‘भावनिक प्रथमोपचार घरच्याघरी’ हे डॉ. हमीद दाभोलकर यांचे पुस्तक म्हणजे मनाचा सखोलपणे केलेला विचार. या पुस्तकाची सुरुवात होते ती मनाच्या प्रश्नांच्या तोंडओळखीपासून. मन म्हणजे काय, मानसिक आरोग्य म्हणजे काय, ते कुठे असतं याची चर्चा या प्रकरणात आहे. आपल्याला टेन्शन कसं येतं आणि का येतं, त्याच्या त्रासावरचा उतारा कोणता याविषयीची माहिती या पुस्तकात आहे. ‘रंग-बेरंग भावनांचे’ या दुसऱ्या भागात माणसांना येणाऱ्या ताणतणावाविषयीचे विश्लेषण आहे. दैनंदिन जीवनात येणारे ताणतणाव हे जीवनातील सकारात्मक मार्गाचा मुख्य अडसर असल्याचे नमूद करताना, कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या व्यक्तीला केवळ ‘सकारात्मक विचार करा’ असा उपदेश देऊन उपयोगी नाही ही बाबही लेखकाने लक्षात आणून दिली आहे. सकारात्मक आणि नकारात्मक परिस्थितीकडे तटस्थपणे बघता यायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीराबरोबर मनाचा व्यायामही आवश्यक असल्याचे लेखकाने सांगितले आहे. अपयशाला सामोरे जाताना कोणती काळजी घ्यावी, तसेच समाजात ‘संधी’विषयी असलेल्या पारंपरिक गैरसमजावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. ‘अपेक्षांचे ओझे’ हे कसे अपयशाची भीती वाढवणारा महत्त्वाचा घटक आहे याविषयी केलेले विश्लेषण महत्त्वाचे आहे. अपराधीपणाची भावना, समाजाचे दडपण यांचा ऊहापोह करताना लेखक म्हणतो की, विचार-विवेकाच्या माध्यमातून परिस्थितीचे सारासार आकलन करून आपली वर्तणूक ठरवणे हेच महत्त्वाचे आहे. रागावर मात करणे, चिंतेवर ताबा ठेवणे, अप्रिय घटना आणि भीती, लैंगिक प्रश्न आणि मनाचे अस्वास्थ्य, मानसिक आरोग्य कसे निरामय करता येईल याविषयी सखोल चर्चा करणारं आणि ते सहज-सोप्या भाषेत समजून सांगणारं हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं.

‘भावनिक प्रथमोपचार घरच्याघरी’, डॉ. हमीद दाभोलकर, राजहंस प्रकाशन,

पाने-१३०, किंमत-२०० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang article dr hamid dabholkar book stress analysis amy