‘लोकरंग’मधील (१२ फेब्रुवारी) ‘ग्रंथोपजीवींचे आटणे’ हा लेख बदललेल्या वाचनसंस्कृतीची दखल न घेताच फक्त संमेलनस्थळीच्या व्यवस्थेचे रडगाणे गाणारा वाटला. यात एक विधान आहे- स्थानिक आणि विदर्भाच्या पातळीवर प्रतिनिधींकडून संमेलनाची जी हवा तयार व्हायला हवी होती, तशी ती झाली नाही. परिणामी ठिकठिकाणचे साहित्यप्रेमी संमेलनाला आलेच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पण हे आता होणारच आणि इथून पुढे तर संमेलनात फक्त व्यासपीठ आणि समोर रिकाम्या खुर्च्या हाच माहोल पाहायला मिळणार आहे. याला कारण आता संमेलन भरवण्यासाठी आर्थिक बळ उभे करायची संयोजकांना गरजच उरलेली नाही. पूर्वी ‘स्वागत प्रतिनिधी’ नोंदणीसाठी आयोजक संस्थेचे कार्यकर्ते झटत असत, कारण तो संमेलनाच्या अर्थकारणाचा मुख्य भाग होता. आता संमेलनासाठी सरकारच २५ लाख (इथून पुढे २ कोटी) देतंय म्हटल्यावर कोण कशाला स्वागत प्रतिनिधी नोंदणीसाठी वणवण करेल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, आता पुस्तके पीडीएफच्या स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. शिवाय अनेक अॅप्स आणि साइट्स अशा आहेत ज्यावर पुस्तके वाचली जातात. तेव्हा पुस्तके वाचण्याऐवजी कानाला ब्ल्यू टूथ किंवा ईअर प्लग लावून शांतपणे डोळे मिटून पुस्तक ऐकण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. पूर्वी आम्ही वकील एआयआरचे व्हॉल्यूम्स वर्गणी भरून विकत घ्यायचो, आता सारे न्यायनिर्णय एका क्लिकवर मिळतात. कोण कशाला पुस्तकांची रद्दी, पुस्तकसंग्रहाच्या नावावर जागा अडवायला विकत घेईल? मी इथे प्रकाशकांना ‘बाय बॅक’ योजना सुचवतो. नवंकोरं पुस्तक जर वाचकाने एक महिन्याच्या आत वाचून, सुस्थितीत परत केले तर त्याला ४० किंवा ६०% रक्कम परत करावी. प्रकाशकांना किमान काही परतावा यातून प्राप्त होऊ शकेल. तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, आजकालचे प्रकाशक तरी प्रकाशक राहिलेत कुठे? पूर्वीचे भागवत वगैरेंसारखे प्रकाशक लेखकाने दिलेले पुस्तक स्वत: वाचत. आवडले तर स्वखर्चाने छापत, विकत नाही तर साभार परत करीत. प्रथितयश लेखकांच्या मागे लागून पुस्तके लिहून घेत. लेखकाला यथाशक्ती मानधन देत. आताचे प्रकाशक फक्त प्रिंट्रर झालेत. ते लेखकांकडूनच पैसे घेऊन त्याचे पुस्तक छापून देतात. बदलत्या वाचनसंस्कृतीचा योग्य अभ्यास करून लेखकांनी आणि प्रकाशकांनीसुद्धा आपल्या निर्मिती प्रक्रियेत योग्य ते बदल घडवून आणावेत.
– अॅड. एम. आर. सबनीस, मुंबई.
अर्नाळकरांना न्याय देणारा लेख
‘लोकरंग’मधील (५ फेब्रुवारी) ‘अर्नाळकरांचं मेटाफिक्शन’ या अर्नाळकरांच्या कादंबऱ्या, रहस्यकथा यांवर निखिलेश चित्रे यांनी लिहिलेल्या लेखातून रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांना योग्य प्रकारे न्याय दिला असे म्हणावेसे वाटते. जुन्या पिढीने त्यांच्या कथांची पॉकेटबुक्स आवडीने वाचली होती. या पुस्तकांची त्या काळात हेटाळणी झाली होती. रहस्यमयता आणून हजारो पुस्तके लिहिणे सोपे नाही. ‘झुंजार’, ‘काळापहाड’ यांसारखी ग्रेट धाडसी व गुन्हेगारांना शिक्षा देणारी व्यक्तिमत्त्वे आजही वाचताना त्या काळात गेल्यासारखे वाटते.
– प्र. मु. काळे, सातपूर, नाशिक.