‘लोकरंग’मधील (५ जानेवारी) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी लिहिलेला ‘अजंठ्याची पुसटरेषा… ’ हा थोर कवयित्री इंदिरा संत यांच्यावरचा लेख वाचला. मी स्वत: इंदिरा संत यांच्या कवितेचा निस्सीम भक्त आहे. या लेखात माझे वडील रमेश मंत्री यांचा संदर्भ देताना लेखकाने म्हटले आहे की, ‘त्यात रमेश भाऊ आधीच मंत्री आणि त्यात अमेरिकी माहिती केंद्रातले अधिकारी. अनेक अनुवादांची कामं देणारे. (शक्य झाल्यास) अमेरिकावारी करवणारे वगैरे. त्यामुळे त्यांचा तसा दबदबा होता साहित्य विश्वात…’ ही माहिती चुकीची व दिशाभूल करणारी आहेे.
साहित्यिक जयवंत दळवी यांच्याकडे अमेरिकन वाड्.मयाचा अनुवाद मराठी लेखकांकडून करून घेण्याचे काम अमेरिकन सरकारने दिलेले होते. लेखक म्हणतात तसे ते काम रमेश मंत्रींकडे नव्हते. रमेश मंत्री ‘अमेरिकन वार्ताहर’ या नियतकालिकाचे काम बघायचे. तसेच रमेश मंत्री यांना कोणालाही अमेरिकेला पाठवण्याचा अधिकार अमेरिकन सरकारने दिलेला नव्हता, त्यामुळे लेखक नमूद करतात तसे रमेश मंत्री यांनी कोणालाही अमेरिकेला पाठवलेले नव्हते किंवा त्यांच्या नावाची शिफारसही केली नव्हती. तसे कोणाला पाठवले असेल तर त्याने अवश्य पुढे यावे. रमेश मंत्री यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही तेव्हाच्या निवड पद्धतीप्रमाणे होती. त्यावेळी त्यांची सुमारे १२५ पुस्तके प्रसिद्ध झाली होती. ‘जनू बांडे’, ‘महानगर’, ‘थंडीचे दिवस’, ‘सह्याद्रीची चोरी’ व इतर अशी अनेक पुस्तके गाजत होती. तेव्हाच्या साहित्य महामंडळाच्या सुमारे ३०० मतदारांनी रमेश मंत्री यांना त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारावर निवडून दिले होते. त्याचा अमेरिकन सरकारमधील नोकरीशी सुतराम संबंध नाही.
- राजेंद्र मंत्री, सिडनी, ऑस्ट्रेलिया
‘अक्का’वरचा लेख भावला
‘लोकरंग’मधील (५ जानेवारी) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी लिहिलेला ‘अजंठ्याची पुसटरेषा… ’ हा कवयित्री इंदिरा संत म्हणजेच ‘अक्का’वर लिहिलेला लेख अतिशय भावला. होय. मी त्यांना ‘अक्का’च म्हणत असे. त्यावेळी एक पत्रकार या नात्याने कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने जे जे राजकारण घडले त्याचा एक साक्षीदार! साखळी वृत्तपत्रांना कोल्हापुरात पाय रोवू द्यायचा नाही असा चंग तेव्हा स्थानिक प्रमुख वृत्तपत्रांनी बांधला होता. तर साखळी वृत्तपत्राला साहित्य संमेलन म्हणजे कोल्हापुरात बस्तान बसविण्याची संधी वाटत होती. वृत्तपत्रांच्या या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या लढाईत अक्कांची संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची अजिबात इच्छा नसताना निवडणूक अर्जावर प्रेमाची जबरदस्ती करून त्यांची सही घेण्यात आली. ही सही करताना अक्कांनी स्पष्ट सांगितले होते की, ‘तुम्ही म्हणता म्हणून मी सही केली, तरी मी निवडणूक प्रचारात सहभागी होणार नाही किंवा मला मत द्या म्हणून मी कोणाकडे मत मागायला जाणार नाही!’
अक्कांनी सांगितले तसेच केले. मला अक्कांच्या या भूमिकेमुळे ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानितडॉ. शिवराम कारंथ या ज्येष्ठ कन्नड साहित्यिकाची आठवण झाली नसती तरच नवल! आणीबाणीच्या काळात ‘पद्माभूषण’ सारखा सन्मान परत करणाऱ्या पर्यावरणप्रेमी डॉ. कारंथ यांनी कैगा अणू विद्याुत प्रकल्पविरोधी भूमिका जाहीर केली. पण भूमिका स्पष्ट करणाऱ्या एका निवेदनापलीकडे निवडणूक प्रचार न करता बाकी गोष्टी मतदारांच्या सुजाण/ अजाणपणावर सोडून दिल्या. अक्कांनी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हेच केले. अपेक्षेप्रमाणे अक्कांचा पराभव झाला, पण तो अक्कांचा नव्हे तर मतदारांच्या सुशिक्षित, समंजस व सुजाणतेचा पराभव होता. अक्कांनी जे घडले ते मनावर घेतले नाही. कोणतीही आदळआपट केली नाही. सगळे अपेक्षित असल्याप्रमाणे त्यांनी हसून सोडून दिले!
माझ्यासारख्या पत्रकाराला मात्र जे घडले त्याची रुखरुख लागून राहिली. कोल्हापूरच्या एखाद्या प्रातिनिधिक व्यासपीठावर अक्कांचा व पर्यायाने त्यांच्या साहित्याचा गौरव घडवून आणला पाहिजे असे मनाने घेतले. ती संधी चालूनही आली. कोल्हापूर महानगरपालिका दरवर्षी भास्करराव जाधव ग्रंथालयामार्फत एक व्याख्यानमाला घेते. त्यावर्षी व्याख्यानमाला समिती अध्यक्षपद भूषविण्याची संधी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. रूपा शहा यांना मिळाली. मी लगेचच त्यांच्या मदतीने व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेच्या व्यासपीठावर अक्कांच्या सत्काराचा घाट घातला. अक्कांनी आढेवेढे घेतले, पण अखेर सून वीणाताई यांच्यासह येऊन त्यांनी सत्कार स्वीकारला. अक्कांचा कोल्हापुरात सत्कार म्हटल्यावर डॉ. अरुणा ढेरे व डॉ. वासंती मुजुमदार या दोघीही स्वयंस्फूर्तपणे समारंभाला उपस्थित राहिल्या. मनाचा सल थोडासा कमी झाला.
‘सृजन आनंद’च्या प्राचार्या लीलाताई पाटील या प्रयोगशील व आनंददायी बाल शिक्षणक्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. ताई अतिशय परखड व स्पष्टवक्त्या, पण मनाने अतिशय प्रेमळ! अक्कांचे आणि त्यांचे नाते विलक्षण वेगळे! लीलाताई म्हणजे प्रा. ना. सी. फडके यांच्या पहिल्या पत्नीच्या कन्या तर अक्का म्हणजे प्रा. फडके यांच्या द्वितीय पत्नी कमला फडके यांच्या सख्ख्या भगिनी. कमला फडकेंमुळे आपल्या आईच्या वाट्याला जे आले त्याबद्दल लीलाताईंच्या मनात काहीसा राग, पण अक्कांच्या काव्यप्रतिभेविषयी आदर! अक्कांच्या मनात लीलाताईंविषयी सहानुभूती व कार्यकर्तृत्वाविषयी आदरभावही!! दोघीही कर्तृत्वाने मोठ्या. दोघींकडेही माझे जाणे – येणे. भेट झाली की दोघीही माझ्याकडे एकमेकींविषयी चौकशी करत, पण एकमेकींना आवर्जून भेटायला जाणे मात्र टाळत. अक्कांना उतारवयात असताना लहान मुलांसाठी घरातच सकस व पौष्टिक खाऊ कसा बनवून देता येऊ शकतो याविषयी एखादे पुस्तक लिहावे असे तीव्रतेने वाटत होते. कधी-कधी मनात येते, अक्का व लीलाताई यांनी एकत्र येऊन प्रयोगशील व आनंददायी बालशिक्षणाचे प्रकल्प हाती घेतले असते तर?
- उदय कुलकर्णी, कोल्हापूर.
तरल शब्दशिल्प…
‘लोकरंग’मधील (५ जानेवारी) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी लिहिलेला ‘अजंठ्याची पुसटरेषा…’ हा लेख वाचला. राजकारणात सतत सुरू असलेली साठमारी, परस्परांवरील आरोप—प्रत्यारोपांच्य्रा फै री, त्यात असंसदीय भाषेचा मुक्त वापर, या संबंधीची वृत्ते आणि लेखन वाचून आलेली मरगळ या लेखामुळे काही काळापुरती का होईना दूर झाली. इंदिरा संत यांची कविता हे मराठी साहित्याचे देखणे आणि आशयघन लेणे आहे. जी वाचता वाचता मनात केव्हा उतरते तेच मुळी समजत नाही. इंदिराबाईंनी गेयता, नाद, ताल आणि अर्थातच आशयघन यांनी युक्त अशा कवितांची मुक्त उधळण केली- ज्यात मराठी वाचक चिंब झाला. मला आठवते, कोल्हापूर शहरात झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू यांनी बाईंच्या तीन कविता सादर केल्या होत्या. इंदिराबाईंची कविता डॉ. लागू यांनी सादर करणे हा एक मणिकांचन योगच. तुडुंब भरलेल्या सभागृहातील रसिक तल्लीन होऊन काव्यवाचनाचा आनंद घेत होते. या लेखात इंदिरा संतांच्या जागविलेल्या आठवणी वाचकांना भावविवश करणाऱ्या तर आहेतच, पण त्यांचा साधा सरळ आणि निगर्वी स्वभाव जास्त भावला.
अशोक आफळे, कोल्हापूर
नितांतसुंदर लेख
‘लोकरंग’मधील (५ जानेवारी) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी लिहिलेला ‘अजंठ्याची पुसटरेषा… ’ हा कवयित्री इंदिरा संत यांच्यावरचा नितांतसुंदर लेख वाचला. लेख कसला, अहो ही तर तरल आणि प्रफुल्लित कविताच! लेखकाने इंदिरा संतांचा वखवखशून्य आणि नितळ शांत स्वभावाची सुंदर ओळख करून दिली आहे.
- योगेश वसंतराव भोसे