डॉ. सुप्रिया आवारे

मल्लिका अमरशेख मराठीतील एक बंडखोर कवयित्री. मल्लिकाने सुरुवातीपासूनच आपली एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख मराठी साहित्यात निर्माण केली. ‘भयचकिताच्या सावल्या’ या संग्रहांमधून मल्लिका बदललेल्या परिस्थितीवर भाष्य करताना दिसते. माणसाचं माणूसपणच संपलं तर केवळ माणसाची ओळख संपणार नाही तर सृष्टीचीही ओळख संपणार आहे, याची कवीला चिंता वाटते.

… या अंधारात कुठल्या हृदयाची धडधड ऐकू येतेय

की कुणीतरी टाइम बॉम्बची पिन काढलीय खेचून

मानवानं आपल्या कर्तृत्वाने हे जग भ्रष्ट केलं आहे. माणसाने केवळ प्राणी, हवा, पशुपक्षी यावर केलेला अनन्वित अत्याचार हा माफीस प्राप्त नाही, पण अशा माणसांना हाकलून द्यावं तरी कुठं? हा तिला प्रश्न पडतो.

जेव्हा वास्तवाने कवी मन त्रस्त होऊन जातं, तेव्हा ते एका नव्या जगाचा शोध घेत असतं. हे जग कल्पनेतलं असतं, प्रार्थनेतलं असतं, तर काही वेळा पर्यायांचं असतं. मल्लिका आपल्या ‘माणूसपणाचे भिंग बदलताना’ पासून अशा जगाचा शोध घेताना दिसते. असं जग ज्यामध्ये तव्यातली भाकरी हसू लागेल. मल्लिकाला नेहमीच सर्वहारा वर्गाविषयी आस्था वाटत आली आहे. त्यांचे प्रश्न तिच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यातूनही भाकरी हा तर तिच्या चिंतनाचा विषय आहे. भाकरीशिवाय आपण जगू शकत नाही, याची तिला जाणीव आहे. पण आज काल भूक भागवणारी केवळ भाकरी नाही, याविषयीचे तिचे चिंतन हे तिच्या कवितेतील आजकालच्या माणसाच्या शोधाच्या आशयसूत्रास समांतर आहे. माणसाची वाढलेली भूक हेच सर्वास जबाबदार आहे, असे तिला वाटते. या दोघांनी माणसांना हतबल बनवला आहे या भुकेनं त्याच्या मेंदू, मन यांचा ताबा घेतला आहे, याचं मालिकाने या संग्रहात रेखाटलेलं चित्र हे सद्या परिस्थितीतील माणसाच्या वृत्ती प्रवृत्तींना नेमकेपणाने अधोरेखित करणारं आहे. मल्लिकाला आपले स्वातंत्र्य हे सर्वाधिक प्रिय आहे. आपली माणूस म्हणून असणारी ओळख तिला अधिक सन्माननीय वाटते. त्यामुळेच ‘भूक’ या कवितेत भुकेने माणसाच्या गळ्यात पट्टा बांधून आसूड फिरवत आपल्या दावणीला बांधलं आहे, हे आजकालच्या माणसाचं चित्र तिला अस्वस्थ करतं. या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती माणसाचा विकास ही एक हरवलेली कल्पना आहे, हे ती उपरोधिकपणे सांगताना दिसते. विकास म्हणजे माणूसपणाला विद्रूप करण्यासाठी आणखी एखाद्या ग्रहाचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे, असं तिला म्हणायचं आहे. तिला आपण एवढा आटापिटा करून काय गमावतोय आणि काय कमावतो याचं भान नसणाऱ्या माणसाविषयी चिंता आणि कणव वाटते. या संग्रहातील माणूस आणि जनावर यांच्यातला भेद सांगणारी आणि माणसातल्या पशूवृत्तीवर नेमकं बोट ठेवणारी ‘जनावर’ ही कविता आहे. जी वाचकाला लाजिरवाणं करते. माणसाला पशू म्हटले तर पशूंची प्रतिष्ठा कमी होईल आणि दोघात तुलना केली तर माणूस लाजिरवाणं ठरेल अशी ही छोटेखानी कविता आहे. माणूस न होता आल्याचे दु:ख हे या टप्प्यावर मल्लिकाच्या चिंतनाचा आकार आहे. याविषयीची कवयित्रीची निरीक्षणं, प्रतिमा दाखले आणि रूपकं ही तिच्या नेहमीच्या शैलीतील धारदार आणि स्पष्ट आहेत. माणसाच्या हरवत जाणाऱ्या स्वातंत्र्य आणि विवेकाने ती अस्वस्थ व बेचैन आहे. या हतबलतेने तिची नेहमीची शब्दांची धार आणि संताप कमी केला असला तरी ती ज्या पद्धतीने बदलत्या वृत्ती आणि परिस्थितीवर दगड मारते ते रक्तबंबाळ करणारे आहे. ज्या शब्दांनी जग जिंकण्याची भाषा केली, परिस्थिती उलथवण्याची ऊर्जा बाळगली, त्या शब्दांविषयीचे तिचे चिंतन सतत सुरू असताना दिसते. जे एका कवीची मन:स्थिती व्यक्त करणारे आहे. ती या निमित्ताने तकलादू जगावर बोट ठेवते.

‘या अजनबी जगात एका कवितेला जिवंत जमीन आहे का कुठे तरी?’ हा तिचा शोध केविलवाणा ठरतो. यातून या जगाची संवेदनशीलता संपलेली आहे, हेच जणू पृष्ठतलावर येतं. अशा या जगाविषयी ती म्हणते,

हे कुठलं जग आहे शब्दांशिवायचं?

फुलपानांशिवायचं?

जिथे संवेदनेचं एकही पाखरू चिवचिवत नाही

न ट्यॅ ह्यॅ म्हणायला तान्ही घाबरू लागल्यात

कुठलं जग हे बिन मुंडक्यांचं बिनचेहऱ्याचं

भुकेच्या ज्वालांशिवाय इथं काहीच पेटत नाहीय

झाडं, फुलं, पानं, पशू, पक्षी, भाषा यांच्याशिवायच्या जगाची कल्पना कोणताही संवेदनशील माणूस करू शकत नाही. माणसाची जीवघेणी भूक हीच सर्व शक्तिमान आणि चिरकालीन अस्तित्व आहे, हेच यातून कवयित्री सांगते. अशी भूक जिने माणसाचा, सृष्टीचा, शत्रूसारखा बीमोड केला आहे. तरीही ती जिवंत आहे, ती माणसातच. या कवितांमध्ये किंकाळ्या, आक्रोश हे तिचे आकार आहेत. पण या आक्रोशाने शांततेचे रूप धारण केल्याचे दिसते. याविषयी तिला संताप आहे.

मल्लिकाने शांततेचं रेखाटलेलं हे चित्र हे तिच्या नेहमीच्या एकाच ओळीच्या, प्रतिमेच्या फटक्यात सारा डोलारा उद्ध्वस्त करणाऱ्या शैलीचे प्रतीक आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिघातील शांतता ‘चुप्पी’वर घाव करणाऱ्या या ओळी आहेत.

मरणाला लाजवेल असं आयुष्य आणि त्यातलं दु:ख यांनी थकून गेलेलं मन पाहायला मिळतं. अशा आयुष्याच्या चुलीवर दु:खाची भाकरी शेकली जाते आणि खाल्ली जाते, जी कधी संपतही नाही आणि तिनं पोटही भरत नाही. म्हणूनच मल्लिकाला अशा एका धान्याचा शोध घ्यायचा आहे ज्याच्या भाकरीचा चंद्र हसताना दिसेल. बदललेल्या काळात मूल्य ही किती तकलादू झाली आहेत हे मल्लिका आवर्जून सांगू पाहते. हाताबाहर गेलेल्या परिस्थितीविषयीच्या एका संवेदनशील मनाच्या या जाणिवा व्यक्ती आणि काळ यांच्यातील ताण्याबाण्यांना ठळक करताना दिसतो.

‘भयचकिताच्या सावल्या’, – मल्लिका अमरशेख, मुक्ता प्रकाशन, पाने-८७, किंमत-२०० रुपये.

dr.supriyaaware@gmail.com