डॉ. सुनीलकुमार लवटे
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समग्र वाङ्मय आजवर उपलब्ध नव्हते. मात्र आता १८ खंडांचा बृहत प्रकल्प प्रकाशित झाला आहे. विश्वकोशाच्या २० खंडांतील दीडशेहून अधिक दीर्घ नोंदी, भाषणांच्या सव्वाशे संहिता, पाऊणशे मुलाखती, सव्वादोनशे लेख, सुमारे दीडशे प्रस्तावना, समीक्षा, प्रबंध आणि चरित्रे, पत्रव्यवहार आदी ऐवज वाचकांना एकत्रित वाचायला मिळणार आहे. या बृहत प्रकल्पाच्या संपादनकार्याविषयी…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विसावे शतक जगलेले (१९०१ ते १९९४) ज्ञान तपस्वी. धर्मसुधारक, स्वतंत्रता सेनानी, अस्पृश्यता निर्मूलक, आंतरजातीय – आंतरधर्मीय विवाह समर्थक, मार्क्सवादी, रॉयवादी, गांधीवादी, नवमानवतावादी विचारधारांचे अभ्यासक आणि कार्यकर्ते, कोशकार, संपादक, भाषांतरकार, समीक्षक, प्रस्तावनाकार, प्रबोधक, राजकीय विश्लेषक, साहित्यिक, चरित्रकार, प्रबंधकार, प्राच्यविद्या विशारद, राष्ट्रीय संस्कृत पंडित… त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आपण कितीही रूपे वर्णिली तरी त्यापलीकडे पुरून उरतातच. यात कसलीही अतिशयोक्ती नाही तर हे त्यांच्या संदर्भातलं वस्तुनिष्ठ विधानच! हे तुम्ही जेव्हा त्यांचे समग्र वाङ्मय वाचाल तेव्हा लक्षात येईल.
‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई’ आणि ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ मुंबईचे ते संस्थापक अध्यक्ष. मराठी भाषा संचालनालय, राज्य विकास संस्था यांच्या निर्मितीत त्यांचा पुढाकार होता. या मराठी राजभाषेस ज्ञानभाषा बनविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. मराठी भाषेस अभिजात भाषा बनविण्यात तर्कतीर्थांचे योगदान कोण नाकारेल? समृद्ध प्राचीन भाषेची गुणवैशिष्ट्ये वर्तमानात अस्तित्वात असणे ही अभिजात भाषेची पूर्वअट असते. ती तर्कतीर्थांच्या साहित्यिक आणि भाषिक कार्याने पूर्णत्वास नेली. तर्कतीर्थांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळात कार्यरत असण्याच्या काळात महात्मा फुले समग्र वाङ्मय (१९६९) , सेनापती बापट समग्र वाङ्मय (१९७७) यांसारख्या प्रकल्पांना पूर्णत्व दिले. आज मराठी साहित्य विश्व अशा सुमारे तीस एक प्रकल्पांनी समृद्ध आहे. अशा वाङ्मयाची निर्मिती करण्याचा आग्रह धरणाऱ्या तर्कतीर्थांचे समग्र वाङ्मय उपलब्ध नव्हते. त्याची क्षतिपूर्ती मी संपादित केलेल्या १८ खंडांच्या बृहत प्रकल्पाच्या प्रकाशनाने झाली आहे. सुमारे हजार पृष्ठांचे हे साहित्य मराठी वाचकांना प्रथमच एकत्र वाचण्यास उपलब्ध झाले आहे.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अवकाशाची निर्मिती
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयात तर्कतीर्थ लिखित मराठी विश्वकोशाच्या सर्व २० खंडांतील दीडशेहून अधिक दीर्घ नोंदी, त्यांनी दिलेल्या भाषणांच्या उपलब्ध लिखित सव्वाशे संहिता, पाऊणशे एक मुलाखती, सव्वादोनशे लेख, सुमारे दीडशे प्रस्तावना, तीस एक समीक्षा, उपलब्ध प्रबंध आणि चरित्रे (मराठी व संस्कृत), विस्तृत पत्रव्यवहार, संस्कृत हस्तलिखित ग्रंथ (पोथ्या) सूची (दोन खंड), भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या मसुद्याचे संस्कृत भाषांतर (१९५२) अशा ऐवजाचा अंतर्भाव आहे. आजवर मराठी समग्र वाङ्मय परंपरेत संहिता खंडच प्रकाशित होत आले आहेत. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी आपल्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ मध्ये याला ‘शरीर खंड’ म्हटले आहे. या प्रकल्पात ही परंपरा वर्धिष्णू करीत दोन अधिकचे पूरक खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. पैकी एक खंड ‘स्मृति – गौरव खंड’ असून त्यात तर्कतीर्थांवर लिहिलेले गौरव लेख, स्मृतिलेख, आठवणी यांचा समावेश आहे, तर दुसरा खंड ‘तर्कतीर्थ साहित्य समीक्षा लेखसंग्रह’ म्हणून संपादित करण्यात आला आहे. त्यामुळे वाचक, अभ्यासक, संशोधक यांना मौलिक साहित्य संपदेबरोबर त्याची समीक्षा आणि लेखकाच्या विचार, कार्य, योगदानासंबंधीचे संदर्भ एकहाती उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाबरोबर समग्र व्यक्तिमत्त्व, कार्य, विचारांच्या संबंधी संदर्भ एकाच जागी उपलब्ध झाल्याने या साहित्य, कार्य, विचारावर भविष्यकाळात समीक्षा, संशोधन गतिशील होईल.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री समग्र वाङ्मयाचे १८ खंड हे ‘महाभारत’ आणि ‘भगवद्गीता’ परंपरेचे वर्तमान रूप. यातील पहिल्या खंडात मराठी विश्वकोशात तर्कतीर्थ लिखित नोंदी वाचताना लक्षात येते की या लेखनाचा पट ‘वेद’ ते ‘वेब’ असा विस्तृत, सर्वविषय संग्राहक आहे. तर्कतीर्थांनी विश्वकोशामधील नोंदीचे वस्तुनिष्ठ शैलीशास्त्र विकसित केले होते. ‘मराठी विश्वकोश’ निर्मितीपूर्वी त्यांनी सन १९६५ मध्ये ‘मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ’ प्रकाशित केला होता. हा ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा रचनाकल्प (ब्लू प्रिंट) होता. तो वाचताना लक्षात येते की, तर्कतीर्थांना डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर संपादित ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ (२-३ खंड) मधील लेखन त्रुटी दुरुस्त करून कोशलेखन पद्धतीत वैज्ञानिकता आणि वस्तुनिष्ठता आणली. ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’ सन १९६८ ला प्रकाशित झाला तेव्हा विज्ञान विकास प्राथमिक अवस्थेत होता. तर तंत्रज्ञान उदयोन्मुख होते. मराठी विश्वकोश विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आद्यायावत माहिती देतो. याचं कारण तर्कतीर्थांनी रोनाल्ड डंकन आणि मिरांडा वेस्टन – स्मिथ संपादित सन १९७७ चा ‘दि एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’ अभ्यासलेला होता. तर्कतीर्थलिखित नोंदी म्हणजे त्या विषयाचं सर्वंकष आकलन आहे.
या प्रकल्पात संकलित भाषणांचे चार खंड व्यक्ती आणि विचार, धर्म, साहित्य आणि संस्कृती अशा चार वर्गवारीत प्रस्तुत केले आहेत. आजवर तर्कतीर्थांचे प्रकाशित साहित्य हे त्यांच्या भाषणसंग्रह रूपांतच परिचित होतं. त्या संग्रहांपलीकडची सुमारे शंभर तरी भाषणे या प्रकल्पमुळे वाचकांना एकत्र उपलब्ध झाली आहेत. तर्कतीर्थांचे वक्तृत्व हिंदू धर्म सुधारणेने सुरू झाले. स्वातंत्र्य लढ्यातील जागृतीपर व्याख्यानातून त्यांचा वक्ता प्रगल्भ आणि प्रभावी झाला. स्वातंत्र्योत्तर काळात त्याने समाज प्रबोधकाचे रूप धारण करून महाराष्ट्र समाज पुरोगामी, परिवर्तनशील, धर्मनिरपेक्ष, समतावादी होईल असा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदा, परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्यानमाला, ग्रंथ प्रकाशन समारंभ, गौरव समारंभ यात तर्कतीर्थ विद्वज्जड भाषणे देत आणि पानाच्या टपरीचे उद्घाटन करताना ‘पानसुपारीचे सांस्कृतिक महत्त्व’ देखील जनसामान्यांना त्यांच्या प्रचलित भाषेत समजावत. मराठी भाषेस प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून देणारा ग्रंथ तर्कतीर्थांचा होता. ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ला सन १९५५ चा पुरस्कार लाभला. हा ग्रंथ मराठी साहित्याचा अभिजात ग्रंथ मानला जातो. त्याची हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भाषांतरे उपलब्ध आहेत. वेद ते महात्मा गांधी असा भारतीय संस्कृतीचा विशाल पट मांडणारा हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून आंतरविद्याशाखीय प्रमाण ग्रंथ होय.
हेही वाचा : आंबेडकरी अभिव्यक्तीला नवी पालवी…
सहावा खंड मुलाखतींचा संग्रह असून या मुलाखती एकीकडे व्यक्तिगत जीवन उजळतात तर दुसरीकडे समकालीन विविध प्रसंग, घटनांची समीक्षा, विश्लेषण करत ‘वर्तमान भाष्य’ असं त्यांचं स्वरूप होतं. त्यांनी वेळोवेळी सन १९२३ ते १९९३ अशा सात दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके, पाक्षिके, दिवाळी अंक, गौरव ग्रंथ, कालखंडावरील विशेष ग्रंथ अशांतून विविध प्रदीर्घ लेख लिहिले. पूर्वी सन १९४५ ते १९८५ अशा चार दशकांच्या कालातील दिवाळी अंकामधून विविध विषयांवर लिखित परिसंवाद प्रकाशित होत. ते त्या त्या वर्षीच्या वा समकालीन काही कूट प्रश्नांवर त्या त्या क्षेत्रातील विद्वानांची मतमतांतरे प्रकाशित करून समाज मनाची मशागत करीत. अशा सुमारे वीस परिसंवादांतील तर्कतीर्थ विचार वाचन झाले तर त्यातून तर्कतीर्थांचा जीवन, समाज, संस्कृती, साहित्य, राजकारणविषयक दृष्टिकोन समजायला मोठी मदत होईल. अशा लेखांचे तालिक, राजकीय, सांस्कृतिक, संकीर्ण असे वर्गीकरण करत तीन बृहत खंड या समग्र वाङ्मयात आहेत. तर्कतीर्थ उदारमनाने सर्वांच्या ग्रंथांना प्रस्तावना लिहित, पण परीक्षणे मात्र त्यांनी निवडकच लिहिलीत. त्यांचे दोन स्वतंत्र खंड आहेत. प्रस्तावना विवेचक आहेत, तर परीक्षणे, समीक्षा, विश्लेषक. त्यांनी ‘जडवाद’ आणि ‘आनंदमीमांसा’ असे दोन मूलभूत प्रबंध मराठीत लिहिले, तर संस्कृतमध्ये ‘शुद्धिसर्वस्वम्’, ‘भारतीय धर्मेतिहासतत्त्वम्’ आणि ‘अस्पृश्यत्व – मीमांसा’. हे मराठी आणि संस्कृत प्रबंध म्हणजे तर्कतीर्थांच्या तत्त्वज्ञान लेखनाचा वस्तुपाठ. ते सर्व वाचकांनी मुळातूनच वाचले पाहिजेत. तर्कतीर्थ हे महात्मा फुले यांच्यावर लेखन करणाऱ्या आद्या चरित्रकारांपैकी एक होत. ‘ज्योति – निबंध’ (१९४७) आणि ‘ज्योतिचरित्र’ (१९९२) मराठीशिवाय हिंदी, इंग्रजीत उपलब्ध आहे. त्यामुळे महात्मा फुले भारत तसेच जगभरात पोहोचणे शक्य झाले. या सर्वांचा – प्रबंध आणि चरित्रांचा स्वतंत्र खंड करण्यात आला आहे. त्यांच्या पत्रांचा एक खंड असून त्यात पत्रे, मानपत्रे, पदव्या, मूळ हस्ताक्षरातील पत्रे, शिवाय विविध संस्था आणि व्यक्तींची अनेक महत्त्वपूर्ण पत्रे म्हणजे तर्कतीर्थ समाज पुरुष असल्याचा पुरावा तसेच व्यक्तींची अनेक महत्त्वपूर्ण पत्रे म्हणजे तर्कतीर्थ समाजपुरुष असल्याचा पुरावा. त्यांचे संस्कृत हस्तलिखित ग्रंथांचे विवरण करणारे दोन सूची खंड त्यांच्या प्राचीन वाङ्मयाच्या व्यासंगाचे द्याोतक, तर ‘भारतीय संविधानम्’ हे संस्कृत भाषांतर म्हणजे संस्कृतवरील एकाधिकाराचा प्रत्यय. ‘स्मृति-गौरव खंड’ आणि ‘तर्कतीर्थ साहित्य समीक्षा लेखसंग्रहा’तून तर्कतीर्थ साहित्य समजायला मदत होते. प्रत्येक खंडास स्वतंत्र दीर्घ प्रस्तावना असून, शेवटी संदर्भ सूची देऊन हे खंड वैज्ञानिक संपादनाचा नमुना बनेल असा प्रयत्न करण्यात आला आहे.
lokrang@expressindia.com