स्वानंद किरकिरे
इन्दौरात कोणी नाटक करतंय हे ऐकल्यावर आदिलभाईंची मोटरसायकल सरळ त्या दिशेला वळायची. रिहर्सल, प्रयोगाला ते हमखास हजर असायचे. कोणाला काही मदत लागली तर ते तत्परतेने तिथं हजर असायचे, नाटकवाल्यांना नाटक करायला मदत करणं अन् मग त्याच नाटकावर वर्तमानपत्रात टीका करणं हा आदिलभाईंचा लाडका छंद होता…
एक पक्ष्यांचं दुकान होतं. तिथं तीन पोपट होते. पहिल्या पोपटासमोर जाऊन गिऱ्हाईकानं विचारलं, ‘‘हा पोपट केवढ्याला दिला?’’ दुकानदार म्हणाला, ‘‘५००० रुपये.’’ ग्राहकानं विचारलं, ‘‘का?’’, तर उत्तर आलं, ‘‘या पोपटाला हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी, तमिळ, तेलगू, कानडी, मल्याळम् अशा सर्व भारतीय भाषा बोलता येतात. अगदी सगळ्या बोलीभाषासुद्धा!!’’ गिऱ्हाईक दुसऱ्या पोपटासमोर गेला तर कळलं की त्याची किंमत आहे १०,००० रुपये. विचारलं, ‘‘का?’’ तर उत्तर आलं, ‘‘याला सगळ्या भारतीय भाषांशिवाय जगातल्या सगळ्या भाषा येतात- इंग्रजी, जर्मन, फ्रें च, स्वाहिली, चिनी, जपानी अगदी सगळ्या. गिऱ्हाईक म्हणाला, ‘‘वा!’’ आता तो तिसऱ्या पोपटासमोर गेला अन् विचारलं, ‘‘हा केवढ्याचा.’’ तर उत्तर मिळालं, ‘‘एक लाख रुपये.’’ गिऱ्हाईकानं विचारलं, ‘‘याला कुठल्या भाषा येतात?’’ दुकानदार म्हणाला, ‘‘माहीत नाही, हा पोपट गप्प असतो. काही बोलतसुद्धा नाही. आम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहीत नाही.’’ गिऱ्हाईक त्याला म्हणाला, ‘‘मग याची किंमत डायरेक्ट एक लाख कशी लावली तुम्ही?’’ दुकानदार म्हणाला, ‘‘कारण हा जरी काही नाही बोलला तरी हे बाकीचे दोन पोपट या पोपटाला गुरुजी म्हणतात.’’ जोक संपला, अन् ऐकणाऱ्या सगळ्या घोळक्यात एक मोठा हशा पिकला. अन् त्या हशात सगळ्यात मोठा आवाज खुद्द जोक सांगणाऱ्या आमच्या आदिलभाईंचा होता.
आदिलभाई कोण होते? कुणी खूप नामवंत लेखक होते का? नाही. कुणी नाटक करणारे? नाही. कुणी खूप मोठे पत्रकार? तर तसंही नाही; पण खरं सांगायचं झालं तर आदिलभाई त्या गप्प राहणाऱ्या पोपटासारखे होते- ज्याला बाकीची सगळी कलावंत मंडळी आपला मित्र म्हणायची. आपण उर्दू शायरीतलं एक मोठं नाव- आमच्या इन्दौरचे डॉ. राहत इन्दौरी हे ऐकलंच असेल. आदिलभाई राहत इन्दौरी साहेबांचे धाकटे बंधू. पण इथं त्याबद्दल लिहिण्याचं हे कारण नक्कीच नाही. आदिलभाई आमचे मित्र नाटकामुळेच झाले. कारण हिंदी असो वा मराठी नाटक- कुठलंही असू देत, इन्दौरात कोणी नाटक करतंय हे ऐकल्यावर आदिलभाईंची मोटरसायकल सरळ त्या दिशेला वळायची. रिहर्सल, प्रयोगाला ते हमखास हजर असायचे. कोणाला काही मदत लागली तर ते तत्परतेने तिथं हजर असायचे, नाटकवाल्यांना नाटक करायला मदत करणं अन् मग त्याच नाटकावर वर्तमानपत्रात टीका करणं हा आदिलभाईंचा लाडका छंद होता. ते म्हणाले, ‘‘बुराई तो नाटक की तभी कर पायेंगा ना जब वो होगा. इसलिए नाटक करवाना जरूरी है, और अगर नाटक होही गया तो उसकी बुराई तो करनीही पडेगी.’’
हेही वाचा : पडसाद : मातृभाषा दैनंदिन जीवनातील भाषावापरातून टिकते
माझी आदिलभाईंशी पहिली भेट कधी अन् कुठे झाली हे काही सांगता येणार नाही. पण मैत्री झाली ती आदिलभाई आणि त्यांचे घनिष्ठ मित्र शाहिद मिर्जा यांनी इन्दौरमध्ये नाटक करणाऱ्या तरुण मुला-मुलींसाठी म्हणून खास एन.एस.डी.ची नाट्य कार्यशाळा आयोजित केली होती. मी त्या नाट्य कार्यशाळेत मुलाखत द्यायला गेलो होतो. तरुण वयात मी बरेच उद्याोग केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मी एका सहकारी बँकेत तात्पुरता कारकून म्हणून काही महिने काम केलं होतं. जेव्हा इन्दौरमध्ये ही कार्यशाळा भरत होती त्या वेळी मी त्या नोकरीत रुजू होतो. मुलाखतीत मी जेव्हा आदिलभाईंना सांगितलं की, मी नोकरी करतोय अन् त्या कार्यशाळेसाठी मी ही नोकरी सोडायला तयार आहे; तर ते मला बाजूला घेऊन गेले आणि चहाच्या टपरीवर त्यांनी माझी वेगळीच शाळा घेतली. त्यांचा सूर एकंदरीत असा होता की, नाटकासाठी नोकरी सोडणाऱ्या लोकांचे बऱ्याचदा खूप हाल होतात अन् जर नाटकावर किंवा कलेवर अतोनात प्रेम असेल अन् त्यासाठी काहीही करण्याची तयारी असेल तरच नोकरी सोडावी. मला कार्यशाळा करायची होती या गोष्टीवर मी ठाम होतो. तर त्यांनी म्हटलं, ‘‘अपने घर से माता-पिता में से किसी की चिठ्ठी लेके आओ की उन्हे आपके नौकरी छोडने पर कोई आपत्ती नही है.’’ मी घरून तसं पत्र घेऊनसुद्धा गेलो. मला त्या कार्यशाळेत प्रवेश मिळाला. पण संपूर्ण कार्यशाळाभर ते मला अधून-मधून गाठून एकच प्रश्न विचारायचे, ‘‘किरकिरे साब, नोकरी छोडने का पछतावा तो नही हो रहा?’’ मी ‘नाही’ म्हणालो की म्हणायचे, ‘‘अब हो भी रहा हो तो क्या, अब तो चिडियॉं चुग गई खेत.’’ अन् त्यांचं फेमस सात मजली हास्य सगळ्या जगाला ऐकू यायचं. त्या कार्यशाळेत शिकवायला एन.एस.डी.ची बरीच मातब्बर मंडळी आली होती. सुधा शिवपुरी, गोविन्द नामदेव, आलोक चॅटर्जी अन् अगदी तरुण असे आशीष विद्यार्थी. आदिलभाईंनी या सगळ्यांची मनं जिंकली होती, हे वेगळं सांगण्याची गरजच नव्हती. कार्यशाळा संपली की या सगळ्या मंडळींना रात्री इन्दौरच्या सराफ्यामध्ये खायला घेऊन जाणं, इन्दौरमधील सगळे गल्ल्याबोळ दाखवणं हे काम आदिलभाई अतिशय आनंदानं करत. अन् त्यांच्यासोबत आम्हा सगळ्यांनाही फुकट मेजवानी असायची. लोकांना हसवणं अन् खायला-प्यायला देणं, अड्डा जमवून बसणं हा आदिलभाईंचा अतिशय लाडका छंद होता. आदिलभाई कधी एकटे नाही दिसायचे. सतत आठ-दहा जणांचा घोळका त्यांच्या आजूबाजूला असायचा, अन् त्यातल्या एखाद्या कुणाला टार्गेट करून त्याची थट्टा-मस्करीही सुरू असायची. ज्या वर्षी मी ती कार्यशाळा केली, त्याच वर्षी मी पहिल्यांदा एन.एस.डी.चा फॉर्म भरला होता. अन् प्रवेश परीक्षेचा पहिला इन्टरव्ह्यू कार्यशाळा सुरू असतानाच मुंबईत होणार होता. आदिलभाईंनी माझं एन.एस.डी.मध्ये सिलेक्शन करून देण्याचं मिशन आपल्या डोक्यातच घेतलं होतं. त्यांनी ही गोष्ट आशीष विद्यार्थी यांना सांगितली. आशीषनं माझी वेगळ्यानं तयारी करून घ्यायला सुरुवात केली. जो मोनोलॉग सादर करायचा असतो तो बसवून घेतला. आदिलभाईही अधूनमधून कुठेही दिसलो की, ‘‘एक रिहर्सल कर लो किरकिरे साब,’’ असं म्हणायचे. ज्या दिवशी मला मुंबईसाठी निघायचं होतं तेव्हा ते मला बस स्टॉपवर सोडायला आले, माझ्याकडे पैसे वगैरे आहेत की नाही याची चौकशी केली अन् हातात रात्रीच्या जेवणाचा डबा देऊन मला निरोप दिला. त्या वर्षी माझं एन.एस.डी.मध्ये सिलेक्शन होऊ शकलं नाही, चूक माझीच झाली होती. मी त्या मोनोलॉगची वाक्यं विसरलो होतो. परत इन्दौरला आलो तर आदिलभाई आणि इतर बरीच मंडळी घ्यायला आली होती. माझं सिलेक्शन झालं नाही हे ऐकून सगळ्यांना वाईट वाटलं होतं अन् कारण ऐकून आशीष तर चिडलाच होता. ‘‘एका नटानं वाक्यं विसरणं हा अक्षम्य गुन्हा आहे. वाक्यं कशी दगडावर कोरलेल्या अक्षरांसारखी आपल्या हृदयावर कोरली गेली पाहिजेत. झोपेतून उठवून जरी कुणी म्हणायला सांगितलं तरी अस्खलित वाक्यं बाहेर आली पाहिजेत. पाठांतर इतकं पक्कं असलं पाहिजे…’’ तो काहीच चुकीचं बोलत नव्हता, पण हे सगळं तो कार्यशाळेत सगळ्यांसमोर अन् विशेषत: तिथंच भेटलेल्या एका मुलीसमोर बोलत होता, जी मला जरा जरा आवडायला लागली होती. आदिलभाई हे सगळं पाहत होते. कार्यशाळा संपल्यावर ते आम्हाला त्या काळी आमिर खानचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘जो जीता वही सिकंदर’ बघायला घेऊन गेले. तो संपूर्ण चित्रपट जिंकणं-हरणं, यश-अपयश यावर होता. आज कळलं की आदिलभाईंनी त्याच दिवशी आम्हाला त्या सिनेमाला का नेलं. खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळाली अन् आम्ही पुन्हा नाटक शिकायला लागलो.
आदिलभाई आम्हा सगळ्यांपेक्षा वयानं मोठे होते, पण त्यांनी आपलं ‘वय-मान’ आमच्यात कधी येऊच दिलं नाही. घरी अचानक त्यांची मोटरसायकल येऊन थबकायची. ‘‘चलिये बैठिये, आपको बिर्यानी खिलाकर लाते है.’’ असं म्हणून ते आम्हाला थेट घरी घेऊन जायचे. तिथं डॉ. राहत इन्दौरींबरोबर बाकी काही शायर लोकांची मेहफिल जमलेली असायची. ‘‘ये बडे शायर आये है, अपनी कुछ नयी गजले पढनेवाले है. सोचा आपको सुननी चाहिए.’’ असं म्हणून आम्हाला बिर्याणीबरोबर शेरोशायरीचीही मेजवानी असायची. असंच कधी इन्दौरच्या शनी मंदिराच्या खास समारोहात डॉ. प्रभा अत्रे यांचं गाण ऐकायचो, कधी कुणा होतकरू पेन्टरचं प्रदर्शन बघायला, कधी सरळ बी. व्ही. कारंत यांचं नवं नाटक दाखवायला १४० किलोमीटर लांब भोपाळला घेऊन जायचे. हेतू फक्त एकच की- आम्हाला चांगल्यातलं चांगलं ऐकायला अन् बघायला मिळावं व त्यासोबत नवनवे जोक्स अन् उत्तमोत्तम खाणं आलंच.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : लोकदानातून सिनेधनुष्य..
एक दिवस माझा मित्र रवी महाशब्दे त्यांना म्हणाला, ‘‘आदिलभाई, आप हम पे बहोत पैसा खर्च करते है, अच्छा नही लगता. हम स्टुडन्टस् है. हमारे पास ज्यादा पैसे नही होते…’’ त्यावर आदिलभाई म्हणाले, ‘‘आप बिलकूल ठीक कह रहे है साब. अब से एक पेमेंट आप करेंगे और एक पेमेंट मै.’’ तो जरा घाबरलाच की एवढे पैसेही आणणार कुठून? पण आदिलभाईंनी सुंदर व्यवस्था लावून दिली होती. कुठे हॉटेलात जेवलो की मोठं बिल आदिलभाई द्यायचे आणि टपरीवर एक एक कटिंग चहा प्यायलो की त्याचे चिल्लर पैसे आम्हाला द्यायला सांगायचे. सिनेमाचं तिकीट स्वत: घ्यायचे, पण स्कूटर स्टॅण्डचे पैसे मुलांनी द्यायचे. अशा प्रकारे त्यांनी मैत्रीत कधीच लहान-मोठं येऊ दिलं नाही अन् मुलांच्या आत्मसन्मानालाही ठेच लागू दिली नाही. पुढे मग माझं एन.एस.डी.मध्ये सिलेक्शन झालं. आदिलभाई घरी आले अन् म्हणाले, ‘‘चलिए.’’ आणि एका फोटोग्राफरकडे जाऊन माझा एक फोटो काढून घेतला. म्हणाले, ‘‘आप इन्दौर से पहले हो जो एनएसडी जा रहे हो. पेपर मे खबर छपवायेंगे सर.’’ जेव्हा एक मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकानं ही काही न्यूज नाहीये, म्हणून ती छापली नाही तेव्हा आदिलभाई इन्दौरच्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात गेले अन् शेवटी एका वर्तमानपत्रात ही बातमी छापून आणली. पण आमची माहिती चुकीची होती. १९६१ साली एन.एस.डी.च्या पहिल्या वर्षी विनायक अन् कुमुद चासकर ही दोघं इन्दौरहून एन.एस.डी.ला गेले होते. मी आदिलभाईंना हे सांगितलं तर म्हणाले, ‘‘अखबार अगर इसको खबर मानकर छापेंगेही नही तो हमको पता कैसे चलेगा इसलिये छपवाना जरुरी था.’’ असं म्हणून परत जोरात हसले. मी जेव्हा एन.एस.डी.तून पास आऊट झाल्यानंतर दिल्लीत एन.एस.डी. रापोटरी कंपनीसाठी आपलं शहीद भगत सिंगांच्या लिखाणावर आधारित ‘एक सपना’ हे पहिलं नाटक लिहून दिग्दर्शित केलं. आदिलभाई अन् रवी खास ट्रेनने दिल्लीला आले होते- फक्त नाटक बघायला. म्हणाले, ‘‘जिस राष्ट्रीय विद्यालय रंगमंडलमें एम. के. रैना, राम गोपाल बजाज जैसे महान लोगेने नाटक दिग्दर्शित किया, उस सूची में अपना नाम लिखवाया है. आना तो बनता.’’
मग आम्हाला घेऊन दिल्ली फिरणं, जुन्या दिल्लीच्या गल्लीबोळात कबाब मिळण्याच्या वेगवेगळ्या जागा दाखवणं, नॅशनल आर्ट गॅलरी दाखवून आणणं…. हे सगळं तर झालंच. आदिलभाई एन.एस.डी.मध्येही भलतेच लोकप्रिय झाले होते. रात्री प्रयोग संपवून आलो की दिसायचं की त्यांना गराडा घालून हॉस्टेलमधली जवळजवळ सगळी मुलं बसलेली असायची आणि आदिलभाईंचे जोक्स सुरू असायचे. अन् उत्स्फूर्तपणे हशा पिकलेला असायचा.
हेही वाचा : मत-मतांचा तवंग..
नुकतंच जागतिकीकरण सुरू झालं होतं अन् सॅटेलाईट टीव्ही नावाचं एक नवं माध्यम कलावंतांसमोर उघड झालं होतं. बऱ्याच नव्या लेखक-नट मंडळींना चांगलं काम अन् पैसा दोन्ही मिळायला लागलं होतं. इन्दौरहून बरीच मंडळी मुंबईकडे कूच करत होती. लोकांना कामंही मिळत होती. डॉ. राहत इन्दौरीसुद्धा ‘सर’, ‘मिशन कश्मीर’, ‘करीब’ यांसारख्या अनेक सिनेमांची गाणी लिहायला लागले होते. एक नवं आयुष्य बनवायची स्वप्नं साकार होत होती. आदिलभाईंनाही तो मोह आवरला नाही. त्यांनी रोडवेज कंपनीमध्ये असलेली एक चांगली नोकरी सोडली. सगळ्यांसोबत ते मुंबईला आले. पण मुंबईचं हवामान सगळ्यांनाच मानवतं असं नाही. सगळ्या जगाला आपलंसं करणाऱ्या आदिलभाईंना मुंबईला आपल्या कवेत घेणं काही जमलं नाही. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा मुंबईला एका म्हाडाच्या खोलीत भेटलो तेव्हा असं वाटलं की, जंगलात उन्मुक्त फिरणाऱ्या वाघाला एका पिंजऱ्यात कैद बसलेलं पाहतोय. चेहऱ्यावरचं हसू पार संपलं होतं अन् एक वेगळेच खंगलेले आदिलभाई मला दिसत होते. घरात बायको, तीन लहान मुलं यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च, पुन्हा मुंबईतला राहण्याचा खर्च हे सगळं खर्चाचं गणित जुळवणं त्यांना जड जात होतं, अन् सगळ्यात जास्त कठीण जात होतं लोकांच्या घोळक्याशिवाय जगणं. काही वर्षं हातपाय मारून शेवटी आदिलभाई पुन्हा इन्दौरला निघून गेले. पण आताचे आदिलभाई पहिल्यासारखे राहिले नव्हते. इन्दौरसारख्या लहान गावामध्येही सगळेच लोक मोठ्या मनाचे असतात असं नाही, काही खुज्या मनाच्या लोकांनी त्यांना टोमणे मारले आणि ते खचले… मग बरीच वर्षं त्यांनी एका वर्तमानपत्रात नोकरी केली, पण तो उत्साह, तो जगावर अन् जगाच्या चांगलेपणावर असणारा विश्वास कुठे तरी मावळला होता. पुढे त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. देशात अन् जगभरात जी परिस्थिती लागोपाठ बदलत होती त्याचाही त्यांच्यावर परिणाम होत होता. अगदी रोज दिवस-रात्र घरात येऊन एकत्र जेवणारी माणसं यायची थांबली अन् आपली नवी मतं समाजमाध्यमांवर मांडू लागली. आदिलभाई आता कमी बोलायचे, अगदी मोजकं हसायचे… वाईट वाटायचं… एक दिवस आदिलभाई खूप सीरिअस असल्याची बातमी आली. मी जाऊ शकलो नाही, पण रवी इन्दौरला गेला. तिथून त्याचा फोन आला, ‘‘काही खरं दिसत नाहीये. फक्त मला बघून थोडंसं हसले.’’
मला वाटलं, जसं त्यांनी मला नोकरी सोडायच्या आधी ५० प्रश्न विचारले होते तसे मी त्यांना का नाही विचारले? कधी वाटलंच नाही की सगळ्यांना सल्ला देणाऱ्या आदिलभाईंनापण सल्ल्याची गरज असू शकते. वाटलं, इन्दौरला जाऊन त्यांना ‘जो जीता वही सिकंदर’ दाखवावा अन् म्हणावं…
पण मी असं काहीच केलं नाही अर्थात…
आदिलभाई गेले… मी तडक इन्दौरला गेलो. प्रेस क्लबमध्ये त्यांचे स्नेही जमले होते. स्नेही काय, अर्धं इन्दौर तिथं होतं. अन् सगळ्यांच्या तोंडावर एकच वाक्य होतं. ‘‘उफ! क्या आदमी था।’’
swanandkirkire04@gmail.com