धीरज अकोलकर
सिनेमाच्या अद्भुत जगामध्ये भटकत राहणाऱ्या आणि सतत त्यात नवं शोधणाऱ्या दिग्दर्शकाची ही गोष्ट. चकचकीत बजेटचे चित्रपट नाकारून आपल्याला कोणता चित्रपट करायचा आहे, याची समीकरणं त्यानं हळूहळू पक्की करीत नेली. भाषेच्या, देशाच्या पलीकडे वैश्विक समज असलेले चित्रपट तयार करून ते अधिकाधिक लोकांपर्यंत नेणं हेच त्याचं ध्येय.

मला व्यक्तिश: डॉक्युमेण्ट्री हा शब्दच रुचत नाही. तसंही मी जीवनाबद्दल जितकं अधिक शिकत चाललोय, तितका तो शब्द मला योग्य अर्थावाचून अपुरा आणि चुकीचा वाटत चालला आहे. ‘डॉक्युमेण्ट्री’ या शब्दाचं ‘माहितीपट’ असं सर्रास वर्णन करणारा नेहमीचा मराठी अनुवादही खासकरून प्रेक्षकाला अंधारात ठेवणारा आहे.

world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

माहितीपट या शब्दासाठी सर्वात जवळचा पर्याय माझ्या मते, ‘जीवनपट’ असाच असायला हवा. कारण कुठल्याही कलेचा आविष्कार जीवनाला स्पर्श करू पाहत असतो. जीवन चिरस्थायी करताना त्याला अधिकाधिक अचूक करण्याचा, त्याची सुंदर मांडणी करण्याचा, ते उन्नत करण्याचा, त्यावर संशोधन करून जीवन-परीघ वाढवण्याचा, तो सुस्पष्ट आणि सुयोग्य करण्याचा, जीवनाच्या एखाद्या तुकड्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या अनुषंगाने श्रोते अथवा प्रेक्षकांना स्वत:साठी एक संवाद, एक अनुभव, एक भावना निर्माण करण्यासही मदत करतो.

हेही वाचा : विज्ञानव्रती

माहितीपटांनी काटेकोरपणे फक्त माहिती पुरविण्याची वेळ आता निघून गेली आहे. अनेक वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपल्याला विविध स्वरूपाची माहिती तशीही मिळत असतेच. कलेच्या सादरीकरणाला विशिष्ट शाब्दिक लेबल लावून ओळखणं संकुचित वाटतं. कारण ते कलेच्या मूळ आशयाला आक्रसून ठेवतं, त्याच्याभोवती मर्यादा किंवा सीमा निर्माण करतं. कुठलीही कला मुळात कितीतरी विशाल असते; परंतु तिला जाणून घेण्यात ते लेबल आड येतं. खरं तर कलाविश्वामध्ये छान मुशाफिरी करीत जगायला जास्त मजा असते. या विचारासोबतच माझं मन कला आणि जीवन यांमध्ये फरक करू पाहतं. पण खरं तर ते एकसारखे नाहीत आणि त्यांची एकमेकांशी तुलनाही करता येत नाही. म्हणजे, त्यात सादृश्यता असूच शकत नाही, हेसुद्धा आता मला उमगलंय.

प्रत्येकाने स्वत:च्या अनुभवांतून कलेची निर्मिती केली पाहिजे असं मला वाटतं. स्वत:च्या अंतरंगामध्ये डोकावून पाहताना त्यात दडलेलं कौशल्य, कलाकुसर, प्रयत्न, उत्कटता, समर्पण, ज्ञान, शहाणपण, भावना आणि बरंच काही… यांच्याशी जुळवून घेत कलेची निर्मिती करणं, ती करीत असताना स्वत:च्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणं हा एक अत्यंत आनंददायी व्यायाम आहे. कारण कुठलीही कलानिर्मिती आपल्याला संवेदनशील होण्यास मदत करीत असते. हा विचार जोपासून मग कलेची उपासना करणं एकदम आध्यात्मिक वगैरे होऊन जातं.

चांगला चित्रपट हा फक्त चांगलाच असतो. अशा एखाद्या अस्सल चित्रपटाकडे मी आपोआप ओढला जातो, आकर्षित होतो. मग त्याला कुठलं लेबल लावलं गेलेलं असो वा नसो. निखळ सत्यता नेहमीच प्रेक्षकांसाठी एक आरसा समोर ठेवते. असा सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा विषय कित्येक दिवस मनामध्ये घोळत राहतो, त्यापासून मिळणारं जीवनमूल्य चिरायू असतं.

हेही वाचा : पडसाद : हा तर बुद्धिभेद

मीरा नायर, अँड्रिया आरनॉल्ड, जेन कॅम्पियन, अॅग्नेस वार्दा, सोफिया कोपोला यांचा मी खूप मोठा चाहता आहे. लीव्ह उल्मन, पेद्रो आल्मोदोवार, इंग्मार बर्गमन, रिचर्ड एअर, कोस्ता गाव्रास, निक ब्रूमफिल्ड, गस व्हॅन सॅंत आणि खरं तर अशी कित्येक नावं सांगता येतील, ज्या लोकांनी जगासाठी चिरकाल टिकून राहतील असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत.

२००० सालात पुणे विद्यापीठातून पहिला क्रमांक मिळवून मी वास्तुविशारद झालो. त्याआधी उमेदवारी करण्यासाठी मी मुंबई चित्रपट सृष्टीतील त्यावेळचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे साहाय्यक म्हणून रुजू झालो होतो. तिथे ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘लगान’ या चित्रपटांच्या आराखड्यांवर काम करायला मिळालं. पुढे मुख्य साहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून संजय भन्साळींच्या ‘देवदास’ चित्रपटावर काम केलं. ‘देवदास’च्या शेवटच्या काही भागाचं आणि मग पोस्ट प्रॉडक्शनचं काम मी साहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेतून पार पाडलं. त्यांच्याच ‘ब्लॅक’ चित्रपटावर मी त्यांचा मुख्य साहाय्यक दिग्दर्शक होतो. नंतर तिग्मांशू धुलियाच्या ‘चरस – द जॉइंट एफर्ट’ या चित्रपटाचं स्वतंत्र कला दिग्दर्शन केलं. ‘ब्लॅक’ करीत असताना मी संजयजींबरोबर दिग्दर्शन विभागात जे काम केलं त्यानंतर माझ्याकडे दोन सिनेमा करण्याचे प्रस्ताव होते. दोन्ही कोट्यवधी बजेटचे आणि स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी देणारे, पण ते मी नाकारले. कारण आता मला माझ्या स्वत:चा मुक्त चित्रपट तयार करायचा होता.

मुंबई सोडून मी काही महिन्यांसाठी थेट आसाममध्ये गेलो. तिथे रस्त्यावरच्या मुलांचं पुनर्वसन करणाऱ्या ‘स्नेहालय’ या संस्थेच्या कामाशी माझा परिचय झाला. घरातून पळून आलेली, घर सोडावं लागलेली, लैंगिक अत्याचारांनी पिचलेली, अनाथ झालेली मुलं आणि त्यांचं सुख-दु:खांनी भरलेलं जगणं पाहता आलं, त्यांच्या कहाण्या ऐकता आल्या. त्यातून पूर्णपणे शून्य बजेटमध्ये ‘ज्योतिर्गमय – लीड मी टू द लाइट’ हा डॉक्यु-फिक्शन ड्रामा तयार झाला. माझा कॅमेरा मुलांच्या जगण्याशी संलग्न कहाण्यांमध्ये फिरून सिनेमा घडवत होता. माझ्या पुढील कामाचा आणि माझ्या डोक्यात असलेल्या सिनेमाचा पाया हा खरं तर तिथे रचला गेला. पुढे ती फिल्म जर्मनीच्या एका संस्थेपर्यंत पोहोचली. त्या संस्थेने ‘स्नेहालया’च्या मुलांना पुढल्या दहा वर्षांसाठी दत्तक घेतलं. ही त्या कामाची मला मिळालेली सर्वात मोठी दाद मानावी लागेल. त्यानंतर ‘व्हॉटएव्हर’ (२००६) नावाचा आणखी एक लघुपट केला. २००६ च्या उत्तरार्धामध्ये ‘फिल्म रायटिंग अॅण्ड प्रॉडक्शन’ यामध्ये मास्टर्स करण्यासाठी मी लंडनला गेलो. तिथे गोल्डस्मिथ विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावत अभ्यासक्रम पूर्ण केला. आता वेळ आली होती खराखुरा जागतिक चित्रपट तयार करण्याची.

सन २००७ मध्ये स्वीडिश दिग्दर्शक इंग्मार बर्गमन गेले. मला त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचं होतं. त्यांची भेट घ्यायची होती. त्यांच्याविषयीच्या कुतूहलातून मी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात त्यांच्याबद्दल वाचत गेलो. त्यांच्या आणि लीव्ह उल्मन यांच्या ४२ वर्षांच्या नात्यावर मला चित्रपट सुचत होता. मी एक हस्तलिखित पत्र उल्मन यांना पाठविलं. त्यानंतर त्यांच्याशी फोनवर संपर्क केला. मी भारतात मोठ्या दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर काम केलं असलं, तरी तिकडे मी कोण होतो? पाच ते सहा वर्षे मी या प्रकल्पासाठी वेगवेगळ्या देशांत फिरलो. सगळीकडून नकारघंटाच ऐकू येत राहिली. मग एडिनबरामधील एका व्यक्तीने माझी उल्मन यांच्याशी भेट घडवून आणली. तीन मिनिटं त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि माझ्या ‘लीव्ह अॅण्ड इंग्मार’ची तयारी सुरू झाली. त्यानंतरही चित्रपट तयार व्हायला २०१२ साल उजाडलं.

हेही वाचा : पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…

मग ‘लेट द स्क्रीम बी हर्ड’ (२०१३) तयार झाला. त्या पाठोपाठ ‘वॉर्स डोन्ट एंड’ (२०१८), ‘इन द नेम ऑफ द फादर’ (२०२१), ‘द वुंड इज व्हेअर द लाइट एन्टर्स’ (२०२२) आणि गेल्या वर्षीच्या कान जागतिक चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झालेल्या ‘लीव्ह उल्मन प्त अ रोड लेस ट्रॅव्हल्ड’ (२०२३) यांची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन मी केलं.

चित्रपट तयार करणं ही एक साधना असते. कदाचित तुम्हाला हे बरेचदा ऐकल्यासारखं वाटेल, पण माझ्या बाबतीत तरी आजवर ते असंच होत आलंय- मी चित्रपट निवडत नाही, तेच मला निवडतात. मी जे काही आजपर्यंत केलंय ते प्रामाणिकपणे केलंय. मी काही वेळा जिद्दीने पेटून उठलोय, कधी स्वत:च पेट घेणारी ठिणगी झालोय किंवा क्वचित मनामध्ये झंकारणारे मौनांचे ध्वनी माझे मीच शांतपणे ऐकून घेतलेले आहेत.

जेव्हा मी माझा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट, ‘लीव्ह अॅण्ड इंग्मार’ केला, तेव्हा मला अनेकदा विचारलं गेलं – ‘‘तू पुण्यातील भारतीय चित्रपट निर्माता, लंडन शहरात राहताना अचानक एका स्वीडन आणि रशियाच्या मधल्या बेटावर काय गेलास, तिथे एका नॉर्वेजियन अभिनेत्रीच्या आणि स्वीडिश दिग्दर्शकाच्या जगाचा शोध काय घेतलास, का बरं हे?!’’ याचं उत्तर द्यायचंच तर- मी जे काही केलंय ते माझ्या आतमधून आलेल्या गोष्टीला फक्त योग्य प्रतिसाद देणं, इतकंच होतं! मी स्थळ किंवा काल अशा बाह्यचौकटींमध्ये कधीच अडकून पडलेलो नाहीये.

आजच्या ‘ओटीटी’ फलाटांनी चित्रपट निर्मितीसाठी नवनवीन संधी निर्माण केलेल्या आहेत. कितीतरी लोकांना त्यामुळे रोजगार प्राप्त झालाय. कितीतरी जणांना ‘चित्रपट निर्माण’ या विषयात नव्याने स्वारस्य निर्माण झालंय आणि याच माणसांनी जग आणखी जवळ आणलंय. या प्रसारमाध्यमांच्या स्फोटांचे जसे काही तोटे आहेत तसेच बरेच फायदेसुद्धा आहेत आणि एक गोष्ट निश्चित आहे- तुम्ही यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मची आपापसांत तुलना करू शकत नाही. कारण चित्रपटगृहामध्ये अनेक लोकांसोबत बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव आजही पहिल्या क्रमांकावरच टिकून राहिलेला आहे.

चित्रपटाच्या माध्यमाचा विचार केला तर आज तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे चित्रपट तयार करणं खूप सोपं झालं आहे, असं मी अनेकदा ऐकतो. त्यात काही तथ्य नक्कीच आहे. या दाव्याचं समर्थन करण्यासाठी अनेक उदाहरणंही दिसतात. पण म्हणून ते सोपं आहे असं मात्र मला वाटत नाही. फक्त तोंड उघडून काही शब्द आणि आवाज एका लयीत बाहेर पडू देणं, दिग्गज गायक/ गायिकांची नक्कल करणं, यातून काही उत्तम गाणं नव्याने तयार होत नसतं. ती फार फार तर एक जबरदस्त आत्म-अभिव्यक्ती असू शकते. तसंच जवळ स्मार्ट फोन आणि लॅपटॉप असण्याने चित्रपट तयार करणं ‘सोपं’ होऊ शकत नाही. तरीही असा सोपा चित्रपट तयार करण्यात ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी कुठून तरी किमानपक्षी काही प्रेरणा तरी घेणं आवश्यक आहे, विचारांना प्रतिबिंबित करणं गरजेचं आहे, इतरांसोबत एकत्र काम करणं आवश्यक आहे, समोरच्याचं ऐकणं गरजेचं आहे, त्या प्रक्रियेतून आनंद घेणं महत्त्वाचं आहे, कारण जीवनाचे सर्वात मोठे धडे कला निर्मितीमध्ये दडलेले असतात आणि जर ही अशी अभ्यासपूर्ण भट्टी जमून आली तर एखादा सहजसुंदर चित्रपट नक्कीच जन्म घेऊ शकतो.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उदाहरणार्थ ‘डॉक्यूफिल्म बनवणे’…

एकंदरीत, कोणत्याही प्रकारच्या कलेची निर्मिती, जी आपल्याला खऱ्या जगण्याच्या जवळ आणू शकते, तो एक रोमांचकारी आणि स्वत्त्व बदलवून टाकणारा प्रवास असतो. भीती किंवा बौद्धिक तुरुंगांचा त्रास करून घ्यायचा नसतो… फक्त शांत चित्ताने कला निर्माण करायची असते, मागणी न करता, गणना न करता, अपेक्षा न करता करायची असते… कारण ही एक सर्वात मोठी भेट आपण आपल्यालाच देणार असतो. माझ्या आजवरच्या अनुभवांचं सार हेच आहे- कलेच्या आत्मसाधनेतून मिळालेली विनम्रता हीच तुम्हाला शेवटी जीवनस्राोताशी सांधून ठेवत असते!

‘ज्योतिर्गमय’ला ‘ऑल इंडिया डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन’चे दोन पुरस्कार. ‘व्हॉटएव्हर’ला आइस पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसरा क्रमांक. इतर फिल्म्स १५० हून अधिक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये प्रदर्शित. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची नामांकनं आणि पुरस्कार. फिल्म्सचे १०६ देशांमध्ये विविध माध्यमांद्वारे वितरण.

akolkars@gmail.com

अनुवाद – सिद्धार्थ अकोलकर

Story img Loader