पूजा बवले

विजय नाईक यांचे ‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत… चढती कमान – वाढते तणाव’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. भारताचा छिद्रान्वेषी शेजारी. सारा आशिया खंड चीनमुळे स्थिर-अस्थिर असतो. करोनाकाळ सुरू असताना भारतीय सीमेत घुसखोरी करून चीनने साऱ्या जगाला बेभरवसा व गाफिलपणाची समज दिली. राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या एकछत्री अमलामुळे चीन कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या देशाबाहेरदेखील अन्य छोट्या देशांमध्ये (विशेषत: आफ्रिकन) हस्तक्षेप करण्यास नव्याने सुरुवात केली. अशावेळी चिनी ड्रॅगनला समजून घेण्याची नितांत गरज होती. ही गरज हे पुस्तक भरून काढते. २०१६ साली चीनमध्ये भारतीय प्रसारमाध्यमांचे सात प्रतिनिधी होते. आज एकाही भारतीय प्रसारमाध्यमाचा एकही प्रतिनिधी चीनमध्ये नाही. त्यामुळे सत्तर-ऐंशीच्या दशकाप्रमाणे आताही पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे वाचूनच भारतीयांनादेखील आपले मत बनवावे लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षी जिनपिंग यांच्यापासून सुरू होणारे हे पुस्तक २२ व्या प्रकरणानंतर डोकलाम-वुहान आणि त्यापलीकडे लेखक नेतो. चिनी कम्युनिस्ट पक्षावर माओची प्रकृती ढासळल्यानंतर इतरांनी कब्जा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. हे पर्व जणू काही भारतीय राजकारणाची साक्ष देते. त्यावर लेखकास विस्ताराने लिहिता आले असते, पण प्रमुख घटनांचा उल्लेख करून पिंगपाँग डिप्लोमसी व डेंगशाव पिंग पर्वाचे विस्तृत विश्लेषण लेखकाने केले आहे. त्यातून आजच्या चीनचा भूतकाळ उमगतो. हाँगकाँग, तैवान वादावर भारताच्या भूमिकेचे नेटके वर्णन पुस्तकात आहे. त्यामुळे विस्तारवादी चीनचा हातखंडा कळतो.

हेही वाचा…डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…

चीनमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाश्चिमात्य माध्यमातून आपल्याला कळतात. परंतु त्यातील सिल्क रोडचे अर्थकारण मात्र वाचकांपर्यंत येत नाही. ‘धूमसता शिंजियांग’ या प्रकरणातून ही माहिती लेखक मांडतो. त्यात एक प्रसंग फारच मजेशीर आहे. पुस्तकलेखकाची २००९ सालच्या चीन दौऱ्यात पीपल्स डेलीच्या संपादकाशी भेट झाली. भेटीचा दिवस होता ५ जुलै. त्याच दिवशी शंजियांगची राजधानी उरुमचीत वांशिक हिंसाचार झाला. त्यावर संपादकाने लेखकास दिलेले स्पष्टीकरण तत्कालीन परिस्थिती दर्शवते. संपादकाने सांगितले की, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही मुस्लीम पत्रकाराला पाठवले. कारण अन्य चिनी पत्रकार गेल्यास आमच्यावर टीका होते. संपादकाचे हे उत्तर म्हणजे राजकीय स्पष्टीकरणच. पीपल्स डेली सरकारी मालकीचे. त्यामुळे मुस्लीम पत्रकारास पाठवण्याचा निर्णय कोणाचा व त्याची अपरिहार्यता काय- अशा प्रश्नांची उत्तरेही पुस्तकात मिळतात.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आत्मशोधाचा प्रवास…

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनचा विस्तारवाद व त्यातील वस्तुस्थिती. चीनचा विचार करताना अमेरिका, रशियाच्या विस्तारवादाकडे दुर्लक्ष होते. या पुस्तकात मात्र तसे नाही. अमेरिका, रशिया व चीन अशा तीनही देशांच्या (राक्षसी) महत्त्वाकांक्षेवर विस्तृत टिप्पणी केली आहे. केवळ आर्थिक नव्हे तर भौगोलिक अतिक्रमणाचे विवेचन यात आहे. जमीन, जंगल आणि समुद्र मार्गाने इतरांना गिळंकृत करू पाहणाऱ्या चीनच्या विस्तारवादाची चढती कमान व त्यातून निर्माण होणारे तणाव पुस्तकात आहेत. नेहरू- गांधी परिवारातील पंतप्रधानांच्या चीन धोरणाची सविस्तर चर्चा सध्या होत आहे. गैरसमजांनी भरलेल्या समाजमाध्यमी चर्चेत हे पुस्तक आपल्या पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांची साधक-बाधक चर्चा करते. हा या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा भाग ठरावा. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंह राव, वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह व आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन धोरणातील घटनाक्रम सांगताना लेखकाने टिप्पणी केलेली नाही. पण त्याचा दूरगामी परिणाम करणारी उदाहरणे मात्र जागोजागी आढळतात. चीनच्या व्यापारयुद्धाची मीमांसा करताना लेखकाने स्वस्त, टाकाऊ चिनी मालाच्या बाजारपेठेऐवजी अमेरिका व चीनदरम्यान असलेल्या उद्याोगविश्वाचे विश्लेषण केले आहे. ज्यात चिनी महत्त्वाकांक्षा कोणत्या थराला जाऊ शकते हेही सोदाहरण सांगितले आहे. भारत-चीनचे करोनोत्तर नवस्पंदने टिपणारे हे पुस्तक मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे.

‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत’ – विजय नाईक, रोहन प्रकाशन, पाने- २२३, किंमत- २९५ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang article book review xi jinping yaancha vistarvadi chin aani bharat by vijay naik psg