साहित्याचा प्रवाह मोठाच, पण दृश्यकलेचाही परीघ वाढतो आहे हे अनुक्रमे ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ आणि ‘दिल्लीच्या इंडिया आर्ट फेअर’मधून दिसून आलं.. व्यावसायिकरीत्याच भरवल्या जाणाऱ्या या फेस्टिव्हल/ फेअरसमोर आपल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ची स्थिती मात्र केविलवाणी.. मराठी साहित्याचा प्रवाह जणू त्रिवेणी संगमातल्या सरस्वतीसारखा अदृश्यच वाटावा, अशी. हे का होतं आहे याचा अमळनेरहून मांडलेला लेखाजोखा आणि सोबत जयपूर व दिल्लीचे वृत्तान्त..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्वत:ला बिलकूल अखिल भारतीय न म्हणवून घेणाऱ्या जयपूर साहित्य महोत्सवाचे यंदाचे सतरावे वर्ष हे भारतातील १६ भाषांचे आणि इंग्रजीसह जगातील आठ भाषांचे प्रतिनिधित्व करणारे होते. ज्यात चारशेहून अधिक लेखक-वक्ते, अनुवादक आणि विचारवंत यांच्या चर्चेचे विषय विभिन्न असले तरी हेतू एकच होता, तो म्हणजे पुस्तक विकण्याचा! तो किती यशस्वी झाला याची दोन-तीन उदाहरणेदेखील पुरेशी आहेत. सुधा मूर्ती या आपल्याकडल्या सर्व प्रांतांतील खूपविक्या लेखिका. त्यांच्या ताज्या पुस्तकावरील चर्चासत्रासाठी गर्दी इतकी होती की, सलग साडेतीन तास सह्य करूनही पुस्तक खरेदी करीत त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्यांची रांग संपत नव्हती; आणि हेच शशी थरूर आणि गुलजार यांच्याबाबतही झाले होते.
हेही वाचा…जाणिवा उसवणारं आत्मकथन..
‘लेसन्स इन केमिस्ट्री’ या कादंबरीद्वारे अचानक आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी बनणाऱ्या बॉनी गारमस, २०२३ आणि २०२१ चे बुकर विजेते अनुक्रमे पॉल लिन्च आणि डेमन गालगट, ‘ओपनहायमर’ सिनेमा ज्यांच्या ग्रंथाधारे झाला त्या पुलित्झर विजेत्या लेखक काय बर्ड यांच्या पुस्तकांबाबतही हे घडत होते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि विविध राज्यांतील छोटय़ा-मोठय़ा शहरगावांतील लोक (आपल्याला फार माहिती असलेल्या अतिभंपक ‘रसिक वाचक’ वगैरे बिरुदापलीकडील) पुस्तक विकत घेण्यात, त्यांवर लेखकाची सही मागण्यात, आपल्या आवडत्या लेखकाला जाच न होऊ देता त्यांच्यासह सेल्फी काढण्यात मग्न होते. पुस्तकांच्या पाचशे-हजार प्रती काही तासांत खपण्याचा आणि इतका फक्त त्याच गोष्टीच्या खरेदीसाठी आलेला वाचक जथा खऱ्या अर्थाने ग्रंथसजग म्हणावा लागेल. जो प्रत्येक दिवशी होणाऱ्या तीस ते सदतीस इतक्या संख्येने चर्चासत्रांपैकी जेमतेम तीन ते पाचच ऐकू-अनुभवू शकण्याची मर्यादा मान्य करीत आपल्याला हव्या त्या लेखकाची ५० मिनिटांची (वेळ सर्वाना समान. भाषण-गप्पा-प्रश्नोत्तरे यांचे नियोजन अचूक. काही सेकंददेखील पुढे गेल्यास थांबविण्याची शिस्तबद्ध रचना) वेळ पकडण्यासाठी हॉटेल क्लार्क आमेरच्या भवतालच्या ‘फ्रण्टलॉन’, ‘चारबाग’, ‘मुघल टेण्ट’, ‘दरबार हॉल’, ‘बैठक’ या पाच भव्य ठिकाणांची पायपीट किंवा धावपीट करताना दिसत होता.
पुस्तक खरेदी-श्रवण यापलीकडे यंदा दिसलेली इथली दर वर्षीपेक्षा तरुणाईची तिप्पट गर्दी इथल्या उत्साही-उत्सवी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जमलेली. नजीकच्या हिंदीबहुल पट्टय़ांच्या राज्यांमधून महोत्सवाच्या कुतूहलापोटी आलेली. यात वर्षांगणिक भर पडत असली तरी हिंदीला इंटरनॅशनल बुकर मिळाल्यानंतर हिंदी पत्रकार आणि वाचकांच्या ठळक जाणवणाऱ्या संख्येचे प्रतिनिधित्व यंदा आत्मविश्वासासह इथे वावरताना आणि आस्वाद घेताना दिसले.
हेही वाचा…आठवणींचा सराफा: किरणदा.. आमचा मेन्टॉर
‘बुक टेंट’ हे इथले महत्त्वाचे आकर्षण केंद्र- जे पूर्वी फक्त महोत्सवात असणाऱ्या लेखक-वक्ते-विचारवंत यांच्याच पुस्तकांची विक्री करीत होते. त्यातला बदल विचारपूर्वक केलेला होता. महोत्सवात येणाऱ्या हरतऱ्हेच्या वाचकांना खेचून घेण्यासाठी या बुक टेंटमध्ये निवडक क्लासिक्स आणि समकालीन खूपविक्या पुस्तकांची सहज उपलब्धता होती. उदा. महोत्सवात वक्ता किंवा पाहुण्या असलेल्या सर्व लेखकांची पुस्तके सहज उपलब्ध होतीच, पण ते नसलेल्या जपानी लेखक हारुकी मुराकामी यांची इंग्रजी अनुवादित पुस्तके सहज नजरेस पडतील अशी ठेवण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत बुकर पुरस्कार पटकावलेल्या आणि महोत्सवात न फिरकलेल्या कित्येक लेखकांची पुस्तके इथे होती. या बदलाचा परिणाम म्हणजे दिवसातल्या कोणत्याही वेळेत, अगदी गर्दी खेचणाऱ्या चर्चासत्रांच्या दरम्यानही इथली खरेदी थांबत नव्हती आणि बिलिंग काऊंटर क्षेत्र वाढवूनही तिथले कर्मचारी अव्याहत ग्रंथपिशव्या भरण्यात दंग होते.
या ग्रंथदालनात दाखल असलेल्या देशी किंवा जगभरातील पुस्तकांची निर्मिती आणि त्यावर घेतलेली मेहनतदेखील अनेक गोष्टी शिकवून जाणारी होती. किमतीच्या तुलनेत कागद, बांधणीचा दर्जा आणि त्यांतले प्रयोग, मुखपृष्ठांचे नमुने ग्रंथ हाताळताना आपली श्रीमंती दाखविणारे. बॉनी गारमसच्या ‘लेसन्स इन केमिस्ट्री’ची आपल्याकडल्या दुकानांत असलेली पुठ्ठाबांधणी, रस्तादालनांतील खूपविक्या पुस्तकांच्या रांगेत असलेली पेपरबॅक आवृत्ती यांच्यापेक्षा वेगळीच ‘हार्डबाऊंड’ प्रत तिथे मोहात पाडत होती.
हेही वाचा…मन:स्वास्थ्यासाठी..
प्रेक्षकओढू सुपरिचित चर्चासत्रांपलीकडे ‘जो जे वांछील तो’ या प्रकारच्या विषयांवर नवी माहिती करून देणाऱ्या गप्पांची इथे कमतरता नसते. ‘द अल्केमी ऑफ बुकसेलिंग’ नावाचे एक चर्चासत्र होते. देशभरामध्ये विविध शहरांत मोठी पुस्तकालये असणाऱ्या विक्रेत्यांचे. ऑनलाइन खरेदीने दारात ग्रंथ पोहोचविणाऱ्या अॅमेझॉनपुढे ‘मोठी’ ही संकल्पना वापरणे संकुचित असले, तरी या महोत्सवातीलच एका चर्चासत्रात भारतातील मुख्य शहरांतील पुस्तकांच्या सक्रिय असलेल्या भव्य दुकानांची संख्या तीन हजारांहून अधिक असल्याची आकडेवारी समोर आली. तर या ‘द अल्केमी ऑफ बुकसेलिंग’ चर्चासत्रात ‘क्रॉसवर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता, दिल्लीतील ‘सीएमवायके’ बुकस्टोरचे मालक कपिल आणि प्रिया कपूर यांनी वाचकांना आकर्षित करण्याच्या व्यावसायिक मुद्दय़ांवर चर्चा केली. या चर्चासत्रात गंमत म्हणजे एक विषय काही क्षणांसाठी उपस्थित झाला, तो प्रादेशिक भाषांच्या पुस्तक विक्रीचा. मल्याळम, तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी या पुस्तकांची-प्रकाशकांची त्यांच्या विक्रीची स्थिती सांगण्यात आली. त्यात ‘मराठी’तील पुस्तकांच्या-प्रकाशकांच्या जयपूर साहित्य महोत्सवातील प्रतिनिधित्व नसल्याबद्दलचा मुद्दाही चर्चिला गेला.
विशेष म्हणजे याच चर्चासत्रात मराठी पुस्तके विकणारा एकमेव विक्रेता सहभागी होता, तो कोल्हापूरमधील ‘ग्रंथ’ या प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या (मराठी, हिंदी पुस्तकेही असलेल्या) लोकप्रिय दुकानाचा तरुण मालक विशाल पिंजानी. त्याने मराठीची बाजू किंचित लढविली, तरी ‘मर्यादा सर्वोत्तम’ वाचकांच्या बळावर अडीचशे ते हजार प्रती विक्रींच्याच समाधानात रमणाऱ्या प्रकाशन उद्योगाची काय ती परिस्थिती सांगितली जाणार?
हेही वाचा…अस्तित्वाचा तपास..
या महोत्सवाने सतरा वर्षांत आपली केवळ आंग्ल ओळख हळूहळू कमी करत नेली आहे. यंदा हिंदी पट्टय़ातील राज्यांतून प्रचंड संख्येने आलेली गर्दी तेच सांगत होती. पत्रकारांसह हिंदी लेखकांची उपस्थितीही बरीच होती. पण यंदाच्या वर्षीच तुलनेने कमी हिंदी चर्चासत्रे झाली. दक्षिणेतील लेखकांचा अनुवाद होणाऱ्या साहित्यात वरचष्मा असतो. पेरूमल मुरूगन यांना नुकतेच ‘फायर बर्ड’ पुस्तकासाठी ‘जेसीबी’ पारितोषिक जाहीर झाले. एक चर्चासत्र या ‘जेसीबी’ पारितोषिकाच्या लघुयादीमध्ये असलेल्या लेखकांचे होते. त्यात मनोरंजन व्यापारी (बंगाली) आणि मनोज रूपडा (हिंदी) यांनी आपापल्या लेखनाची निर्मिती प्रक्रिया सांगितली.
बंगाली आणि दक्षिण भारतीय लेखकांच्या पुस्तकांच्या तुलनेत इतर भाषांतील ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद अद्याप मंद गतीनेच होत असल्याचे या सत्रात पुन्हा अधोरेखित झाले. मनोरंजन व्यापारी यांनी आत्तापर्यंत लिहिलेल्या १४ कथनात्मक पुस्तकांपैकी १२ इंग्रजीत उपलब्ध आहेत. मुरूगन यांचे ‘फायर बर्ड’ या पुस्तकावर स्वतंत्र चर्चासत्र होते. त्यात दणकून तमीळच बोलून त्यांनी मुलाखत अनुवादकर्त्यांसह श्रोत्यांची मने जिंकली. वर पुस्तक खरेदीसाठी गर्दीही मिळविली. ‘कन्व्हर्सेशन ऑफ औरंगजेब’ या नव्या अनुवादित कादंबरीच्या निमित्ताने चारू निवेदिता या तमिळमधील आणखी एक ‘रॉकस्टार’सम लोकप्रिय लेखकाचे चर्चासत्र इंग्रजी आणि तमिळमध्ये झाले. पुस्तक शीर्षकामुळे तुरळक गर्दी (फक्त तीनेकशे लोक) असलेल्या या चर्चासत्रात लेखकाने देशातील वर्तमान राजकारण, धर्मकारणाच्या स्थितीचा तिरकस शैलीत समाचार घेत आपल्या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया सांगितली. इंग्रजीत पुस्तक अनुवादित झाल्यानंतर पुस्तक आणि लेखकाच्या वाढणाऱ्या परिघाबद्दलही त्यांनी सुंदर चर्चा केली. निवेदिता यांनी आधीच्या सर्व पुस्तकांबद्दल कुतूहल निर्माण करीत खऱ्या अर्थाने आपले सत्र गाजवले.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: काळाची बखर
यंदा जाणवणारी एक बाब म्हणजे, मराठी समुदायाची उपस्थिती. मुंबई, पुणे, नागपूरच नाही तर नाशिक आणि औरंगाबादेतील तरुण-तरुणींचा, काही लिहित्या मराठी लेखकांचा तिथला वावर आश्चर्यकारक होता. अखिल भारतीय म्हणवून घेण्याचा सोस असलेल्या आणि गौरव परंपरांच्या बाता मारत वास्तव जगापासून फारकत घेणाऱ्या आपल्याकडच्या साहित्य मेळय़ांनी सालाबादप्रमाणे चालणारा उदासी शिरस्ता मोडला नाही, तर हळूहळू वाचणाऱ्या सजग मराठी वाचकांचा जथा जयपूरसारख्या साहित्य महोत्सवातच पाहायला मिळेल. त्याला सुरुवात झाल्याचे यंदा तरी लख्ख जाणवले.
pankaj.bhosle@expressindia.com