रवींद्रनाथ टागोर यांचे चरित्र आणि साहित्य याबद्दल आजही जगभरातील लोकांमध्ये अमाप कुतूहल आहे. त्याच कुतूहलातून अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून डॉ. विलास खोले आणि प्रदीप कुलकर्णी यांनी मराठीमध्ये लिहिलेले ‘प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकासाठी डॉ. विलास खोले यांनी आधी तीन प्रकरणे लिहिली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर लेखक प्रदीप कुलकर्णी यांनी त्यात ३७ प्रकरणांची भर घालून हे अपुरे संकल्प-कार्य दीड वर्षातच पूर्ण केले. थोर प्रतिभावंत, कवी, लेखक, शिक्षक, कलाकार, चित्रकार, समाजसेवक इत्यादी गुणांनी संपन्न आणि मानवतावादी अशा रवींद्रनाथ टागोर यांचे समग्र चरित्र सुसंगतपणे आणि रसाळपणे लिहिणे, हे फार मोठे काम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुस्तकात सुरुवातीला रवींद्रनाथांचे आजोबा म्हणजे ‘प्रिन्स द्वारकानाथ’ यांच्या यशस्वी उद्याोगशील चरित्रापासून एकेक प्रकरणे रेखाटली आहेत. हुशार, उद्यामी द्वारकानाथांनी आपल्या बुद्धिचातुर्याने समाजात आणि इंग्रजांच्या देशातही कसा प्रभाव निर्माण केला, अपार धनसंपत्ती मिळवण्याबरोबर समाज प्रगत व्हावा यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले, हा इतिहास नेमका लिहिला आहे. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांच्यावरील राजा राममोहन रॉय यांच्या ‘ब्राह्मो समाजा’च्या पुरोगामी तत्त्वज्ञानाचा प्रभाव, हिंदू धर्मातील अन्याय्य, अनिष्ट रूढींना केलेला विरोध, वैराग्यपूर्ण आयुष्य, वेदाभ्यास, हिमालयातील वास्तव्य यांमुळे ‘महर्षी’ म्हणून ओळख, हेही अतिशय सुबोधपणे लिहिले आहे. रवींद्रनाथांचे भाऊ, बहिणी व नातेवाईक हे सर्व अतिशय बुद्धिमान, कलाप्रेमी आणि प्रगत विचारांचे होते. त्यामुळे टागोरांच्या घरात समृद्ध, मोकळे, उत्साहपूर्ण सांस्कृतिक वातावरण होते. जन्मजात लाभलेली उच्च प्रतिभा, कलासक्त कुटुंब आणि घरातील समृद्ध, पोषक वातावरण यांमुळे रवींद्रनाथांची प्रतिभा कशी फुलली आणि त्यांची कीर्ती वैश्विक होण्यास कशी मदत झाली, या सर्वांची यथायोग्य आणि वस्तुनिष्ठ नोंद लेखक पुस्तकात घेतात.

हेही वाचा…सरले सारे तरीही…

यानंतर रवींद्रनाथांचे बालपणापासूनचे समग्र चरित्र अतिशय सुरसपणे आणि समरसतेने आपल्यासमोर येते. यात त्यांच्या वैयक्तिक चरित्राबरोबर त्या वेळची कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, ग्रामीण, शहरी परिस्थिती कशी होती याबद्दलचे वास्तव रूप दर्शवले आहे. पुस्तकातील ‘संवेदनशील जमीनदार’, ‘बंगाली लघुकथेचे जनक’, बंगालची फाळणी आणि स्वदेशीची चळवळ’, ‘जनगणमन गीताची जन्मकथा’, ‘विश्वभारती विद्यापीठाची स्थापना’ इत्यादी प्रकरणांची शीर्षके उत्सुकता निर्माण करतात आणि शमवतातदेखील. ‘गीतांजलीला नोबेल पारितोषिक’ हा लेख तर खास वाचावा. रवीन्द्रनाथांनी ग्रामविकासासाठी स्थापलेल्या ‘श्रीनिकेतन’बद्दलचा लेख वाचून ‘‘ते नुसते बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते!’’ हे लेखकाचे म्हणणे पूर्णपणे पटते.

रवींद्रनाथ आपल्या लेखांमध्ये, भाषणांमध्ये जसे भारतीय संस्कृतीचे माहात्म्य अभिमानाने विशद करत, त्याचबरोबर भारतीयांच्या लाचारी, अंधानुकरण, दांभिकता अशा दुर्गुणांवर कोरडे ओढत आणि इंग्रजांचा कावेबाज स्वार्थीपणा जनतेच्या लक्षात आणून देत.संवेदनशील मन, लोकांना भेटण्याची, जाणून घेण्याची इच्छा, नावीन्याची आस आणि वडिलांकडून मिळालेली प्रवासाची आवड यांमुळे १९४० सालापर्यंत जगातील ३४ देशांना भेटी दिलेल्या रवींद्रनाथांना ‘भ्रमंती करणारा लेखक’ असेच म्हणायला हवे. त्यांनी परदेशात सहिष्णू भारतीय संस्कृती, प्राचीन वेदादी ज्ञान यांचे महत्त्व सांगणारी व्याख्याने दिली, काव्य-चर्चा केल्या, चित्र-प्रदर्शनं भरवली, आपल्या संस्थांसाठी निधी गोळा केले, मुसोलिनी, आइनस्टाइन, रोमाँ रोलाँ इ. प्रसिद्ध राजकारणी- शास्त्रज्ञ- कवी- लेखक इ.च्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अशा प्रकारे रवींद्रनाथ परदेशांमध्ये परतंत्र भारताचे सांस्कृतिक दूत बनले आणि त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या बाजूने अनेकांचे अनुकूल मत तयार झाले, यांविषयी सुरेख लेख आहे. रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार, शांतिनिकेतन, विश्वभारती विद्यापीठ, संगीत, चित्रकला, नाट्यकला इत्यादीविषयी पुस्तकात अभ्यासपूर्ण ऊहापोह आहे.

हेही वाचा…चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार

कलावंतांचे आपले असे एक जग असते, पण या भौतिक जगाचे नियम, जाच, येथील सुखदु:खे, व्यथा हे कुणालाच चुकले नाही. रवीन्द्रनाथांवर झालेले आरोप, आघात, त्यांच्या जीवलगांचे मृत्यू यांसंबंधी लेखकाने संवेदनशीलतेने लिहिले आहे. या अद्भुत जीवनकथेनंतर रवींद्रनाथांच्या चार लघुकथा वाचणे, ही वाचकांसाठी एक पर्वणी पुस्तकात आहे. तसेच रवींद्रनाथांच्या संदर्भातील कृष्णधवल छायाचित्रे, त्यांच्या समग्र बंगाली साहित्याची सूची, संदर्भग्रंथांची यादी आणि काही विशेष परिशिष्टे यांमुळे पुस्तकाच्या वाचनीयतेत मोलाची वाढ झाली आहे. परंतु रवींद्रनाथांच्या ‘छिन्न पत्रे’मधील काही पत्रे, प्रवासवर्णनाची, छोट्यांना लिहिलेल्या पत्रांची झलक, तसेच एखादे रवींद्र-गीत, नाटकाची कथा याबद्दल जास्तीची माहिती पुस्तकात हवी होती, असे वाटते. रसिक, अभ्यासू आणि जिज्ञासू वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि आपल्या संग्रही ठेवावे. ‘प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर’, – विलास खोले, प्रदीप कुलकर्णी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने- २७७, किंमत- ४५० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang article on marathi book pratibhasurya rabindranath tagore by vilas khole and pradeep kulkarni published sud 02