आता महाराष्ट्रातील सगळी गावं संपल्यामुळे परदेशात संमेलनं भरवायची पद्धत सुरू झाली आहे. परदेशी नंबर लागलेले सूटबूट घालून रुबाबदार होण्याच्या प्रयत्नात असतानाच, नंबर न लागल्यामुळे स्वत:ला मानी समजू लागलेले काही साहित्यिक सूटबूटवाल्यांना लाचार म्हणून हिणवतात. त्यांना रोखण्यासाठी दुष्काळ, गरिबी, बेकारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आठवण करून देतात. असल्या करुण कहाण्यांचा कुणावरच काही परिणाम होत नाही.पाझर फुटत नाही. सूटबूटवाले विमानाला लोंबकळतात. खालचे विमानाचे पंख छाटू पाहतात, लोंबकळणाऱ्यांना खाली ओढतात.
मध्यंतरी एक बातमी वाचली. ब्राझीलमध्ये खूप गुन्हेगारी वाढली आहे. तिथले सर्व तुरुंग भरून गेले आहेत. नव्यांना आत शिरायला जागा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. काय करावं कळत नाही. आता यावर तोडगा म्हणून ब्राझीलमध्ये कैद्यांसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. तुरुंगात कैद्यांना उत्तम साहित्य पुरवलं जातं. एक पुस्तक संपवून त्यावर निबंध लिहिणाऱ्या कैद्याला शिक्षेत चार दिवसांची सूट मिळते. वर्षांतून बारा पुस्तकं वाचून अठ्ठेचाळीस दिवसांची सूट मिळवता येते.
आता तिथे म्हणे कैदी सतत डोळ्यासमोर पुस्तक धरून बसलेले असतात. सतत वाचतात. वाचून गलबलतात, गहिवरतात, रडतात, एकमेकांचे डोळे पुसतात, प्रेमाने मिठय़ा मारतात, मिठय़ा मारून झाल्या की लगेच निबंध लिहायला बसतात. कुठे अडलंच तर पुन्हा मिठी मारतात. निबंध पूर्ण करूनच दुसऱ्या पुस्तकासाठी उठतात.
साहित्याच्या संस्काराने कैदी भला माणूस व्हावा आणि लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर पडावा अशी ही योजना आहे. आपल्याकडे असा उपक्रम सुरू करायचा झालाच तर पटकन चार पुस्तकांची नावं आठवत नाहीत. उद्या वेळ पडलीच तर डॅडींना (अरुण गवळी) कोणतं पुस्तक द्यावं किंवा गुजरातच्या दंगलीत नरोडा पटिया येथे ९६ स्त्रियांच्या आणि बायकांच्या कतलीत सहभागी झालेल्या व पुढे बढती मिळून बाल महिला विकासमंत्री झालेल्या डॉ. माया कोडनानींना (मम्मी) कोणता ग्रंथ वाचायला द्यावा? काही सुचत नाही. आपल्या साहित्याने मम्मी, डॅडींचं डोकं तर फिरणार नाही ना? प्रेम, जिव्हाळा नष्ट होऊन तुरुंगात दंगे तर भडकणार नाहीत ना, अशी भीती वाटते. नवीन पुस्तक बघितलं की धडकी भरते. असो!
अलीकडे लाचार, बाजारबुणगे, फुकट फौजदार असे शब्द वारंवार कानावर पडू लागले आहेत. असे शब्द ऐकले की, शासनाच्या व इतरांच्या पैशातून कुठे तरी संमेलनाचा कट शिजतो आहे हे चाणाक्ष रसिकांच्या लक्षात येतं. संमेलनात असलेले व नसलेले असे साहित्यिकांचे दोन गट पडून राडा सुरू होतो. प्रत्यक्ष संमेलनापेक्षा हा राडा जास्त रंजक आणि उद्बोधक असतो. आता महाराष्ट्रातील सगळी गावं संपल्यामुळे परदेशात संमेलनं भरवायची पद्धत सुरू झाली आहे. परदेशी नंबर लागलेले सूटबूट घालून रुबाबदार होण्याच्या प्रयत्नात असतानाच, नंबर न लागल्यामुळे स्वत:ला मानी समजू लागलेले काही साहित्यिक सूटबूटवाल्यांना लाचार म्हणून हिणवतात. त्यांना रोखण्यासाठी दुष्काळ, गरिबी, बेकारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आठवण करून देतात. असल्या करुण कहाण्यांचा कुणावरच काही परिणाम होत नाही. पाझर फुटत नाही. सूटबूटवाले विमानाला लोंबकळतात. खालचे विमानाचे पंख छाटू पाहतात, लोंबकळणाऱ्यांना खाली ओढतात. या सर्व गडबडीत काही विमानात शिरतात, काही हवेत लटकतात. हवेत लटकणाऱ्या साहित्यिकांची संख्या मोठी आहे. विमानात घुसलेले मात्र खुर्चीचा पट्टा घट्ट आवळून घेतात. प्रवास संपला तरी पट्टा सैल करायला तयार होत नाहीत. पुढे पट्टय़ाची सवयच पडून जाते. असो!
मराठी नाटकवालेही काही मागे नाहीत. तेही देशपरदेशात भव्य संमेलनं भरवतात. सर्व संमेलनं एकसारखीच असतात, हे कितीही खरं असलं तरी नाटय़ संमेलन हे साहित्य संमेलनापेक्षा जास्त मनोरंजक व नाटय़पूर्ण असतं. हे कुणालाही मान्य होईल.
भव्यनाटय़ संमेलन
रसिक मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, विरोधी पक्षातले किंवा नव्याने राजकारणात स्वत:ची ताकद अजमावू पाहणारा कोणीही आपल्या गावात नाटय़ संमेलन भरवण्याचं निमंत्रण देतो. संमेलनाला गेलेला रिकाम्या हाताने परतणार नाही, अशी खात्री झाल्यावरच निमंत्रण स्वीकारलं जातं. जंगी संमेलनाचा खेळ मांडला जातो. सर्वत्र आनंदीआनंद होतो. काहींना तर पुन्हा गंधर्व युगाची सुरुवात झाल्याचे भास होऊ लागतात.
संमेलन म्हटलं की त्याला एक अध्यक्ष लागतो. निवडणूक होते. जगाचे डोळे निवडणुकीकडे लागतात. संमेलन भरणार त्या गावातलाच किंवा गावातून बाहेर पडून मोठा(?) झालेला नाटकवाला असेल तर तो अध्यक्ष पदावर आपला हक्क सांगतो. ‘मी अध्यक्ष व्हावे’, अशी समस्त गावकऱ्यांची इच्छा आहे अशा समजुतीनं तो उभा राहतो. त्याच्यासोबत, ‘आता वय झालं, रंगभूमीची खूप सेवा केली.’ असं वाटून दोनतीन ज्येष्ठ नाटय़ तपस्वी उभे राहतात. तपस्व्यांचा जंगी सामना होतो. सुपाऱ्या दिल्या, घेतल्या जातात. मागचा इतिहास उकरून काढला जातो, चिखलफेक होते. सततच्या मानहानीला कंटाळून दोन तपस्वी माघार घेतात. आपल्या गावात सन्मान करवून घ्यायची घाई झालेल्या गावकरी तपस्व्याचा गावातलेच काटा काढतात. शेवटी एक उरतो- तो अध्यक्ष होतो. अचानक महाराष्ट्राला जाग येते. सर्व त्यांच्याविषयी, ‘जगात असा अध्यक्ष नाही.’ छाप भरभरून बोलू लागतात. एवढय़ानेही अनेकांचा ऊर भरून येतो. अध्यक्षांना भरून पावल्यासारखं होतं. भरून पावलेले अध्यक्ष, रंगभूमीवरच देह ठेवायच्या गोष्टी करू लागतात. नव्याने नाटक करू पाहणारे गोंधळतात. रंगभूमीवर देहांची गर्दी झाली तर नाटक कुठे करावं म्हणून घाबरतात.
पॉवरफूल राजकारणी पाठीशी असल्यामुळे कशाला काही कमी पडण्याचा प्रसंग येत नाही. प्रत्यक्ष संमेलन सुरू होईपर्यंत सांस्कृतिक वातावरण तापत ठेवलं जातं. रोज कुठे ना कुठे तरी तृप्त अध्यक्षांचा फोटो छापून येतो. त्यांना खूप प्रयत्न करूनही, फोटोत इतर तपस्व्यांना माती चारल्याचा आनंद दडवता येत नाही. फोटोसोबत त्यांचे सुविचारही असतात. गावागावांत बॅनर्स लागतात. त्यात मेकअप करून हसणारे अनेक चेहरे असतात. ते कुठले कोण हे कळत नसल्यामुळे काही जण त्यांना ‘नाटय़सेवक’, तर उरलेले काही जण त्यांना ‘बाजारबुणगे’ म्हणतात. बाजारबुणगे म्हटल्यामुळे हसणारे व्यथित होतात. लगेच सेवा थांबवून कारस्थानं करू लागतात.
संमेलन जवळ येऊन ठेपतं. गावात उत्साह पसरतो. चित्रविचित्र लोक गावात जमू लागतात. चॅनल्सच्या गाडय़ा दिसायला लागतात. कॅमेरे रोखले जातात. संमेलनाच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना प्रथम संधी मिळते. हे कळताच संमेलन भरवणारेही अचानक कॅमेऱ्यासमोर संमेलनाच्या विरुद्ध तावातावाने बोलू लागतात. कॅमेऱ्याच्या समोर बोलणाऱ्यामागे गाव गोळा होतो. माना डोलावू लागतो. मनोरंजक गोंधळाची स्थिती निर्माण होते.
चौथ्या अंकाला आसुसलेले नाटकवाले सूर्यास्तानंतर बारच्या दिशेने धाव घेतात. बाहेरच्या नाटकवाल्यांना गावात काही कमी पडू नये म्हणून बारवाले सज्ज असतात. गल्ल्यावर, तांब्यातल्या श्रीफळातून उगवलेल्या नारळाच्या झाडाखाली बसलेला श्रद्धाळू बारमालक सर्वाची प्रेमाने विचारपूस करतो. गर्दी असतानाही सर्वाची मिळेल तिथे व्यवस्था करतो. बारबालाच्या रसिकतेने सर्व गलबलतात. नाटकवाल्यांच्या चर्चा रंगतात. नाटकवाले, नाटक सोडून इतर सर्व विषयांवर ठासून बोलतात. कलकलाट वाढतो. क्वचित स्थानिक व नाटकवाले अशी बाचाबाची होते. माफक धक्काबुक्की होते. दारू ओरिजिनल असेल तर प्रकरण धक्काबुक्कीवर थांबतं. दारू डुप्लिकेट असेल तर मात्र धारदार डायलॉगबाजी होऊन एकमेकांच्या कानाखाली टाळ्या वाजवल्या जातात. बारमध्ये राडा होतो, पण नारळाच्या झाडाखाली पंख्याचा वारा खात बसलेला श्रद्धाळू मालक आपली जागा सोडत नाही. नाटकवाले फुटलेल्या पाच-पन्नास ग्लासांचे पैसे भरून निघतात- तेव्हा बाहेर उजाडत असतं. सुजलेलं अंग ठणकत असलं तरी मन प्रसन्न होऊन जातं. असो!
गाव हळूहळू सजायला लागतं. गावभर स्वागतासाठी कमानी उभारल्या जातात. वाऱ्याने हलणारी स्वागताची कमान आपल्यावर कोसळू नये म्हणून सावध राहावं लागतं. गावातल्या शाळेत रांगोळ्यांचं प्रदर्शन भरलेलं असतं. रांगोळ्या बघायला पाहुणे जमतात. लिपस्टिक लावलेले गुलाबी गांधी, दाढीवाले शिवाजी महाराज अशा राष्ट्रपुरुषांच्या रांगोळ्यांसोबतच काही प्रसिद्ध नटांच्याही रांगोळ्या घातलेल्या असतात. रांगोळी जास्त पडल्यामुळे नटांचे चेहरे सुजल्यासारखे वाटतात. गावातले लोक सुजलेल्या चेहऱ्यांची चर्चा करतात. त्या सचित्र चर्चेतून मराठी रंगभूमीचा वेगळा इतिहास उलगडत जातो. काही अभिनयसम्राज्ञांच्याही रांगोळ्या असतात. उजवीकडून पाहिल्यास ती हसते आहे असा भास होतो, डावीकडून पाहिल्यास रडते आहे असं वाटतं. हुंदका ऐकू येतो. अर्थात हुंदका, दु:खाचा की अभिनय जमत नाही म्हणूनचा आहे- हे मात्र कळत नाही. असो!
मैदानात दहा-वीस हजार माणसं बसू शकतील एवढा मोठा मंडप घातलेला असतो. मंडप सजवलेला असतो. पुढे गुबगुबीत सोफ्यांची रांग असते. त्यावर मुख्यमंत्री, मंत्री, राजकारणी, त्यांचे रक्षक, त्यांचा स्टाफ व पांढऱ्या शर्टाच्या कॉलरमागे रुमालाची घडी ठेवणारे काही लोक बसलेले असतात. मागे लटपटणाऱ्या खुच्र्यावर नाटकवाले तोल सावरत बसतात. दहा-वीस हजार लोक बसेपर्यंत बराच वेळ जातो. पाय लागला, धक्का लागला, खुर्चीत बसलेल्या रसिकावर दुसरा रसिक बसला अशा किरकोळ घटना घडतात. कुणा रसिकाचा मुलगा हरवतो, बायको चुकते. चुकलेल्या बायकोला शोधायला इतरांचे नवरे धावतात, असा गोंधळ होतो.
मुख्यमंत्री, मंत्री येणार म्हणून कडक पाहारा असतो. पोलीस दिसेल त्या नाटकवाल्याचा नम्रपणे अपमान करतात. त्यांच्या रिकाम्या झोळ्या पुन:पुन्हा तपासतात. आपल्या पाठीवर काठी पडली नाही, हाच सन्मान समजत नाटकवाले आत शिरतात. आत पुन्हा सन्मानासाठी पायाखाली मूळ लाल, पण आता धूळ खाऊन तपकिरी झालेला गालिचा अंथरलेला असतो. त्याला काही ठिकाणी भोकं पडलेली असतात. संमलेनाला काही मानी कलावंतही आलेले असतात. ते आढय़ाकडे बघत ताठ मानेने प्रवेश करू पाहतात व भोकात पाय अटकून पडतात. चांगलाच मार बसतो, ते निमूट खाली मान घालून, लंगडत मंडपात शिरतात. राजकारण्यांनी केलेल्या सन्मानात ताठा मारण्याचे व्हायरस असतात. त्यामुळे मंडपात सगळेच वाकलेले दिसतात. ताठ मानेचा कुणी दिसत नाही. सर्वाना मंगलमय वाटावं म्हणून सनई-चौघडा वाजत असतो.
गावात रिकाम्यांची संख्या जास्त असेल तर मंडप पटकन भरून जातो. सीरिअलवाले, सिनेमावाल्याच्या मागं माणसं धावतात. नाटकवाल्यांना लक्ष वेधून घेण्यासाठी फार आटापिटा करावा लागतो. भरत जाधवला, भरतमुनी समजून त्याच्या मागे धावणारेही काही जण असतात.
प्रचंड मोठय़ा स्टेजवर लग्नात वधू-वरांसाठी मांडतात तशा शंभर-एक खुच्र्या मांडलेल्या असतात. खुर्चीत बसलेला प्रतिष्ठित दिसत नाही. आपण दिसावं म्हणून काही लोक रंगीबेरंगी मोठे फेटे बांधतात. मुंबई, पुण्याकडचे निवेदक खूप आनंदल्यागत निवेदन करतात. रिकाम्यांचा, रसिक असा उल्लेख केला जातो. ‘पुस्तक समोर धरलं तर डोकं दुखतं, नाटकाला बसलो तर डोकं फिरतं..’ अशी अवस्था असणाऱ्यांना रसिक म्हटल्यामुळे अचानक गर्दीत उत्साह संचारतो. टाळ्यांचा कडकडाट होतो.
प्रत्येक वक्ता मंचावर बसलेल्या शंभरांचं नाव घेतो, त्यांचे हुद्दे, त्यांची कर्तबगारी (थोर समाजसेवक, महान नट, जगविख्यात नाटककार..) सांगतो. प्रत्येक वक्ता आवाज चढवतो, तावातावाने हातवारे करीत बोलतो, तरीही तो हात पसरून काही तरी मागतो आहे असंच वाटत राहतं.
मंत्री उभे राहतात. हात पसरणाऱ्यांना दिलासा देतात. आकडा जाहीर करतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. आता तेही हात पसरतात. आकडा वाढवतात. आनंदी आनंद होतो.
शेवटी अध्यक्ष उभे राहतात. अलीकडे नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांच्या डोक्यावर मानाची पगडी घालण्याची पद्धत आहे. पगडी चढवलेल्या अध्यक्षांच्या कुडीत आता वीरश्री संचारेल असं वाटून गर्दी सावध होते. अध्यक्षांच्या कानाजवळ तुताऱ्या फुंकल्या जातात. क्षणभर अध्यक्ष ताठ होतात, पण कण्याचा बाक लपत नाही. पसरलेल्या हाताच्या मुठी वळत नाहीत. ते अडचणी सांगत सुटतात. मदतीसाठी आक्रोश करतात. टाहो फोडतात.
‘नाटकाकडून आपल्याला काय मिळेल?’ हे ऐकायला जमलेले कंटाळून जेवायला धावतात. कंटाळलेल्यांना वाटतं, ‘सत्राशे साठ अडचणी असलेल्या नाटकात बघण्यासारखं काय असेल?’ पुढे कधी तरी त्या गावात चांगलं नाटक येतं. पण अडचणी बघायला लागतील, या भीतीने त्या नाटकाकडे कुणी फिरकत नाही. संमेलनात अनेक परिसंवाद होतात. स्वत:ची हौस भागवायला अनेक विद्वान बोलून घेतात. मंडपात जमलेल्या दहा हजारांच्या चेहऱ्यांवर एकच प्रश्न असतो, ‘मी नाटक बघितलं नाही तर तर माझं काय नुकसान होईल?’ उत्तर मिळत नाही.
‘नाटक बंद पडलं तर आमचं काय?’ अशी विवंचना असलेल्या नाटकवाल्यांना प्रश्न कळत नाही. कळला तरी उत्तर द्यायचं धाडस होत नाही. असो. संमेलन यशस्वी होतं. राजकारण्यांचा फायदा होतो. ताकद वाढते. खंगलेले नाटकवाले नव्या अडचणींच्या शोधात निघतात.

dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
What are the important post that Vidarbha got along with Chief Ministers
मुख्यमंत्रीपदासह विदर्भाला मिळालेली महत्वाची खाती कोणती?
gst on fsi loksatta news
देशभरातील घरांच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ ? चटई क्षेत्र निर्देशांकावर १८ टक्के जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव
MLA Randhir Savarkar appointed as BJPs chief spokesperson in legislature
अकोला : मंत्रिपदाची संधी हुकली, मात्र पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
kalyan acid attack on son in law
कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर ॲसिड हल्ला, मधुचंद्रासाठी काश्मीर की मक्का मदिनेला जाण्यावरून वाद
gst on sin goods
‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर
kisan kathore meet nitin gadkari
किसन कथोरेही नितीन गडकरींच्या भेटीला, मुरबाड मधील विकास कामांवर चर्चा
Story img Loader