नारायण कुळकर्णी कवठेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रान, निसर्ग, शेती, पिके, पाऊस, डोंगर, नदी, सांज हे सारे ना. धों. महानोरांच्या भावजीवनाशी आणि म्हणून कवितेशी एकरूप झालेले एकजीव असलेले अवयव आहेत. परिचित प्रतिमेच्या, पण वेगळे संकेत देणाऱ्या कविता त्यांनी आयुष्यभर रचल्या. पन्नास वर्षांपूर्वी महानोरांची शब्दकळा कवठा नावाच्या खेडय़ात ऐन विशीत पहिल्यांदा अनुभवलेल्या आणि त्यांच्या कवितेसह वर्षांनुवर्षे त्यांच्या जगात वावरलेल्या बुजुर्ग कवीने महानोरांच्या काव्यपर्वांतील सौंदर्यखुणांचा माग घेत वाहिलेली ही शब्दांजली..
बऱ्यापैकी सुरू होते मराठी कवितेचे. मर्ढेकरांचा प्रभाव होता. मुक्तिबोध आपला आवाज राखून होते. सुर्वे हातोडा उगारुन ललकारी देत होते, स्वातंर्त्य मिळाल्यानंतरच्या आशा-आकांक्षा! मराठी मुलुखात साहित्य क्षेत्रात नवे उजळ कोंभ तरारू लागले होते. अशा वेळी मराठी कवितेच्या क्षेत्रात एक गार वाऱ्याची झुळूक आली. साधी नव्हती, शिरशिरी उठविणारी होती. तिला कोवळे पोपटी गवत तळहातांमध्ये चुरगाळल्यामुळे येतो तसा उग्रमधुर सुगंध होता. झाडाखेडय़ांवर चालून येणाऱ्या वेगवान धसमुसळ्या पावसामुळे येतो तसा विस्मित करणारा नाद होता. ज्वानीतील उत्सुक ललनेच्या त्वचेचा वास होता. हवेच्या झोतामुळे फुलांनी लदबदलेली वेल झुकते-डोलते-थरथरते असा चलच्चित्रासारखा आकार होता. भाषा अशी की बोली वाटावी, पण भाषाभ्यासासंबंधी पुस्तकात उल्लेख असावा अशीही बोली नव्हती. ही हिरवी बोली होती.
.. ही महानोरांची कविता होती.
१९६७ साली महानोरांचा ‘रानातल्या कविता’ हा चौसष्ट कवितांचा- ज्यात चौसष्टावी कविता नसती तर बरे असते असे वाटणारा- संग्रह आला. छान उभट आकार. जाड ठळक टाईप. एक गोष्ट लक्षात यायला वेळ लागला- एका एवढय़ा मोठ्ठय़ा पानावर चार ओळींची एखादीच किंवा चार ओळींच्या दोन छोटय़ा-छोटय़ा कविता. मुक्तक म्हणता येतील अशा. मीही कविता लिहीत होतो ना, पाने अपुरी पडतील अशा. हा संग्रह लवकर वाचून होईल असे वाटले. एक कविता वाचली-
डोळे थकून थकून गेले
पाखरासारखा येऊन जा
रान भलतंच भरात जरा
पिकात धुडगूस घालून जा
बाप रे! विशीचे वय होते. कवठा नावाच्या खेडय़ात जन्मापासून राहत होतो. पिढय़ानपिढय़ा शेतात, गावगाडय़ात गेल्या होत्या. पाखरू, रान, पीक, धुडगूस सारे काही कळले. प्रतिमा परिचित होत्या, पण संकेत वेगळे होते. काय काय मनात आणि डोळ्यांसमोर आले ते सांगण्याची गरज नाही. पण चार ओळींच्या भोवताली असलेला कोरा परिसर हा वाचकाला, रसिकाला मुक्तपणे विहरण्यासाठी सोडलेला आहे असे वाटू लागले.
महानोर किंवा ग्रेस असे काही कवी वर्षांनुवर्षे वाचण्यासाठी असतात. आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या जगात जातो. महानोरांची कविता नागर नाही, पण पूर्ण ग्रामीण म्हणावी अशीही नाही. कवितेतील अनुभवविश्व धक्का देणारे वाटते. धुडगुस घालण्यासाठी आमंत्रण देणारी स्त्री शाहिरांच्या कवनांमध्ये होती. महानोरांच्या आधी महानोरांचे आवडते कवी ना. घ. देशपांडे यांच्या कवितेत ती आहे –
सहस्त्र भुजंगबळाने राजसा
एकच घाल रे मिठी.
नाघंच्या कवितेचे ऋण, प्रभाव महानोरांनी अनेकदा व्यक्त केले आहे. (यासाठी दिलदार वृत्ती लागते.) कुठेही बाहेर न जाणाऱ्या व्रतस्थ ‘नाघं’साठी विदर्भ साहित्य संघाने आपले संमेलनच मेहकरला नेले आणि त्यासाठी मेहकरला पु.ल. देशपांडे, गायक जोशी, महानोर.. आवर्जून आले होते.
एक साम्य नाघंच्या आणि महानोरांच्या कवितेत, नदीच्या वाहत्या पात्रात गुडघ्यापर्यंत पाय बुडालेली प्रेयसी आहे. लुगडे भिजू नये म्हणून थोडे कापड वर गोळा करून दोन्ही हातांच्या मुठीत धरलेले आहे. याला घोळ म्हणतात. घोळ हा शब्द महानोरांच्या एका कवितेत आहे. काही ठिकाणी ओचे हा शब्द आहे. हे न कळल्यामुळे काही जणांनी, भल्याभल्यांनी एकेकाळी ‘घोळ’ घातल्याचे स्मरते.
‘रानातल्या कविता’, ‘वही’ या संग्रहांमध्ये खेडय़ातली, झोपडीतली, काही कुटुंबचित्रे, संसारचित्रे आहेत, ती वेधकही आहेत, चटका लावणारीही आहेत.
झडीचे दिवस
जल्दी शेजबाज करू
हावऱ्या जिवाला
येते रात्रच पांघरू
तुही असा कसा
नको ओटीपोटी धरू
पाळण्यात डोके
जरा दिवा तरी सारू
या अनुभवाविषयी काही बोलणे म्हणजे त्याला ढका लावून ओरखडा काढण्यासारखे आहे. एकदा वाटले या अस्सल बोली भाषेत ‘जल्दी’ हा उर्दू शब्द मध्येच कसा काय कवीने आणला. छंदाची सोय हे एक कारण आणि दुसरे म्हणजे मराठवाडा -निजामाची राजवट – उर्दूतून शिक्षण – एकेकाळी शासकीय भाषा – यामुळे अनेक उर्दू शब्द फारसी शब्दी मराठवाडय़ातील माणसांच्या बोलण्यात- लिहिण्यात अगदी सहजपणे येतात. महानोरांच्या कवितेतही नागरबोली-बोलण्यातले शब्द सखेसोबती या नात्याने येतात.
रान, निसर्ग, शेती, पिके, पाऊस, डोंगर, नदी, सांज हे सारे महानोरांच्या भावजीवनाशी आणि म्हणून कवितेशी एकरूप झालेले एकजीव असलेले अवयव आहेत. या सगळ्यांच्या, म्हणूनच कवितेच्या केंद्रस्थानी आहे स्त्री! प्रेम करणारी, करून घेणारी स्त्री, संसाराचा गाडा नेट लावून ओढणारी स्त्री, कुटुंबाचा भार आणि गरिबी यांनी दबलेली स्त्री, खानदानी देखाव्यात दडलेली, गांजलेली स्त्री, हाडाची काडे करणारी राबणारी स्त्री, वस्तीवरील दारू पिणाऱ्या पुरुषांच्या रानटी वागण्यामुळे काचलेली स्त्री, बाळांचे संगोपन करणारी वत्सल स्त्री, कोंडय़ाचा मांडा करून संसाराचा हातभार लावणारी स्त्री.. पण स्त्रीच! महानोरांच्या कवितारतीचा आधार-स्त्री!
तिच्या ‘नितळ भुऱ्या मांडय़ावरचा दाह झालो’ – अशी आपल्या पुरुषी वृत्तीतून येणारी वागणूक, पश्चाताप आणि आत्मग्लानी कवी व्यक्त करतो.
सरलं दळण
ओवी अडली जात्यात,
उभ्या जन्माचा उमाळा
कळ सोसून डोळ्यांत.
असा त्या स्त्रीचा उभा जन्म!
असे हे सर्व असते. कवीचे उमेदीचे, सुरुवातीचे, आतील उद्रेकाचे दिवस सहसा अनुकूल, सोपे नसतात. याच काळात त्याच्या हातून कच्च्या, पण अस्सल कविता लिहून होतात. साहित्याच्या व्यावसायिक केंद्रापासून महानोर दूर होते. पळसखेड आणि घरातील वातावरण कवी आणि कवितेसाठी कसे होते? महानोरांनीच एका कवितेत सांगितले आहे –
बापाने करंदीकर जाळला आगटीत..
निसर्ग, सुंदर-सुंदर शेती, गाऊ मोटेवरचं गाणं, भाकरीवर दह्याचं वाडगं घेऊन येणारी हनुवटीवर हिरवं गोंदण असलेली रूपवान पारू.. हळूहळू हे सगळं करपून जायला लागतं- कवीच्या डोळ्यांसमोर. कवी संवेदनशील, जातिवंत असेल तर भूतकाळ न गिरवता धीराने सामोरच्या काळाला तोंड देतो. काळच कोळपून जातो. काळाची लय हरवते. जगणे छंदहीन होते. गात्या गळ्यात हुंदका दाटतो. अवघे जीवन गद्यप्राय होते. म्हणून कवी मुक्तछंदात म्हणण्यापेक्षा छंदमुक्त लिहायला लागतो का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
‘रानातल्या कविता’, ‘वही’ यानंतर महानोरांच्या कवितेचे दुसरे पर्व सुरू होते पावसाळी कवितांपासूनच. ‘प्रार्थना दयाघना’, ‘तिची कहाणी’.. आणि पुढे. हे दुसरे पर्वही लक्षणीय, विचारणीय आणि अस्वस्थ करणारे आहे.
आता या क्षणी मी उदास आहे. महानोर, तुम्ही गेलात म्हणून आणि माझ्या गावात पाऊस आलाच नाही म्हणून. पण तुम्ही आहात आणि तुमची कविता आहे. जी मला ऐकू येते आहे, पावसासारखी. होय महानोर, तुमची कविता दिसते, ऐकू येते, स्पर्श करते..
पक्ष्यांचे पक्ष थवे
गगनाला पंख नवे
वाऱ्यावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतुन
लदबदले
बहर कांचनाचे,
घन वाजत वाजत ये, थेंब अमृताचे.
narayankulkarnik@gmail.com