पावसाळा संपत आला होता. स्वच्छ पिवळं धमक ऊन पडलं होतं. मी दार उघडून आमच्या बागेत गेले. झाडं बघत, फुलं पाहात, पक्षी शोधत मी बागेत फिरत होते. अचानक माझ्या मागून, भोवती चक्कर मारून पिवळी धमक फुलपाखरं उडाली. मला काही समजायच्या आत ती माझ्या भोवती परत आली. जणूकाही ती मला काही सांगू पाहात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेवढ्यात एक फुलपाखरू माझ्या कानापाशी येऊन कुजबुजलं. ‘‘काय ग छोटी, पाहते आहेस काय अशी आमच्याकडे?’’

मी तशीच वेड्या नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाले, ‘‘तुमचं हे पिवळं भिरभिरणं. मधेच फुलांमध्ये तोंड खुपसून पंख मिटून बसणं.’’

‘‘भिरभिरणं काय म्हणतेस गं, नाच म्हण.’’ एक फुलपाखरू म्हणालं.

‘‘अगं, हा आमचा नाच आहे नाच! याला म्हणतात ‘पिवळा नाच’.

‘‘पिवळा नाच कसा काय असेल बरं? माझ्या मनात आलं आणि ते फुलपाखरू पुढे म्हणालं, ‘‘आम्हा पिवळ्या फुलपाखरांचा पिवळा नाच. ठिपकेवाल्यांचा ठिपक्यांचा नाच, तसेच नारिंगी नाच, धवल नाच. खूप खूप नावं सांगता येतील.’’ हे सांगताना त्यांचा पिवळा रंग अभिमानाने चकचकून सोनेरी झाला.

मी खूश होऊन म्हणाले, ‘‘मग नाचाल का माझ्यासाठी?’’

इतक्यात आंब्याच्या झाडामधून सुरेल शीळ ऐकू आली. जणूकाही एखाद्या गायिकेच्या गळ्यातून निघालेली सुरेल तान! त्या तानेला दाद देईपर्यंत आंब्याच्या फांदीवरून उतरून ‘नाचण’ जमिनीवर त्याच्या शेपटीचा पंखा करून नाचू लागला. मी आनंदाने नाचणलाही फुलपाखरांबरोबर नाचाल का म्हणून विचारलं. आणि काय गंमत, त्याचाही लगेचच होकार आला.

पण संगीताशिवाय नाचाला काय मजा?

माझ्या मनातलं ओळखूनच की काय नाचण म्हणाला, ‘‘आहेत की आमच्याकडे कितीतरी गाणारे, मधुर शिळा मारणारे पक्षी! मी एक शिट्टी मारली की जमतील सगळे- दयाळ, नीलिमा, बुलबुल… खूपच छान गातात. गाण्याला ठेका पाहिजेच म्हणून तांबट ‘टुक-टुक’ करून देईलच ठेका.’’

‘‘कोकिळेला विसरलात का?’’मी विचारले.

‘‘त्या पहाटेपासून किंचाळणारच.’’ नाचण म्हणाला.

सर्वांचा एवढा उत्साह पाहून मी उड्या मारत टाळ्या वाजवल्या.

मला अचानक अभ्यास आठवला आणि मी त्या कलाकारांना म्हणाले, ‘‘तुम्ही आज सर्वांना एकत्र आणा आणि तालीम घ्या. कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे. उद्या सकाळी याच वेळी याच ठिकाणी मी आंब्यापाशी येईन.’’

मी घरात एका वेगळ्याच तंद्रीत गेले.

रात्रभर सकाळ केव्हा होते याच विचारात मी अर्धवट झोपले.

सकाळी पटकन उठून चटकन तयार होऊन मी हळूच आवाज न करता दार उघडून बागेत गेले आणि कुठून कोण जाणे कोंबडा आरवला.

‘‘अरेच्या! कोंबडा इथे कसा? आजच्या कार्यक्रमाची बातमी पोचलेली दिसतेय याला पण!’’ माझ्या मनात आलं. कोकिळा कर्कश्यपणे न ओरडता कुहऽऽऽ कुहूऽऽऽ गाऊ लागल्या.

माझ्या उजव्या बाजूने घाणेरीच्या झुडुपातून पिवळ्या धमक फुलपाखरांचा थवा विविध रचना करत उडू लागला. तांबटाचा टुक-टुक ठेका सुरू झाला. एका क्षणात फुलपाखरांचं पिवळं भिरभिरं माझ्या भोवती फिरू लागलं. आंब्याच्या झाडाखालच्या पारावर नाचण त्यांच्या शेपट्यांचे पंखे करून ताना मारून नाचू लागले.

पाहता पाहता दयाळ, नीलिमा, बुलबुल सगळेच विविध रचना गाऊ लागले. ‘‘काय चाललंय तरी काय बागेत?’’ असं म्हणत मधमाश्या त्यांच्या पोळ्यांच्या खिडक्यांतून डोकावू लागल्या. कामिनीने सुगंध उधळला. पारिजातकाने आपल्या नाजूक फुलांचा सडा जमिनीवर पसरवला.

नाचणचं पंखानृत्य बघू, का फुलपाखरांचा पिवळा नाच! मला काही कळेना. मी निसर्गाच्या या अप्रतिम आविष्काराने अवाक्झाले होते. शेवटी पावसानेही यात भाग घेण्यासाठी हजेरी लावलीच. पाऊस वाढू लागला आणि फुलपाखरांचं पिवळं भिरभिरं भिरभिरत अदृश्य झालं. नाचणही गायब झाले. कोकिळा उडून गेल्या. आंब्याच्या झाडावरून दोन चपळ खारटुल्या शेपट्या उडवत कुठेतरी पळून गेल्या. राहिले फक्त मीच शेवटच्या पावसात भिजत.

दिवस दुसरा : ‘छान किती दिसते ऽऽऽ फुलपाखरू!’ हे गाणं मनातून जाता जाईना. गाणं गुणगुणतच मी घरात इकडे तिकडे करत राहिले. पुष्कळदा आपल्याला मिळालेला आनंद पुन्हा मिळावा असं वाटत असतं, पण तो नाही मिळत. माझं थोडंफार तसंच झालं असं म्हणायला हरकत नाही. आज सकाळी बागेत फुलपाखरं, पक्षी दिसतात का पाहायला गेले तर बागेत शुकशुकाट होता. आपल्या बागेत त्यांनी सतत रहावं असं वाटत असेल तर तशी बाग केली पाहिजे असं मला वाटू लागलं. माझ्या बागेत गुलाब, शेवंती, लिली अशी फुले आहेत, पण फुलपाखरं फक्त कण्हेरीवरच येणं पसंत करतात. ‘‘का बरं असं?’’ मी विचारात पडले.

तेवढ्यात कोणीतरी पुन्हा कानात कुजबुजलं, ‘‘बाईसाहेब काढा शोधून आम्हाला काय आवडतं ते.’’ कुजबुजून एक पिवळं फुलपाखरू कण्हेरीच्या फुलात जाऊन पंख मिटून बसलं.

लक्षात आलं की, घरात फुलपाखरांवर पुस्तक आहे. आईने एका वाढदिवसाला भेट म्हणून दिलं होतं. अभ्यासामुळे मी ते कधी बघितलंच नव्हतं. मग भराभर फुलपाखरांवरील ते पुस्तक शोधून काढलं आणि त्यांना कुठली फुलं आवडतात ते लक्षात आलं. काही फुलपाखरांना घाणेरी, सदाफुली, झेंडू, कॉसमॉस अशी सहज इकडे तिकडे दिसणारी फुलं आवडतात, तर काहींना बदकवेल, सोनचाफा, शंकासूर, बहावा अशी आवडतात. करंज, रुई, मांदार, चिंच, काजू, कदंब, सोनटक्का ही फुलेही इतर अनेक फुलपाखरांना आवडतात.

मी ठरवलंच की गच्ची रिकामीच आहे तर तिथे फुलपाखरांना आवडणारी झेंडू, घाणेरी, सोनटक्का, सदाफुली तरी लावायचीच. लगेचच मी कुंड्या माती रोपं इत्यादी सर्व साहित्य जमवलं आणि लागवड केली. मग बसले वाट पाहत फुलांची आणि फुलपाखरांची.

दिवस गेले, महिने लोटले तशी सदाफुली फुलू लागली. आणखी काही दिवस गेले आणि मिटलेला सोनटक्का त्याच्या कणसांमधून डोकावू लागला. झेंडू आणि कॉसमॉसने गच्ची केशरी झाली. एक दिवस गुपचूप गच्चीत डोकावले तर विविध नक्षी आणि रंग असलेली फुलपाखरं मनसोक्त भिरभिरताना दिसली.

मी अवाक् होऊन ते दृश्य पाहत राहिले.

‘‘बापरे बाप! इतक्या प्रकारची फुलपाखरं असतात!’’ असं मला शोधत गच्चीत आलेली ताई आश्चर्यचकित होऊन म्हणाली.

साक्षात्कार झाल्यासारखी ती ओरडली, ‘‘मी फुलपाखरांचाच अभ्यास करणार. तू काय करणार गं?’’

‘‘आत्ता तरी मी त्यांना मन भरून पाहणार आणि नंतर कधीतरी त्यांचं चित्र रंगवणार.’’ मी एका वेगळ्याच आनंदात म्हणाले आणि तिथेच उभं राहून माझ्या गच्चीतल्या त्या फुलपाखरांना न्याहाळत राहिले.

vidyadengle@gmail.com