषिक बाज असूनही सारंगांच्या समीक्षेचं देखणेपण सतत जाणवत राहतं. पण या गोष्टी पाठीमागे टाकून सारंगांची समीक्षा जेव्हा सामाजिक विश्लेषणात उतरते तेव्हा तिला असलेल्या सद्धान्तिक संदर्भाचं अपुरेपण अस्वस्थ करीत राहतं. लिहित्या लेखकाच्या दृष्टिकोनातून मांडलेली निरीक्षणं अशी या समीक्षेची भलामण करतानाही सद्धान्तिकतेला काही ठिकाणी पर्याय नसतो, या वस्तुस्थितीची जाणीव होत राहते.
हे सगळं जमेस धरूनही हाताळलेल्या साऱ्याच प्रकारांना सारंगांनी उंचावर नेऊन ठेवलं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यांना सांस्कृतिक राजकारण जमलं नाही. आपल्या लेखनावर लिहून यावं यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. आपल्या सामाजिक स्थानाचं सांस्कृतिक भांडवल त्यांनी कधीही केलं नाही. त्यांच्या लेखनाचा कोणी विशेष अभ्यासही केला नाही. असं असूनही एक मोठा लेखक म्हणून आपण त्यांना ओळखतो. कुठल्याही लेखकाला असण्यासाठी हे पुरेसं ठरावं.