हृषीकेश पाळंदे

काही हिशेबी व्यक्ती पटकन सगळ्या नात्यांतून हात झटकून मोकळ्या होतील आणि कर्तव्य निभावल्याच्या आनंदात दूर हिमालयातल्या केदारनाथची गुहा बुक करून टाकतीलही. पण ज्यांना हे जमत नाही, त्यांची काय तगमग होत असेल, गुंते किती टोकदार होत होत किती त्रासदायक होत असतील, हे ही कादंबरी वाचल्यावर जाणवतं..

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
lokmanas
लोकमानस: उद्याोग हवे तर अणुऊर्जा अपरिहार्य
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून

शांता गोखले यांची ‘रीटा वेलिणकर’ मी जेव्हा पहिल्यांदा वाचली, तेव्हा नुसतीच वाचली. शब्द डोळ्यांसमोरून सरकले एवढंच. ती मला खरंच नीट कळली नव्हती, हे आता मान्य करायलाच हवं. कारण तेव्हा मी कोरा करकरीत होतो. प्रेमात अनेक वेळा पडलो असलो तरी ‘रिलेशन’ असं काही आयुष्यात नव्हतं. आयुष्याचं ध्येय ठरलेलं होतं ते म्हणजे उंडगेपणा. आयुष्याच्या आणि जगण्याच्या बाजारात नोकरी, पैसा, लग्न त्यासाठी मुलगी शोधा वगैरे करावं लागतं हे गावीही नव्हतं. त्यामुळे रीटाच्या मनातली नेमकी उलघाल लक्षात येत नव्हती. पण वर्ष, महिने, दिवस सोडा; तास, मिनिट आणि सेकंद यात विभागलेला वेळ तुम्हाला बरंच काही शिकवून जातो. हे असं का होतंय? या प्रश्नावर जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा एकेक सेकंदही वर्षांएवढा होतो. तशी आत्ता इतका काळवेळ गेल्यावर रीटाची अस्वस्थता, घुसमट समजायला लागली. रीटा खूपच जवळची वाटायला लागली. एखाद्या नात्यातली ओढाताण, नात्यात गुंतलं जाणं हे जीवघेणं ठरू शकतं, आणि त्यात जर विविध नात्यांची अनेक चक्रं एकातएक गुंतली असतील तर काय विचारायलाच नको. काही हिशेबी व्यक्ती पटकन सगळ्या नात्यांतून हात झटकून मोकळ्या होतील आणि कर्तव्य निभावल्याच्या आनंदात दूर हिमालयातल्या केदारनाथची गुहा बुक करून टाकतीलही. पण ज्यांना हे जमत नाही, त्यांची काय तगमग होत असेल, गुंते किती टोकदार होत होत किती त्रासदायक होत असतील, हे ही कादंबरी वाचल्यावर जाणवतं.

कादंबरीची सुरुवात हॉस्पिटलमध्ये बेडवर जखडलेल्या रीटाच्या असहाय अवस्थेपासून होते. ‘नव्र्हस ब्रेकडाऊन’ झाल्यामुळे तिला तिथं दाखल केलंय. ती इथे असहाय अशी वाटत असली तरी ती स्वत:लाच प्रश्न विचारून त्यावर उलटसुलट विचार करून आयुष्याचा गुंता सोडवायचा जिवापाड प्रयत्न करतेय. हा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी. मानसिक आरोग्याविषयी आपण आत्ता जागरूक होतोय. पण शांताताईंनी नव्वदच्या दशकातच ‘मेंटल हेल्थ’बद्दल बोलणं, हे अभूतपूर्व वाटतं.

तर, स्वगतामधून हळूहळू तिचं कौटुंबिक जीवन उलगडत जातं. तशा संपन्न कुटुंबात राहणाऱ्या चार बहिणींपैकी रीटा ही सर्वात मोठी. ती तिच्या मम्मी-डॅडींविषयी सांगते. तिचे मम्मी-डॅडी भयंकर आत्ममग्न असल्याचं कळतं. त्यांना त्यांच्या स्वत:बद्दल, पाटर्य़ाबद्दलच जास्त पडलेलं असतं. त्यामुळे लहानपण काही विशेष चांगलं गेलं नसल्याची बोचरी जाणीव तिच्या मनात ठासून आहे. यावर हॉस्पिटलात विचार करणारी रीटा व्यवस्थेच्या चक्राबद्दल सांगायला लागते. तिला वाटतं की, ‘मीची शेपूट धरून आपल्याला जन्मापासून मरणापर्यंतचं वर्तुळ पूर्ण करायचं असतं. ती करते म्हणून मी, मी करते म्हणून तू, तू करतेस म्हणून त्या- असं हे एक सामूहिक चक्र. त्या चक्रात मी कोण- तू कोणचे प्रश्न चिरडून जातात. उरते पोकळी. मग आयुष्यभर त्या पोकळीत साडय़ा, वांगी, ‘रोमँटिक’ कादंबऱ्या आणि सोनसाखळ्यम कोंबत बसायचं.’ हे वाचल्यावर खरं तर ज्ञानसंपृक्त झाल्यासारखं सगळं सोडून द्यावं असंच वाटत राहतं. पण घडत मात्र नाही. व्यवस्था तिच्या चक्रात आपल्याला गोल गोल फिरवत राहते.

कादंबरीत मग पुढे साळवी येतो. थोडंसं त्याच्या-रीटाच्या नात्याविषयी समजतं. पण तरी नक्की अंदाज येत नाही. तो रीटाच्या मम्मी-डॅडींशी ओळख ठेवून असल्याचं समजतं. मग रीटाची सर्वात धाकटी बहीण संगीताविषयी समजतं. संगीता ही आपल्या ताईशी खूप जवळ आहे. ती तिला रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटत असते. तिला हवं-नको ते बघत असते. तिच्या येण्यानं रीटाला जरा माणसात असल्याची जाणीव येत राहते, जी तिला हवीशी वाटते. रीटा जेव्हा संगीताबद्दल सांगते, तेव्हा व्यवस्थेच्या त्या भयंकर दातेरी चक्राचा अजून खोलातला भाग दिसतो. पण मुख्य भाग तर आणखी खोलात आहे. हा भाग रीटाने तिची बालमैत्रीण सरस्वतीला लिहिलेल्या पत्रातून उलगडत जातो. सरस्वतीला पत्र लिहिताना ती स्वत:मध्ये दाबून ठेवलेलं सगळं मोकळं करत जाते.

तिच्या डॅडींची नोकरी गेल्यावर कुटुंबाला आर्थिक फटका बसतो. त्यांची परिस्थिती हालाखीची होते. पण तरी तिचे मम्मी-डॅडी त्यांची छानछोकी जीवनशैली सोडू शकत नाहीत. त्यावेळी रीटा केवळ १७ वर्षांची असते. या वयात तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी घेते. सर्वात मोठी मुलगी या नात्याचं ओझंच असतं ते. वय १८ वर्षांच्या खाली, तरी विठ्ठल साळवी तिला त्याच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिपची ऑफर देतो. मग तिला पूर्ण वेळ नोकरीत सामावून घेतो. मग तोच तिला पुढील अभ्यासासाठी प्रोत्साहन देतो. कारण, रीटाची जी परिस्थिती आहे, तशीच एकेकाळी त्याची होती. म्हणूनच तो रीटाला रिलेट करू शकतो. तेव्हाच तिचे त्याच्याशी सूर जुळतात. आणि ते हळूहळू रिलेशनशिपमध्ये बदलतात. साळवीचं लग्न झालेलं आहे. त्याच्या आणि रीटाच्या नात्याला भविष्य नाही. तो रीटासाठी त्याचं कुटुंब सोडू शकत नाही, यावर तो ठाम आहे. उलट, रीटानं लग्न केलं पाहिजे, हे त्याचं म्हणणं तिनं ऐकलं पाहिजे असं त्याला वाटत असतं. इकडे रीटा त्याच्यात पूर्णपणे गुंतलेली असते. त्याच्यावर पूर्णपणे विसंबून असते. तिला नेहमीच त्याच्यामध्ये आशेचा किरण दिसत असतो, जो जवळजवळ व्यर्थ आहे. त्यात तिचा एकटेपणा वाढतोय. घरी मम्मी-डॅडीसुद्धा तिला गृहीत धरायला लागलेत. सुरुवातीला व्यवस्थित चाललेलं त्यांचं ते रिलेशन, जेव्हा रीटा त्याच्याकडे एक मागणी करते तेव्हा बिघडायला लागतं. ती मागणी म्हणजे- साळवीनं घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्न करावं किंवा त्यांच्या नात्याला उघडपणे सांगावं. साळवीला हे अजिबात जमणार नसतं. शिवाय, घरातली मोठी मुलगी म्हणून तिच्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या. कृत्रिम नाती आणि अपेक्षाधारी घरचे लोक. ही मोठी ओझी वाहवत असतेच ती. आणि जेव्हा या सगळ्या गुंत्यातून काहीच नीट घडणार नसल्याची जाणीव तीव्र होते तेव्हा ती कोलमडते.

हा व्यवस्थेच्या पोटातला दातेरी भाग हा कादंबरीचा प्राण आहे. हे जे नातं आहे ते समाजमान्य नाही. व्यवस्था ही ‘बायनरी’ विचारांवरच चालणारी असल्याने, या नात्यांमधले लोक त्या चक्रात गुंतून रक्तबंबाळ होणारच होणार. समाजातली प्रचलित लग्नव्यवस्था ही नवरा (पुरुष) आणि बायको (स्त्री) या दुहेरी केंद्रांच्या मानेवर उभी आहे. त्यात इतर काही आचारविचार करणाऱ्याला स्थान असत नाही. पण पंचाईत अशी की, मुळात माणूस हा ‘बायनरी’ नाही. तो शून्य आणि एक यामधल्या अनेक संख्यांनी बनतो. त्याच्या मेंदूतली अनेक रसायनं एकाच वेळी एकमेकांत मिसळून त्याचे आचारविचार घडवत असतात. त्यातून त्याचा ‘पॉलीएमरस’पणा घडतो. यावर बऱ्यापैकी संशोधने झाली आहेत. पण संशोधने सोडा, जर आपण एकटं स्वत:ला एका खोलीत कोंडून आपल्या मनातले एकेक पापुद्रे उघडून बघायला लागलो तर आपल्याला ही गोष्ट नक्कीच जाणवेल की, आपण जे खरेखुरे आहोत आणि व्यवस्थेत आपण जे दाखवतोय यात प्रचंड तफावत आहे. ही तफावत आपल्याला कमी करायची आहे. ती करताना व्यवस्थेचं चक्र काही आपल्याला सोडणार नाहीये. अशा वेळी जी मनाची उलघाल होते, जी तगमग होते, काय करावं, कुठे जावं, कसं वागावं, कोणाला हे मोकळेपणानं सांगावं, त्याने जर आपल्याला ताडून पाहिलं तर त्याने हे दुसऱ्यांना सांगितलं तर त्याचं ‘गॉसिप’ झालं तर.. असे सगळे प्रश्न निर्माण होऊन आपली स्थिती असुरक्षित होते. रीटाचं हेच झालंय. आणि त्यातूनच ती मार्ग शोधतेय. या व्यवस्थेच्या चक्रातल्या नाजूक अशा ‘रिलेशनशिप’ या प्रकाराशी, स्वत:शी डील करताना तिला अखेरीस मार्गही सापडतोच. तो मार्ग म्हणजे मैत्रीचा. सरस्वती ही तिची मैत्रीण जेव्हा तिची पत्रं वाचते तेव्हा तिला स्वत:ला प्रश्न पडतात. आणि तिची परिस्थिती वेगळी असली तरी घुसमट तीच. तिच्या नवऱ्याचं तिच्यावर प्रेम नाही. तो प्रेमातच पडू शकत नाही. त्याच्याशी लग्न हे तिच्या बापानं विकून टाकल्यासारखं लावलं असल्याचं तिला जाणवतं. त्या पत्रात रीटाच्या मोकळं बोलण्यामुळे ती रीटाच्या अजून जवळ जाते.

मला असं वाटतं की, आवडत्या व्यक्तीबरोबर असणं ही गोष्ट वेगळीच आहे. त्या व्यक्तीशी तादात्म्य पावून, अलगदपणे एकमेकांना उलगडत मोकळं होत जाण्यात जो संघर्ष असतो. ही व्यक्ती किंवा हे नातं फक्त नवरा-बायकोचं का असावं? अशा दुहेरी नात्यामुळे माणूस खरं तर अनुभवांच्या विविधतेला पारखा होऊ शकतो. समोरच्या व्यक्तीवर नशेसारखं खोल प्रेम करायला अजूनही मी आसुसलो आहे. मला हे कितीही करावं वाटलं, तरी तसा जोडीदार मिळणं म्हणजे एक दिव्य घटना आहे. तपश्चर्या करावी लागत असेल यासाठी. मी सर्वात लहान असल्याने माझ्या सर्व बहीण-भावांची, मित्रांची लग्नं झालेली पाहिली आहेत. लग्नानंतर सगळ्यांना बदललेलं पाहिलं. दोघांचं एकमेकांत भान हरवून गेलंय, अशा रिलेशनशिप्स मी खूप कमी बघितल्या. एकदा लग्न झालं की, टोकाचं घडत गेलेलंच बघितलं. दोघांच्याही स्वातंत्र्यांचा संकोच होत असलेला पाहात आलोय. माणूस जसा उत्क्रांत होतोय तसा तो आक्रमक होतोय. (नि त्यामुळेच आणखी संकुचित होतोय की काय?) त्याच्या मेंदूतल्या रसायनांची घुसळण वाढतीये. या सगळ्यात जेव्हा भावभावनांचा कोंडमारा होऊ लागतो तेव्हा तर आणखीनच वाट लागते. वाढलेल्या मानसिक गरजा शेअर करण्यासाठी व्यक्ती आजूबाजूला असायलाच हव्यात, असं वाटतं. ज्यांच्याशी कधीही, वाटेल तेव्हा, बोलता आलं पाहिजे. पण ते दिवस आता राहिले नाहीयेत. आपल्या सर्वाचा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ‘गदारोळ’ एवढा प्रचंड वाढलाय की, एकमेकांशी भेटण्या-बोलण्यातसुद्धा सोय बघितली जाते. अर्थातच, याला काही अपवाद आहेतच. माणूस स्वावलंबी वगैरे मुळीच नाही. तो परस्परावलंबी आहे. पण हल्ली त्याचं समाज माध्यमांवरचं अवलंबत्व वाढतच चाललंय. इतकं की, धर्म, आर्थिक व्यवस्था, कला-साहित्य, राजकारण सगळंच व्हाया सोशल मीडिया ‘कडेलोट पॉइंट’ला जाऊन पोहोचल्यासारखं वाटतंय. त्यामुळे या सगळ्या नात्यांच्या गुंत्यावर एकच उत्तर दिसतं ते म्हणजे मैत्रीचं. सगळे रस्ते देवाघरी जातात, त्याप्रमाणे सगळी नाती शेवटी मैत्रीच्या बहरलेल्या वटवृक्षाखालीच येऊन सावलीला विसावतात. आश्रय सापडायचा असेल तर तिथेच सापडेल. कदाचित, हेही आदर्शवादी असेल. कारण माणूसनामक रसायन भयानक गुंतागुंतीचं आहे. कुठलंही उत्तर हे माणसाला त्रासाकडेच नेत असेल तर..? असेल तर असेल. पण बेरीज-वजाबाकी करत, आधी स्वत:शी मग दुसऱ्यांशी मोकळेपणानं बोलत उत्स्फूर्तपणे मैत्रीचा वटवृक्ष फुलवायचा प्रयत्न करणं हेच हातात आहे, हे रीटाचं ठाम म्हणणं आहे असं वाटतं. कादंबरी सुरू व्हायच्या आधीच म्हणजे अगदी सुरुवातीला शांताताई म्हणतात, ‘एकमेकांना बळकट-कोमल शक्तीने सांभाळणाऱ्या बायका जगात सर्वत्र आहेत. इथे त्यांची नावे आहेत : रीटा, सरस्वती, संगीता. खरं तर पुरुषी स्वभावाच्या व्यक्तींनी हे लक्षात घेऊन, स्वत:वर वेळीच काम करून मैत्रीचा असा वटवृक्ष उभारायला सुरुवात करण्याची गरज आहे.’

स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) अर्धवट सोडून बीएस्सीची पदवी. त्यानंतर उच्चशिक्षण सोडून पत्रकारितेचा अभ्यास. भटकंतीच्या ओढीतून अहमदाबाद ते जम्मू असा १९०० कि.मी सायकलवरून प्रवास. त्या अनुभवांवर ‘दोन चाकं आणि मी’ हे अकथनात्मक पुस्तक प्रसिद्ध. ‘बयो’, ‘भरकटेश्वर’ आणि लेह-लडाखमध्ये एक वर्ष राहून लिहिलेली ‘झुरांगिलग’ या तीन कादंबऱ्या लोकप्रिय.

Story img Loader