नीरजा
या संग्रहातील सगळय़ाच कथा म्हणजे आपल्याशीच आपुला चाललेला तुकडय़ातुकडय़ांतला संवाद आहे. तो कधी आशयघन असतो तर कधी निर्थकाच्या कडय़ावर येऊन स्वत:चाच कडेलोट करतोय. या संग्रहातली जवळजवळ प्रत्येक कथा ही माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांच्या विविध कडय़ांची तयार झालेली साखळीच आहे. ती कधी तुटते, कधी निखळून पडते, तर कधी सलगपणे आपल्याला वेगळय़ाच जगात घेऊन जाते.
संवेदनशील आणि विचारी माणसांना एका विचित्र तिठय़ावर घेऊन आलेला हा काळ आहे. राजकीय अराजक तर आहेच, पण एवढे दिवस लोकशाही आणि संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवत वाढणाऱ्या या पिढीला गेल्या काही वर्षांत आपण नेमक्या कोणत्या चिखलात रुतत चाललो आहोत, हेच कळेनासे झाले आहे. आपल्याला हवंय खूप काही आणि काहीच मिळत नाही ही तीव्र होत चाललेली भावना आणि त्यासोबत जगताना हाती लागलेले निर्थकाचे बुडबुडे फोडत जगणारी तरुण पिढी समोर दिसते आहे. चळवळी, त्यातून आलेलं परिवर्तन वगैरे केवळ बोलण्याच्या पोकळ गोष्टी झाल्यात की काय असा माहोल तयार होतो आहे. गेल्या वीस वर्षांत आलेलं जागतिकीकरण केव्हाच मागे पडलंय आणि जागतिकीकरणाच्या या फुगवलेल्या फुग्याला केव्हाच धार्मिक ध्रुवीकरणाची टाचणी लागली आहे आणि ग्लोबल विश्वात पुन्हा संकुचित अस्मितांचा मळा फुलायला लागला आहे. आता आपली मुळं सांभाळायची, अस्मिता जपायच्या, आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी जिवाचा आटापीटा करायचा, असलेले नातेसंबंध सांभाळायचे की नसलेल्या संबंधांची चिरफाड करत फँटसीत रमायचे, हे कळेनासे झालेली एक पिढी आपल्या सभोवताली वावरते आहे. परिवर्तन आणि चळवळींचा परिणाम झालेली ही पिढी विचारही करतेय. पण तो करताना आपल्या हाती नेमकं काय लागलंय त्याचा शोध घेतल्यावर हाती काहीच लागत नाही याविषयी खंत व्यक्त करतेय आणि आपलं असंबद्ध जगणं आणि मानगुटीवर स्वार झालेला विचित्र काळ त्यातील विसंगती टिपण्याचा प्रयत्न करतेय.
मनस्विनी लता रवींद्र ही अशा पिढीची एक प्रतिनिधी आहे. नव्वोदत्तर काळातील एक महत्त्वाची नाटककार आणि कथाकार असलेल्या या मुलीनं जिथं स्त्रियांचा वावर अत्यंत कमी आहे अशा नाटकासारख्या क्षेत्रात तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहेच, पण एक कथाकार म्हणूनही आपली ओळख मिळवली आहे. तिच्या ‘ब्लॉगच्या आरशाआड’ या कथासंग्रहात तरुण पिढीच्या बदलत गेलेल्या जाणिवांचे आणि जगण्याचे संदर्भ आले आहेत. ऐंशीनंतरच्या दशकात प्रामुख्यानं आलेल्या स्त्रीवादी चळवळीचं आणि सांविधानिक मूल्यांचा अंगीकार करत जगणाऱ्या पिढीचं ती अपत्य आहे. त्यामुळे अत्यंत विचारी, आत्मभान आलेली, स्त्रीत्वाच्या चौकटीतून स्वत:ला मुक्त करून घेऊन एक व्यक्ती म्हणून जगण्याला भिडण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी आणि हा काळ अंगावर घेऊन त्याला भिडण्याचं सामथ्र्य आलेल्या लेखिकांपैकी एक असलेली मनस्विनी आपल्या भावभावना, लैंगिक प्रेरणा, त्यातील विविध प्रकारचे गुंते अत्यंत सशक्तपणे व्यक्त करतेय. पहिल्या संग्रहात तिनं तिची ही चुणूक दाखवलेली आहेच. अलीकडेच आलेल्या ‘हलते डुलते झुमके’ या संग्रहातदेखील ती त्याच ताकदीनं स्त्री-पुरुष दोघांच्याही मनाच्या तळाशी पोहोचून त्यातले विविध तरंग नेमकेपणाने टिपून ते आपल्या पुढे आणते. त्याला या काळाचे संदर्भ आहेत. या काळातल्या निर्थकतेचे आणि हातातून सुटत चाललेल्या जगण्याचे संदर्भ आहेत.
या संग्रहातील जवळजवळ सगळय़ाच कथा म्हणजे आपल्याशीच आपुला चाललेला तुकडय़ातुकडय़ांतला संवाद आहे. तो कधी आशयघन असतो तर कधी निर्थकाच्या कडय़ावर येऊन स्वत:चाच कडेलोट करतोय. या संग्रहातली जवळजवळ प्रत्येक कथा ही माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांच्या विविध कडय़ांची तयार झालेली साखळीच आहे. ती कधी तुटते, कधी निखळून पडते तर कधी सलगपणे आपल्याला वेगळय़ाच जगात घेऊन जाते. एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून चौथ्यात घेऊन जाणारा हा निरंतर चाललेला प्रवास अनेकदा निवेदकाला कुठं तरी अज्ञातात सोडून निघून जातो आणि त्याच्याबरोबर वाचकही भरकटत जातो.
हे आजचं वास्तव आहे. विखंडित झालेलं आयुष्य सलगपणे जगता न येण्याची ही शोकांतिका अशी तुकडय़ातुकडय़ांत मनस्विनी उभी करते. उदाहरणार्थ, ‘हलते डुलते झुमके’ ही कथासंग्रहाचंच शीर्षक असलेली कथा किंवा ‘झोप’, ‘कॅसिनेचा रॅपर असलेला बॉक्स’ यांसारख्या कथा एकाच वेळी अनेक पातळय़ांवर घडत जातात. या कथांत एकाच पात्राच्या आयमुष्याला जोडणाऱ्या अनेक कथा समांतरपणे घडताना दिसतात. म्हणजे ‘हलते डुलते झुमके’ या कथेची सुरुवातच आयुष्यातलं बोअरडम सूचित करणाऱ्या ठरावीक, एकसाची घटनांनी होते.
‘दररोज पहाटे चार वाजता एक कोकीळ बरोबर ओरडायला लागतो, हिवाळा संपत आला आणि उन्हाळय़ाची चाहूल लागली की बाथरूमच्या खिडकीतून दर वर्षी सावरीच्या कापसाची म्हातारी उडत येते. मागच्या सलग चार वर्षांपासून मधुरा डिव्होर्सची केस घेऊन येते आणि पुढे तीच स्वत: केस व्रिडॉ करते. तसंच मागची चार वर्ष दर वर्षी फक्त एकदाच आम्ही एकमेकांना किस करतो.’
दर वर्षी त्याच त्याच वेळी आणि त्याच त्या घडणाऱ्या साचेबंद घटनांचा एक तपशीलच ती या कथेत सांगत राहते. तीच स्वप्न, तेच विचार, तीच कारणं, तेच वाद, तेच आग्र्युमेंट आणि तेच तपशील. आयुष्यात काहीच बदलत नाही अशा परिस्थितीतील या कथांतील पात्र तेच ते असंबद्धपणे बोलत राहतात. ‘कॅसिनेचा रॅपर असलेला बॉक्स’मधल्या निवेदकाला अधूनमधून नदीच्या पाण्यात, खरं तर मुंबईसारख्या शहरात पाण्याच्या झालेल्या चिखलात बुडणारा मनुष्य दिसत राहतो. त्याला बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करत राहतो आणि स्वत: परिस्थितीच्या चिखलात रुतत जातो. त्याला भेटणारी माणसंही तीच तशीच तेच बोलणारी, तेच करणारी, त्याच त्या प्रश्नांच्या गुंत्यात गुंतलेली आणि हे गुंते अधिकाधिक जटिल होत चाललेले.
एकूणच सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते असं निर्थक जगणं जगणारी माणसं या सगळय़ाच कथांत भेटत राहतात. ‘झोप’मधील चार पात्रं त्या रात्री वेगवेगळय़ा कारणांनी झोपू शकत नाहीत. असे जगभरातले किती लोक एखाद्या रात्री ठरावीक वेळेत काय काय विचार करत असतील, कोणकोणत्या प्रश्नांनी हैराण होत असतील, कोणती अस्वस्थतता त्यांना निवांत होऊ देत नसेल असे प्रश्न ही कथा उपस्थित करते. दिवसाच्या चोवीस तासांत एकाच वेळी हजारो लोक अस्वस्थ असतील किंवा आनंदात असतील किंवा काहीच करत नसतील, याचा हिशेब मांडला तर हाती नेमकं काय लागेल. खरं तर काहीच नाही, पण ही लेखिका अशी अकस्मात आदळणारी माणसं शोधते आणि ती आपल्यासमोर कोणताही उद्देश मनात न ठेवता उभी करत जाते.
‘वांती’मधल्या निवेदकाच्या घराची बेल वाजते आणि दार उघडल्यावर एक अनोळखी माणूस समोर दिसतो. दार उघडल्याबरोबर तो वांती करतो आणि निवेदकाला आठवत नाही, हा कोण माणूस आहे. संपूर्ण कथेत त्याला काही दिवसांत भेटलेली वेगवेगळी माणसं आठवतात- जी ओळखीची नसतात, पण कुठं तरी दिसलेली असतात आणि निवेदक संपूर्ण कथेत हा वांती करणारा तो आहे का की दुसरा कोणी असा विचार करत आपल्याला वेगवेगळय़ा ठिकाणी वेगवेगळय़ा परिस्थितीत दिसलेल्या खिजगणतीतही नसलेल्या अशा माणसांना भेटवून आणतो आणि कथा संपते. तो सुरुवातीलाच म्हणतो, ‘‘तो कोण कुठचा आठवायला झालेला. ज्याच्या पृथक्करणातून निघतील ते नमुने आणि त्यावरून तयार केलेला अहवाल, मसुद्यांची फेरतपासणी आणि शेवटी निघेल तो निष्कर्ष. हा निघणारा निष्कर्ष म्हणजे लेखकाला ज्या निर्थकाच्या टोकाला घेऊन जाईल तोच.’’
या संग्रहातल्या जवळजवळ सगळय़ाच कथा या अशा पृथक्करणातून निघालेले नमुने आहेत. ‘क्लृप्तीपत्र’सारख्या कथेत लेखिका एका शाळेत जाणाऱ्या दहावीत असलेल्या मुलीच्या मनाचा निरंतर चाललेला खेळ उभा करते. नको असलेल्या कामांत गुंतवले गेल्यानंतर वयात येणाऱ्या मुलांच्या मनात कंटाळय़ावर मात करण्याचे जे अनेक उपाय येतात, त्या उपायांची एक मालिकाच या क्लृप्तीपत्रात आहे. क्लासच्या वाटेवर जाता-येता जो निर्थक उद्योग ही मुलगी करते त्याचा निर्विकारपणा मांडलेला हा आलेख आहे. हा वेळ घालवण्याच्या तिच्या क्लृप्त्या काय तर- रस्त्यावरचे बोर्ड वाचणे, रस्त्यावर पडलेल्या काही उपयोगी वस्तू उचलणे, वाटेवर लागणारे दवाखाने मोजणे, टपऱ्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मोजणे, झाडांची नावं आठवणं, रस्त्यावरच्या किती गाडय़ांचे हॉर्न वाजले ते मोजणं, इमारती मोजणं, रस्त्यावर दिसणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा मोजणे आणि रस्त्यात किती बरे मुलगे दिसतात ते पाहणे. हे असं क्लृप्तीपत्र आणि त्याविषयीचे वेगवेगळे विचार म्हणजे ही कथा आहे.
वेगवेगळे बोर्ड्स पाहिल्यावर या मुलीला पडलेले प्रश्न विलक्षण आहेत. वेगवेगळय़ा पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांना दिलेल्या शुभेच्छांचे बोर्ड पाहून ती म्हणते, ‘‘टीव्हीवरल्या बातम्या ऐकून मला कळलं आहे की या पक्षाची माणसं ओरडून बोलतात. त्याच्या माणसांनी काही खून, मारामाऱ्या करून मोठय़ा विचारवंतांना मारलं तरी हे लोक असा बोर्ड लावू शकतात आणि त्यांना कोणीच काही बोलू शकत नाही. मला कधी कधी कळत नाही की मला वाटतं ते बरोबर आहे की माझ्या आईबाबांना वाटतं तेच मला वाटतं.’’
किंवा रस्त्यात दिसलेल्या देवदेवतांच्या तसबिरी मोजल्यावर गणपती एकदम पॉप्युलर देव आहे हा शोध तिला लागतो. खूप हॅशटॅग आणि लाइक्सवाला असा सेलिब्रिटी देव असल्याचा साक्षात्कार तिला होतो आणि प्रश्न पडतो की- ‘‘हे सारे देव प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आणि माणसाने बनवले आहेत. माणसाने चॉकलेट, दफ्तर, खुर्ची अशा अनेक गोष्टी बनवल्या आहेत, मग त्या का नाही पुजायच्या आणि माणूस देव बनवतो तरी देवाने आपल्याला बनवलंय असं का म्हणायचे?’’ हे असे साधे सरळ प्रश्न ही लेखिका विचारते आणि वाचकांनाही विचार करायला भाग पाडते.
यातली ‘तीव्र सणक’ आणि ‘रहस्य, खून, जहाज आणि प्रेमकथा’ या दोन कथा इतर कथांपेक्षा वेगळय़ा आहेत. ‘तीव्र सणक’ ही गोष्टींतल्या गोष्टीची कथा माणसाच्या स्वप्नांविषयी, व्यवस्थेच्या चौकटीतून त्याच्या मुक्त होण्याविषयी तसेच त्याच्यात असलेल्या लालसा, मोह, वासना, स्वप्न यांविषयी बोलते. खलाशाच्या गोष्टीतला खलाशी आपल्या मुलीला ‘स्वप्नांना खुलं कर, प्रश्नांची उत्तरं होतील’ असं म्हणतो तेव्हा मुक्त जगण्याविषयीच्या आपल्या मनात असलेल्या भयापासून आपल्याला सोडवतो. असाच खलाशी आपल्याला ‘रहस्य, खून, जहाज आणि प्रेमकथा’ या कथेत भेटतो. या दोन्ही कथांत लॅटिन अमेरिकेतील समुद्र आणि त्यावरचा प्रवास येतो. या कथांना गॅब्रिएल गार्सिया मार्खेजच्या काही कादंबऱ्यांचे संदर्भ आहेत. ‘रहस्य, खून, जहाज आणि प्रेमकथा’ या कथेच्या सुरुवातीलाच ही कथा आर्थर कॉनन डायल यांच्या रहस्यकथा मालिकेतील शेरलॉक होम्स आणि डॉ. वॉटसन ही प्रसिद्ध पात्रं तसेच मार्खेजच्या ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ या कादंबरीतील काही पात्रं घेऊन संपूर्ण नवीन कथा लिहिल्याचं लेखिका नमूद करते. त्यामुळे या कथेतील पात्रं ही मूळ लेखकांची असली तरी डॉ. वॅटसन, त्याची बायको आणि या ‘लव्ह इन टाइम ऑफ कॉलरा’ या कादंबरीतली फर्मिना दासा, डॉ. उर्बिनो, फ्लोरेन्तिनो आरिसा ही पात्रं यांची भेट घडवून आणते आणि आपल्या परीनं त्याचे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करते. या दोन्ही गोष्टी प्रेमातली तीव्र सणक व्यक्त करतात. मार्खेजच्या जादूई वास्तववादाचा स्पर्श या दोन्ही कथांना आहे. त्यामुळे त्या जास्त गूढरम्य झालेल्या आहेत. अर्थात या कथा समजून घेण्यासाठी शेरलॉक होम्स आणि मार्खेजच्या कादंबऱ्यांशी परिचित असण्याची गरज भासते. विशेषत: केळीच्या बागांतील मजुरांचे बंड, कॉलराची साथ वगैरे गोष्टी समजून घेण्यासाठी मार्खेजचं आत्मचरित्र किंवा ‘हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटय़ूड’सारख्या कादंबऱ्यांतील संदर्भ माहीत असणं गरजेचं आहे. एकूण या कथासंग्रहात वाचकाची एक बौद्धिक पातळी गृहीत घेतली गेली आहे.
या संग्रहातील बाकी सर्वच कथा या विखंडित आयुष्य जगणाऱ्या पिढीचं शतखंडित आयुष्य दाखविणाऱ्या आहेत. ज्या वाचकांना लेखिकेनं निर्माण केलेल्या असंबद्ध भूलभुलैयात घेऊन जातात आणि निर्थकपणे जगताना हाती नेमकं काय लागलं याचा विचार करायला भाग पाडतात.
पेशाने इंग्रजीच्या प्राध्यापिका ही एक ओळख, तर दुसरी काव्य-कथालेखन या क्षेत्रात तीन दशके सक्रिय लेखिका म्हणून. ‘वेणा’ हा पहिला कवितासंग्रह. ‘ओल हरविलेली माती ’(कथासंग्रह), ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं ’ (कथासंग्रह), ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ ही काही लोकप्रिय पुस्तके. विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन.
nrajan20 @gmail.com