सागर भालेराव

साम्यवादी आचार-विचारांचे कवी शैलेन्द्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेत राहूनही सामान्य माणसाशी असलेली आपली नाळ कधीच तोडली नाही. आपल्या गीतांमधून त्यांनी भोवतालच्या सामाजिक वास्तवावर नेहमीच कोरडे ओढले. अशा कवी आणि गीतकार शैलेन्द्रजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध..

kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…

हिंदी सिनेसृष्टीला डोळस बनवण्याचं काम करणारे फार कमी गीतकार होऊन गेले आहेत. त्यापैकी कवी शंकर शैलेन्द्र यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. ३० ऑगस्ट हा शैलेन्द्र यांचा जन्मदिवस. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. ३० ऑगस्ट १९२३ रोजी रावळिपडी (सध्या पाकिस्तान) येथे त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा अस्पृश्यतेचे स्तोम माजले होते, अशा काळात दलित कुटुंबात जन्मलेल्या शैलेन्द्र्र यांना अनेक पीडा, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आर्थिक अडचणींमुळे त्यांना उत्तर प्रदेशच्या मथुरेत स्थलांतरित व्हावं लागलं. इथेही त्यांचा संघर्ष संपला नाही. कविमनाचे शैलेन्द्र शायरी लिहू लागले होते. मुशायऱ्यांमधून आपली कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकत होते. अशात त्यांना रेल्वेत नोकरी लागली आणि आपलं कुटुंब सोडून त्यांना पोटापाण्यासाठी मुंबईला यावं लागलं. माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये त्यांची बदली झाली होती. माणसांमध्ये रमणारे शैलेन्द्र आता मशिनच्या गडगडाटात सूर-ताल-लय शोधू बघत होते. रावळिपडी, मथुरेत अनुभवलेले जातीय व वर्गीय चटके त्यांना मुंबईतदेखील जाणवू लागले होते. तशात ते कामगार संघटनांमध्ये सक्रीय झाले. कामगारांचे होणारे शोषण बघून, भांडवलशाहीचे विक्राळ रूप अनुभवून आणि राजकीय पक्षांचे सत्तागणित बघून ते अस्वस्थ होत होते. या बेचैनीतून होणारी आपली अभिव्यक्ती त्यांनी कवितेतून शब्दांत उतरवली. पुढे त्यांचा कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आला. कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, शुभेन्द्र घोष यांच्याशी त्यांची जवळीक वाढली.  ते ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) आणि प्रगतशील लेखक संघाच्या विचारमंचावर वावरू लागले. याच काळात त्यांनी जगभरातील साम्यवादी, समाजवादी लेखकांची पुस्तके वाचली. त्यातून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली.

हेही वाचा >>> एक अकेला..

भारताची फाळणी झाल्यानंतर पंजाब जळत होता. देशभरात शांतीयात्रा सुरू होत्या. ‘इप्टा’च्या एका कार्यक्रमात त्यांनी ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. शैलेन्द्र यांच्या रूपात राज कपूर त्यांच्या आगामी ‘आग’ चित्रपटासाठी गीतकार शोधत होते. तशी विचारणा त्यांनी शैलेन्द्र यांना केली. ‘मी पैशासाठी लिहीत नाही..’ असं म्हणत त्यांनी चक्क राज कपूर यांना तेव्हा सुनावलं होतं. परंतु काही दिवसांतच त्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यावेळी शैलेन्द्र यांना राज कपूर यांच्या प्रस्तावाची आठवण झाली. राज कपूर यांनी त्या आर्थिक संकटाच्या वेळी शैलेन्द्र यांना ५०० रुपयांची मदत केली होती. पुढे राज कपूर आणि शैलेन्द्र सच्चे मित्र बनले, ते कायमचेच. राज कपूर यांच्या ‘बरसात’(१९४९) चित्रपटासाठी शैलेन्द्र यांनी गीत लिहिलं- ‘बरसात में हम को मिले तुम सजन..’ हे गीत आणि चित्रपट दोन्ही सुपरहिट् ठरले. शैलेन्द्र यांची चित्रपटसृष्टीतली ही पहिलीच एन्ट्री दमदार ठरली. चित्रपटाला टायटल सॉंग देण्याची सुरुवात तेव्हा झाली नव्हती. ही सुरुवात शैलेन्द्र यांच्या गाण्यानेच सर्वप्रथम केली असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

पुढे ‘अनाडी’, ‘बूट पॉलिश’, ‘आह’, ‘श्री ४२०’, ‘दाग’, ‘दो बिघा जमीन’, ‘सुजाता’, ‘ससुराल’, ‘संगम’, ‘मधुमती’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटांसाठी त्यांनी उत्तमोत्तम गाणी लिहिली.. जी प्रचंड गाजली. नंतर रेल्वेतली नोकरी सोडून पूर्णवेळ चित्रपट गीतकार म्हणून काम करण्याचं शैलेन्द्र यांनी ठरवलं. कामगार चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आता चंदेरी नगरीत आपली स्वत:ची ओळख निर्माण करत होता.

हम मौत का जबड़ा तोड़ेगे, एका हथियार हमारा है

हर जोर-जुल्म की टक्कर में हड़ताल हमारा नारा है

त्यांची ही कविता आजही कामगार, विद्यार्थी आंदोलनांतून घोषणा म्हणून वापरली जाते. एखादी कविता आंदोलनाची घोषणा बनावी अशी उदाहरणे हिंदी कवितेत क्वचितच सापडतात. चित्रपटांसाठी गाणी लिहिताना शैलेन्द्र यांनी त्यांचा मूळ विचार मात्र सोडला नाही. शक्य असेल तिथे समाजवादी दृष्टिकोन पेरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘बूट पॉलिश’ (१९५४) सिनेमासाठी ते लिहितात-

‘पंडित जी मंतर पढ़ते हैं, वह गंगा जी नहलाते हैं

हम पेट का मंतर पढ़ते है, जूते का मुंह चमकते है

पंडित को पांच चवन्नी है, अपनी तो एक इकन्नी है

फिर भेदभाव यह कैसा है जब सब को प्यारा पैसा है

ऊँच नीच कुछ समझ ना पाये हम मतवाले पॉलिशवाले..’

जातीभेद आणि वर्गभेदावर इतकं स्पष्ट भाष्य करण्याचं धाडस कवी शैलेन्द्र्र करू शकले, याचं कारण त्यांनी त्यांची वैचारिक बैठक कधीही सोडली नाही. त्यांच्या चित्रपटांतील गाण्यांमधून सामाजिक संदेश देताना त्यांनी सामान्य लोकांनाच आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी ठेवलं. ‘आवारा हूं ,या गर्दिश में आसमान का तारा हूं..’ या गाण्यातून त्यांनी आवारा माणसालादेखील एक आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या गीताची जादू जगभरात पाहायला मिळाली. चीन, तुर्कस्तान, उझबेकिस्तान, रशिया, ताश्कंद या ठिकाणी हे गीत आजही गायले जाते. ‘आवारा’ हा चित्रपट चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ यांचा आवडता चित्रपट होता असं म्हटलं जात.

राज कपूर यांच्या चित्रपटांना मानवतावादी ओळख निर्माण करून देण्याचे श्रेय शैलेन्द्र यांच्या गीतांनाही आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अतिशय साध्या-सरळ भाषेत शैलेन्द्र यांनी गाणी लिहिली. त्यांची कविता, गाणी समजून घेण्यासाठी कुठलाही शब्दकोश घेऊन बसावं लागत नाही. सामान्य माणसाला कळेल इतकं ते सोपं, सुटसुटीत लिहायचे. त्यामुळेच कदाचित तत्कालिन समीक्षकांनी शैलेन्द्र यांना दुर्लक्षित केलं. जितकं प्रेम साहिर लुधियानवी, कैफी आझमी, फैज अहमद फैज, शकील बदायुनी यांच्या वाटय़ाला आलं तितकं शैलेन्द्र यांच्या वाटेला आलं नाही हे सत्य लपवून चालणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीने सिनेगीतांना ‘साहित्य’ म्हणून कधीही पाहिलं नाही. त्यामुळे उडत्या चालीची, उडत्या शब्दांची, अर्थविहीन गाणी जन्माला येऊ लागली. भपकेबाज संगीताचा साज चढवून ‘आयटम सॉंग’ प्रेक्षकांना दाखवले जाऊ लागले. प्रेक्षकांची अभिरुची बदलण्याची व बिघडण्याची सुरुवात त्यामुळेच झाली.

हेही वाचा >>> “तू जन्मला तेव्हा मी गाणी कंपोज करत होतो”; प्रसिद्ध संगीतकाराने मुलाला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा चर्चेत

आपल्या उभ्या आयुष्यात ‘न्योता और चुनौती’ हा एकमेव कवितासंग्रह शैलेन्द्र यांनी प्रकाशित केला. कामगार नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना हा कवितासंग्रह शैलेन्द्र यांनी समर्पित केला आहे. पुरोगामी चळवळीत म्हटले जाते की, ‘यह आझादी झूठी है, देश की जनता भूकी है’ असा नारा अण्णाभाऊंनी दिला होता. परंतु याबद्दलचे तपशील वा पुरावे उपलब्ध नाहीत. पण ‘न्योता और चुनौती’ या कवितासंग्रहात ‘नेताओं को न्योता’ या कवितेत शैलेन्द्र यांनी मुंबई भेटीवर येणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईत आल्यावर काय काय केले पाहिजे याबद्दल विडंबन काव्य लिहिले आहे. नेहरूंनी धारावीच्या झोपडपट्टीत येऊन कामगारांचं जीवन अनुभवावं, कामगारांच्या घरी खानपान करावं असं त्यात म्हटलं आहे. याच कवितेत ‘यह कैसी आझादी है?’ असं शैलेन्द्र म्हणतात. अण्णाभाऊ साठेंना समर्पित असलेल्या या कवितासंग्रहातील कवितेचा आधार घेऊन ‘यह आझादी झूठी है, देश की जनता भूकी है’ हा नारा दिला गेला असावा.

शैलेन्द्र यांच्या कवितेतील भावना इतक्या धारदार, तीव्र  असायच्या की त्या थेट काळजाला भिडत. ‘आज फिर जीने की तमन्ना है’ या गाण्याने कितीतरी महिलांचे आत्मभान जागृत केले असेल. ‘ये रातें ये मौसम नदी का किनारा’ या गीताने प्रेमात पडलेल्या कितीतरी तरुण-तरुणींना जगण्याची नवी दिशा दाखवली असेल. ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्याने  किती युवा हृदयांना प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी शालीनता शिकवली असेल. कुठलेही भपकेबाज शब्द न वापरता नितळ भावना व्यक्त करण्यासाठी शैलेन्द्र्र लिखित गाणी आजही वापरली जातात. दुर्दैव असं की आजच्या पिढीला शैलेन्द्र लिखित सगळी गाणी पाठ आहेत, परंतु गीतकार म्हणून ते शैलेन्द्र यांना ओळखत नाहीत. समीक्षक आणि विद्यापीठातील अभ्यासकांनी शैलेन्द्र यांना कायम दुर्लक्षित ठेवले. त्याचाच हा परिणाम आहे. हेच कशाला, ‘इप्टा’ आणि ‘प्रगतीशील लेखक संघ’- ज्यांच्यापासून शैलेन्द्र यांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्याला सुरुवात केली, त्यांनीदेखील शैलेन्द्र यांची विशेष दखल घेतली नाही. काही वर्षांपूर्वी शैलेन्द्र यांच्या मुलाने एका मुलाखतीत ‘दलित असल्यामुळेच शैलेन्द्र यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले गेले,’ अशी खंत व्यक्त केली होती.

कामगार चळवळीशी बांधिलकी असलेले शैलेन्द्र साम्यवादी चळवळीत जास्त रमले. सिनेगीत लिहिताना त्यांनी स्वत:च्या जातीची ओळख कधीही उघड केली नाही. ज्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ते कामाला होते तेथून अगदीच जवळच असलेल्या परळच्या दामोदर हॉल येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या न्याय्य हक्कांसाठीची लढाई लढत होते. त्या चळवळीशी शैलेन्द्र यांनी स्वत:ला जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यांच्या कवितेतदेखील तसा दाखला मिळत नाही. त्यामुळे जातीच्या फायद्या-तोटय़ापासूनही शैलेन्द्र दूर राहिले.

निर्माता म्हणून ‘तिसरी कसम’(१९६६)  हा कवी शैलेन्द्र यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. हिंदीतले प्रसिद्ध लेखक फणीश्वरनाथ रेणू यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्याचे स्वप्न शैलेन्द्र यांनी पाहिले. राज कपूर आणि वहिदा रहमान यांना घेऊन हा चित्रपट करण्याचे ठरले. परंतु चित्रपट निर्मितीचा कुठलाही अनुभव नसलेल्या शैलेन्द्र यांना हा चित्रपट पूर्णत्वास नेण्यास पाच वर्षे लागली. चित्रपटासाठी अव्वाच्या सव्वा खर्च झाल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यांचे दारूचे व्यसन वाढत गेले आणि प्रकृती ढासळत गेली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा तो स्वीकारण्यासाठी शैलेन्द्र जिवंत नव्हते. जीवनाचं शास्त्र कवितेच्या, सिनेगीतांच्या रूपात सांगणारा हा कवी चित्रपट निर्माता म्हणून अयशस्वी ठरला होता. आपलीच माणसे साथ सोडून जातात तेव्हा होणाऱ्या वेदना हळव्या मनाच्या शैलेन्द्र यांना गहिऱ्या जखमा देऊन गेल्या. ‘आर्ट सिनेमा’ ही संकल्पना भारतात उदयास आली नव्हती, त्या काळात असा वेगळ्या धाटणीचा सिनेमा बनवण्याचं धाडस शैलेन्द्र यांनी केलं होतं.

‘अनाडी’ (१९५९) चित्रपटासाठी शैलेन्द्र लिहितात..

‘सब कुछ सीखा हमने ना सिखी होशियारी,

सच है दुनियावालों कि हम हैं अनाड़ी

आपल्या तत्त्वांशी, आदर्श विचारांशी कुठलीही तडजोड न करणारे शैलेन्द्र ‘अनाडी’ असले तरी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सर्जनशील कलाकार होते. सिनेसृष्टीतील केवळ १८ वर्षांच्या कारकीर्दीत १८० चित्रपटांसाठी त्यांनी सुमारे ८३१ गाणी लिहिली. एकापेक्षा एक सरस अशी ही गाणी आहेत. त्यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव व्हायला हवा. आजकाल फारसं कर्तृत्व नसणाऱ्या सिनेकलाकारांनाही पद्मश्री, पद्मविभूषण यांसारखे किताब दिले जातात. परंतु हे भाग्य शैलेन्द्र यांच्या नशिबी आले नाही. अगदी मरणोत्तरदेखील नाही. इतका मोठा कलाकार समाजाने दखल न घेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या कामाची चिकित्सा आज उशिरा का होईना, यथार्थतेने केली गेली पाहिजे. त्यातून आजच्या सिनेसृष्टीला मार्गदर्शन लाभू शकेल. सिनेमांचा आणि सिनेगीतांचा समाजावर जो काही भलाबुरा परिणाम होतो, तोदेखील यामुळे सकारात्मकतेने समजून घेता येईल.

sagobhal@gmail.com

Story img Loader