बालवाडीत जाणारी स्वरा आज खुशीत होती. सकाळी तिला उठवताना तिच्या आईनं तिच्या कानात सांगितलं होतं की, आज आपल्याकडे दुपारी गंमत आहे. कसली गंमत आहे हे मात्र आईनं सांगितलं नाही.
चार वाजता गायत्रीताई उमा मामीबरोबर आली. त्यापाठोपाठ कॉलेजमध्ये जाणाऱ्या रतीताई व रमाताई काहीतरी खरेदी करून घेऊन आल्या. इराताई, शर्वरीताईसुद्धा मीनामावशीबरोबर आल्या. सुमाआजीपण आली. गायत्रीताईनं एक सुंदर आकाशी रंगाची प्लेन चादर आणली होती. स्वराची गडबड, बडबड आणि लुडबुड चालू होती.
‘‘ए रमाताई, या पिशवीत काय आहे?’’ न राहवून स्वराने विचारलेच.
‘‘त्यात नं वेगवेगळ्या प्राण्यांची मोठी मोठी रंगीत चित्रे आहेत. आपण ती चित्रे या चादरीवर सेलोटेपने चिकटवू या हं. तू सेलोटेप धरून ठेव बघू हातात.’’ रमाताईनं स्वराला सांगितलं. स्वराला अगदी मोठ्ठं झाल्यासारखं वाटलं.
स्वराच्या सगळ्या तायांनी चादरीच्या काठावर चित्रं पटापट चिकटवली. नंतर हॉलमध्ये मधोमध गालीचा घालून त्यावर ती चादर घातली. स्वराच्या आईनं चांदीच्या ताम्हणात दोन निरांजनं, अक्षता, सुपारी, हळदकुंकवाची कोयरी ठेवून औक्षणाची तयारी केली. अमेय दादानं मोतीचूर लाडू आणले.
स्वराला लाडू बघितल्यावर लगेच भूक लागली. ‘‘आई मला लाडू दे ना!’’ तिची भुणभुण चालू झाली.
‘‘जरा थांब. आता आभा येईल. तिचे चमक लाडू आहेत ना आज.’’ आईनं सांगितलेलं स्वराला काही कळलं नाही, पण ‘आभा आली, आभा आली’ असं कानावर पडल्यामुळे ती ते विसरून गेली. स्वराचा अमितदादा, अलका वहिनी आणि नुकतीच वर्षाची झालेली आभा उत्साहानं घरात आले. खूप माणसं जमलेली बघून सुरुवातीला आभा आईच्या कडेवरून खाली उतरेच ना! थोड्या वेळानं सुमाआजीनं तिला घेतलं.
आकाशी चादरीवर रंगीत पाट ठेवण्यात आला. त्यावर आभाला बसविण्यात आलं. सुमाआजीनं तिचं औक्षण केलं. आभाच्या डोळ्यात कुतूहल दाटून आलं होतं. मग स्वराच्या आईनं व मावशीनं औक्षण केलं. त्यानंतर मात्र गायत्री, रती, रमा, इरा, शर्वरी या सगळ्या आभाच्या आत्यांनी आभाचं औक्षण केलं. सर्वांत छोट्या स्वरा आत्यानंही ताम्हणाला हात लावून भाव खाऊन घेतला. सगळ्या आत्यांनी जरीचे परकर पोलके आभाला दिले. आभाच्या आईनं आभाचा मूड सांभाळत ते लगेच तिला घातले.
आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. रमा आणि रतीनं आभाचे हात धरून रंगीत चादरीवर एका कडेला तिला उभं केलं. गायत्रीनं मोतीचूर लाडू आभाच्या समोर धरला आणि हळूच खाली ठेवला. आत्याचे हात धरून लाडू घेण्यासाठी आभानं टाकलेलं पहिलं पाऊल फोटोत पकडण्यासाठी सगळे मोबाइल पुढे झाले. स्वरानं हळूच दुसरा लाडूपण पुढे ठेवला. आभा लाडवांकडे आणि जमलेल्यांकडे आलटून पालटून बघत होती. नकळत तिचं पाऊल पुढे पडलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आलटून पालटून सगळ्या आत्यांनी आभाला चादरीवर हात धरून चालवलं. शेवटी आभानं पटकन खाली बसून हातात दोन्ही लाडू घेतले. नुकत्याच फुटलेल्या कुंदकळ्यांनी तिनं लाडवाचा तुकडा खाल्ला. आनंदानं ती खुदकन हसली.
‘‘सुमाआजी, हे चमक लाडू म्हणजे काय ते सर्वांना सांग ना,’’ रतीनं आठवण करून दिली.
‘‘अगं आपल्या संस्कृतीत घरात आलेल्या छोट्या नवीन पाहुण्याचं, त्याच्या प्रत्येक पहिल्या गोष्टीचं कौतुक केलं जातं. बाळानं उच्चारलेला पहिला शब्द, त्यानं छातीवर हात ठेवून सांगितलेली स्वत:ची ओळख, त्यानं उघडझाप करून दाखवलेले डोळे, नाक, डोकं, चिऊ, काऊ विठ्ठल विठ्ठल करत वाजवलेल्या टाळ्या, बाप्पाला केलेला जय जय… या सगळ्या बाललीलांचं आपण अतिशय कौतुक करतो. समारंभपूर्वक ते लक्षात ठेवतो, साजरे करतो. सगळा हौसेचा मामला. ते करत असताना संस्कारांची जपणूक करतो. जावळ, उष्टावण हे प्रकार त्यातलेच. आता आजचा चमक लाडूचा समारंभ. बाळ धरून धरून उभं राहू लागतं. आपल्या शक्तीनं सावधगिरीनं, निरीक्षणानं, युक्तीनं ते पाऊल टाकतं. विजयी मुद्रेनं इतरांकडे बघतं. त्याला मार्गदर्शन आवश्यक असतं आणि ते करण्याचा मान आत्याचा. ती घरातील मानाची माहेरवाशीण. घराण्याविषयी अभिमान बाळगणारी, तोच वारसा आपल्या भाचरांनी पुढे चालवावा अशी अपेक्षा धरणारी. बाळाची दुडदुडणारी पावलं घरात गोडवा, आनंद निर्माण करतात. त्यासाठी लाडवाच्या पायघड्या म्हणून हे चमक लाडू. बाळाचं चालणं, फिरणं, प्रवास, पायावर उभं राहणं, प्रगती हे सगळं उत्तम होवो या हेतूनं दिलेल्या या शुभेच्छा. समारंभ करून आठवणीत जपलेले हे सुंदर क्षण.’’
सुमाआजीनं माहितीसह ही जबाबदारी यावेळी तिसऱ्या पिढीवर सोपवली. सगळ्या आत्यांनी ती पारही पाडली. कौतुकानं आभाचे ‘चमक लाडू’ साजरे केले. त्यामुळे अमितदादा खूश झाला. सगळ्या आत्यांना रिटर्न गिफ्ट मिळालीच शिवाय सगळ्यांना पार्टी देण्याचा वायदा केला हे वेगळे सांगायला नकोच.
suchitrasathe52 @gmail.com
© The Indian Express (P) Ltd