चित्रपट, सीरियल आणि ओ.टी.टी.च्या आजच्या काळात जगभरात अतिरंजित गोष्टी प्रेक्षकांपुढ्यात जात असताना अभ्यासपूर्ण काम केलेल्या काही डॉक्युमेण्ट्री मनात कायमसाठी जागा करतात. ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवरच्या आणि डेव्हिड अॅटनबरा यांच्या माहितीपटांतून प्रेरणा घेऊन डॉक्युमेण्ट्री क्षेत्रात प्रवेश केलेल्या दिग्दर्शकाचे मनोगत…

सध्या आपण काय पाहतो, याबाबत प्रचंड गोंधळलेले आहोत. म्हणजे दहा- वीस वर्षांपूर्वी भारतातील किंवा इथल्या कुठल्याही राज्यातील प्रेक्षकांचे मनोरंजन किंवा माहितीरंजन म्हणून ‘पाहणे’ कसे होते? आणि आताच्या प्रेक्षकांचे ‘पाहणे’ कसे आहे, यात किती मोठा भेद दिसेल. मराठी अथवा हिंदी यापलीकडे हॉलीवूडी मारधाडपटांपर्यंत मर्यादित असलेली शहरी प्रेक्षकांची दृष्टी उपग्रह वाहिन्यांच्या रतिबानंतर थोडी-थोडी बदलत गेली. दक्षिणी सिनेमांची ‘डबिंग’वर चालणारी चित्रयंत्रणा त्यातील रंगांसह भारतातील सगळ्या कानाकोपऱ्याने आपलीशी केली. मग ‘एमटीव्ही’, ‘व्ही चॅनल’मधील गाणी-ट्रेलर्ससारख्या देशभरातील वाहिन्यांवर चालणाऱ्या आकर्षक जाहिरातींची आपल्याला सवय होत गेली. ‘डिस्कव्हरी’ वाहिनीने माहितीचा पाऊस पाडून ज्ञान-उत्सुकांसाठी ‘जो जे वांछिल…’ ही भूमिका ठेवली. आता लोक कोणत्याही भाषेतील मालिका ओटीटीवर पाहतात. अमेरिकीच नाही तर स्पॅनिश मालिकाही घराघरात पोहोचू शकतात हे करोनाच्या आधीपासूनच दिसले. करोनाकाळात मल्याळम, कन्नड, तेलुगू सिनेमाही मराठी प्रेक्षक चवीने पाहत होते. तेलुगू चित्रपटही संपूर्ण देशातील ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट ठरू शकतो, हे प्रेक्षकांनीच दाखवून दिले. पण या सर्वकाळात नकळत प्रेक्षकांची ‘एकनिष्ठता’ ही ‘अनेकनिष्ठ’तेत परावर्तित झाली, ही बाब आपल्या लक्षात आली आहे काय?

pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Paaru
Video: पारू-आदित्यमधील जवळीक वाढणार, अनुष्का दोघांची अहिल्याकडे तक्रार करणार, पाहा प्रोमो
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…
IIT Mumbais TechFest showcased innovative projects for science and technology enthusiasts worldwide
मुंबई : आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ आजपासून
documentary , need of documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: शोधण्यातील मजा…

आज चित्रपट, सीरियल आणि ओ.टी.टी.च्या काळात, अतिरंजित गोष्टी लोकांसमोर जात असताना अभ्यासपूर्ण काम केलेल्या काही डॉक्युमेण्ट्री मनात जागा करतात त्या कायमच्या. माझी डॉक्युमेण्ट्री करण्यामागची प्रेरणा ‘बीबीसी’ आणि ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवरच्या असंख्य माहितीपटांमध्ये आहे. त्यांत पर्यटनापासून ते प्राणिजगताचे सूक्ष्म तपशील अशक्य वाटावे अशा कॅमेऱ्याने टिपलेले असे. असे कौशल्य हस्तगत असलेले माहितीपट निर्माते माझ्यासाठी वाढत्या वयापासून आदर्श राहिले. ‘डेव्हिड अॅटनबरा’ आणि त्यांच्या साऱ्या कामांत माहितीपट बनविण्याचा नुसता ध्यासच दिसत नाही, तर आजवर कॅमेऱ्यात न टिपल्या गेलेल्या जगाला उभा करण्याचा अट्टहास दिसतो. त्यांच्या साऱ्या माहितीपटांचा मी चाहता आहे. आज ९३ व्या वर्षीही त्यांचे काम सुरू आहे. ठरविले, तर काम करताना कुठल्याच अडचणी (अगदी वयाचीही नाही) येत नाहीत, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते.

मला या माध्यमाबद्दल आस्था अधिक आहे. पण मी काही आधीपासून ‘डॉक्युमेण्ट्री बनवूया’ असे ठरवून या क्षेत्रात आलेलो नाही. ध्वनिमुद्रणाचे रीतसर शिक्षण घेतले. माझा ध्वनिमुद्रण संकलन स्टुडिओ आहे. या क्षेत्रात रुळल्यानंतर मी काही वर्षे अनेकांच्या कामाचे निरीक्षण करीत होतो. समीर शिपुरकर, अतुल पेठे, योगेश सोमण, राहुल सोलापूरकर हे त्यांच्या कामांचे ध्वनिमुद्रण आणि काही कामांचे संकलन माझ्याकडे करत असत. त्यातूनच चित्रपट करण्यापेक्षा हे काम अधिक अभ्यासपूर्ण आहे असे लक्षात आले. तांत्रिक गोष्टींचे काम करत असल्याने डॉक्युमेण्ट्रीविषयी आकर्षण निर्माण झाले. समीर शिपुरकर हा माझा मित्र. तो त्याच्या प्रत्येक डॉक्युमेण्ट्री करताना किती प्रकाराने विचार करायचा हे मी जवळून अनुभवले आहे. मुळातच माझा स्वभाव उगीच एखाद्या गोष्टीला ताणत बसण्याचा नाही. वैचारिकतेचा अतिडोस, अतिसोस प्रेक्षकांना फार रुचत नाही ही माझी धारणा. माहितीपटांत आधी खूप अभ्यास करून मगच आपले मुद्दे, कॅमेऱ्याच्या आणि ध्वनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेता आले पाहिजेत, हे माझ्या मनात रुजले, ते इतरांना धडपडताना पाहताना. डॉक्युमेण्ट्रीमेकरने कधीही एक बाजू मांडू नये असे माझे ठाम मत बनत गेलेे. माहितीपट पाहणारी व्यक्ती तो विषय खोलातून जाणून घ्यावा म्हणून त्याकडे जात असते. मनोरंजनासाठी नाही. पण रंजनासह त्याला एखाद्या विषयाची सखोल माहिती मिळते का, याबाबत काहीशी आग्रही असते.

वन्यप्राणी जीवनावर अनेक माहितीपट पाहिलेले होते. याच विषयांत माहितीपट बनविण्यासाठी माझा अभ्यास सुरू आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ‘शेकरू’ यावर ‘शेकरू वाचवा’ अशी डॉक्युमेण्ट्री राज्य सरकारसाठी केली. त्यात शेकरूंची सध्याची स्थिती, त्यांची घटती संख्या आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व या बाबींवर लक्ष केंद्रित केले होते.

त्यानंतर वन्य प्राण्यांवरच्या आणखी एका माहितीपटाचे काम सुरू केले. ‘एमटीपीसी’च्या स्पर्धेसाठी ‘वाघोबा’ माहितीपट २०१६ साली बनवला. अवघ्या पाच मिनिटांचा कालावधी आणि त्यात ताडोबा अभयारण्याविषयी अधिकाधिक माहिती या फिल्ममधून बघायला मिळते. युट्यूबवर ती पाहायला मिळू शकेल. डॉक्युमेण्ट्री करीत असताना काही गोष्टींचे भान असणे अत्यावश्यक आहे. ‘असे का होते?’ आणि ‘असे का होत नाही?’ किंवा ‘कुणाची बाजू नक्की बरोबर?’ जसे ताडोबामध्ये मानव- वाघ संघर्ष काही ठिकाणी आहे. त्यावर भाष्य करणे आवश्यक आहे. पण माहितीपट करीत असताना आपल्याला लोकांना प्रश्न दाखवायचा आहे की उपाय सांगायचा आहे? हे पक्के करूनच त्याप्रमाणे संहिता निर्माण करावी लागते.

दूरदर्शनसाठी ‘तपस्या’ या मालिकेकरिता प्रगती बहुउद्देशीय केंद्र या छत्तीसगडजवळील संस्थेचे मधुमक्षिका पालन केंद्र या विषयावर काम केले. तेथील आदिवासी समुदायासाठी मधमाश्या किती उपयोगी आहेत, मेण आणि मध या दोनच गोष्टींवर कुटुंब वर्षभर कशी गुजराण करते याचा प्रत्यक्ष अनुभव आला. शहर आणि गावातील गरजा यांमधील फरक माहितीपटातून दाखवता आला. आपण खूपच सुरक्षित जगात वावरतो. अनेक अडचणींतून या गोष्टी मिळविण्यासाठी आदिवासी समाजाची कामाची गणिते खूप भिन्न आणि अवघड आहेत. ते समजून घेता आले.

माहितीपटांचा मुख्य उद्देश किंवा उद्दिष्ट हे दस्तावेजीकरणाचे असते. आपल्याकडे ‘डॉक्युमेंटेंशन’चे महत्त्व अजूनही फार उमगलेले नाही. एखादी लोकोपयोगी ठरलेली महत्त्वाची व्यक्ती किंवा संस्था यांच्याबद्दल ऑडिओ- व्हिडीओ माध्यमात ठेवा जतन केला, तर पुढील कित्येक पिढ्यांना तो अभ्यासात संदर्भासाठी किंवा माहितीसाठी उपयोगी पडू शकेल.

मला आवर्जून सांगावेसे वाटते ते गणेशोत्सवाशी निगडित मी केलेल्या एका माहितीपटाविषयी. ‘कसबा गणपती’ हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती. मी यात कसबा गणपतीची स्थापना, येथील उत्सव परंपरेचा सुमारे १२५ वर्षांचा इतिहास त्यात मांडला आहे. सध्या राजकीय फायद्यासाठी सण उत्सवांचा वापर केला जातो, पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सव कसा साजरा केला जात होता, ते मला सांगायचे होते. आजची पिढी गणेशोत्सवाकडे काय दृष्टिकोनातून पाहते, याबाबतचे अनेक प्रश्न त्या माहितीपटामध्ये विचारले आहेत. हा माहितीपट करीत असताना सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे केवळ धांगडधिंगा नसून अद्यापही खूप मंडळे सामाजिक उपक्रम म्हणून याकडे पाहत आहेत. उत्सवाचे पावित्र्य राखून आहेत, ते मला यात संशोधन करताना जाणवले. या उत्सवाच्या माध्यमातून होणारा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय अनेक समुदायांना वर्षभर कशी साथ देतो, याचाही मला शोध घेता आला.

माझ्या मनात कैक दिवस रुतलेले आहेत त्यापैकी पहिला दिग्दर्शक सुबय्या नालमुथ्थू यांनी केलेला रणथंबोरमधल्या ‘मछली’ या वाघिणीवरचा ‘द वर्ल्डस मोस्ट फेमस टायगर’ आणि दुसरा रॉब सुलिव्हन- अॅलिस्टर टोन्स सहदिग्दर्शित ‘टायगर ऑन राइझ’ हा माहितीपट. मनोरंजनाशिवाय किंवा त्यासह आपण माहितीपटांतून सामाजिक विषय, प्रश्न योग्य पद्धतीने मांडू शकतो, याची जाण मला माहितीपटांनी करून दिली. त्यामुळे चित्रपटांपेक्षा मला डॉक्युमेण्ट्री अधिक भावते. आपण करीत असलेल्या कामाचा काहीतरी उपयोग व्हावा, हाच मुख्य हेतू माहितीपट बनविण्यात असतो.

भारतामध्ये चांगले माहितीपट बनविणारे आता कुठे पुढे येऊ लागले आहेत. माहितीपटांसाठी हा कधी नव्हे इतका चांगला काळ आहे. ज्यांना फक्त प्रसिद्धीच्या मागे न धावता चित्रपट निर्मितीच्या कौशल्याचा वापर ज्ञान-रंजनसाठी करायचा आहे, त्यांच्यासाठी डॉक्युमेण्ट्री बनविणे पर्वणी आहे. कारण तांत्रिक स्राोत पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. संदर्भांची साधनेही सहज प्राप्त होण्यासारखी आहेत. पण त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च यांचा मेळ व्यावसायिक दृष्टिकोनातून सुरुवातीला फारसा होत नाही, हे लक्षात घेऊनच या क्षेत्रात पाऊल ठेवायला हवे. निर्माता मिळणे ही सर्वात मोठी गोष्ट आणि मिळालेल्या निर्मात्याला आपल्या विषयाची समज (जाण) असणे हे फार आवश्यक आहे. तर पुढील गोष्टी सोप्या होतात.

भारतातील जंगले, प्राचीन वास्तू, वन्य जीव यावर मला अधिकाधिक काम करायचे आहे त्या दृष्टीने सध्या जोरदार अभ्यास सुरू आहे. लवकरच म्हणजे वर्षाच्या आत ‘ताडोबा’वर आणि ‘पेंच’ अभयारण्यावर आधारित एक डॉक्युमेण्ट्री प्रदर्शित होणार आहे.

ओटीटी फलाटाने फक्त डॉक्युमेण्ट्री या विषयावर भारतीय वाहिनी सुरू करायला हवी, इतके चांगले काम या माध्यमात सुरू आहे. सध्या ‘प्राच्यम’ हे आपली विपुल परंपरा आणि संस्कृती दाखविणारे चॅनेल सुरू आहे. त्यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर वाहिन्या सुरू झाल्या, तर त्या डिस्कव्हरी वाहिनीसारखे काम करतील. मग या माध्यमाकडे अधिकाधिक तरुणाई वळेल.

सध्या मुख्य धारेत अतिमनोरंजित मालिका किंवा डॉक्युफिक्शन भरणा सुरू आहे. पण डॉक्युमेण्ट्रीचा प्रेक्षक लेखाच्या सुरुवातीला म्हटले तसे गोंधळलेल्या स्थितीवाल्यांपेक्षा थोडा वेगळा किंवा त्यांमधला देखील आहे. त्यांना त्यांच्या पारंपरिक ‘पाहण्या’च्या पर्यायांमधून माहितीपटांकडे ओढून घ्यायचे, तर त्याच ताकदीचे विषय मांडावे लागणार आहेत. अमित त्रिपाठी, डेव्हीड अॅटनबरा यांसारखे सजग लोक या क्षेत्रात काम करीत आहेत. त्या दर्जाचे काम करण्याची संधी भविष्यात मिळण्याची मी वाट पाहत आहे.

या माध्यमात येताना वेगवेगळ्या विषयात संशोधन- अभ्यास करणाऱ्यांनी ऑडिओ – व्हिडीओ माध्यमातील जाणकार लोकांशी चर्चा करूनच मग आपण देणार काय आहोत, कसे सादर करणार आहोत हे ठरवायला हवे. तरच उत्तम डॉक्युमेण्ट्रीज तयार होऊ शकतात, असे माझे मत आहे. निवेदन, ग्राफिक्स, प्रत्यक्ष चित्रीकरण, मुलाखती यांच्या साखळीतून आपला माहितीपट प्रेक्षकाची पकड घेऊ कसा शकतो, याचा अभ्यास आधी कागदावर करावा लागेल. दृक-श्राव्य माध्यमाचा फक्त हास्यविनोद, मनोरंजन या पलीकडे जाऊन विचार होत नाहीए. सिनेमाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आधी डॉक्युमेण्ट्री बनविण्याचा मार्ग एकदा चोखाळावाच, असे मला वाटते. आवश्यक तेवढ्या प्रापंचिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या संपवून पूर्णवेळ डॉक्युमेण्ट्री मेकर म्हणून काम करायला कुणाला आवडणार नाही? मी सध्या त्यादृष्टीने माझ्या कामाला दिशा देत आहे. प्रेक्षकांच्या ‘पाहण्या’चा गोंधळ आणखी वाढणार आहे. पण माहितीपटांच्या पर्यायाकडे त्यांना ओढून आणणे, ही एक जबाबदारी देखील असणार आहे.

वाणिज्य शाखेतून पदवीधर. त्यानंतर ध्वनिमुद्रणात शिक्षण. वाघोबा, ज्योती, उन्मुक्त या लघुपटांना महोत्सवांमध्ये पुरस्कार. विविध संस्थांसाठी तिसाहून अधिक माहितीपटांचे दिग्दर्शन.

mslimaye1979@gmail.com

Story img Loader