‘झाली का तुमची नौटंकी सुरू?’ मित्राने तिरस्काराच्या सुरात मला प्रश्न विचारला. मी त्याच्याकडे पाहिले तर त्याने वर्तमानपत्रावर बोट ठेवले. होऊ घातलेल्या साहित्य संमेलनासंबंधीच्या बातम्या तिथे होत्या. सर्वसामान्य, पण जागरूक नागरिकही संमेलनासंबंधी अशी कडवट प्रतिक्रिया देतो ती एका संमेलनापुरती मर्यादित नसते. गेल्या दहा-वीस वर्षांत संमेलनाच्या नावाने जे काही तो वाचतो-पाहतो-ऐकतो आहे, त्यामुळे तो असा वैतागलेला आहे. तो वाचनालयातून पुस्तके, मासिके आणतो, दिवाळी अंक वाचतो, काही पुस्तके विकत घेतो, काही साहित्यिकांची भाषणे आवर्जून ऐकतो- या सगळ्यांशी जेव्हा तो संमेलन-प्रकरण ताडून पाहतो, तेव्हा तो चिडतो; आपली कुणी तरी फसवणूक करतं आहे, आपली चेष्टा करतं आहे असे वाटते त्याला आणि त्यातून हा हताश आणि तिखट प्रश्न उमटतो.
खरे तर असे का होते दरवर्षी, याचे उत्तर फार अवघड नाही. आयोजक-संयोजक, महामंडळ आणि घटकसंस्था, उद्घाटक, स्वागताध्यक्ष, राजकारणी मंडळी आणि लेखक म्हणजे अध्यक्ष यांच्या भूमिका (प्रत्येकाला भूमिका असली पाहिजे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ना..) एकदा शांतपणे आणि स्वत:शी लपवाछपवी न करता समजून घेतल्या की, सगळ्या गोष्टी बिसलेरीच्या पाण्यात कचरा स्पष्ट दिसावा अशा ठळक दिसू लागतात.
संमेलनाची गरज (किंवा हौस) कोणाला असते? सुरू असलेले संमेलन संपायच्या आधीच पुढच्या वर्षांसाठी निमंत्रकाचा शोध सुरू होतो. कासावीस आणि व्याकूळ जिवांना वाटते, एक तरी निमंत्रक मिळावा. कधी कधी भाग्य फळफळते आणि तीन-तीन ठिकाणांहून निमंत्रण मिळते. पदाधिकाऱ्यांना आनंद होतो. कारण आता तीन ठिकाणी पाहणी-दौरे, निमंत्रकांकडून ठेवली जाणारी बडदास्त आणि निवडीचे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळतात.
येथे एक गोष्ट स्वाभाविक आणि आवश्यक मानून समजून घेतली पाहिजे. संयोजक हे आमदार, खासदार, सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट, संस्थाचालक अशांपैकी असतात, असावे लागतात. कारण त्यांच्याजवळ पैसा असतो असेच नव्हे; तर त्यांना पैसे गोळा करता येतात, उभे करता येतात. आता काही वेळा त्यांच्या संस्थेतले लोक कुरकुरतात, की प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी हजार ते दहा हजार अशा ठरवून दिलेल्या वर्गणीच्या रकमा अन्यायकारक आहेत वगैरे. पण पहिल्याच सभेमध्ये झालेल्या संस्थाध्यक्षांच्या करडय़ा, सूचक भाषणानंतर सर्वानाच पटायला लागते, की आपल्या गावाचा साहित्यिक-सांस्कृतिक विकास, आपल्या भाऊंचा वाढणारा गौरव, आपल्या दुर्लक्षित भूमीला लागणारे महान विभूतींचे पाय (आणि आपल्या नोकरीची सुरक्षितता) या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. (पण शनिवार-रविवारच्या सुट्टय़ा गमावल्याची खंत उरतेच) तर असो. संमेलनासाठी लागणारे मनुष्यबळ आयोजकांकडे असते. आम्ही साहित्य संमेलनही आयोजित करून आणि यशस्वी करून दाखवू शकतो, अशी त्यांची इच्छा आणि जिद्द असते. (अर्थात, त्यांच्या यशस्वी होण्याच्या कल्पना वेगळ्या असतात) येणारे कुठलेही अडथळे दूर करण्याची क्षमता आणि निषेधाचे सूर शांत करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये असते. पंचक्रोशीत लोकप्रियता आणि दबदबा वाढेल, पुढील प्रगती आणि विकास यांची स्वप्ने ते पाहतात. संमेलनाचे यशस्वी आयोजन ‘साहेबांनी’ पाहावे, त्यांच्या नजरेत भरावे या दृष्टीने उद्घाटनाला बडे सरकार आणि समारोपाला छोटे सरकार यावेत, अशी योजना ते ठरवूनच टाकतात. अर्थाचे दास मग काय करणार? राजकारणी मंडळी व्यासपीठावर अवतरतात ती अशी.
एक मात्र खरे, की आयोजक मंडळी अतिशय समजूतदार आणि स्वातंत्र्यप्रेमी असतात. (प्रत्येकाचे दैवत वेगळे असते. ज्याचा त्याचा साहेब! त्यांना बोलावण्याचे व आवश्यक तेवढे स्वातंत्र्य घेतले की मग ते महामंडळाला स्वातंत्र्य देतात.) अध्यक्ष कोणी व्हावे याचे त्यांना घेणे-देणे नसते आणि एखादेवेळी आयोजकांच्या पसंतीचा अध्यक्ष निवडून आला नाही तरी उत्साहाने निवडून आलेल्या अध्यक्षांचे स्वागत करतात. आणि उत्साह तीन दिवस टिकवून ठेवतात; मनाचा मोठेपणा आणि वृत्ती दिलदार असेल, तर निवडणुकीत पराभव झालेला अध्यक्षीय उमेदवारदेखील; मतपत्रिकांमध्ये घोळ झाला वगैरे कांगावा न करता, त्याच संमेलनाला उपस्थित राहतो, सहभागी होतो.(अमरावतीचे साहित्य संमेलन हे या प्रकारचे उदाहरण होय. एक गोष्ट सांगाविशी वाटते, की आयोजक, महामंडळ, अध्यक्ष यापैकी कोणीही असो, इच्छाशक्ती असेल तर हव्या त्या चांगल्या गोष्टी ठासून करता येतात. अमरावतीकर आयोजकांनी ठामपणे सांगितले की, आमच्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये हे संमेलन भरते आहे. या परिसरात कोणाचाही लहान-मोठा निमंत्रित वा रसिकांना मद्यपान व धूम्रपान अजिबात करता येणार नाही. (केवढे हे क्रौर्य!) कोणी आढळल्यास.. टिंब. टिंब. टिंब..! अखेरीस कोणी तरी बहुसंख्याकांच्या वतीने गयावया केल्यानंतर, आयोजकांनी संस्थेच्या प्रवेशद्वाराबाहेर एका मोकळ्या जागेत, एका कोपऱ्यात आठ बाय आठ असा बंदिस्तवजा झाकलेला कापडी चौकोन- ‘फक्त धूम्रपान’ या अटीवर टाकून दिला होता. संमेलन पाहण्यासाठी येणारे अनेक जण तेथे काय आहे हे पाहण्यासाठी कुतूहलाने जात असत आणि त्या चौकोनात, कोंदाटलेल्या धुराच्या लाटांमध्ये तरंगणारे दाटीवाटीने उभे असलेले, ओठांवर लाल ठिपके असलेले दाढीमिशीधारी अक्राळविक्राळ चेहरे पाहून घाबरून पळून येत असत.)
राजकारण मंडळी व्यासपीठावर तुम्ही बोलावल्यामुळे येतात. तुम्ही म्हणजे स्थानिक आयोजक, महामंडळाचे पदाधिकारी, संमेलनाशी संबंधित लेखकवर्ग इत्यादी आणि काही राजकारणी बोलावूनही येत नाहीत. कारण, राजकारण्यांचे आपसातले हेवेदावे, मागचे-पुढचे हिशेब इत्यादी असतात. लेखक-साहित्यिकांवर ते रागवतदेखील नाहीत, तर रुसवा-फुगवा सोडूनच द्या. त्यांना माहीत असते की लेखक कुरबुर वगैरे करतात. पण दुर्लक्ष करण्याच्याच पात्रतेचे असतात. येतात शेवटी आपल्याकडेच, सरकारी कोटय़ातून फ्लॅट पाहिजे असतो (स्वत:च्या मालकीचे दोन फ्लॅट असतानाही). वेगवेगळ्या कमिटय़ांवरही यांना यायचे असते. काहींना लाल दिव्याची गाडी मिळेल असे पद हवे असते. लेखक मंडळींची कुवत, नियत आणि पाणी पुढाऱ्यांनी जोखलेले असते. चाणाक्षपणा हा पुढाऱ्यांचा गुण निश्चितच लक्षणीय आहे. आपणच नेमलेली मंडळी कशी आहेत आणि काय करतात हेही साहेबांना माहीत असते. कुठे कानाडोळा करायचा आणि केव्हा भुवई वाकडी करायची हेही साहेबांना माहीत असते. आणि वेगवेगळे साहेब त्यांच्या त्यांच्या प्रकृतिधर्मानुसार प्रतिक्रिया देत असतात. उपकृत करून ठेवलेल्या लेखकांकडून कोणते काम, कसे सौजन्याने करून घ्यायचे याचे तारतम्य साहेब लोकांजवळ असते. एकदा तर त्या वर्षीच्या राज्य पुरस्कारप्राप्त पुस्तके आणि त्यांच्या लेखकांची यादी दोन शासनपोषित कवींनी फायलीतून बाहेर काढली आणि संबंधित मंत्रिसाहेबांच्या (गेले ते!) घरी बसून बदलली. नावांची काढ-घाल केली. सुधारित (?) यादी वर्तमानपत्रात आल्यानंतर निवड समितीतल्या लेखकांनी राजीनामा दिल्याचे किंवा निषेध केल्याचे कुठे ऐकिवात आले नाही. जाणती राजकारणी मंडळी जेव्हा साहित्याच्या व्यासपीठावर येतात, तेव्हा गृहपाठ करून येतात, असे अनेकदा अनुभवास येते. त्यांचे बोलणे लालित्यपूर्ण नसेल, पण अवतीभवतीच्या हालचालींवर नेमके भाष्य करणारे आणि उपस्थित जनतेच्या नाडीवर बोट ठेवणारे असते. लेखकाच्या भाषणात पुन्हा पुन्हा येणारा ‘मी’ त्यांच्या भाषणात नसतो. ज्या विषयात प्रावीण्य नाही, त्यासंबंधी गरज भासल्यास मोजके बोलायचे हेही त्यांना कळते. ते बोलून निघून जातात. (कारण त्यांचा वेळ मोलाचा असतो) संमेलनात किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात, लेखकांना वाटत असते की आपले भाषण होईपर्यंत साहेबांनी थांबावे, पण साहेब थांबत नाहीत. सौजन्य, विनम्रता दाखवीत लेखकाची क्षमा मागून मगच जातात आणि काय? व्यासपीठावरील दहा आणि सभागृहातील शंभर लोक साहेबांपाठोपाठ निघून जातात. मग लेखक तुरळक उपस्थितांच्या आणि रिकाम्या खुच्र्यासमोर त्वेषाने भाषण देताना ओळ म्हणतो, ‘आम्हाला वगळा गतप्रभ क्षणी होतील तारांगणे..’
राजकारणी लोकांसमोर जो हजारोंचा समुदाय असतो, तो म्हणजे त्याची शिदोरी असते. भावी वाटचालीची ती सामग्री असते. समाजातील सर्व स्तरांतील लोकांमध्ये आपली प्रतिमा उजळ करण्याची आणि प्रभाव टाकण्याची साहित्य संमेलन ही एक संधी असते. आणि या संधीचा त्यांनी चातुर्याने उपयोग करून घेतला तर त्यांना दोष कसा देता येईल. लेखक मिळणारी संधी गमावतो आणि ते उपयोग करतात, याचा विचार लेखकांनी करावा. बाकी, साहेब ज्या गमती करतात त्यासुद्धा दाद द्याव्या अशाच. ते म्हणतात, ‘आम्हाला साहित्यिक चालतात, तर तुम्हाला आम्ही का चालत नाही?’ क्या खूब! दोन ओळी आठवल्या-
‘इनसे जरूर मिलना, सलीके के लोग हैं
सर भी कलम करेंगे, मगर एहतराम से’
आता विचार लेखकाचा.. त्याला कितीही पुरस्कार मिळाले, त्याचा इतरत्र कितीही सन्मान झाला तरी त्याचे संमेलनाध्यक्षपदाचे आकर्षण काही ओसरत नाही. याचे एक कारण हे आहे, की भूतकाळात काही खरोखरच मोठय़ा लेखकांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे. त्यांच्या यादीत आपले नाव असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण काळ बदलला, परिस्थिती बदलली, लेखक एकदा निवडणुकीत पराभूत झाला तरी पुन्हा तो उभा राहतो. आता तो खरोखरच स्थल-काल-परिस्थिती यांचा विचार करायला लागला आहे. खरे तर प्रदेश-काल-परिस्थिती असे म्हणता येईल. संमेलन कोठे आहे, संयोजक कोण आहेत, याचाही तो अभ्यास करायला लागला आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, हैदराबाद, गुलबर्गा वगैरे नावे त्याच्या आकाशगामी विचारव्यूहातून निसटली होती, ती त्याला आता आठवायला लागली. आता त्याला ‘फिल्डिंग लावणे’ जमू लागले आहे. अध्यक्ष होण्यासाठी निव्वळ साहित्यनिर्मिती पुरेशी नाही, असा साक्षात्कार त्याला झाला आहे. आपली लिहिण्याची खोली आणि फक्त आपले असे लेखक, समीक्षक मित्र- काही जण याला ‘आपला गट’ असेही म्हणतात. तर यांना सोडून लोकांमध्ये मिसळले पाहिजे, किमान काही लोकांना (ज्यांना मतदार असेही म्हणतात) भेटले पाहिजे, असे त्याला कळू लागले आहे. ज्या लोकांचे कधी तोंड पाहिले नाही, त्यांची घरे पाहण्याची वेळ यावी म्हणजे स्वाभिमानी मनाला केवढय़ा यातना! (पण जाऊ दे. कार्यभाग साधल्यानंतर पुन्हा तर आयुष्यभर त्यांचे तोंड पाहणे नाही ना. तेवढेच समाधान.) – सगळी गंमतच आहे.
प्रत्येक जण निवडणूक लढवून, निवडून आल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत पहिलेच वाक्य म्हणतो ते असे – ‘अध्यक्षपदी लेखकाची निवड सन्मानाने व्हायला हवी. त्याच्यावर निवडणूक लढण्याची वेळ येऊ नये.’ ठो ठो करून माणूस हसणार नाही तर काय? ‘तुम्हाला अध्यक्ष का व्हावेसे वाटले’ असे विचारले तर तो म्हणतो, की ‘अध्यक्ष झाल्यामुळे माझे विचार खूप लोकांपर्यंत पोहोचतील.’ बाबा रे, मग गेली चाळीस वर्षे तू जे लिहीत होतास आणि लोक वाचत होते- त्यात अनुस्यूत असा विचार नव्हता का? हे ललित लेखन विचारविरहित असते, की त्या लेखनातून प्रकट करू शकला नाहीस असे विचार तुला मांडायचे आहेत?
संमेलनाचा अध्यक्ष होणाऱ्या लेखकाकडे लोक किती आदराने, श्रद्धेने पाहतात याचे भान सर्वानीच ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला माहीत आहे की तृतीय वा चतुर्थ श्रेणीत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे एक वा दोन आवडते लेखक असतात. तो संमेलनाला येतो तेव्हा स्वत:साठी दोन व मुलांसाठी एक असे पुस्तक घेऊन जातो. ते पाककृतीचे वा सौंदर्यप्रसाधनांचेच नसते हे लक्षात घ्या. सखाराम गटणेची थट्टा करा, मस्करी करा पण कृपया टिंगल करू नका. त्याला हा गोंधळ पाहून काय वाटत असेल याचा विचार करावा. विरोध होतो म्हणून काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकाचे पितृत्व निवडून आलेल्या संमेलनाध्यक्षाने नाकारावे? आणि वर्गात शिकवावे की ‘ना ना राजे हो, येणे आमचे कविकुळासी कलंकु लागेल!’ अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची पूजा करणाऱ्यांनी नियमबाह्य़ सेन्सॉर बोर्डाकडून आपल्या कलाकृतींसाठी तोंडी प्रमाणपत्रे घ्यावीत? काही मोठी मागणी नाही. लेखकाने आपले इमान जपावे, जे संमेलनाध्यक्ष या पदापेक्षा मोठे आहे.
तुम्ही अध्यक्ष झालात की कोणी तुम्हाला केले? अर्ज भरल्यानंतर उमेदवाराचा मते मागण्यासाठी दौरा सुरू होतो. मग नागपूर, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या महामंडळाच्या घटक संस्थांच्या कार्यालयाच्या पायऱ्या (आधी वेळ घेऊन) चढाव्या लागतात. आपल्या निमंत्रणाला (व्याख्यानासाठी किंवा एखाद्या बक्षीस वितरणासाठी पाहुणा म्हणून) नकार देणारा हाच तो लेखकराव हे आठवून, पण कसबी अभिनेत्याप्रमाणे भाव चेहऱ्यावर राखून लेखकाचे स्वागत होते. त्याला जाणे भाग असते. कारण मतांचा गठ्ठा एकेका घटक संस्थेकडे असतो. (पदाधिकाऱ्यांच्या मनात एक भाव, या भावरूपात वा वाक्यात उमेदवाराकडे पाहून येत असतो, ‘अब आ गया ऊँट, पहाड के नीचे’).
गंमत अशी की, हे पदाधिकारी सगळ्याच उमेदवारांचे मनापासून स्वागत करतात. मतदारांच्या भेटी घडवून आणतात आणि अलिप्त राष्ट्रांचा सदस्य असल्यासारखे सहजपणे वागतात. पण त्यांचाही एक लाडका उमेदवार असतो. त्याच्यासाठी ते मतपत्रिका गठ्ठय़ाने गोळा करतात आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानासाठी उभे असणाऱ्यांना गावंढळ म्हणणारे उच्चविद्याविभूषित सुसंस्कृत लोक आपल्या मतपत्रिका निमूटपणे संबंधितांकडे सोपवतात. उगीच नाही एखाद्या घटकसंस्थेचा अध्यक्ष म्हणत, की यांना-यांना आम्ही अध्यक्ष केले किंवा ज्या कोणाला अध्यक्ष व्हायचे असेल त्याने आमच्याकडे यावे म्हणजे आम्ही ‘किंगमेकर’ आहोत. याचा अर्थ अध्यक्षीय निवडणूक हा एक ‘गेम’ असतो, असे म्हणता येते. येथे साहित्याचा आणि वाङ्मयीन गुणवत्तेचा काही संबंध नसतो.
‘बंद करा ही संमेलने’- अशी आरोळी काही जण ठोकतात. पण वास्तू सांभाळता येत नसेल, तर पाडूनच टाकायची हा एकमेव उपाय असतो का? आपल्या आधीच्या पिढय़ांमधील काही सुजाण लोकांनी काही व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही साहित्य संमेलनाची प्रथा सुरू केली. विरोध तर तेव्हाही होताच. या एकूणच संमेलन- ‘व्यवस्थे’तील उणिवा आणि दोष परखडपणे ग्रंथकार सभेस पत्र लिहून महात्मा फुले यांनी दाखवून दिले होते आणि पत्राच्या शेवटी जोतीरावांनी खास आपल्या शैलीत- ‘साधे होके बुढ्ढे का ये पहला सलाम लेव’ असा झिणझिण्या आणणारा दणका दिला होता.
एक मुद्दा फार महत्त्वाचा. उधळपट्टी, जेवणावळी, पंचपक्वान्न्ो, भपका, डामडौल, रुसवे-फुगवे, मानपान, फेटे, तुताऱ्या, आरास- ही सगळी श्रीमंतांघरच्या लग्नसमारंभाची वैशिष्टय़े आहेत; साहित्य संमेलनाची नसावीत. शासनाचे पंचवीस लाख रुपये देताना व घेताना मने मोकळीच असावीत. दातृत्वाचा अहंकार किंवा घेणाऱ्यांमध्ये ओशाळवाणेपणा असण्याची काही गरज नाही. एकदा वरील खर्च कमी करा आणि निमंत्रितांचे मानधन व इतर लाड कमी करा. संमेलन पंचवीस लाखांत नियोजन करून बसवता येते. काही साहित्यिक येणार नाहीत. न येऊ देत. पुढच्या वर्षी बोलावूच नका, तिसऱ्या वर्षी न राहवून स्वत:च येतील.
सतत हात पसरण्यापेक्षा, तो जो महाकोश आहे तो भरीव होण्यासाठी एक वर्षभर प्रयत्न करा. लोकांवर विश्वास ठेवा. ते तुमच्यावर प्रेम करतात. ते तुमचे तळे थेंबाथेंबाने काठोकाठ भरून टाकतील. (सामाजिक कृतज्ञतावाल्यांना त्यांनी नाही का महाराष्ट्राच्या सर्व भागांतून ‘लग्नाची बेडी’च्या प्रयोगाने भरभरून दिले..) तेवढी आच, आस्था, तळमळ आधी आपल्याजवळ पाहिजे. लोकांनाही विश्वास वाटला पाहिजे की, आपण दिलेल्या पैशांतून पदाधिकारी विमानाने प्रवास करणार नाहीत. असे ‘उपभोगशून्य स्वामी’ तुम्ही होऊ शकाल?
लेखकाने आपले अध्यक्षपद पणाला लावले, तर सकारात्मक बदल होऊ शकतो. पण तो उपकृत आणि कृतकृत्य झाल्यासारखा गप्पगार होत असेल, तर त्याला ग्यानबा-तुकोबांपासून केशवसुत-जोतिबांपर्यंत कोणाचाच वारसा सांगण्याचा अधिकार उरत नाही. व्यासपीठावर राष्ट्रपती किंवा सिनेसृष्टीचा शहेनशाह अवतरत असेल तर अध्यक्षाची अवस्था कशी होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आपल्या अस्तित्वावरच आक्रमण होते आहे हे जर लेखकालाच जाणवत नसेल, तर मग दरवर्षी नौटंकी सादर होतच राहणार. आयोजक, पदाधिकारी, पुढारी सारे त्यांना वागायचे तसेच वागतात. एक लेखकच फक्त असा आहे जो लेखकासारखा वागत नाही. बा लेखका (यात सर्व लिहिणारे आले), हृदयाच्या तळापासून एकदा पीळ सैल पडू न देता या ओळी म्हण –
संमेलनातील ‘साहित्य’ हरवले!
मराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर.. ‘झाली का तुमची नौटंकी सुरू?’ मित्राने तिरस्काराच्या सुरात मला प्रश्न विचारला. मी त्याच्याकडे पाहिले तर त्याने वर्तमानपत्रावर बोट ठेवले. होऊ घातलेल्या साहित्य संमेलनासंबंधीच्या बातम्या तिथे होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-01-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व ऱ्हस्व आणि दीर्घ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literature is missing from marathi sahitya sammelan