भारतीय साहित्यात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या २०११च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी उडिया भाषेतील कथा-कादंबरीकार प्रतिभा राय यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्य यांचा वेध
डॉ. प्रतिभा राय या नावाप्रमाणेच  प्रतिभासंपन्न लेखिका आहेत. हिंदी, कन्नड, तमिळ, मराठी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे त्यांची साहित्यिक प्रतिभा फक्त उडिया भाषेपुरतीच मर्यादित न राहता भारतात सर्वत्र पसरलेली आहे, असे म्हणता येईल. भारतीय भाषांची सीमा ओलांडून इंग्रजीतही त्यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे.
डिसेंबर १९९२मध्ये घडलेल्या बाबरी मशीदच्या घटनेनंतर उडिया वर्तमानपत्रात ‘ईश्वर वाचक’ नावाने प्रतिभा राय यांचा एक लेख आला होता. तो मनाला इतका भावला की, त्याचा मराठी अनुवाद करून तो प्रकाशित करण्यासाठी त्यांची परवानगी आणायला आम्ही त्यांच्या कटकच्या घरी गेलो होतो. तो दिवस होता २१ जानेवारी १९९३. तो त्यांचा वाढदिवस होता हे मला नंतर समजलं. इतक्या मोठय़ा लेखिकेकडे जायचं म्हणून माझ्या मनावर खूप दडपण आलं होतं. पण त्यांच्या घरात गेलो आणि त्यांना बघितल्यावर सगळं दडपण एकदम उतरून गेलं. अगदी साधी राहणी, खूप आदरातिथ्य आणि प्रेमळपणे बोलणं. मला माझ्या मोठय़ा बहिणीकडे गेल्यासारखं वाटलं. आता माझ्यासाठी त्या प्रतीभाअपाच (ताई) आहेत. गेल्या वीस वर्षांत (जानेवारी १९९३ ते जानेवारी २०१३) खरोखर तेच नातं तयार झालं आहे. परवानगी तर त्यांनी लागलीच दिली. मी निघताना त्यांना वाकून नमस्कार केला. मी मुंबईला जाते आहे हे समजल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आनंदात जा आणि सुखाने परत ये.’’ (नंतर मी त्यांच्या ‘उल्लंघन’ आणि ‘पूजाघर’ या दोन कथासंग्रहांचा अनुवाद मराठीमध्ये केला. सध्या मी त्यांच्या ‘महामोह’चा अनुवाद करत आहे.)
प्रतिभा राय यांचा जन्म कटक जिल्ह्य़ातील बालीकुदा येथे २१ जानेवारी १९४३ रोजी झाला. त्यांचे गांधीवादी वडील संस्कृतचे मोठे पंडित होते. पेशाने ते शिक्षक होते तरी रामायण व महाभारतावर प्रवचनेही करायचे. आईची शिस्त, वडिलांचे संस्कार आणि निसर्गाबद्दल असणाऱ्या आकर्षणामुळे पाचव्या इयत्तेत असतानाच उडिया साहित्यामध्ये प्रतिभांचं पदार्पण झालं. त्यांनी लिहिलेली ‘सकाळ हेला’ (सकाळ झाली) ही पहिली कविता तेव्हा ‘मीना बाजार’ या पत्रिकेत छापून आली होती. त्या म्हणतात, ‘‘ज्या दिवशी मी माझी पहिली कविता लिहिली, त्या दिवशी माझी साहित्यिक पहाट उगवली.’’
आपल्या मुलीनं डॉक्टर व्हावं अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. पण तिथून नाव काढून ‘बॉटनी’ हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. केलं. आपलं लेखन आणि शिक्षण त्यांनी लग्नानंतर आणि तीन मुलं झाल्यावरही चालूच ठेवलं. त्याचं श्रेय त्या आपल्या आई-वडिलांना व यजमानांना देतात. मुलं मोठी होत असताना ‘शिक्षण’ हा विषय घेऊन त्या एम.एड. झाल्या. पुढे ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ हा विषय घेऊन त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये विभागप्रुमख आणि प्रपाठक म्हणून अध्यापनाचं काम केलं. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर त्यांनी उडिसाच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणूनही काम केलं.
डॉ. प्रतिभा राय यांच्या साहित्य संसारामध्ये १८ कादंबऱ्या, २४ लघुकथा संग्रह, तीन प्रवासवर्णने, बालसाहित्य आणि इतर भाषांमधून अनुवादित केलेलं साहित्य यांचा समावेश होतो. त्यांची पहिली कादंबरी ‘बरसा बसंत बसाख’ १९७४ साली प्रकाशित झाली आणि शेवटची ‘मग्नमाटी’ २००४ साली प्रकाशित झाली. १९७४ ते २००४ या तीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले. कोणार्क मंदिरावर लिहिलेल्या ‘शीलापद्म’ला उडिसा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला (ही मराठीत ‘कोणार्क’ नावाने अनुवादित झाली आहे.). ‘याज्ञसेनी’ला १९९०मध्ये ‘सारला पुरस्कार’ आणि त्यानंतर १९९१मध्ये ‘मूíतदेवी पुरस्कार’ मिळाला (ही मराठीत ‘द्रौपदी’ या नावाने अनुवादित झाली आहे.). हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री लेखिका आहेत. या कादंबरीत द्रौपदीचा व्यक्ती म्हणून त्यांनी वेगळ्या पातळीवर विचार केलेला आढळतो. ‘महामोह’ अहिल्येवर आधारित आहे. ‘आदिभूमी’ ही कादंबरी आदिवासींवर आधारित आहे. ‘मग्नमाटी’ ही ओरिसात १९९९मध्ये झालेल्या भयंकर वादळावर आधारित आहे. त्या सांगतात, ‘‘वादळग्रस्त लोकांमध्ये जाऊन मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होते, तेव्हा वादळामुळे जीवनात त्यांनी जे जे काही घालवलं होतं, ते ऐकूनच माझ्या मनात आणखी एक वादळ सुरू झालं. कादंबरी लिहिताना त्यातील पात्रांची सुख-दु:खं तुमची झाली नाहीत तर लिखाणात प्राण येत नाही. मला स्वत:ला लघुकथांपेक्षा कादंबरी लिहिणं आवडतं. त्यामध्येच तुम्ही जगायला लागता. माझी सगळी पात्रं सकाळी उठल्यापासून माझ्या प्रत्येक वेळापत्रकात माझ्या बरोबर असतात. दिवसभर त्यांचाच विचार.. अगदी गाडी चालवतानासुद्धा. त्यामुळे कादंबरी मी स्वत: जगते. लघुकथा म्हणजे एका थेंबामध्ये अख्खा समुद्र उभा करायचा असतो.’’
त्यांच्या कथांमध्ये ‘स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून, समाजातील तिचं स्थान, तिची अगतिकता, वेगवेगळ्या कारणांनी होणारी तिची लाचारी, तसेच विविध नातेसंबध यांचा शोध घेतलेला दिसतो. त्याचप्रमाणे नवरा म्हणून, मुलगा म्हणून स्त्रीवर असलेलं पुरुषांचं वर्चस्व, स्त्री शरीराची होणारी विटंबना आणि ‘स्त्री’ म्हणजे एक उपभोग्य वस्तू ही भावना यांचं भेदक विश्लेषणही असतं. मुलगी म्हणजे मातीची बाहुली, हुंडय़ापायी त्रास सहन करणारी, पण सर्व अडथळ्यांवर मात करून ती कशी पुढे जाते व समाजात स्वत:चं स्थान कसं निर्माण करते याचाही प्रत्यय त्यांच्या कथांमध्ये येतो. त्यांच्या कथा संवेदनशील वाचकाला निश्चितच अंतर्मुख करतात. त्यांच्या कथांमध्ये ओडिसातील सर्वसाधारण समाज जीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर- विशेषत: कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचं दर्शन, त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेद यामुळे उसळणाऱ्या दंगली, त्यामागचे खरे सूत्रधार या सर्वाचं एका वेगळ्या दृष्टिकोनातून वर्णन केलेलं आढळतं. जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती व श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये  बघायला मिळते.
धर्मभेद/ जातिभेद त्यांना मान्य नाहीत. त्यामुळेच ‘धर्मर रंग कळा’ (धर्माचा रंग काळा) या शीर्षकाखाली पुरीच्या पंडय़ांविरुद्ध, त्यांच्या वागणुकीवर आधारित एक लेख त्यांनी वर्तमानपत्रात लिहिला. तेव्हा पुरीच्या पंडय़ांनी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. ऑक्टोबर १९९९मध्ये झालेल्या वादळामुळे अपरिमित हानी झालेल्या भागात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष काम केलं आणि नंतर तिथल्या विधवा व अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठीही आपल्यापरीने मदत केली.
साहित्याखेरीज त्यांच्या अशा प्रकारच्या कार्यामुळेच २००६ साली त्यांना ‘अमृता कीर्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. येत्या २१ जानेवारीला प्रतिभा राय ७१व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्याच वेळी त्यांच्या ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’ची बातमी म्हणजे अगदी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. साहित्यातला सर्वोच्च सन्मान म्हणजे हा पुरस्कार. त्यांना तो या वयात मिळतो आहे याचं विशेष अप्रूप वाटतं.. कोणत्याही साहित्यिकाचं हेच स्वप्न असणार. ‘उल्लंघन’ या लघुकथा संग्रहासाठी त्यांना २०००चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. इतर पुरस्कारांमध्ये ‘विषुव पुरस्कार’, ‘सप्तर्षी पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या ‘मोक्ष’ कथेवर आधारित निर्माण झालेल्या ‘मोक्ष’ या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या आधी २००७ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने विभूषित केलं. हा पुरस्कार त्यांना ‘साहित्य आणि शिक्षण’ या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला.
ऑस्ट्रेलिया व बांगलादेशमध्ये झालेल्या भारतीय महोत्सवामध्ये, भारतीय लेखक म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. तेथील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी भारतीय भाषा व साहित्य या विषयांवर भाषणं दिली.  जून १९९९मध्ये नॉर्वेत झालेल्या Seventh International  Interdisciplinary Congress on Woman हेंल्लला त्या भारतातर्फे हजर होत्या. त्या वेळी त्यांनी नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये भाषणं दिली. २००० साली झुरीच, स्वित्र्झलडला Third European Conference on Gender Equality in Higher Educationसाठी जाऊन त्यांनी तिथे आपला शोधनिबंध सादर केला.
प्रतिभा राय यांच्या आयुष्यात काही उतार-चढाव आले, पण ते त्यांनी समर्थपणे पेलले. त्यामुळे आपल्या जवळच्या पैकी एखाद्याचा असा चढता, समृद्ध जीवनालेख बघितला की मन आनंदानं भरून जातं आणि तो जीवनालेखही एका स्त्रीचा ही जास्त महत्त्वाची बाब वाटते.
लेखकासाठी आलोचक-समालोचक या दोघांची गरज आहे, असे प्रतिभा राय म्हणतात. काहीजण त्यांच्यावर स्त्रीवादी असल्याचा आरोप करतात. त्यावर त्या म्हणतात, ‘‘मी स्त्रीवादी नाही तर मानववादी आहे. स्त्री आणि पुरुष अशी वेगळी रचना समाजाच्या उत्तम कार्यप्रणालीसाठी झालेली आहे. स्त्रीला मिळालेल्या अंगभूत गुणांची पुढे जोपासना झाली पाहिजे, पण मनुष्य म्हणून स्त्री आणि पुरुष दोघेही समानच आहेत.’’
अशा यथायोग्य लेखिकेला एवढा मोठा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे एक स्त्री म्हणूनही माझीही मान अभिमानानं उंचावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा