जी, ए आजी…’’ समीरनं दारातूनच आरोळी ठोकली. त्याच्या आवाजानं वामकुक्षी घेत असलेली आजी दचकून जागी झाली. उठून बसेपर्यंत तो आजीच्या खोलीत आलादेखील.
‘‘आजी, माझं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे!’’
‘‘अगं बाई, आमच्या समूचं असं कोणतं बरं काम आहे माझ्याकडे?’’
‘‘आजी, त्या दिवशी आपण बागेत फिरायला गेलो तेव्हा तू त्या कसल्यातरी शेंगा आणल्या होत्यास. आठवतंय का?’’
आजी विचार करू लागली. आजीला फुलाझाडांचं वेड होतं, त्यामुळे तिचे बागकामाचे प्रयोग सुरूच असायचे. ‘‘कुठल्या शेंगा आणल्या असाव्यात?’’ असं तिला पुटपुटताना बघून समीर म्हणाला, ‘‘आजी, त्या दिवशी ती निळी, पांढरी फुलं आपण आणली होती ना… तेव्हा तिथे तुला शेंगाही मिळाल्या होत्या.’’
‘‘अच्छा ती फुलं होय… ती गोकर्णची फुलं होती आणि त्याच्याच त्या शेंगा होत्या. त्यात बिया असतात म्हणून मी आणल्या होत्या. बरं त्या शेंगा तुला हव्या आहेत का?’’
‘‘आम्हाला शाळेत पर्यावरण विषयाचा प्रकल्प दिला आहे. बाईंनी एखादं झाड लावून त्याची वाढ कशी होते, त्याचा पर्यावरणास कसा उपयोग होतो ते वहीत नोंदवायला सांगितलं आहे.’’
‘‘बरं मग तू काय ठरवलं आहेस?’’
‘‘आजी, आपण त्या बियांचं झाड लावूया. मी त्याची काळजी घेईन, त्याची वाढ नोंदवेन. त्या फुलांची सगळी माहिती मिळवून प्रकल्प तयार करेन. एकदोन महिन्यांत फुलं आली की ते सुंदर फुललेलं झाड मी शाळेत घेऊन जाईन. मस्त आयडिया आहे ना!’’
‘‘समू, आयडिया मस्त आहे. पण बाळा गोकर्णचा वेल असतो. त्याला आधार दिला की तो वरवर जातो.’’
‘‘अस्स होय…’’ असं म्हणत समीर विचार करू लागला.
‘‘समू, दुसऱ्या कुठल्यातरी फुलाचं झाड लाव.’’
‘‘नाही आजी, मला माझा प्रकल्प थोडा वेगळा करायचा आहे. गुलाब, जास्वंद, सदाफुली या फुलांचा प्रकल्प मुलं करतील. ‘गोकर्ण प्रकल्प’ कसं थोडं वेगळं वाटतं ना, म्हणून मी या फुलांवर प्रकल्प करणार आहे.’’
‘‘बरं तू म्हणशील तसं करू… आता जा आधी कपडे बदल, हातपाय धू नाहीतर आईचा ओरडा खावा लागेल.’’ एवढ्यात समीरला आईचा आवाज ऐकू आला.
‘‘समीर, काय करतो आहेस. आधी हातफाय धू बघू.’’
‘‘हो तेच करायला चाललो आहे,’’ म्हणत समीर पळत बाथरूममध्ये गेला.
संध्याकाळी समीर व आजी बाजारात जाऊन एक मोठी कुंडी, माती घेऊन आले. आजीनं पिशवीत ठेवलेल्या गोकर्णच्या शेंगा सोलून बिया काढल्या व कुंडीतल्या मातीत जरासा खड्डा करून व्यवस्थित रुजत घातल्या. वरून थोडं पाणी शिंपडलं. कुंडी आजीच्या खोलीतल्या खिडकीत ठेवली.
समीरनं प्रकल्प लेखनासाठी आणलेल्या कागदांवर तारीख लिहून बिया पेरण्याची कृती थोडक्यात नोंदवली. त्याला खूप आनंद झाला होता, कारण त्याचा पर्यावरणाचा प्रकल्प सुरू झाला होता ना!
काही दिवसांत कुंडीत गोकर्णच्या पाचसहा वेली वाढू लागल्या. समीर रोजच्या रोज त्याच्या नोंदी ठेवू लागला. आजीनं आधारासाठी वेल एका लांब काठीवर चढवला. हळूहळू गोकर्णच्या वेली वाढत होत्या. सकाळी शाळेत जाताना समीरला वेलीवर फुलं आल्यासारखी वाटायची, पण दुपारी तो पाहायचा तेव्हा फुलं नाहीशी व्हायची. हळूहळू वेलीची पानंही कमी व्हायला लागली. समीरला कळेना हे असं का होतंय.
एक दिवस समीर शाळेतून लवकर घरी आला व वेली पाहायला आजीच्या खोलीत गेला. पाहतो तर काय, चारपाच चिमण्या वेलीची छोटीछोटी फुलं खात होत्या. काही पानं आपल्या चोचीनं कुरतडत होत्या. समीरला खूप राग आला. तो जोरात ओरडत चिमण्यांच्या अंगावर धावला. सगळ्या चिवचिवाट करत उडाल्या.
समीरनं रडकुंडीला येऊन आजीला आपल्या गोकर्णच्या वेली दाखवल्या. आता आपल्याला प्रकल्प पूर्ण करता येणार नाही याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. आजीनं वेलींचं नीट निरीक्षण केलं. वेलीची फुलं व पानं कमी झाली होती, पण वेलीला छोट्या छोट्या शेंगा धरल्या होत्या. आजीनं समीरला त्या शेंगा दाखवल्या आणि म्हटलं, ‘‘अरे समू, तुझा प्रकल्प तुला छान लिहिता येणार आहे.’’
‘‘तो कसा काय आजी?’’ समीरच्या चेहऱ्यावर जरा हसरे भाव आले.
‘‘तुझा प्रकल्प पर्यावरणाचा आहे. गोकर्णच्या वेली पर्यावरण वाचवायचंच काम करत आहेत.’’
‘‘ते कसं काय गं आजी?’’
‘‘पर्यावरणात असणारी जैवविविधता महत्त्वाची आहे. तिला वाचवणं आपलं काम आहे. हल्ली चिमण्यांसारखे छोटे पक्षी खूप कमी झाले आहेत. कारण त्यांना खाण्यासाठी, राहण्यासाठी योग्य पर्यावरण उपलब्ध नाही. आता तुझ्या वेलीची पानं, फुलं त्या चिमणपाखरांना आवडल्यामुळे त्यांनी ती खाऊन टाकली. त्यांना जगण्यासाठी त्याचा उपयोग झाला. ही गोष्ट किती छान आहे. पर्यावरणातील जैवविविधता वाचविण्यासाठी तुझा हा छोटासा प्रयत्नच झाला रे!’’
‘‘खरंच आजी. व्वा! मी आताच सगळ्या नोंदी करून तू दिलेली माहितीही लिहितो. आता चिमण्या आल्या की त्यांचा वेलीची पानं खाताना फोटो काढतो, म्हणजे मला त्याची प्रिंट प्रकल्पाला जोडता येईल.’’
दुपारी समीर गोकर्णच्या नोंदी प्रकल्प कागदांवर नोंदवत असताना त्याला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला आला. त्यानं आईच्या फोनमधून हळूच त्यांचा फोटो काढला. त्याची प्रिंट काढून त्याने आपल्या प्रकल्पाला जोडली व निष्कर्षामध्ये त्यानं गोकर्ण जैवविविधतेला कसा जपतो ते स्पष्ट केलं. त्याचा प्रकल्प तयार झाला. त्यानं प्रकल्पाला आधी दिलेलं शीर्षक बदललं व नवीन शीर्षक दिलं- ‘जैवविविधता जपणारं गोकर्ण’.
mukatkar@gmail.com