चेरीच्या बहराचा प्रभाव जपानच्या संस्कृतीत खोलवर रुजला आहे. प्राचीन काळापासून चित्रकार या फुलांची व झाडांची अगणित चित्रे काढीत आले आहेत. असा चित्रकार दाखविता येणे कठीण आहे ज्याने चेरीच्या बहराचे चित्र काढले नाही, असा कवी दाखविता येणे कठीण ज्याने या बहरावर कविता लिहिली नाही.
वसंत ऋतूचे आगमन म्हणजे सुमारे मार्च एप्रिलचा काळ. या काळात सारा जपान चेरीच्या फुलांच्या बहराने रंगून गेलेला असतो. जपानचे सांस्कृतिक जीवनदेखील अनेक अंगांनी फुलून आलेले असते. या पंधरा-वीस दिवसांत प्रचंड उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण झालेले असते. माणसे एकेकट्याने, गटागटाने बहर पाहण्यासाठी बाहेर पडतात. जंगले, वने, उपवने चेरीच्या फुलांनी व्यापून टाकलेली. शहरातदेखील रस्त्याच्या कडेला ओळीने लावलेल्या वृक्षांवर गुलाबी छटा असलेली नाजूक फुले लगडलेली असतात. त्यांचा मंद, पण मन गंधित करून टाकणारा सुवास वातावरणात पसरलेला असतो.
हेही वाचा…चारशे कोटी विसरभोळे?
पुरातन काळापासून लोकप्रिय असलेली ही परंपरा आधुनिक काळातदेखील जपानने जपली आहे. जंगलात तर चेरीच्या वृक्षांच्या प्रजातींचा अभ्यास करून उत्तम जातींची पद्धतशीर लागवड व जोपासना केली जातेच, पण असंख्य शाळांच्या आणि सरकारी इमारतींच्या आवारातदेखील चेरीची झाडे लावली जातात. मुलांना लहानपणापासून त्या संबंधीच्या कथा, कविता ऐकविल्या जातात. चेरीचे फूल हे जपानने आपले राष्ट्रीय फूल म्हणून निवडले आहे.
या काळात माणसे खास चेरीचा बहर पाहण्यासाठी बाहेर पडतात. इ.स.च्या ७ व्या शतकापासून ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. प्रथम राजघराण्यातील मंडळी चेरीच्या बागेत जमत. फुलांच्या सावलीत दिवस घालवत. नंतर सामुराई घरण्यांनी ही परंपरा उचलली. हळूहळू ती सामान्य माणसांतदेखील लोकप्रिय बनली. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरेला ‘हनामी’ असे नाव दिले गेले आहे. ‘हनामी’ म्हणजे ‘ flower viewing’ (बहर पाहणे). या ‘पाहण्याला’ जपानी परंपरेत खास अर्थ आहे. पाहणे म्हणजे नुसते दृष्टिक्षेप टाकणे नव्हे. पाहणे म्हणजे सारे चित्त एकवटून लक्ष केंद्रित करणे. पाहणे म्हणजे एकटक पाहत राहणे- जोपर्यंत समोरच्या दृश्याशी आपले नाते जुळत नाही. इतक्या उत्कटतेने की एका काळानंतर पाहणाराच त्या दृश्याचा एक भाग बनून जातो, फूल बनतो. जपानमधील बहुसंख्य कवी ही (आणि पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची) परंपरा पाळतात. अर्थात पाहण्यासाठी आलेल्या लोकांत हौशे-नवशेच अधिक असतात.
हेही वाचा…स्थितप्रज्ञ वैज्ञानिक
अशाच लोकांना उद्देशून सायग्यो या कवीने हायकू लिहिला आहे-
या चेरीचा एकमेव दोष
त्या फुलतात
आणि गर्दी जमा होते.
अर्थात हा दोष लोकांचा आहे हेच कवीला सांगायचे आहे हे लगेच ध्यानात येते.
चेरीच्या बहराचा प्रभाव जपानच्या संस्कृतीत खोलवर रुजला आहे. प्राचीन काळापासून चित्रकार या फुलांची व झाडांची अगणित चित्रे काढीत आले आहेत. असा चित्रकार दाखविता येणे कठीण आहे ज्याने चेरीच्या बहराचे चित्र काढले नाही; असा कवी दाखविता येणे कठीण ज्याने या बहरावर कविता लिहिली नाही. कलावंत तर सोडाच, सैनिकांनादेखील या बहराचे आकर्षण आहे. दुसऱ्या महायुद्धात चेरीच्या बहराचा लोकांत राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी उपयोग केला गेला. बॉम्बर विमानावर चेरीची झाडे रंगविली गेली. आजच्या तरुणांमध्येदेखील बहराविषयीचे प्रेम संक्रमित झाले आहे. जपानच्या राष्ट्रीय रग्बी टीमच्या युनिफॉर्मवर चेरीच्या फुलांचे चित्र आहे आणि तिचे नाव आहे- Brave Blossoms.
हेही वाचा…पदार्थ विज्ञानातील जादूगार…
चेरीच्या बहराशी पुरातन काळापासून आणखी एक प्रतीकात्मक अर्थ निगडित आहे. तो बहर जसे सौंदर्याचे तसेच जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक म्हणूनदेखील मानला गेला आहे. चेरीचा बहर हा जास्तीत जास्त आठ-दहा दिवसच टिकतो, नंतर त्याची फुले गळून पडायला सुरुवात होते. जीवन सौंदर्यपूर्ण आहे, पण तसेच ते क्षणकाळ टिकणारेही आहे- ही संकल्पना जपानी संस्कृतीतील mono no aware ( melancholy at passing of things- काल निसटून जात असल्याची विषण्ण जाणीव) या संकल्पनेशी निगडित आहे. (जीएंच्या ‘भेट’, ‘ओर्फिअस’ अशा काही कथांतून ही संकल्पना अवतरताना दिसते.)
११ व्या शतकातील पहिल्या जपानी महाकादंबरीत- ‘The tale of Genji’- मध्ये प्रथम एका कवितेत ही संकल्पना मांडली गेली.
चेरीचा बहर
वसंत ऋतू
काहीच शाश्वत नाही
श्रेष्ठ जपानी हायकूकार योसा बुसों लिहितो-
चेरीची फुले
गळून पडताहेत
आजही
फुले उगवण्याची तसेच ती गळून पडण्याची क्रिया अव्याहतपणे चालूच आहे. चालूच राहणार आहे. सौंदर्य हरवलेले जीवन हे वास्तवही माणसाला स्वीकारावेच लागते. ही कल्पना मांडताना बुसों आणखी एका हायकूत लिहितो-
चेरीचा बहर संपला
मंदिर पुन्हा
फांद्यांच्या ताब्यात
असे असले तरी चेरीचा बहर म्हणजे उत्साहाचा बहर. चैतन्याचा बहर. कोबायाशी इस्सा लिहितो-
जगण्यातील आनंद
अद्भुत
चेरीबहराच्या सावलीत
या बहराचा प्रभाव एवढा आहे की-
अनोळखी माणसे
अनोळखी उरत नाहीत
चेरीच्या बहराखाली (इस्सा)
एकाच सौंदर्यपूजक वृत्तीतून ही माणसे एकत्र आलेली आहेत, मग ती अनोळखी कशी राहतील? त्यांचे एकमेकांशी नाते जुळेलच. या बहराचा फक्त माणसावरच परिणाम होतो असे नव्हे.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
ओरीसुरा हा कवी एका हायकूत लिहितो-
पहाडातील निर्झर.
चेरीच्या छायेखाली
दगडदेखील गाणे गाऊ लागतात.
चेरीची फुले क्षणजीवी तसेच नाजूकदेखील. आवाजानेही गळून पडतील. म्हणून एक हायकूकार इशारा देतो-
मंदिराची घंटा
हळूच वाजवा
चेरी फुलली आहे
चेरीचा बहर असंख्य वेळा पाहत राहिल्यामुळे त्याच्या संदर्भातल्या अगणित आठवणी माणसाच्या मनात भिरभिरत असतात, म्हणूनच बाशो एका हायकूत लिहितो-
किती किती गोष्टी
तो पुन्हा मनात घेऊन येतो
चेरीचा बहर
चेरीचा बहर हा सौंदर्याचे प्रतीक असो की क्षणभंगुरतेचे, खरे तर हा प्रतीकात्मक अर्थ माणूसच त्याला देतो. निसर्ग फक्त असतो. आपल्याच नियमांनुसार बदलणारा.
हेही वाचा…निमित्त : समर्पित समाजसुधारक
कोबायाशी इस्साने एका हायकूतून हे सत्य अतिशय नेमकेपणाने मांडले आहे-
तुझ्याशिवाय
चेरीचा बहर
फक्त बहर
निसर्ग सर्वांसाठीच फुलत असतो. आपण त्याला काही खास बनवितो. त्याचे महत्त्व आपल्यासाठी अधिक वाढते जेव्हा तो बहर आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पाहतो. पण जेव्हा ती प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर? तर मग तो बहर ‘फक्त बहर’ असतो. आपले सारे वैशिष्ट्य हरवून बसलेला. केवळ एका झाडाचा बहर असलेला.
चेरीचा बहर पाहून नादावणे ही काही जपानी कवींचीच मक्तेदारी नाही, जगातल्या प्रत्येक कवीला सौंदर्याची भूल पडलेली आहे. ज्याला ही भूल पडलेली नाही तो कवी होऊच शकत नाही. चेरीच्या बहरासंदर्भातील हायकू शोधताना मला अचानक Marilyn Potter या कवयित्रीचा हायकू दिसला आणि मी चमकलो. तिच्या हायकूचा अनुवाद असा-
‘हिवाळ्यातील वादळ
मी कॅलेंडरच्या पानांवर शोधते
चेरीच्या बहराचा फोटो…
हिवाळ्यातील एक सर्दलेली एकाकी रात्र खोलीत कवयित्री एकटी बसलेली आहे. बाहेर कडाक्याची थंडी, वादळ… आतले एकाकीपण आणि बाहेरचे गारठलेपण… अशा वेळी आवश्यकता आहे ती कुठल्या तरी सोबतीची. मग ती सोबत आनंद देणाऱ्या आठवणींची का असेना. तिला आठवते, कॅलेंडरच्या मार्च महिन्याच्या पानावर चेरीच्या बहराचा सुंदर फोटो आपण पाहिला होता. ती ते पान शोधते. तो फोटो शोधते. त्याच्यावरून अलगद हात फिरविते. चेरीचा बहर पाहिल्याची सय तिच्या मनात जागी होते, पानावरच्या चित्रातले रंग आठवणींच्या रंगात हलकेच मिळून जातात. मनभर पसरतात. आता ती एकटी राहिलेली नसते. तिची आवडती चेरी तिच्या सोबतीला आलेली असते.
हेही वाचा…आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
इथपर्यंत लिहिले आणि मला जाणवले : माझा हा शोध असाच तर नाही? उन्हाळ्याच्या कहरात मी चेरीच्या बहराचे हायकू शोधतो आहे.
vvpadalkar@gmail.com