आर्या रोठे
डॉक्युमेण्ट्रीचे जुने साचे मोडून नव्या पद्धतीने तिच्याकडे बघता येईल का, याचा शोध एका दिग्दर्शिकेने घेतला. तिचं समाजाशी असलेलं नातं आणि त्यामुळे तिच्या फिल्म बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तसेच फिल्ममध्ये काय बदल होतात हे तपासलं. त्यानंतर तयार होणारी फिल्मची नवी भाषा कशी असेल, हे जगाला दाखवून दिलं. त्याविषयी…

माझी आणि डॉक्युमेण्ट्रीची ओळख चुकून झाली. जन्मापासून ते बारावीपर्यंत पुण्यात वाढल्याने आणि फिल्म अर्काइव्हज्मध्ये दर आठवड्याला जागतिक आणि अव्यावसायिक भारतीय सिनेमे दाखवायला नेणारी रसिक प्रेक्षक- माझी आई असल्याने, मला खूप लहानपणापासून सिनेमामधली श्रीमंती अनुभवायला मिळाली. तारुण्याच्या उंबरठ्यावर सिनेमा हा माझ्यासाठी माझ्या भोवतालच्या आणि कौटुंबिक ताणातल्या कोलाहलापासून दूर जायचा, वेगळ्या जगात काही तास घालवायचा एक मार्ग होता; पण जशी मी डॉक्युमेण्ट्री करायला लागले तसा सिनेमा माझ्यासाठी आता तो कोलाहल समजून घेणारी एक जाणीव होत चालला आहे.

academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

मी बारावीनंतर पुणं सोडलं आणि बंगलोरच्या डिझाईन स्कूलमधून पदवी मिळवली. त्यानंतर फिक्शन-चित्रपट दिग्दर्शन शिकण्यासाठी प्राग येथील FAMU या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिथे शिकत असताना, मी जो सिनेमा करायचा विचार करत होते त्याचे सगळे संदर्भ भारतीय आहेत, असं माझ्या लक्षात आलं. चेक समाज, तिथल्या लोकांची मानसिकता, भाषा, इतिहास, रीतिरिवाज, जगण्याची पद्धत काहीच माझ्या परिचयाचं नव्हतं. परिचय कसा करून घ्यायचा, हे कळत नव्हतं. मी लिहीत असलेल्या फिल्म्सच्या जगात आणि प्रागमध्ये एक मोठ्ठी दरी होती. तिथल्या पहिल्या थंडीत परकं वाटत असताना, माझ्या आजूबाजूचा समाज आणि मी यांमध्ये सिनेमाचं स्थान काय आहे हा विचार मनात यायला लागला. या परक्या वाटणाऱ्या समाजाशी नातं जोडायला हा सिनेमा हे माध्यम होऊ शकेल का, हा प्रश्नही पडायला लागला.

याच दरम्यान युरोपियन युनियनतर्फे चालवल्या जाणाऱ्या डॉक्युमेण्ट्री फिल्म मेकिंगच्या पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाविषयी ( DOCNOMADS) मला ऑनलाइन माहिती मिळाली. मी त्यासाठी अर्ज केला आणि माझी निवड झाली. मला स्कॉलरशिपही मिळाली. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेली मी पहिलीच भारतीय होते. प्रत्येक देशातून एक असे तेवीस देशांमधील विद्यार्थी माझ्याबरोबर होते. डॉकनोमॅड्सची तीन सत्रे हंगेरी, पोर्तुगाल आणि बेल्जियम या युरोपातल्या तीन देशांमध्ये झाली आणि चौथ्या सत्रात आम्ही यांपैकी एका देशात आमची डॉक्युमेण्ट्री बनवली. या दोन वर्षांत युरोपातल्या असूनही राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांपासून अतिशय भिन्न असणाऱ्या देशांमध्ये आम्ही एकत्र येऊन डॉक्युमेण्ट्री शिकायला लागलो आणि माझ्यातली फिल्ममेकर मला सापडायला सुरुवात झाली. मला ज्या प्रकारच्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्यासाठी डॉक्युमेण्ट्री हे योग्य माध्यम आहे, हे माझ्या लक्षात आलं. लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं, त्यांची भाषा कळत नसली तरी भाषेच्या पलीकडे जाऊन त्यांचे विचार समजून घेणं, याची पायाभरणी तिथे झाली. संस्कृती, रीती, देश, राहणीमान कितीही वेगळं असलं तरी काही मूलभूत विचार आणि संवेदना आपल्याला एकत्र जोडू शकतात- संवादाचे साधन बनू शकतात, याचा मला अनुभव आला आणि त्याने मी आमूलाग्र बदलले. याच बदलातून फुटलेली एक फांदी म्हणजे आमची फिल्म कंपनी ‘नो-कट फिल्म कलेक्टिव्ह’. माझ्या डॉकनोमॅड्समधल्या दोन रूममेट्स आणि जवळच्या सहकारी इसाबेला, क्रिस्टिना आणि मी कॉलेज संपल्या संपल्या २०१६ मध्ये ही कंपनी स्थापली. भारत, इटली आणि रोमेनिया अशा आमच्या तिघींच्या जन्मदेशांत आमची कंपनी कार्यरत आहे.

अव्यावसायिक, लेखकप्रणीत (ऑथर ड्रिव्हन) डॉक्युमेण्ट्री करण्यावर आमचा जास्त भर आहे. डॉक्युमेण्ट्रीचे जुने साचे मोडून, नव्या पद्धतीने तिच्याकडे बघता येईल का? दिग्दर्शिकेचं समाजाशी असलेलं नातं आणि त्यामुळे तिच्या फिल्म बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तसेच फिल्ममध्ये होणारे बदल, मग त्यातून तयार होणारी फिल्मची नवी भाषा यांवर आमचा जास्त भर असतो. याच विचारातून आमची पहिली फिल्म झाली. इसाबेला आणि क्रिस्टिना भारतात आल्या आणि आम्ही आमच्या पहिल्या फिल्मसाठी विषय शोधू लागलो. आमच्या स्कॉलरशिपमधून वाचवलेले पैसे घेऊन आम्ही सिनेमाची सुरुवात केली. तीन महिने आम्ही महाराष्ट्रात खूप हिंडलो, छोट्या छोट्या गावांमध्ये गेलो. त्यांचा मुक्काम संपत आलेला असताना आदिवासींमधले पहिले डॉक्टर असलेल्या आमच्या स्नेह्यांचं काम बघायला आम्ही गडचिरोलीमध्ये गेलो. तिथे आमची ओळख जे पूर्वी नक्षलवादी होते आणि आता सरकारला शरण जाऊन पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत अशा काही लोकांशी झाली. आम्हाला इथेच आमच्या डॉक्युमेण्ट्रीची नायिका ‘सोमी’ भेटली. ही एक आई आहे. ती नक्षलवादी होती; परंतु तिथे तिचा भ्रमनिरास झाला आणि ती तिचं जंगल आणि तिची लढाई सोडून परत आली. तिला आता दोन मुलं आहेत आणि त्यांना शिकवलं तरच पुढे परिस्थिती बदलेल, असं तिला ठामपणे वाटत होतं. पण त्या मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येत होत्या. त्यांना नोकरशाहीशी जो संघर्ष करावा लागला, त्यावर आम्ही आमची पहिली फिल्म – ‘अ रायफल अॅण्ड अ बॅग’ – बनवली. आम्ही जवळपास तीन वर्षं या फिल्मवर काम करत होतो.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मिळणारी प्रतिष्ठा वेगवेगळी असते. डायरेक्टर, सिनेमॅटोग्राफर, साऊंड रेकॉर्डिस्ट अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना भिन्न स्थान असतं आणि त्याप्रमाणे वेगवेगळी वागणूक मिळते. यात भरपूर विषमता बघायला मिळते. आम्हाला फिल्म यंत्रणेतल्या या उतरंडीला आणि असमानतेला आव्हान द्यायचं होतं. त्यामुळे आम्ही फिल्म शूट करताना कामं वाटून घेतली होती, पण ही फिल्म लिहीत असताना, त्यासाठी फंडिंग मिळवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत होतो. आम्ही ही फिल्म ‘नो-कट फिल्म कलेक्टिव्ह’ अशी साइन करायचं ठरवलं. आम्ही हा निर्णय खूप सहजपणे आणि उत्साहात घेतला, पण हे सोपं नव्हतं. ‘‘तुम्ही तीन मुली लहान आहात म्हणून असं म्हणताय, तुम्हाला हे अजिबात नीट जमणार नाही.’’, ‘‘ नक्की अपयश येईल, तुमची भांडणं होतील.’’, ‘‘तीन लोकांनी जहाज चालवलं तर ते बुडेल ना. फिल्मचा कॅप्टन एकच असतो.’’ असं आम्हाला काही निर्मात्यांनी, फंडिंग देणाऱ्या संस्थांनी, शिक्षकांनी कधी कधी तोंडावर आणि कधी कधी आडून सांगितलं. खूपदा आम्ही फंड मागताना तिघी दिग्दर्शक आहोत हे लिहायचं टाळत असू. आम्हीसुद्धा हा प्रयोग प्रथमच करत होतो, त्यामुळे या शंका आमच्यापण मनात होत्याच. पण ही फिल्म करायला हीच पद्धत योग्य आहे, असं आम्हाला आतून कुठे तरी वाटत होतं. इथे मला खासकरून लिहायचं आहे की, जशी शंका घेणारे होते तसेच आम्हाला पाठबळ देणारेदेखील होते. त्यामुळे आम्हाला फिल्म पूर्ण करता आली. २०२०च्या ‘रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ने ती Bright Future Competition साठी निवडली. आम्ही तिथे ज्युरी अॅवॉर्ड जिंकलो. तिथून आमच्या या फिल्मचा प्रवास आणि करोना सुरू झाला. आम्ही फिल्मबरोबर प्रवास करू शकलो नाही, पण आमची डॉक्युमेण्ट्री पंचावन्न फिल्म फेस्टिव्हल्समध्ये दाखवली गेली. २०२० मध्ये ती MUBI या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आली.

फिल्म करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, आर्थिक अडचणी कशा सोडवायच्या, तुम्ही कशा पद्धतीने इंडस्ट्रीला सामोरं जायला हवं, याचा अंदाज या अनुभवांमधून आला. नवख्या दिग्दर्शकाच्या मनात स्वत:च्या क्षमतेविषयी खूप शंका असतात, त्याचा चित्रपटावर परिणाम होतो – विशेषत: जर तुमचा सिनेमा व्यावसायिक साच्यात बसत नसेल तर नक्कीच. मग अशा नव्या दिग्दर्शकाबरोबर आम्ही निर्माते म्हणून काम सुरू केलं. आम्ही भारतात तसेच नेपाळमध्ये दोन डॉक्युमेण्ट्री निर्मितीत सहभागी होतो. गेल्या वर्षी मला ‘इंटरनॅशनल डॉक्युमेण्ट्री असोसिएशनकडून’ एक पारितोषिक मिळालं, ज्याचं मानधन वापरून आम्ही तिघींनी ‘अ रायफल अॅण्ड अ बॅग’चा सिक्वेल सुरू केला आहे. सोमीच्याच आयुष्यावरची ही पुढील गोष्ट आहे. एक फिल्म यशस्वीपणे केल्याने या फिल्मसाठी आम्हाला आता ‘एकत्र का?’ हा प्रश्न कमी विचारला जातोय.

आमच्या कामाची बांधणी (स्ट्रक्चर) काटेकोर नसते. प्रोजेक्टची गरज असेल त्याप्रमाणे आमच्या कामाचं स्वरूप बदलतं. आमच्या तिघींमध्ये खूप चांगला आणि मोकळा संवाद असल्यामुळे आम्हाला हे शक्य होतं. आम्ही सगळ्याच फिल्म तिघीजणी मिळून एकत्र करतो, असं नाही. आमची वेगवेगळी कामंही सुरू असतात. सिनेमा बनवणं हे आंतर सांस्कृतिक माध्यम आहे, असं मला वाटतं. आपण ज्या समाजात जगतो, तिथे आपल्याला वेगवेगळ्या विचारांना, जगण्याच्या पद्धतींना वाव आहे, ते सिनेमांमध्येही उतरलं पाहिजे. अनेक संस्कृतींची सरमिसळ झाल्याने, जगाविषयी एक नवी समजूत तयार होऊ शकते. एका नव्या संवादाला वाव मिळू शकतो. यातून तयार होणारी संवेदनशीलता आपण सिनेमात उतरवू शकतो का? मी माझ्या कामात हा सतत शोध घ्यायचा प्रयत्न करते.

करोनाकाळात डिजिटल मीडिया खूप मोठा झाला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर डॉक्युमेण्ट्री बघण्याचं प्रमाण वाढलं तेव्हा मी नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनच्या डॉक्युमेण्ट्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. सहायक दिग्दर्शक, संकलक (एडिटर) तसेच लेखनही केलं. भारतामध्ये कमर्शियल सेटअपमध्ये डॉक्युमेण्ट्रीसाठी काम करणं हा शिकवणारा अनुभव होता.

माझी सहकारी आणि जवळची मैत्रीण अर्चना फडके हिने कोविडकाळात मला एका प्रोजेक्टविषयी विचारलं. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने स्क्रोल या डिजिटल बातम्या प्रकाशनाबरोबर एक डॉक्युमेण्ट्री सीरिज बनवणार होते. ही सीरिज भारतातल्या आणीबाणी पर्वाविषयी होती. तिचं एडिटिंग करणं हासुद्धा एक अनोखा अनुभव होता. एनएफडीसी, फिल्म अर्काइव्हज्मध्ये तसेच १९६० पासून भारताविषयी जगभरात जे लघुपट उपलब्ध होते, ते सगळे आम्ही पहिले. पुस्तकं वाचून त्या काळाचा अभ्यास केला. कुठलाही वैयक्तिक अजेंडा न ठेवता, घटना अतिरंजित न करता – पत्रकारितेतील तटस्थपणा आणि प्रामाणिकपणा बाळगून तो काळ नवीन पिढीसमोर ठेवायचा हा प्रयत्न होता. नवीन शूटिंग न करता आम्ही फक्त उपलब्ध चित्रफिती वापरून ही सीरिज एडिट केली. त्याची एक फिल्मपण बनवली. ही फिल्म २०२३ च्या मामी फेस्टिव्हलमध्ये दाखवली गेली.

आपल्या देशात डॉक्युमेण्ट्रीसाठी स्वत:ची फंडिंग सिस्टीम नाही. आम्ही फक्त परदेशातल्या निधींवर अवलंबून असतो. तिथे खूप स्पर्धा असते. जो भारताचा संदर्भ ( context) तुझ्या परदेशी निर्माते किंवा निधी देणाऱ्या संस्थांना हवा असतो- त्यानुसार फिल्म बनवावी लागू शकते. कधी कधी गोष्टीपेक्षाही जास्त तुम्हाला या भारतीय संदर्भाला अग्रक्रम द्यावा लागतो. यामध्ये फिल्मच्या मांडणीमध्ये मूलभूत बदल होऊ शकतात. तडजोड न करता फिल्म बनवणं ही तारेवरची कसरत असते. अर्थात अशा पद्धतीने फिल्म बनवणं मला मान्य आहे. कारण फक्त डॉक्युमेण्ट्री फिल्म बनवून टिकून राहण्यासाठी आपल्या देशात आत्ता तरी दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही.

लोकांच्या आणि त्यांच्या नात्यांच्या व्यक्तिगत अनुभवांमधून उलगडणाऱ्या सामाजिक-राजकीय कथांकडे माझा ओढा आहे. अशा नात्यांना आणि कथांना अनेकदा परिस्थिती आकार देते, त्यात जगणाऱ्यांना निवडीचा पर्याय नसतो. जे कोणत्याही प्रचाराला अगदी माझ्या स्वत:च्या विचारधारेलाही बळी पडणार नाहीत, असे राजकीय चित्रपट मी बनवू इच्छिते. माझे चित्रपट माझ्या विचारधारेचे कर्कश प्रचारक बनू नयेत. जे कुतूहल निर्माण करते आणि प्रश्न विचारते, उत्तरे देण्याची घाई करत नाही, असे सहकार्यशील वातावरण मी निर्माण करू इच्छिते.

अग्नेस वार्दा ही माझी आवडती दिग्दर्शिका डॉक्युमेण्ट्रीविषयी खूप सुंदर बोलते- ‘‘डॉक्युमेण्टरी ही विनम्रतेची शाळा आहे. अशी शाळा जी तुम्हाला जग कसं आहे, याकडे परत घेऊन जाते.’’ मी जे काम करते त्यातून माझी माणूस म्हणून सतत घडण होत राहते. मी डॉक्युमेण्ट्री बनवताना ज्या ज्या अनुभवातून जाते, ते मी कधीच डोक्यात ‘स्क्रिप्ट’ करू शकणार नाही. डॉक्युमेण्ट्री करताना ज्या पद्धतीने मी जगाशी जोडली जाते. तो बंध जिवंत असतो, तो सतत राहतो. मी वेगवेगळ्या लोकांना भेटते, त्यातून माझी जगाविषयी मतं बनण्याऐवजी कुतूहल वाढत राहतं. मला प्रश्न पडत राहतात. एकदा तुम्ही सुरुवात केली की डॉक्युमेण्ट्री करण्याची प्रक्रिया तुम्हाला सोडवत नाही.

nocutarya@gmail.com

Story img Loader