रघुनंदन गोखले
पाचव्या वर्षी बुद्धिबळाची गोडी लागलेला बालक जगातील एकूण एक राष्ट्रांची नावे, त्यांची लोकसंख्या आणि राजधान्याही धडाधडा म्हणून दाखवत होता. अपघातामुळे फुटबॉलला रामराम ठोकणाऱ्या एका खेळाडूने या लहान मुलाच्या बुद्धीचे बळ ओळखले आणि फुटबॉलमधील प्रशिक्षणाची पद्धत त्याच्या बुद्धिबळातील प्रगतीसाठी वापरली. पुढल्या काही वर्षांत तो बुद्धिबळातील विश्वनाथ कसा झाला, त्याची ही गोष्ट..
येत्या गुरुवारी (३० नोव्हेंबर) मॅग्नस कार्लसन या बुद्धिबळाच्या अनभिषिक्त सम्राटाचा ३३ वा वाढदिवस! बुद्धिबळाचा कोणताही प्रकार घ्या- मॅग्नस त्यात चमकणारच असा नियमच पडून गेला आहे. भले मग ते क्लासिकल पद्धतीचे (दीड तासात ४० खेळय़ा), जलदगती (संपूर्ण डावाला १५ मिनिटे), विद्युतगती (संपूर्ण डावासाठी तीन मिनिटे) किंवा गोळीबंद (संपूर्ण डाव ६० सेकंदांत) असो, मॅग्नसनं आतापर्यंत त्यात जागतिक दर्जाची स्पर्धा अनेक वेळा जिंकली नाही, असं झालेलं नाही. एवढं सातत्य इतर कुठल्याही जगज्जेत्याला दाखवता आलेलं नव्हतं. कारण मॅग्नस सतत कुठे ना कुठे बुद्धिबळाच्या स्पर्धा खेळत असतो आणि पटावर नसेल तर ऑनलाइन तरी खेळताना दिसतोच. अशा या बुद्धिबळाच्या सम्राटाला मानाचा मुजरा आणि शतायुषी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
मॅग्नसच्या प्रतिभेला पारखलं ते नॉर्वेजियन ग्रँडमास्टर सिमॉन अगडेस्टीन यानं! माझ्याशी प्रागच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान बोलताना सिमॉन म्हणाला की, काही वेळा तुम्ही एखाद्याला पाहिलं की कळतंच की, हे प्रकरण जगावेगळं आहे. त्यामुळे त्यानं छोटय़ा मॅग्नसला आपल्या पंखाखाली घेतलं. सिमॉन म्हणाला की, वयाच्या पाचव्या वर्षी मॅग्नसनं जगातील एकूण एक राष्ट्रांची नावे, त्यांची लोकसंख्या आणि राजधान्या तोंडपाठ केल्या होत्या; आणि त्या सर्व देशांचे राष्ट्रध्वज त्याला ओळखता येत असत. सिमॉन अगडेस्टीननं खरं तर बुद्धिबळाला रामराम ठोकून फुटबॉलमध्ये सर्वस्व वाहण्याचं ठरवलं होतं, कारण त्याची निवड नॉर्वेच्या राष्ट्रीय संघात गोलकीपर म्हणून झाली होती. तो फुटबॉल खेळण्यासाठी जमशेदपूर येथे येऊन गेला होता; पण दुर्दैवानं त्याला एक मोठा अपघात झाला आणि त्याचं फुटबॉल करिअर संपुष्टात आलं; पण बुद्धिबळाचा अमाप फायदा झाला. सिमॉन म्हणतो की, त्यानं नॉर्वेचा सुप्रसिद्ध फुटबॉल मॅनेजर एगिल ओल्सन याची फुटबॉलमधील सुधारणा करण्याची पद्धत मॅग्नससाठी वापरली. काही का असेना, त्यानं मॅग्नससारखा एक हिरा घडवण्याचं महत्कार्य केलं.
मागे एका लेखात मी उल्लेख केला होता की, मॅग्नसच्या अफाट स्मरणशक्तीविषयी अनेक सुरस कथा आहेत आणि त्यातल्या काही खऱ्याही आहेत. आई रसायनशास्त्रातील इंजिनीयर आणि वडील माहिती तंत्रज्ञानातले तज्ज्ञ- अशा उच्चशिक्षित कुटुंबात वाढलेल्या मॅग्नस कार्लसनला तीन बहिणी आहेत. वयाच्या दुसऱ्या वर्षी मॅग्नस ५०० तुकडय़ांचं जिगसॉ कोडं चिकाटीनं सोडवत असे. चौथ्या वर्षी त्यानं १० ते १४ वर्षीच्या मुलांसाठी असणाऱ्या लेगोच्या तुकडय़ांनी खेळातील ट्रक जोडला होता.
वयाच्या पाचव्या वर्षी बुद्धिबळ शिकलेल्या मॅग्नसला खरी गोडी लागली ती मोठय़ा बहिणीला हरवल्यामुळे. मग काय, त्याला बुद्धिबळ वेडानं पछाडलं आणि तासन् तास मॅग्नस स्वत:शीच खेळत बसे. वयाच्या दहाव्या वर्षीच मॅग्नसचं रेटिंग २००० झालं. या दरम्यान मॅग्नसची दिनचर्या काय होती माहिती आहे का? तीन तास बुद्धिबळाचा अभ्यास, मग फुटबॉल खेळणं आणि डोनाल्ड डकच्या चित्रकथा वाचणं! २००० ते २००२ या वर्षांतील २७ महिन्यांत मॅग्नस ३०० रेटेड डाव, असंख्य विद्युतगती स्पर्धा आणि जी मिळेल ती स्पर्धा खेळला होता. त्याची प्रगती किती झपाटय़ानं होत होती याचं एक उदाहरण सांगतो- ऑक्टोबर २००२ मध्ये युरोपियन १२ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत मॅग्नस सहावा आला आणि पुढच्याच महिन्यात जागतिक १२ वर्षांखालील मुलांमध्ये त्याचा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ‘टाय’ झाला, पण ‘टायब्रेकर’ चांगला नसल्यामुळे मॅग्नसला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. १२ वर्षांखालचा जगज्जेता कोण झालं माहिती आहे का? मॅग्नसबरोबर कायम स्पर्धा करणारा रशियाचा इयान नेपोमानेची. बिचारा नेपोमानेची कधी तरी मॅग्नसच्या पुढे जगज्जेता झालेला आहे. त्याच स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात दुसरा आलेला शक्रियार मामेद्येरोव्ह गेल्या वर्षी टाटा स्टील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुसरा आला होता. त्याचं त्या वेळचं भाषण खूप गाजलं. तो म्हणाला, ‘‘मला लोकांनी विचारलं की, या स्पर्धेतील तुझा सर्वात आवडलेला डाव कोणता? माझा सर्वात आवडलेला डाव म्हणजे मॅग्नसनं माझा केलेला पराभव! त्या पराभवानंतर मला असं जाणवलं की, संगणकांना नमवू शकणारा एक खेळाडू आपल्याकडे आहे- तो म्हणजे मॅग्नस कार्लसन! आणि मॅग्नस असेपर्यंत मानव जातीला काहीही धोका नाही.’’ हरल्यानंतर प्रतिस्पर्धी किती नशीबवान होता किंवा स्वत:ची तब्येत ठीक नव्हती अशी कारणं देणारे खेळाडू आपण बघतो; पण खुल्या दिलानं प्रतिस्पध्र्याची स्तुती करणारे मामेद्येरोव्हसारखे खिलाडूवृत्तीचा खेळाडू विरळाच.
मॅग्नसचा खेळ उच्च दर्जाचा असल्यामुळे त्याची स्तुती आमच्यासारखे बुद्धिबळप्रेमी करतात यात नवल नाही; पण त्याच्यासाठी त्याचे प्रतिस्पर्धीही शब्दांच्या पायघडय़ा घालतात हेच आश्चर्य आहे. त्याच्याकडून दोन वेळा विश्वविजेतेपदाच्या लढतींत हरलेला आणि स्वत: पाच वेळा जगज्जेता राहिलेला विश्वनाथन आनंद म्हणतो, ‘‘डावाची अंतिम अवस्था खेळणं हा मॅग्नसच्या विजयाचा मोठा भाग आहे. मी तर म्हणतो की देवापाठोपाठ मॅग्नसच!’’ आणखी काय पाहिजे आपल्याला मॅग्नसची महती वर्णायला?
पण हाच मॅग्नस ग्रँडमास्टर होण्याआधी किती चुका करून हातातोंडाशी आलेले डाव घालवत असे, हे कोणाला माहिती आहे? त्याचे अगदी सुरुवातीचे डाव बघा. पण मॅग्नसचं मोठेपण याच गोष्टीत सामावलेलं आहे की, अपार मेहनत घेऊन त्यानं आपल्या दोषांवर नुसती मात केली नाही, तर त्यांना आपलं शक्तिस्थान बनवलं. अनेक वेळा मॅग्नसचा उल्लेख बुद्धिबळाचा मोझार्ट असा केला जातो. मोझार्ट हा १८ व्या शतकातील प्रसिद्ध संगीतकार होता आणि त्याच्या संगीताने फक्त त्या काळीच नव्हे तर आजही मंत्रमुग्ध केले जाते. मॅग्नसच्या खेळाचेदेखील तसेच आहे. विश्वास बसत नसेल तर त्याचा ब्रिटिश ग्रँडमास्टर मायकेल अॅडम्सविरुद्धचा २००७ सालचा डाव बघा. २०११ साली पहिल्यांदा ‘सीबीएस न्यूज’नं मॅग्नसवर केलेल्या त्यांच्या प्रसिद्ध ‘सिक्स्टी मिनिट्स’ या कार्यक्रमाचे शीर्षकच बुद्धिबळाचा मोझार्ट- मॅग्नस कार्लसन असे होते. पूर्वी मिखाईल ताल अप्रतिम, पण जहरी हल्ले करून प्रतिस्पध्र्याला गोंधळवून टाकत असे. त्या वेळी ताल चेटूक करतो, असं विनोदानं बोललं जात असे; पण मॅग्नसविषयीही तसंच आहे. त्याच्या डावांचं विश्लेषण करणारी शेकडो पुस्तकं, डीव्हीडी, यूटय़ुबवर कार्यक्रम आहेत आणि अजूनही मॅग्नसच्या खेळाचं जनमानसावरील गारूड कमी झालेलं नाही. उदाहरणार्थ, मी काही वर्षांपूर्वी स्वित्झरलँडमधील बिएल या छोटय़ा गावातील आयोजकांना त्यांच्या स्पर्धेदरम्यान माझं हॉटेल आरक्षित करण्यासाठी संपर्क केला होता. त्यांचं मला उत्तर आलं की, या वर्षी सगळी हॉटेल्स आधीच आरक्षित झाली आहेत, कारण या वर्षी मॅग्नस कार्लसन खेळणार आहे. या वर्षी उद्योगपती आनंद मिहद्रा यांनी दुबईमध्ये ग्लोबल चेस लीग नावाची महाजत्रा भरवली होती. नाव ग्लोबल आणि त्यामध्ये मॅग्नस नाही असं शक्यच नाही. या कारणासाठी मॅग्नसच्या तारखा मिळाल्यावर स्पर्धेची घोषणा करण्यात आली.
मॅग्नसला छोटय़ा छोटय़ा गोष्टी स्पर्धेच्या काळात विचलित करतात. डॉ. ताराश यांनी म्हटल्याप्रमाणं, संशयी स्वभाव हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. अमेरिकेतील एका स्पर्धेत निमन नावाच्या एका अमेरिकन ग्रँडमास्टरनं इतक्या सहजपणे मॅग्नसला हरवलं, की कधी नव्हे तो मॅग्नसचा राग अनावर झाला. त्यानं निमनवर फसवणुकीचा आरोप केला आणि स्पर्धा सोडून दिली. मग निमननं मॅग्नसला कोर्टात खेचलं आणि मॅग्नस आणि त्याची तळी उचलून धरणाऱ्या chess.com या चॅनेलना नाक मुठीत धरून आपले आरोप मागे घ्यावे लागले होते. मागच्याच महिन्यातली गोष्ट घ्या ना! कझाखस्तानचा ग्रँडमास्टर अलिशेर सुलेमानोव्ह हा हातात घडय़ाळ घालून आला आणि ते कार्लसनच्या मते अयोग्य होतं; परंतु पंचांच्या निर्णयानुसार चावी द्यायची जुन्या पद्धतीची घडय़ाळे वज्र्य नाहीत. (परंतु दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय मास्टर रवी हेगडे याला जुने घडय़ाळ घातल्याबद्दल पुणे येथील एका स्पर्धेत आपला गुण गमवावा लागला होता.) झालं, मॅग्नसचा मूड गेला आणि तो अवघ्या २५ चालींत हरला; परंतु नंतर मॅग्नसनं खिलाडूवृत्तीनं अलिशेरच्या खेळाचं ट्विटरवर कौतुक केलं होतं.
मॅग्नस कार्लसन हा एकमेव बुद्धिबळ खेळाडू असा आहे की, ज्याच्या व्यावसायिक गोष्टी आयोजित करण्यासाठी पूर्णवेळ मॅनेजर आहे. मॅग्नसचा जुना प्रशिक्षक सिमॉन अगडेस्टीनचा धाकटा भाऊ एस्पिनही चांगला बुद्धिबळपटू आहे आणि तोच मॅग्नसच्या स्पर्धा ठरवणं, त्याच्या जाहिरातींचे करार करणं यांसारख्या सगळय़ा जबाबदाऱ्या सांभाळतो. जगज्जेता होण्यापूर्वी २०१२ सालीच मॅग्नसचं उत्पन्न १२ लाख डॉलर्स (सुमारे १० कोटी रुपये होतं). आता तर विचारूच नका.
मॅग्नसच्या वेगवेगळय़ा केशभूषांमुळे तो चर्चेत असतो. तो कधी पोनी बांधेल तर कधी दाढी वाढवेल आणि कधी कधी जुन्या चित्रपटातील देव आनंद टाइप केसांचा कोंबडा करेल. २०१३ साली Cosmopolitan या प्रख्यात अमेरिकन मासिकानं त्याला जगातील तरुणींमधील लोकप्रिय तरुण म्हणून नट आणि फुटबॉलपटू यांच्यासोबत मान दिला होता.
बुद्धिबळ खेळाडू रूक्ष असतात असा एक गोड गैरसमज असतो; पण कार्लसन मोठा विनोदी आहे. एकदा एका मुलाखतकारानं त्याला विचारले की, ‘‘तुझ्या आत्मचरित्रातील पहिलं वाक्य काय असेल?’’ तर त्याला कार्लसन म्हणाला, ‘‘पहिलं वाक्य असेल
‘I am not a genius’ (मी काही प्रतिभावान नाही) आणि आत्मचरित्राचं नाव काय असेल? याच्यावर कार्लसनचं मिश्कील उत्तर आलं-
‘I am a Genius.’ (मी प्रतिभावान आहे). एकदा त्याला कोणी तरी विचारलं की, तुला इतरांचे डाव बघायला आवडतं का? कार्लसन म्हणाला, ‘‘खेळणं हे माझं जीवन आहे, पण डाव बघणं? नाही!’’ पण हाच कार्लसन प्रज्ञानंदच्या विश्वचषक स्पर्धेतील हिकारू नाकामुराविरुद्धच्या डावावर घारीसारखी नजर ठेवून होता. प्रज्ञानंद जिंकल्या जिंकल्या मॅग्नसनं स्वत:चा जलदगती डाव सुरू असतानाही (बहुधा त्याच्या मार्गातील काटा काढल्याबद्दल) उठून प्रज्ञानंदचं अभिनंदन केलं.
मॅग्नसच्या जीवनाचे अनेक पैलू आपण आज पाहिले. पुढल्या भागात आपण उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्याच्या कारकीर्दीचाही आढावा घेऊ या.
gokhale.chess@gmail.com