साहित्याची आत्यंतिक आवड, सुरांवरही तितकंच प्रेम, भटकंती म्हणजे जीव की प्राण… त्याला फोटोग्राफीची जोड अशा नाना छंदानी आयुष्य रसरसून जगताना जर एखाद्याचं आयुष्य आकस्मिक अपघाताने जागच्या जागी ठप्प (पॅराप्लेजिक) झालं; तर आलेल्या एकटेपणातून, त्या व्यक्तीचा जो आत्मसंवाद सुरू होतो, त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे संजीव सबनीस यांचं ‘एकला चलो रे…’ हे आत्मकथनपर पुस्तक.
हे पुस्तक रडगाणं मात्र अजिबात नाही. हे आहे विपरीत परिस्थितीत चिंतन करून दुर्दम्य आत्मविश्वासाने सामोरं जाणं. एकटेपण, उदासीनता दूर करण्याचे नाना मार्ग स्वत:च शोधून काढणं… ‘आयुष्याची सखी बनलेल्या’ खिडकीच्या चौकटीतून दिसणाऱ्या निळ्या आभाळाच्या तुकड्यात आठवणींचे विविध रंग भरणं. लेखकाच्या उमद्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे पुस्तकात ठायी ठायी सापडतात. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना अपघाताने अपंगत्व आलं. मुळात देव, नियती, नशीब, पूर्वजन्म यांवर लेखकाचा बिलकूल विश्वास नव्हता. हे विचार कमकुवत मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात ही त्यांची ठाम समजूत होती. पण अंथरुणाला जखडल्यावर केलेल्या आत्मचिंतनातून अनेक घटनांचा अर्थ लावत, त्यांनी नियतीने सुसूत्रपणे आखलेल्या या योजनेमागील, अनाकलनीय सत्याचा शोध घेतला आणि त्यानंतर मनातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गीतेचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना कळून चुकलं की आपल्या आयुष्यात घडलेला अपघात हे विधिलिखित होतं. ते टाळू शकणारं नव्हतंच. यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीतील तसेच तुकारामांच्या अभंगांचा दाखला दिलाय. यावरून माणसाचा दृष्टिकोन परिस्थितीनुसार पूर्णपणे कसा बदलतो हे स्पष्ट होतं.
हेही वाचा…माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट
पानोपानी विखुरलेल्या विविध कवींच्या आशयघन कविता हे या आत्मकथनाचे एक बलस्थान. खिडकीतून दिसणाऱ्या जलधारा पाहून लेखकाला रानावनात अनुभवलेला, मन चिंब करणारा पाऊस आठवतो. स्वर्गातून बरसणाऱ्या त्या अमृतधारा त्यांना मंगेश पाडगावकरांच्या शब्दांची आठवण करून देतात. विकलांग केंद्र आणि महालक्ष्मी हॉस्पिटलमधील वास्तव्याचे दिवस, तिथला दिनक्रम, प्रशिक्षण, तिथे भेटलेल्या व्यक्ती आणि त्या स्वमग्न, असहाय माणसांमुळे बदललेली लेखकाची मानसिकता हा भाग मनाला चटका लावणारा आहे. या केंद्रात त्यांना तारुण्याच्या जोशात बेदरकारपणे बाईक चालवताना झालेल्या अपघातामुळे लुळे – पांगळे झालेले काही तरुण भेटले. वेगाच्या काही क्षणांच्या नशेपोटी धडधाकट आयुष्याची किंमत मोजणाऱ्या त्या उद्ध्वस्त तरुणांकडे पाहिलं तर कोणीही नियत वेगमर्यादा ओलांडण्यासाठी धजणार नाही असं ते कळकळीने सांगतात. एकटेपणावर मात करण्यासाठी लेखकाने शोधलेले उपायही या परिस्थितीतील माणसांना मार्गदर्शक ठरावेत. मुख्य म्हणजे त्यांची विजिगीषा व पराकोटीची सकारात्मकता पॅराप्लेजियाग्रस्त व्यक्तींचं मनोधैर्य उंचावेल, त्यांच्या मनात परिस्थितीशी झगडण्याची उमेद जागवेल हे नक्की!
‘एकला चलो रे…’, – संजीव सबनीस, मॅजेस्टिक प्रकाशन, पाने- २१९, किंमत- ३०० रुपये.
waglesampada@gmail.com