डॉ. इरावती कर्वे हे नाव उच्चारलं की सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर येतात ती ‘युगान्त’, ‘परिपूर्ती’ किंवा ‘आमची संस्कृती’, ‘भोवरा’ या पुस्तकांची नावं. मात्र या पुस्तकांची लेखिका सुमारे शंभर वर्षांपूर्वी जर्मनीला जाऊन तिनं तिथं शारीर मानवशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पार पाडला होता आणि तेवढ्यावरच न थांबता जर्मनीतील वंश श्रेष्ठत्वाच्या सिद्धांताला आव्हानही दिले होते. हे फारच थोड्यांना माहीत आहे. जर्मनीतून परत आल्यावर इरावतीबाईंनी शारीर मानवशास्त्राला सांस्कृतिक मानसशास्त्र, भारतविद्या, वांशिक-ऐतिहासिक ज्ञानशाखा यांची जोड देऊन पुरातत्त्व शास्त्राच्या आधारे वंश म्हणजे जात हे समीकरण मोडीत काढले.
भारतातील जातीयुक्त समाजाला पूर्वीचे मानसशास्त्रज्ञ ‘जिगसॉ पझल’ची उपमा देत असत. इरावतीबाईंनी ती नाकारली. रंगीबेरंगी गोधडीचा दृष्टांत देऊन इथली समाजरचना स्पष्ट केली. इथल्या समाजरचनेत असलेल्या विविध गटांचे विविध ठिकाणांहून, वेगवेगळ्या वेळी स्थलांतर होणे, त्यांचे इतरत्र अद्याप अस्तित्वात असणे वगैरे स्पष्ट केले.
‘आम्ही भारतीय कोण आहोत आणि आहोत ते तसे का आहोत?’ हा प्रश्न त्यांच्या संशोधनाच्या मुळाशी होता. हे सर्व संशोधन भोवती चार पुस्तकं मांडून बंद खोलीत करता येण्यासारखं नव्हतंच. त्यासाठी त्यांनी उदंड फिल्डवर्क केलं. प्राचीन मानवी सांगाड्याच्या शोधात त्यांनी अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर खननकाम केलं. सांगाड्यांची मोजमापे घेतली. प्रवासाची, निवासाची सोय धड असेल की नाही याची पर्वा न करता जिद्दीनं संशोधन करत राहिल्या. सुज्ञ, सुजाण पती डॉ. दिनकर कर्वे यांची सर्वतोपरीने साथ त्या काळात त्यांना होती, हे महत्त्वाचे. १९४०च्या दशकात प्रवासाची सार्वजनिक साधनं म्हणजे आगगाडी आणि बस. चुकून कधी सरकारी जीप मिळाली तरच. संपर्काची साधनेही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत अत्यंत काटकसरीनं संशोधन मोहीम पार पाडावी लागे. प्राचीन मानवी सांगाडा मिळाला तर प्राचीन व आधुनिक संस्कृतीचं नातं उलगडू शकेल म्हणून पुरातत्त्व विभागाच्या डॉ. सांकळिया यांच्या बरोबर प्राचीन सांगाड्याच्या शोधात त्यांनी गुजरातमध्ये खननकाम केलं. विशेष म्हणजे जिथे कुठे त्यांचं खननकाम चालू असे आणि शालेय सुट्टीचा काळ असेल तर इरावतीबाई आपल्या आणि परिचितांच्या मुलांना अशा मोहिमांवर नेत. सांगाडे साफ करायला, त्यांची मोजमाप घ्यायला शिकवत. (आजचे प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ त्यांच्या लहानपणी इरावतीबाईंच्या शोधमोहिमांत सहभागी असत.) या मोहिमांत बाईंचा त्या त्या प्रदेशातील संस्कृती, इतिहास, भूगोल, लोकजीवन, राहणीमान, कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध वगैरेंवरही अभ्यास चाले. १९५१-५२मध्ये त्यांना इंग्लंडमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनने निमंत्रित केलं. तिथल्या वास्तव्यात त्यांनी बरंच लेखन केलं. इकॉनॉमिक वीकली, नेचरसारख्या जगप्रसिद्ध नियतकालिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. भारतात परतल्यावर त्यांनी ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा महत्त्वाचा शास्त्रीय ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यात भारतातील नातेदारी संघटनसंस्थेचा शोध अनेक अंगांनी घेतला होता. या ग्रंथाचं त्या काळातील विद्वानांनी खूप कौतुक केलं. भारतीय समाजाची संरचना समजून घेण्यासाठी हा ग्रंथ त्यांना उपयुक्त वाटला. विशेष म्हणजे, इरावतीबाईंनी स्वदेशी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून भारतीय कुटुंब व्यवस्थेचे विश्लेषण करण्याचं पायाभूत काम केल्याबद्दल तो उल्लेखनीय ठरला. इरावतीबाईंचा भारतीय संस्कृतीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन या पुस्तकातून व्यक्त झाला आहे. त्यांनी पुढे आपल्या संशोधनावर आधारित ‘हिंदू सोसायटी – अॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ लिहिला. महाभारतकालीन समाजव्यवस्थेचे संदर्भ देत त्यांनी जात आणि वर्ण याविषयी सविस्तर मांडणी केली. या ग्रंथाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं. जगभरातील अनेक विद्यापीठांत तो ग्रंथ पाठ्यपुस्तक किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून लावला गेला.
वयाची साठी ओलांडल्यावरही त्यांचा संशोधकाचा पिंड शांत बसला नाहीच. प्लॅनिंग कमिशनच्या रिसर्च कमिटीला कोयना प्रकल्प विस्थापितांवर सर्वेक्षण अहवाल देऊन त्यांच्या सुस्थापनासाठी उपाय सुचवले. १९६५ सालात त्यांनी केलेलं हे काम पुढे १९८०-९० च्या दशकात सरदार सरोवराच्या निमित्ताने झालेल्या विस्थापनाचा अभ्यास करताना उपयोगी ठरले.
शास्त्रीय लेखनाइतकाच त्यांनी मराठीत ललित लेखन करण्यातही रस घेतला. भरपूर प्रवास केल्यानं त्यांचं अनुभवविश्व समृद्ध होतं. इंग्रजी, संस्कृत वाङ्मयाचं वाचनही दांडगं होतं. संशोधक वृत्ती आणि वर्तमानाचं चिकित्सक भान, त्याला चिंतनशीलतेची जोड यामुळेही त्यांची प्रतिभा ललित लेखनात झळाळून उठली. लेखिका डॉ. प्रतिभा कणेकर यांनी इरावतीबाईंचा हा अनोखा प्रवास बारकाईनं सांगितला आहे. इरावतीबाईंच्या संशोधनामागच्या प्रेरणा, त्यांचा अभ्यास, काळाच्या पुढची त्यांची झेप याविषयी प्रतिभाताईंनी साक्षेपानं लिहिलंय. शक्य तेवढी माहिती जमवून भारतीय मानसशास्त्राच्या प्रांगणातील या आद्या दीपमाळेला मराठीत आणलंय.
इरावतीबाईंच्या शास्त्रीय संशोधन आणि लेखनाइतकाच त्यांच्या महाभारत आणि रामायणावरील अभ्यासपूर्ण लेखनावर प्रतिभा कणेकरांनी स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. त्यांच्या ललित लेखनाची योग्य ती दखल घेतली आहे. त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’ आणि ‘संस्कृती’ ग्रंथाची माहिती वाचताना इरावतीबाईंचा आवाका पाहून थक्क व्हायला होतं. एका वेगळ्याच ज्ञानशाखेत प्रवेश करून स्वत:चा मार्ग निवडणारी, असीम प्रयत्नांनी त्यात स्वत:चं स्थान निर्माण करणारी मराठी स्त्री शास्त्रज्ञ प्रतिभा कणेकर यांनी मराठीत सादर करून चरित्रवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. एक मानवशास्त्र संशोधक, गृहिणी, माता, लेखिका, शिक्षिका, सखी, पत्नी… अशा विविध भूमिकांत इरावतीबई आपल्याला या चरित्रात भेटत राहतात. एखाद्या आदिवासीबहुल खेड्यात त्या जितक्या सहजतेनं वावरतात तितक्याच पटुत्वाने त्या कॅलिफोर्निया विद्यापीठात व्याख्यात्या म्हणून लक्षणीय कामगिरीही पार पाडून येतात.
या ग्रंथात प्रतिभा कणेकरांनी इरावतीबाईंचे पती डॉ. दिनकर धोंडो कर्वे यांचीही योग्य ती दखल घेतलेली आहे. खरं तर त्यांचं अस्तित्व थंडावा देणाऱ्या सावलीसारखं सर्वत्र जाणवत राहतं. पत्नीची इच्छा आणि तिचा कल पाहून तिला सर्वतोपरीने प्रोत्साहन देणारा, तिला उच्च शिक्षणासाठी, आपल्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन जर्मनीला पाठवणारा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा मान राखणारा, पत्नी संशोधनकार्यासाठी बाहेर गेल्यावर तिच्या अनुपस्थितीत मुलांचा प्रतिपाळ करणारा, त्यांच्या सांगोपनात रस आणि सहभाग घेऊन घर सांभाळणारा, झाडपेरात रमणारा, तिच्या लेखन कार्यात मदत करणारा, ती आजारी असताना तिच्या लेखांचं शब्दांकन करणारा, तिच्या मृत्यूनंतर तिच्या अप्रकाशित लेखांचा संग्रह संपादित करणारा बुद्धिमान आणि सुस्वभावी सहचर या पुस्तकात कुठे ना कुठे भेटत राहतो. हृद्या अनुभव देतो. प्रतिभा कणेकरांनी असे क्षण निगुतीनं टिपलेत. इरावतीबाई आणि डॉ. दिनकर यांचं मैत्रीपूर्ण नातं सुरुवातीलाच त्या काळात त्यांनी एकमेकांना दिनू आणि इरू अशा संबोधण्यातूनच व्यक्त होत जातं. एक देखण्या, बुद्धिमान, कर्तबगार, चिंतनशील, विचारी आणि तितक्याच सहृदय संशोधक स्त्रीचा हा जीवनालेख ललित्यपूर्ण झाला आहे, हे विशेष.
‘भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्या दीपमाळ : डॉ. इरावती कर्वे’ – प्रतिभा कणेकर, प्रकाशक – इंडस सोर्स बुक्स, पाने- २७०, किंमत- ४५०
veena.gavankar@gmail.com