हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com
साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात अश्वघोष या बौद्धधर्मीय संस्कृत महाकवीने ‘वाल्मीकिरादौ च ससर्ज पद्यम्’ (बुद्धचरित) अर्थात् ‘महाकवी वाल्मीकि यांनी पहिल्यांदा पद्य-काव्य निर्मिले’ असे म्हटले आहे. ज्येष्ठ संस्कृतज्ञ शेल्डन पोलॉक यांनी दाखवून दिल्यानुसार, इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात लिव्हियस नामक लॅटिन साहित्यकार याला लॅटिन साहित्यामध्ये आद्यकवी मानले जाई. पोलॉक यांनी नमूद केल्यानुसार, या दोघांना त्या- त्या साहित्यविश्वात ‘आदिकवित्वा’चा मिळालेला मान हे संबंधित साहित्य क्षेत्रातील एका महत्त्वाच्या बाबीचे निदर्शक आहे. ढोबळपणे अभिजात संस्कृत साहित्यात वाल्मीकी रामायणाच्या आधीचं साहित्य हे बहुतकरून एका विशिष्ट विषयमर्यादांच्या, विशेषत: काहीसे धर्मकर्मकांड, तत्त्वज्ञानप्रवण कक्षांच्या धाटणीचे राहिले. म्हणूनच बहुधा अश्वघोषादि अभिजात संस्कृत साहित्यकारांच्या धारणेनुसार वाल्मीकी ‘रामायण’ हे पहिले महाकाव्य- ज्यात रामचरित्राच्या निमित्ताने मानवी भावना, संवेदनेचा वैयक्तिक हुंकार प्रकटला. यासंदर्भात मराठीचा विचार करायचा झाल्यास म्हाइंभट यांचे ‘लीळाचरित्र’ किंवा ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांना (मुकुंदराज किंवा अन्य साहित्यकारांच्या रचना या दोन कृतींहून आधीच्या असल्या तरीही) मराठीतील आद्यग्रंथ असे संबोधले जाते हे आपण जाणतो. सामान्य-उच्चवर्णीयेतर समाजातल्या धारणा, सामाजिक-सांस्कृतिक रचनांचे संदर्भ व त्यांवर बेतलेली वैचारिकता या दोन ग्रंथांतून पहिल्यांदाच प्रकट झाली अशी मराठी बुद्धिजीवी विश्वातील धारणा आहे. या धारणेमुळेच हे दोन ग्रंथ मराठी साहित्य चळवळीच्या आरंभीच्या काळातले आदिग्रंथ समजले जातात. वर नमूद केलेल्या लॅटिन साहित्यविश्वातील आदिग्रंथाचे ‘आद्यत्व’देखील या अशाच धारणेवर बेतल्याचे दिसून येते.
खरे तर इतिहास म्हणजे मानवी समाजाच्या भूतकाळातील घडामोडींची गुंतागुंत वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धतींनी मांडणारं शास्त्र. या शास्त्राची पुष्कळशी भिस्त वेगवेगळ्या प्रकारच्या मौखिक व लिखित साधनांवर बेतलेली असते. खरे तर इतिहासातील सर्वच ग्रंथसाधने व त्यांच्या निर्मितीप्रक्रिया संबंधित काळातल्या सामाजिक-आर्थिक-राजकीय व्यवस्थांचे प्रतिनिधित्व करत असतात. उपखंडाच्या इतिहासात वेदांच्या रचनेचा प्रारंभीचा काळ/ प्रारंभीची सूक्ते पाहिल्यास ऋग्वेदीय समाजात आजच्या वायव्य सरहद्द, पंजाब वगैरेंमधील नद्यांच्या खोऱ्यांत संचार करणारे वैदिक कवी- ऋषी समाज त्यांच्या श्रद्धाविषयक धारणांपासून कुटुंबातील रचना, व्यवसाय किंवा अगदी जुगारासारख्या व्यसनांनी देशोधडीला लागलेल्या व्यक्तींची स्वगते इत्यादी अनेक विषय चित्रित झालेले दिसतात. रूढ धारणांनुसार ऋग्वेद किंवा वैदिक साहित्य यांची गणना कर्मठ, सनातनी साहित्यप्रणालीमध्ये होते हे वास्तव इथे अधिक चिंतनीय आहे. चिंतनीय म्हणण्यामागचे कारण इथे स्पष्ट व्हायला हवं. वेदांमधील सूक्ते ही विशिष्ट गोत्रमंडलांतून (ऋषिसमूह) रचली गेली. परंपरेनुसार या रचनांना वेगवेगळ्या व्यक्तींनी संपादित वेदग्रंथांच्या शाखा निर्माण केल्या, उदा. शाकल यांनी बनवलेली सूक्तांची संपादित आवृत्ती ही ऋग्वेदाची शाकल शाखा म्हणून ओळखली जाते. ऋग्वेदातील ऋचांनी देवतांचे स्तवन होते आणि यजुर्वेदातील मंत्रांनी यजन (अग्नीला आहुती अर्पण) केले जाते वगैरे धारणा बनल्या त्या वेदांचा अवकाश धर्मव्यवस्था आणि कर्मकांडे यांच्यापुरता मर्यादित राहण्याच्या प्रक्रियेतून. ही प्रक्रिया चूक की बरोबर असा सनातन प्रश्न वेगवेगळ्या स्तरावर सुरू राहणार असला तरी वेदग्रंथांसारखा एक्स्क्लुजिव्ह साहित्यवर्ग एका विशिष्ट धार्मिक-सांस्कृतिक आणि राजकीय प्रक्रियेतून साचेबद्ध होण्याची प्रक्रिया अनेक शतके सुरू असते आणि ही प्रक्रिया समाजाच्या विशिष्ट पद्धतीने होणाऱ्या रचनेच्या प्रक्रियेसोबत समांतर सुरू असते. यामध्ये अथर्ववेदाचा वेदपरंपरेत समावेश होणे किंवा तांत्रिक अंगाने विकसित होणाऱ्या यातु/जादूप्रक्रिया (magic) वगैरे घटकांचा भद्र, शुद्ध समजल्या जाणाऱ्या विश्वात समावेश इत्यादी गुंतागुंतीच्या प्रक्रिया त्यात आहेत. तसे पाहता इतिहासाची संरचना करताना विशिष्ट ग्रंथांना आद्यत्व मिळणे, किंवा पवित्रताव्यूहात बसवणे किंवा विशिष्ट प्रागतिक/आधुनिक किंवा अगदी कालबा चौकटीत बसवणे, या साऱ्या रचनांचे एक सांस्कृतिक-राजकीय गतिमानतेच्या प्रक्रियेत विशिष्ट असे महत्त्व असते. साधारणत: नवव्या-दहाव्या शतकात दक्षिण भारतात तेलुगू या लोकभाषेतून अतिशय अभिनव असा ‘बहुजन’ लोकधारणांना केंद्रस्थानी ठेवणारा साहित्यनिर्मितीचा प्रवाह सुरू झाला. दोन-अडीच शतकांनी महाराष्ट्रात तीच परंपरा महानुभाव-वारकऱ्यांच्या माध्यमातून सुरू झाली. त्याच्या आधी रुद्रदामन या मध्य आशियातून आलेल्या शक राजघराण्यातील राजाने प्रशस्तीकाव्याच्या माध्यमातून ‘लोकाभिमुख’ (जनसामान्यांना उद्देशून/ लक्ष्य असलेले) साहित्य गुजरात प्रांतात कोरून नव्या साहित्यप्रकाराला साहित्य व्यवहारात आणले. त्याआधी कुशाणांच्या काळात त्यांच्या आश्रयातून अनेक बौद्ध संस्कृत साहित्यकार संस्कृत नाटय़े-काव्ये लिहिण्यास उद्युक्त झाले होते. या साऱ्या घटना साहित्याच्या रचनेच्या इतिहासातील अभिनवतेच्या वेगवेगळ्या कालखंडांतील महत्त्वाचे क्षण म्हणावे लागतील असे पोलॉक यांनी म्हटले आहे. एकीकडे अशी ही मांडणी करताना पोलॉक यांनी एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले आहे. साहित्य व्यवहारातील ही लोकाभिमुखता दाखवून देताना ‘read’ या क्रियापदासाठी संस्कृतात प्रचलनात असलेला धातू आहे ‘वाच्’! ज्याचा अक्षरश: अर्थ लेखकाचे लिखाण वाचकाला म्हणायला लागणे. यावरून मराठीत आलेला ‘वाचन’ या शब्दाचा निराळा, काहीसा तांत्रिक असा आयाम समोर येतो. लेखक जे लिहीत असतो ते वाचत असताना वाचक स्वत:पर्यंत तो आशय एखाद्या संवादासारखा मनात बोलत.. स्वत:पर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळेच शब्द म्हणावे असे औपचारिक संहितीकरण केलेला आशय समाजातील सर्व वर्गाना उपलब्ध करून देणे म्हणजे संबंधित आशय-विचार सर्व समाजापुढे खुले करून देण्यासारखे असते. त्यामुळे वर म्हटल्यानुसार, वेदांसारख्या विशिष्ट ग्रंथांची किंवा एकूण साहित्याची विभागणी शास्त्र, सूत्र, स्मृती अशा वर्गात करून विशिष्ट आर्थिक-सांस्कृतिक-समाजातील प्रवर्गातील लोकांपुरतेच ते साहित्य मर्यादित ठेवले जाते. अंतोनियो ग्रामची या तत्त्वज्ञाच्या म्हणण्यानुसार, ‘भाषा व साहित्य विशिष्ट प्रकारच्या बलाधिष्ठित सामाजिक उतरंडी निर्माण करणाऱ्या राजकारणाला कारणीभूत होतात.’ त्यामुळेच त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘जेव्हा सामाजिक स्तरावर भाषेविषयीचा किंवा साहित्याविषयीचा एखादा प्रश्न उद्भवतो तेव्हा त्यातून अनेक सामाजिक प्रश्न समोर येतात व त्यातून विशेषत: सांस्कृतिक अधिसत्तेचा अन्वयार्थ लावावाच लागतो.’’
शक राजा रुद्रदामन असो किंवा ग्रीक (यवन) राजे अथवा कुशाण असोत; संस्कृतचा राजकीय हेतूंसाठी वापर करत. तसाच त्यापूर्वी अशोकाने पाली भाषेचा वापर आपल्या राजाज्ञा कोरण्यासाठी केला. गुप्तांच्या काळात संस्कृतचे, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊ लागले हे दिसत असले तरी लोकभाषांतून होणारी निर्मितीदेखील कायमच उदारमतवादी, समावेशक अशाच स्थानिक धारणा-विचारांभोवती केंद्रित होती असे नाही. त्यामुळेच वास्तवात प्राकृत म्हणवल्या जाणाऱ्या लोकभाषांचीदेखील कर्मठ, काटेकोर व्याकरणे निर्माण झाल्याची उदाहरणे प्राचीन भारतातच नव्हे, तर मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही दिसून येतात. स्थानिक लोकभाषा, विशेषत: त्यांतील साहित्यनिर्मिती अभिजन ब्राह्मणी म्हटल्या जाणाऱ्या किंवा तिच्याशी गुणसाधम्र्य दाखवणाऱ्या परंपरेतून उदयाला येत जाते. किंवा काही काळ विद्रोहाची भाषा बोलून तिच्या मुख्य प्रवाहाची वृत्ती ब्राह्मणी (किंवा जागतिक संदर्भात बाजारपेठेला अनुकूल असलेल्या मुख्य अभिजन) प्रवाहात सामील होण्याकडे लक्षणीय प्रमाणात झुकू लागते.
आधुनिक साहित्येतिहासात विद्रोहाची भाषा बोलणाऱ्या अनेक वर्गाचा तथाकथित मुख्य प्रवाहांकडे वळलेला ओढा अनेक समीक्षक-अभ्यासकांनी दाखवून दिलेला आहे. अनेकदा ब्राह्मणी-अभिजन प्रवाहांकडे न जाण्यावर कटाक्ष असलेल्या परंपरेचे आपल्यापुरते स्वत:चे कठोर, साचेबंद, बंदिस्त असे विचारविश्व तयार होते. त्यांचे वेगळे संप्रदाय-समूह निर्माण होतात व त्यातून नव्या गुंतागुंतीच्या संरचना निर्माण होतात. या साऱ्या प्रक्रिया साहित्यप्रवाहाची व्याप्ती आणि बहुविधता समृद्ध करत असल्या तरी त्यासोबतच त्या नव्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाला आकार देत असतात. या गुंतागुंती बारकाईने, तपशिलाच्या गुंतागुंतीचे आणि गतिमानतेचे पदर उलगडत, अभिनिवेशरहित राहत पाहणे हा इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आयाम ठरतो. इतिहासाच्या अभ्यासासाठी आवश्यक असा हा साहित्याचा चष्माही इतर अनेक चष्म्यांप्रमाणे बहुरंगी, बहुढंगी व अनेक वास्तवांना दृग्गोचर करणारा असतो. त्यामुळे तो घालताना संबंधित रंगांच्या, ढंगांच्या व गुंतागुंतीच्या वास्तवाच्या जाणिवांचा वेगळा चष्मा मन:चक्षूंसमोर लावणे गरजेचे ठरते.
(लेखक ‘ऑब्झव्र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)