महेश सरलष्कर
अयोध्येत फक्त राम मंदिर उभे केले जात नाही, तर धर्माधारित राजकारणाचे आणि बदललेल्या भारताचे दृश्यरूप निर्माण होत आहे. हे मंदिर भाजपसाठी धार्मिक आणि राजकीय पर्यटन स्थळ असेल. पुढील महिन्यात मंदिराचे उद्घाटन होत असताना देशभरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अयोध्येत जाऊन तिथल्या सध्याच्या हालहवालीचे आणि भविष्यातील संभाव्य कायापालटाचे शब्दचित्र..
सध्या अयोध्येमध्ये लगबग सुरू आहे. २२ जानेवारीला राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या तयारीची रंगीबिरंगी माहिती प्रसारमाध्यमांमधून दिली जात आहे. तोपर्यंतचे सगळे वातावरण राममय करण्याच्या प्रयत्नातून अयोध्येतील राम मंदिर हे संघ परिवार आणि भाजपसाठी किती महत्त्वाचे आहे, हे दिसत आहे. भाजपच्या केंद्रीय पातळीवरच्या एका नेत्याच्या विधानातून तर ते अधिकच स्पष्ट होते. हा नेता म्हणतो, ‘‘ताजमहाल जगात भारताची ओळख आहे. ती अप्रतिम कलाकृती असेलही, पण ती भारताच्या हिंदू संस्कृतीचा हिस्सा नाही. देशातील-परदेशातील लोकांनी ताजमहालला जरूर भेट द्यावी. ताजमहाल आमच्यासाठी (भाजप) पर्यटनस्थळ आहे. त्यातून उत्तर प्रदेशला महसूल मिळतो. पर्यटनस्थळ म्हणून ताजमहाल महत्त्वाचे असेल इतकेच. पण परदेशी पाहुणे भारतात येतात, तेव्हा आम्ही आमच्या संस्कृतीचा भाग म्हणून ताजमहालची प्रतिकृती भेट देत नाही. आम्ही त्यांना गीतेची प्रत भेट देतो..’’ भाजप नेत्याच्या या भूमिकेतून राम मंदिराकडे बघितले तर सध्या जे सुरू आहे, त्याचा नीट अर्थ लावता येऊ शकेल. अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचा संबंध धर्मापेक्षाही राजकीय असल्याचा मुद्दा भाजपच्या या नेत्याच्या विचारातून अधोरेखित होतो. अयोध्येतील राम मंदिर हे भाजपच्या सांस्कृतिक आणि राजकीय भूमिकेचे प्रतीक आहे. त्यामुळे आता यापुढे कदाचित भाजप राम मंदिराची प्रतिकृती परदेशी पाहुण्यांना भेट देऊ लागेल!
अयोध्येमध्ये कधी काळी बाबरी मशीद उभी होती. ९० च्या दशकात ती पाडली गेली आणि तिथे आता राम मंदिर उभे केले जात आहे. खरे इथे फक्त राम मंदिर उभे केले जात नाही, तर धर्माधारित राजकारणाचे आणि बदललेल्या भारताचे दृश्यरूप निर्माण होत आहे! इथे राम मंदिराला भेट देणारा प्रत्येक भक्त केवळ रामाच्या श्रद्धेखातर येईलच असे नव्हे. राम मंदिर हा फक्त श्रद्धेचा विषय असता तर संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद आदी संघटना, भाजप हा राजकीय पक्ष, त्यांच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारांनी अयोध्येचा कायापालट करण्याचा घाट घातला नसता, हे कोणीही मान्य करेल. बाबरी मशीद पाडल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनाला भक्त अयोध्येमध्ये येत होते, आता ते राम मंदिराच्या दर्शनाला येतील. हा फरक निव्वळ धार्मिक नसून राजकीय आहे, त्याही पलीकडे जाऊन हा हिंदूंच्या राजकीय पर्यटनाचा आरंभ आहे, असे म्हणता येईल. राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. तिथे सरसंघचालक मोहन भागवतही असतील. त्यानंतर राम मंदिर भक्तांसाठी खुले होईल, तेव्हा त्यांना मंदिराची भव्यता आश्चर्यचकित करेल.
अयोध्येतील राम मंदिर भाजपसाठी धार्मिक-राजकीय पर्यटन स्थळ असेल. त्याची प्रचीती अयोध्येत पोहोचल्याक्षणी येते. पूजापाठात रमलेल्या, सुशेगात जगणाऱ्या अयोध्येला आता जाग आलेली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये हे पुरातन गाव भारतातील आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटनाचे मुख्य केंद्र बनलेले असेल. सध्या अयोध्येमध्ये बांधकाम सुरू नसलेला एकही कोपरा सापडणार नाही. अयोध्येच्या रेल्वे स्टेशनने कात टाकलेली आहे. आणखी दोन फलाट बांधून स्टेशनची क्षमता वाढवली जात आहे. रेल्वे स्टेशनच्या अत्याधुनिकीकरणाचे काम सुरू असले तरी आतमध्ये गेल्यावर अद्ययावत विमानतळाचा भास होतो. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गरजेच्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जातील. मोठे कार वा टॅक्सीतळ उभारले जात असल्याने अयोध्येमध्ये बाहेरून येणाऱ्या खासगी गाडय़ांची संख्या मोठी असेल. अयोध्येत आत्ता टॅक्सी सेवा नसली तरी कदाचित पर्यटकांना रेल्वे स्टेशनवरून राम मंदिरापर्यंत पोहोचवण्याची वाहनसुविधा सुरू होऊ शकते. हा लेख प्रकाशित होईपर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केले असेल. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळय़ाला सुमारे आठ हजार निमंत्रित अपेक्षित असून, त्यापैकी अनेक जण थेट विमानतळावर उतरतील.
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दररोज दीड ते दोन लाख म्हणजे दरमहा ४५ ते ६० लाख भाविक अयोध्येत येतील. अयोध्येचा आकार बघितला तर हा आकडा प्रचंड आहे. अयोध्येत फक्त गल्लीबोळ आहेत, ते भाविकांनी भरगच्च होतील. राम मंदिराकडे घेऊन जाणारा रामपथ हा अयोध्येतील मुख्य रस्ता. हा रस्ता एकपदरी म्हणजे ४० फुटांचा होता, इथे दुतर्फा दुकाने होती, मुख्य बाजाराचे हे ठिकाण होते. आता रामपथाचे रुंदीकरण झाले असून तो ८० फूट रुंद झाला आहे. भाविकांनी अयोध्या तुडुंब भरून जाईल तेव्हा हा मोठा रस्ताही अरुंद वाटू लागेल. रस्ता रुंदीकरणासाठी भरपूर पाडापाडी झाली, तिथले लोक अवशेष गोळा करताना दिसतात. अनेक दुकाने दोनफुटी राहिलेली आहेत. त्यातच त्यांनी नवा संसार मांडलेला आहे. या दुकानदारांना नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे. जयपूरमध्ये मुख्य गावठाणाला गुलाबी रंग देऊन ‘पिंक सिटी’ अशी नवी ओळख दिली गेली तशी अयोध्येच्या रामपथाच्या सर्व इमारतींना फिका केसरी रंग दिलेला आहे. सज्जाचा आकृतिबंधही एकसारखा आहे. योगी सरकारच्या आदेशाने रामपथाची नवी ओळख निर्माण केली जात आहे. रामपथाला समांतर असलेल्या हनुमान गढीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाडापाडी झालेली आहे, इथेही रुंदीकरण झालेले आहे, तेही काही दिवसांमध्ये अरुंद ठरेल.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये पाहिलेली अयोध्या आणि आत्ताची धार्मिक राजकीय ‘भक्तां’चा ओघ वाढवणारी अयोध्या या दोन्हींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्या वेळीही रामलल्ला होता, पोलिसांनी उभ्या केलेल्या लोखंडी अडथळयांतून पुढे जात अगदी सहज रामलल्लाचे ठिकाण पाहता येत होते. त्या वेळी ना गर्दी होती, ना भक्तांची रीघ. आता भक्तांचा ओघ कैक पटींनी वाढलेला आहे. अयोध्येच्या गल्लीबोळांतून आताच इतकी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे की, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येची काय अवस्था होईल याची कल्पनाच न केलेली बरी! अयोध्येचा परिसर तीन-चार किमीचा. हे छोटय़ा मंदिरांचे, चालत चालत पालथे घालता येईल असे गाव. इथे अचानक छोटय़ा-मोठय़ा कार फिरू लागल्या तर या गावाचा कोंडमारा होणारच. त्यात स्थानिक ई-रिक्षावाल्यांची भर. इतक्या छोटय़ा गावात हजारोंच्या संख्येने ई-रिक्षा कधी पाहिल्या नव्हत्या. जिथे तिथे या रिक्षा आडव्या तिडव्या येतात. रामपथ रुंद झाला असला तरी अयोध्येचे गल्लीबोळ तसेच आहेत, प्रत्येक बोळ मोठा करायचा झाला तर अख्खी अयोध्याच नव्याने उभी करावी लागेल. हे शक्य नसल्यामुळे या गल्ल्यांमध्ये रिक्षा-कारच्या लांबलचक रांगा लागलेल्या असतात, वाहतूक कोंडी ही अयोध्येची न आवरता येणारी समस्या ठरेल, अशी शक्यता आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला एकाच वेळी आठ हजार मान्यवर येतील. त्यांच्या निवासाची सुविधा करण्याची अयोध्येकडे क्षमता नाही. त्यामुळे ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रा’च्या व्यवस्थापकांना निवासाची तात्पुरती व्यवस्था करावी लागत आहे. दोन वर्षांनंतर ही समस्या उद्भवणार नाही, असे व्यवस्थापकांपैकी एकाचे म्हणणे होते. याचा अर्थ अयोध्येमध्ये प्रचंड प्रमाणात निवास उभे राहतील. अयोध्येत धर्मशाळा आहेत, पण अयोध्या आंतरराष्ट्रीय केंद्र झाल्यावर निवासाची आधुनिक व्यवस्था लागेल. अयोध्येपासून सुमारे दहा किमीवर असलेले जिल्हा केंद्र फैजाबादमध्ये निवासाच्या उत्तम सुविधा आहेत. अयोध्या-फैजाबादमध्ये नजीकच्या भविष्यात अनेक पंचतारांकित हॉटेल उभी राहतील. देशी-विदेशी बडय़ा समूहांना दोनशे-तीनशे खोल्यांची पंचतारांकित हॉटेल उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन-तीन तारांकित हॉटेलही सुरू होतील. अयोध्येत सध्या ‘हॉटेिलग’चे पीक आलेले आहे, जिथे मोकळी जागा दिसेल तिथे पाच-दहा-पंधरा खोल्यांची हॉटेले सुरू झालेली आहेत. ही हॉटेल्स धर्मशाळांच्या सुधारित आवृत्ती आहेत, पण त्यांच्यामुळे भाविकांचा एक-दोन दिवसांच्या निवासाचा प्रश्न सुटतो. काहींनी आपापल्या घरात भविकांसाठी खोल्या खुल्या केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी केली की घरगुती हॉटेिलग सुरू करता येते. अयोध्येच्या पर्यटनातून स्थानिकांना विनासायास उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण झालेला आहे. एखाद-दोन खोल्या जरी भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या तरी दरमहा २५-३० हजार रुपये मिळू शकतील. अयोध्येसारख्या छोटय़ा गावामध्ये या मिळकतीचे मोल किती असेल याची कल्पना करता येऊ शकेल. रोजगार मिळवण्यासाठी भिवंडी- नाशिक- पुणे अशा महाराष्ट्रातील शहरांत आलेले अयोध्येतील तरुण गावी परतले आहेत, त्यातील अनेक जण छोटय़ा हॉटेिलगमध्ये शिरले आहेत, काहींनी वेगवेगळी दुकाने काढून स्वयंरोजगार निर्माण केले आहेत. धार्मिक पर्यटनातून अयोध्येमध्ये पैसा येऊ लागला आहे, स्थानिक प्रशासनाचे उत्पन्नही कैक पटींनी वाढेल. त्या तुलनेत सोयीसुविधा निर्माण होतील का, याचे उत्तर वर्षां-दोन वर्षांत मिळू शकेल.
राम मंदिराचे काम अहोरात्र सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी दोन-तीन वर्षे लागतील. हे मंदिर म्हणजे स्वतंत्र, स्वावलंबी गावच असेल. पाणी-वीज पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था भाविकांच्या खाण्या-पिण्याची सुविधा अशा विविध स्वरूपाच्या सोयी मंदिर न्यासाकडून दिल्या जातील. मंदिर व्यवस्थापनाचा कसलाही बोजा स्थानिक प्रशासनावर पडणार नसल्याचा दावा न्यासाने केलेला आहे. अयोध्येचे राम मंदिर हा संघ परिवार आणि भाजपचा मोठा धार्मिक-राजकीय प्रकल्प आहे. बाबरी मशीद पाडून उभ्या राहिलेल्या मंदिरामध्ये रामलल्लांना विराजमान करणे एवढाच या प्रकल्पाचा उद्देश नाही हे नवी अयोध्या पाहिल्यावर कोणाच्याही लक्षात येऊ शकेल. १९९० च्या दशकामध्ये ‘मंडलविरोधात कमंडल’ची राजकीय मोहीम राबवली नसती तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. हिंदूत्वाचा प्रचार करून केंद्रात सत्ता मिळाली नसती. मग राम मंदिर झालेच नसते. म्हणून राम मंदिराची उभारणी केवळ धार्मिक राहत नाही, ती राजकीय होते. आत्ताची अयोध्या याच धार्मिक-राजकीय सत्तेचे केंद्र बनू लागली आहे.
mahesh.sarlashkar@expressindia.com