पंकज कपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:ला तारांकित अभिनेत्याऐवजी कायम सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती मानणाऱ्या आणि तशाच साधेपणाने समाजात वावरणाऱ्या पंकज कपूर यांचा अभिनय भारतीय दर्शकांतील तीन पिढ्यांना सुपरिचित. इब्राहिम अल्काझी यांच्याकडून घेतलेल्या अभिनय तालमीबद्दल, नाटक आणि सिनेेमा माध्यमातील चांगल्या-वाईटाबद्दल, भूमिकांतील वैविध्य जपत दूरदर्शनमधल्या एक तपाहून अधिक काळाबद्दल, चित्रपट माध्यमात घडविलेल्या नव्या पर्वाबद्दल आणि आजच्या ‘ओटीटी’ फलाटाच्या स्वरूपाबद्दल रंगकर्मी आणि प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी त्यांना ‘लोकसत्ता गप्पां’च्या मंचावर भरभरून बोलते केले… नक्कीच आपल्या प्रेरणांना कुठून तरी आरंभ होतो. माझी आई आमच्या परिसरातील सर्व मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून नाटिका करवून घेई. माझी अभिनयाची हौस तेथून जन्माला आली असावी. वडील इंग्रजीचे प्राध्यापक. आम्हा लहान मुलांना काही ती भाषा येत नव्हती. पंजाबी ही मातृभाषा आणि थोडी जुजबी हिंदी कळत होती. वडील शेक्सपिअर, आर्थर मिलर आणि कित्येक अभिजात लेखक वाचायचे. त्यांच्या कहाण्या पंजाबीत आम्हाला रंगवून सांगायचे. त्यातून कुठे तरी पाया रुजत गेला असावा. ज्या वातावरणात मी वाढलो, त्यात या महान लेखकांच्या कामाची ओळख आणि आईकडून घेतली जाणारी नाटिकांची प्राथमिक ‘शाळा’ यांतून अभिनयाकडे ओढा गेला असावा. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ‘लहानपणी ज्या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळते, तीच प्राणपणाने करण्यात पुढे स्वारस्य तयार होते.’ किंवा मी त्या वेळी अंमळ अधिकच बोलका आणि उत्साही असल्यामुळे अभिनय उत्तम करू शकतो, असा समज तेव्हा इतरांमध्ये निर्माण झाला असावा. त्या वातावरणातच मला घडण्याची संधी मिळाली.

वयाच्या अठराव्या वर्षी आयुष्यभर अभिनयच करणार हे माझे ठरले होते. आईजवळ हे सांगितले तेव्हा तिने नकार दिला. मग ‘मी घर सोडून मुंबईला पळून जाईन,’ असे तिला सुनावले. मग आईने ही गोष्ट वडिलांपर्यंत पोहोचवली. वडिलांची त्यावरची प्रतिक्रिया अचंबित करणारी होती. ‘‘माझ्या मुलाने आपल्याला आयुष्यात काय करायचे हे इतक्या लहान वयात स्वत:च ठरविले, याबद्दल मला अभिमानच वाटतो.’ प्राध्यापक असल्याने आणि तरुण विद्यार्थ्यांमध्ये सतत वावर असल्याने वडिलांना तरुणांच्या मानसिकतेची जाणीव होती. त्यांनी मला विचारले, की या फिल्म उद्याोगातील चकचकीत ग्लॅमरला तू भुलला आहेस की खरोखरच तुला अभिनय येत असल्याचे तुला वाटते, हे आधी पक्के कर. त्यांनी ठामपणे सांगितले की या क्षेत्राबद्दल ‘ग्लॅमर’ वाटत असेल तर तिकडे फिरकूदेखील नको, पण आपल्यातल्या क्षमतेबद्दल विश्वास असेल तर नक्कीच त्याचा विचार कर. मग मी अभिनयाच्या शिक्षणासाठी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अर्ज केला. पण वडिलांनी माझ्यासाठी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेची माहिती करून घेतली. त्यांनी मला सांगितले की, ही संस्थादेखील अभिनय शिकवते. तिथून तू अभ्यास करावा, अशी माझी इच्छा आहे. ज्या क्षेत्राचा करिअर म्हणूून तुला विचार करायचा असेल तर आधी त्या विषयीचे संपूर्ण शिक्षण घेणे आवश्यक आहे. कोणत्या घरातून कुणाला इतक्या सहजपणे स्वप्नांचा पाठपुरावा करायला प्रोत्साहन मिळते? मला ते मिळाले.

फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय चाचणीत माझी निवड झाली. मला आनंद झाला. पण पुढल्या टप्प्यावर माझा चेहरा कदाचित पसंतीस न उतरल्याने ‘स्क्रीन टेस्ट’मध्ये मी बाद झालो. तिथे माझ्या जागी कुणा दुसऱ्याचीच निवड झाली. मग ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिक्षण सुरू झाले. तिथे इब्राहिम अल्काझी यांच्यासारखे शिक्षक मला लाभले, याबाबत मी स्वत:ला प्रचंड नशीबवान समजतो. त्यांच्याकडून वैयक्तिक पातळीवर जे मार्गदर्शन मला लाभले, त्यातून मी घडलो.

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील आमच्या शिक्षणकाळातील आरंभीचे तीन महिने अल्काझी नव्हतेच. त्यांच्या वडिलांचा तेव्हा मृृत्यू झाला होता. ते जेव्हा आम्हाला शिकवायला आले तेव्हा आम्ही वाचलेल्या नाटकांची यादी एका कागदावर लिहून देण्याचे फर्मावले. मी तोवर कुठलेच नाटक वाचले नव्हते. इब्सेनच्या ‘डॉल हाऊस’ या नाटकाची कथा ऐकली होती. ‘मॅक्बेथ’ या नाटकावर आधारलेला चित्रपट मला वडिलांनी दाखविला होता, त्यामुळे मी फक्त दोन नावे लिहून दिली. पैकी ‘इब्सेन’ आणि ‘मॅक्बेथ’ यांची स्पेलिंग चुकवून ठेवली. (अल्काझींनीच ती दुरुस्त केली.) वर्गातील इतर मुलांनी वाचलेल्या शेकडो नाटकांची पुरवणी यादीच लिहून ठेवली, त्या तुलनेत माझी दोन नावे म्हणजे त्रोटकच. मी ती तेवढीच लिहिली, कारण अल्काझींनी समजा नाटकाचे कथानक विचारले तर ते सांगता येईल अशा दोन नावांचाच मला आधार होता. माझ्या यादीखाली अल्काझींनी नोंद केली की, ‘वाचन वाढवण्याची आणि इब्सेनची स्पेलिंग अचूक लिहिण्याची गरज.’ पण नंतर दुसऱ्या वर्षात अल्काझींनी माझ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले. त्यांना मी अभिनयाऐवजी दिग्दर्शनाचा गांभीर्याने अभ्यास करावा, असे वाटत होते. पण मी मात्र अभिनयाच्या तालमीवर ठाम होतो. एक दिवस त्यांनी त्यांच्या गाडीत मला बसविले आणि गलगोटीयाज या दिल्लीतील त्या वेळच्या सर्वात मोठ्या पुस्तकांच्या दुकानात नेले. तिथून मला पाच नाटकांची पुस्तके खरेदी करून दिली. मला म्हणाले,

‘‘तुझी साहित्यावरची जी परीक्षा असेल ती या पुस्तकांवर घेतली जाईल. इतर विद्यार्थ्यांना जो अभ्यासक्रमावरील पेपर असेल, त्यासारखी नाही.’’ मी जगभरातील नाटकांची उत्तमोत्तम पुस्तके वाचावीत, ही त्यांची इच्छा होती. त्यांच्याबाबत आणखी एक प्रसंग मला अजूनही लक्षात आहे. आमची अभिनयाची तालीम सुरू झाली तेव्हा स्टानिस्लाव्हास्की या रशियन रंगकर्मीचा जगभरात प्रचंड दबदबा होता. त्यांनी घालून दिलेल्या ‘मेथड अॅक्टिंग’च्या धड्यांना गिरवत कलाकारांच्या पिढ्या घडत होत्या. मार्लेन ब्राण्डो यांच्यासह हॉलीवूडचे कित्येक अभिनेते त्यांच्या अभिनय नियमांचे अनुयायी होते. त्यांचा ‘अॅन अॅक्टर प्र्रीपेअर्स’ नावाचा ग्रंथ, जो आजही अभिनयोच्छुक अभ्यासतात, तो एके दिवशी मी वाचनालयातून घेऊन आलो. त्यासह आणखीदेखील काही पुस्तके निवडली असावीत. योगायोगाने अल्काझी तेव्हा समोरून जात होते. तर त्यांना माझ्याकडील ग्रंथसंपदा नीट दिसावी म्हणून मी ‘अॅन अॅक्टर प्र्रीपेअर्स’ पुढे धरून उभा राहिलो. मी अभिनयाबाबत किती गंभीर आहे, ते माझ्या शिक्षकांना दाखविण्याची चालून आलेली संधी मला दडवायची नव्हती. पण अल्काझी अशा क्षणांना पकडण्यात पक्के मुरलेले. मला म्हणाले, ‘‘अच्छा तर आत्ता वाचनालयातून येतोयस काय, बघू काय वाचतोयस?’’ यावर मी तातडीने ‘अॅन अॅक्टर प्रीपेअर्स’ पुढे केले. त्यावर त्यांची प्रतिक्रिया ही की- ‘लगेचच हे पुस्तक वाचनालयाच्या फडताळात पुन्हा ठेवून दे. अभिनयात चाळीस वर्षं काम केल्यानंतर वाच.’ मी त्यांच्या या विरोधी भूमिकेने दचकलो. ‘चाळीस वर्षांनी का? आत्ता का नको?’ असे प्रश्न त्यांनाच विचारले. त्यावर अत्यंत नम्रतेने त्यांनी मला उत्तर दिले, ‘‘पंकज, त्या माणसाने हे पुस्तक ४० वर्षे अभिनय केल्यानंतर लिहिले. या काळात त्याने अभिनयाची आपली शैली विकसित केली. त्याने स्वत:ला तपासत -तपासत अभिनयाचा, मेथड अॅक्टिंगचा त्याला योग्य वाटणारा अर्थ पुस्तकातून मांडला. मला माझ्या विद्यार्थ्याने त्याची आयती शैली अनुसरावी अथवा अंगीकारावी असे बिलकूल वाटत नाही. त्याऐवजी मला असे वाटते की तू तुझी स्वत:ची अभिनयाची वाट तयार करावीस.’’

आज मी माझ्या वयाच्या सत्तरीत आहे. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून शिक्षण पूर्ण करूनदेखील ४८ वर्षे झाली आहेत. पण आजतागायत मी ‘अॅन अॅक्टर प्रीपेअर्स’ वाचले नाही. अल्काझींच्या सान्निध्यात जे शिक्षण मिळत होते ते अशा प्रकारचे होते.

तिथल्या तिसऱ्या वर्षाच्या काळात दिग्दर्शनाचे शिक्षण घेणारे सात की नऊ विद्यार्थी होते आणि अभिनयाचे केवळ सहा. तीन दिग्दर्शकांनी त्यांच्या नाटकात मला मुख्य भूमिका दिली. त्यावर अल्काझींनी आक्षेप घेतला आणि ठणकावून सांगितले की, मी फक्त एकाच नाटकात काम करेन. त्यावरून अभिनेत्याची निवड ही दिग्दर्शकाचा मूलभूत हक्क असल्याचा दावा करीत बरीच तंटातंटी झाली आणि दिग्दर्शक विद्यार्थ्यांनी संपाचे हत्यार उगारले. त्यावर अल्काझींनी तोडगा काढला की, कोणत्या आणि किती नाटकांमध्ये काम करायचे हे पंकजला ठरवूद्यात. मग मी दोन नाटकं स्वीकारली. त्यातील एक रणजीत कपूर आणि दुसरे अनिल चौधरी यांचे होते. याला अल्काझींची संमती मिळाली. मग नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. रंगमंच उभारण्यात आला. एक दिवस सेटची पाहणी करीत असताना अल्काझी माझ्यासमोरून गेले.

थोड्या वेळाने पुन्हा परतून माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारू लागले, ‘‘दोन्ही नाटकांतील भूमिकांची तयारी झाली?’’ मी उत्तरलो, ‘‘नाही. सध्या मी एकाच भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही एकाच वेळी करणे अवघड वाटते. दुसऱ्या भूमिकेबद्दल मी अद्याप विचारदेखील केला नाही.’’ ही गोष्ट कदाचित त्यांना आवडली की, मी एकाच भूमिकेचा बारकाईने अभ्यास करतोय. ते पुन्हा दूर गेले. मग पुन्हा माझ्याजवळ येऊन जे म्हणाले ते अभिनेता म्हणून आयुष्यभर माझ्या मनावर गोंदले गेले. त्यांनी इतकेच सांगितले, ‘‘या जगात कुठलीही दोन माणसे एकसारखी बनू शकत नाहीत.’’ हा माझ्यासाठी अल्काझींकडून मिळालेला गुरुमंत्र होता- ज्याच्या आधारावर माझ्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. माझ्या वैयक्तिक विकासासाठी त्यांनी दिलेल्या या काही महत्त्वाच्या गोष्टी. त्यांची शिस्त, त्यांच्याकडून मिळणारे शिक्षण, त्यांचे साहित्य, रंगभूमीवरील त्यांचे काम यांवर ग्रंथांचे खंडच्या खंड लिहिता येतील इतके त्यांचे योगदान आहे. मी त्याविषयी काही इथे सांगत नाही. त्यांनी मला वाढू देण्यासाठी आभाळ तयार करून दिले, त्याची आठवण मात्र कायम राहील.

प्रत्येकामध्ये थोड्या-बहुत प्रमाणात एक अभिनेता दडलेला असतो. रोजच्या आयुष्यात घराघरात संवाद सुरू असतो तेव्हा कुणी तरी कुणाशी बोलताना काही तरी माहिती देत असतो. काही तरी रंगवून अगदी रसाळपणे सांगत असतो की, ‘‘आज ऑफिसमध्ये अमुक गोष्ट घडली.’’, ‘‘आज या परिसरात काही तरी विचित्र झाले.’’ तर सांगण्याची ही कला नेमकी काय आहे? त्यासाठी व्यक्तीचे शिक्षण कुठे घडते काय? अगदी सामान्यातल्या सामान्य घरांमध्ये गप्पांमध्ये हा प्रकार रोजच होतो. अशी किस्से सांगण्याची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. हीदेखील एक प्रकारची ‘तालीम’च. घरातील बुजुर्गाकडून कुटुंबाच्या नवीन सदस्याला ती आपसूक मिळते.

एखाद्या व्यक्तीमधील प्रतिभा ही नदीसारखी असते. तिच्या गुणधर्मानुसार सरळ रेषेत वाहण्याची क्षमता आणि महत्त्वाकांक्षा ज्याच्यामध्ये अधिक, त्याला ती पुढे नेत राहते. या प्रतिभारूपी प्रवाहावर नियंत्रण राखले नाही तर पूर येऊ शकतो. पण या प्रवाहाला एकाजागी रोखता आले तर त्याच्यापासून वीजनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे कला परंपरेनुसार एखाद्यात हस्तांतरित होणारी असेल किंवा कुठल्या विद्यापीठात जाऊन शिकून आत्मसात होणार असेल, तर तिची मशागत प्रतिभारूपी प्रवाहाच्या नियंत्रणातून खऱ्या अर्थाने होते. एखाद्या गोष्टीचे शिक्षण घेऊन त्यात निष्णात होण्याचा नियम हा केवळ अभिनयातच नाही, तर इतर क्षेत्रालादेखील लागू आहे. डॉक्टर होण्यासाठी पदवी घेऊन नंतर काही वर्षे उमेदवारी केल्यानंतरच त्याला ती मान्यता प्राप्त होते.

गांधी सिनेमात काम केले आणि बेन किंग्जले यांना गांधींच्या भूमिकेसाठी हिंदीत आवाज दिला तेव्हा माझे वय सव्वीस-सत्तावीस होते. त्या वेळी काम करण्याची आवड आणि उत्साह उतू जात होता, त्याचबरोबर अभिनयाचे जे शिक्षण घेतले त्याची सुरसुरी इतकी होती की, या क्षेत्रात मी काहीही करू शकतो, असा एक गंड तयार झालेला. पण त्याच तोडीस तोड मी मेहनतदेखील करीत होतो. ज्याची फळे माझ्या कामात दिसत होती. दिग्दर्शकदेखील त्याबाबत समाधानी दिसत होते. पण सिनेमाच्या पडद्यावर जेव्हा मी माझे काम पाहायला सुरुवात केली; तेव्हा स्पष्ट जाणवायला लागले की, सिनेमाच्या ज्या जगात शिरायचा आपण प्रयत्न करतोय, तिथे पोहोचण्यासाठी स्वत:त काही ठोस बदल करावे लागतील. त्यात देहबोली, आवाज यांच्यासह एखादी व्यक्तिरेखा खोदून पाहावी, ती अधिक स्वत:तून बाहेर काढायला हवी. हा बदल माझ्या आणि इतरांच्या भूमिकांच्या अवलोकनातून मला करता आला. अभिनयाचे मूलभूत अंग माझ्याजवळ आहे, त्याला धक्का न लावता हा बदल कसा घडवता येईल, याच्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो.

रंगभूमीवर तुम्ही जेव्हा काम करता, तेव्हा अभिनेता आणि प्रेक्षक यांच्यात निश्चित असे अंतर असते. प्रेक्षक नाटकात घडणारी प्रत्येक घटना आणि संवाद ‘लाँग शॉट’मध्ये पाहतो. ते करताना तुमची व्यक्तिरेखेतील गुंतवणूक तितकीच असायला हवी, जितकी तुम्ही पडद्यावरील भूमिकेत असते. पडद्यावरील भूमिकेत कॅमेरा तुमच्या इतक्या जवळ येऊन दृश्य टिपत असतो की तुम्ही व्यक्तिरेखा प्रत्यक्षात जगत नसलात तर त्यातील खोटेपणा कॅमेरामुळे चक्क उघडा पडतो. रंगभूमी आणि सिनेमांत काम करताना ही गोष्ट माझ्या आरंभीच लक्षात आली. नंतर नाटक असो, चित्रपट असो किंवा टीव्ही मालिका असो, आपली व्यक्तिरेखा तंतोतंत खरी वाटण्याचा अट्टहास कायम ठेवला. कुठलीही व्यक्तिरेखा असली तरी तिचा सच्चेपणा प्रेक्षकाला कळणे, ही या क्षेत्राची मूलभूत गरज आहे.

मला सुरुवातीपासून रंगभूमीवरच काम करायचे होते. कारण नाटकातच जन्म झाला होता, त्यातच प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे नाटकाशिवाय जग असेल याची तेव्हा कल्पनाच नव्हती. मग जगभरातील चांगले सिनेमे पाहण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांचे आकर्षण वाढू लागले. गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येणारे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणारे हेदेखील उत्तम माध्यम आहे हे उमगले. काही काळानंतर टीव्ही माध्यमाची शक्ती लक्षात आली. त्यातून देशभरातील घराघरांत तुम्ही आणि तुमचे काम कसे पोहोचू शकते याची जाणीव झाली. त्याआधी या माध्यमांत केवळ रेंगाळत होतो. ‘गांधी’ चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली, त्याचे बरे पैसे मिळाले. त्यात ‘डबिंग’चे काम केले त्यामुळे इंग्रजी अभिनेत्याला हिंदी आवाज दिल्याचे भरपूर कलात्मक समाधान मिळाले. त्यासाठी सात दिवस दररोज ११ तास खूप मेहनत केली. पण मूळ मुद्दा हा होता की चित्रपट मोठ्या संख्येने मिळत नव्हते. कामे मिळत असत, पण दुय्यम. म्हणजे नायकाचा मित्र, नायिकेचा भाऊ, खलनायकाचा उजवा हात किंवा त्याच्या डावीकडे घुटमळणारा चमचा. माझे अभिनयाचे शिक्षण थिएटरमध्ये झाले. त्यातही शेक्सपिअरपासून कालिदास आणि सारे आधुनिक नाटककार वाचायला तसेच काम करायला मिळाले. हे केल्यानंतर मग चित्रपटांतील अशी दुय्यम कामे करून मनाला दिलासा कसा मिळेल? त्यातही मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये तुम्ही पहिल्यांदा ज्या भूमिका वठवता, त्या बऱ्या झाल्या तर आयुष्यभर तुम्हाला त्याच पुन:पुन्हा करायला मिळत राहतात. त्या करण्याशिवाय तुमच्याजवळ पर्यायदेखील उरत नाही, हा आपल्या सिनेउद्योगाचा शिरस्ता. हे करण्यासाठी मी इथे आलो नव्हतो. मग पृथ्वी थिएटरजवळ काम करीत असताना एका संध्याकाळी पंकज पराशर मला भेटायला आले. त्यांच्याकडे टीव्ही मालिकेत काम करण्याचा प्रस्ताव होता. तो मी नाकारला. पण महिन्यांनंतर लक्षात आले की आपल्या बँकेत केवळ पाचशेच रुपये उरलेले आहेत. पुढील महिन्याच्या घरभाड्याची तजवीज नाही. तेव्हा मी पराशर यांच्याकडे पटकथेची मागणी केली. तेव्हा रेडिओवर ‘इन्स्पेक्टर ईगल’ नावाचा कार्यक्रम सादर होत असे. त्यांनी माझ्यासमोर ती रेडिओची पटकथा ठेवली. ती मला आवडली नाही.

मी मग अनिल चौधरी या माझ्या मित्राला बोलावले. त्यांनी पटकथेवर काम सुरू केले आणि त्यातून ‘करमचंद’ या व्यक्तिरेखेची उभारणी झाली. त्या मालिकेत काम करण्याचे माझे कारण तेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हते हेच होते. पण करमचंद या व्यक्तिरेखेची बांधणी माझी आणि कार्यक्रमाची शैली आणि निर्मिती त्यांची हा आमच्यात अलिखित करार झाला होता ही दिग्दर्शक-अभिनेता यांच्यातील समाधानाची बाब. त्यात सहभागी असलेल्या कुणालाही ‘करमचंद’ मालिका इतकी लोकप्रिय होईल याचा अंदाज नव्हता. करमचंद ही व्यक्तिरेखा साकारणे, हेदेखील माझ्यासाठी नवे काहीतरी शिकण्याची प्रक्रिया होती. कॅमेरा, दृक्-श्राव्य माध्यमासंबंधी या मालिकेने अधिक तपशिलात मला सजग बनविले. देशभरातील घराघरांत ही मालिका पाहिली गेली आणि त्यातून मला इतके लोक ओळखू लागले की रस्त्यावरून चालणे माझ्यासाठी अवघड बनले. त्या लोकप्रियतेने काही काळ मी घाबरून गेलो, अशा प्रकारची प्रसिद्धी मला नको होती.

मला जगाने अभिनेता म्हणून ओळखावे ही माझी इच्छा होती, पण मी एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगा होतो. ढाब्यामध्ये बसून चहा आणि भजीची लज्जत चाखणे मला पसंत होते. अभिनयाबरोबर आयुष्याची मजा मी घेऊ इच्छित होतो. आपल्या कामासाठी मी ओळखला जावा, आदर मिळावा हे मला हवेच होते. पण माझ्या पाठीमागे मोठ्या संख्येने चाहते यावे, इतपत लोकप्रियता मला बिलकुल नको अशी देवाकडे मी प्रार्थना करीत असे.

शोधत असलेल्या भूमिका टीव्हीत सापडल्या…

पैशांसाठी मी टेलिव्हीजनसाठी काम सुरू केले तरी आणखीदेखील एक कारण होते. मला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यावेळच्या सिनेमाहून अधिक टेलिव्हीजनने दिली. साहित्यावर आधारित, प्रयोग करू देणाऱ्या या भूमिका असल्याने माझ्या कारकिर्दीतील पंधरा वर्षे मी ९० टक्के टीव्हीतील भूमिकांसाठी वाहून घेतले आणि १० टक्के चित्रपटांना.

टीव्हीच्या सुवर्णकाळाबाबत मी नशीबवान…

अनेक लोक एकत्र येऊन आपल्या उत्तम कल्पनांना एखाद्या माध्यमात साकारतात. त्या माध्यमाला अधिकाधिक जाणून घेतात. त्यांतील आर्थिक नफ्याची समीकरणे दिसायला लागल्यानंतर व्यावसायिक प्रवृत्तीच्या समुदायाचा शिरकाव होतो. मग पैसा ओतणारा हा वर्ग तुमच्या कलात्मक प्रेरणांवर नियंत्रण ठेवू पाहतो. आज मनोरंजन माध्यमात हेच दिसत आहे. म्हणून टीव्हीच्या त्या सुवर्णकाळाबाबत मी स्वत:ला नशीबवान मानतो. कारण त्यावेळी कलेवर, कल्पनेवर कुणाची बंधने अथवा नियंत्रण नव्हते. व्यावसायिक समूह कलावंतांची जागा बळकावू पाहत नसत.

टीव्हीबरोबर सिनेमाही बदलला…

टेलिव्हीजनच्या कलात्मक स्वातंत्र्यावर व्यावसायिक वर्चस्व ज्या काळात येऊ लागले तेव्हा टीव्ही पूर्णपणे बदलला. पण त्याचवेळी चित्रपटही बदलांच्या प्रक्रियेतून जात होता. चांगल्या गोष्टी सादर होत होत्या, लोक त्या पसंत करीत होते. भिन्न विषयांचा सिनेमा घेऊन ताज्या दमाचे चित्रकर्ते समोर येत होते. सिनेमा प्रेक्षकांपर्यंत अधिकाधिक पोहोचत होता, याचे काही प्रमाणात श्रेय टेलिव्हीजनलादेखील आहे.

‘एक डॉक्टर की मौत’ एनएफडीसीने चित्रपटगृहात प्रदर्शित केला होता. वांद्रे येथील न्यू टॉकीजच्या सकाळी ११ वाजताच्या खेळामध्ये त्याचे प्रदर्शन करताना तो हाफ आर्कमध्ये ( छोट्या चौकटीत) दाखविला जात होता. फिल्म इन्स्टिट्यूटमधील मित्रांनी त्याबाबत थिएटरच्या प्रोजेक्शनिस्टशी हुज्जत घातली. पण मला त्या अपुऱ्या सुविधांच्या प्रदर्शनातदेखील चित्रपटातील दृश्यांवर स्टॉलमधील प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या ऐकू आल्या. उत्तम कहाणी पाहू इच्छिणारा भारतीय प्रेक्षक त्याला ती बघायला मिळाली तर दाद देण्यात आखडता हात घेत नाही, हे तेव्हा मला उमगले. टेलिव्हीजनवर हा चित्रपट अधिक पाहिला गेला, त्यामुळे माझी ओळख आणखी ठळक झाली. कोणत्या प्रकारचे काम मी करतोय, हे प्रेक्षकांना लक्षात यायला लागले. पुढे मला आणखी त्याच ताकदीचे काम मिळत गेले आणि बरीच प्रशंसादेखील.

चांगला चित्रपट प्रेक्षक ताडतात…

प्रेक्षकांना उत्तम दृश्यचौकटी हव्या असतात. त्यांना उत्तम कहाणी हवी असते, हे ‘एक डॉक्टर की मौत’च्या थिएटरमधील प्रतिसादावरून माझ्या लक्षात आले. कलात्मक सिनेमा म्हणून व्यावसायिक ठिकाणी प्रदर्शित करण्यास निर्मातेच नाखूष असतात. उलट प्रेक्षक मात्र हा भेद करीत नाहीत. चांगला आणि दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी ते भुकेले असतात.

व्यक्तिरेखा कशी बनते?

मी कुठलीही व्यक्तिरेखा उभी करताना पटकथेलाच अनुसरतो. त्यापलीकडे तुम्हाला व्यक्तिरेखेत अधिक जीव ओतायचा असेल, ती अधिक जीवंत करायची असेल तर काय करता येईल याचा विचार करतो. अल्काझींचा गुरूमंत्र कायम माझ्यासह असतोच. व्यक्तिरेखा पटकथेबरहुकूम साकारली तर ती चुकीची होत नाही, पण त्यात स्वत:ला खोदायला जाणे आवश्यक असते. उदाहरण म्हणून ‘मकबूल’मधील अब्बाजीच्या व्यक्तिरेखेबाबत सांगता येईल. विशालजींनी मला अब्बाजी यांची भूमिका दिली, ती व्यक्तिरेखा एका ‘डॉन’ची, प्रचंड दरारा आणि दहशत असलेल्या व्यक्तीची आहे. तर आमच्या चर्चेत माझे म्हणणे होते की, हे फक्त सांगितले जात आहे की अब्बाजीची व्यक्तिरेखा करारी आणि रुबाबदार आहे. प्रत्यक्षात जाणवत मात्र नाही. कुठली तरी अशी जागा असायला हवी, ज्यात त्याचा दबदबा लक्षात येईल. ते उमगल्यावर मग विशाल यांनी नंतर नवे दृश्य लिहिले. त्यात अब्बाजीची व्यक्तिरेखा म्हणते की, ‘गिलोरी खाया करो गुलफाम, जबान काबूमे रेहती है।’ व्यक्तिरेखेचे वजन वाढविण्यास अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या गोष्टींचा आधार आवश्यक असतो.

मकबूलबाबत माझ्या भूमिकेइतकेच विशालजींचे श्रेय महत्त्वाचे आहे. कारण अभिनेता म्हणून मी त्यांच्याबरोबर पोहोचवू पाहतोय, ते दिग्दर्शक मान्य करून त्यानुसार त्यात बदल करण्याची तयारी त्यांनी वेळोवेळी दाखविली. अशा प्रकारची साथसंगत मिळाली तर कुठलीही व्यक्तिरेखा का फुलणार नाही? लोकांना एखादी व्यक्तिरेखा आवडण्यामागे ही गोष्टच तर कारणीभूत असते. पटकथेमध्ये त्या व्यक्तिरेखेचे विशिष्ट बोलणे, चालणे, वावरणे नमूद केलेले असते. पण तिला नव्याने शोधायचे काम अभिनेत्याचे असते. दिग्दर्शकालाही सुचणार नाहीत अशा काही चांगल्या गोष्टी या शोधातून सापडून जातात. दिग्दर्शकाचा सर्व विचार हा पटकथेच्या अंगाने असतो, पण अभिनेत्याला आपल्या भूमिकेला नव्याच साच्यात भरण्यासाठी आणि दिग्दर्शकाशी सल्लामसलत करीत अधिक तीव्रतेने सादर करण्यासाठी आणखी मेहनत घ्यावीच लागते. यासाठी मला भेटलेल्या सर्व दिग्दर्शकांबाबत मी नशिबवानच ठरलो.

माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तिरेखा अशाच आल्या की त्यांत एकसारखेपणाऐवजी नवे काही ओतता येईल. अभिनयाला मी ‘मिनिएचर पेंटिंग’सारखे समजतो. तुम्ही त्याला लांबून जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला ते आवडते; पण जितक्या जवळ जाल तितके कलाकाराने त्यात छोट्या छोट्या जागांमध्ये केलेली कलाकुसर लक्षात यायला लागते. व्यक्तिरेखा अधिकाधिक तपशीलांसह उभी राहत नसेल तर ती तशी करण्यावर माझा भर असतो. पटकथेत सारे आलेले असते, तंतोतंत तसे केल्याने बिघडत काही नाही. मग त्या व्यक्तिरेखेचे जीवनसार जर तुम्ही अभिनेता म्हणून खणून काढाल तर पटकथेला ती अधिक समृद्ध करते. तिला धक्का न लावता तुमची भूमिका उजळून निघते.

दिग्दर्शकाने याबाबत सहकार्य केले तर व्यक्तिरेखा अधिक सशक्त, वास्तव दिसू लागते. दिग्दर्शकाने मानले नाही तर त्याने जे सांगितले ते प्रामाणिकपणाने पटकथेबरहुकूम करण्यात काहीही वावगे नाही. सुरुवातीला माझ्यात एक बंडखोरी होती. त्यावेळी दिग्दर्शकाने सांगितल्यानुसारच काम करण्यात मला त्रास होई. पण नंतर मात्र जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असू शकत नाही, या मतावर मी आलो. तुमच्या दिग्दर्शकालादेखील तुमच्याहून अधिक जाणीव असू शकते, त्यामुळे त्याचे ऐकायचादेखील प्रयत्न करायला हवा, असे वाटू लागले. मग काहीवेळा असेही लक्षात आले की, आपल्याला आधी न पटलेल्या गोष्टी पडद्यावर दिग्दर्शकाच्या नजरेतून योग्यच दिसत आहेत.

व्यक्तिरेखेतून विलग व्हावे… प्रेक्षकांपासून नाही…

सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक अभिनेत्याला वाटते की आपण भूमिकेत पूर्णपणे शिरावे. मग हळूहळू काही वर्षांनी त्याच्या धारणा बदलत जातात. अभिनयासाठी जेव्हा तुम्ही सेटवर जाता; तेव्हा इतर कुठल्याही क्षेत्रासारखे एखाद्या कामावर जात असता. बँक कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना शिकवायला तयारी करून जाणाऱ्या प्राध्यापकाच्या कामासारखेच त्याचे स्वरूप असते. वास्तव आयुष्य वेगळे आणि अभिनय हा वेगळा, त्यामुळे प्रत्येक अभिनेत्याने व्यक्तिरेखेतून विलग होऊनच काम करायला हवे. मात्र ती विलगता, अलगता ही त्या काळापुरती भूमिकेशी असायला हवी, प्रेक्षकांशी नसावी. प्रेक्षकांना आपण या भूमिकेतून काय देणार आहोत? हसवणार आहोत की रडवणार आहोत. याची तपशीलात जाणीव अभिनेत्याला असायला हवी. अभिनय ही प्रचंड संयम, मेहनत यांतून उतरणारी बाब आहे. शिवाय ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी अभ्यासात सातत्य राखणे आवश्यक.

अभिनय हे माझे पहिले प्रेम…

भूमिकांबाबत मी आता पूर्वीइतका तणाव घेत नाही. त्याबाबत कधीकधी मी माझ्या मुलांचा सल्ला घेतो. एखादी उत्तम भूमिका असेल तर तिला नाकारत नाही. पण सहज काम करता येईल, अशा वातावरणाला मी पसंती देतो. नशीबाने माझे वय आणि अनुभव यांच्या बळावर तशाच भूमिकांसाठी मला विचारणा होते. पुढल्या काळात व्यावसायिकरीत्या काम करणे मी बंद जरी केले तरी अभिनय हे माझे पहिले प्रेम असेल आणि ते कायम राहील.

केवळ पैसा असून उपयोग नाही…

मनोरंजन माध्यमांत पैसा ओतणाऱ्या समूहांना वाटते की त्यांना सगळ्याच गोष्टींचे परमोच्च ज्ञान आहे. आपण सर्वोत्तम बुद्धिवंतांना कामावर ठेवू शकतो, सर्वाधिक गुणवत्ता असलेल्यांकडून काम करून घेऊ शकतो, पण प्रत्येकवेळी हे सूत्र कामी येत नाही, आधी काही जणांना वाटते की आपल्याला सारेच चांगले येते. प्रेक्षकांना काय आवडू शकते आणि काय नाही याचा आदमास आपल्यालाच आहे. मग त्यांच्या नुस्ख्याला अपयश आले की नवा समूह उभा राहून म्हणू लागतो की, आम्हाला माहिती आहे काय करायचे. त्यानंतर या सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करून ठरविण्याचा बिंदू तयार होतो. अनेक मेंदूंचा विचार घेऊन काय फायद्याचे आहे, याबाबत चाचपणी सुरू होते. त्यात यश आल्यानंतर मग तोच मार्ग प्रत्येकवेळी अवलंबला जातो. पण खरे तर या प्रक्रियेला प्रचंड कालावधी लागतो. कधी दीडशे-दोनशे कोटी पणाला लागलेला चित्रपट तिसऱ्याच दिवशी आपल्याला तिकीटबारीवरून कोसळताना दिसतो… तर एखादा कमी बजेटचा, पण लोकांना आवडणाऱ्या विषयाचा सुंदर चित्रपट धोधो चालल्याचे दिसते. मी या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. माझा यातील भाग केवळ कलात्मकतेचा. तरीही पैसा ओतणाऱ्या समूहाला सल्ला देईन की, त्यांनी सर्जनशीलतेला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन आपल्या आर्थिक फायद्याची गणिते दूर ठेवावीत. नियंत्रणमुक्त कलेतून तुम्हाला अपेक्षित असणारा लाभच मिळू शकेल.

पुन्हा करमचंद साकारताना…

पूर्वी ज्या कारणासाठी मी करमचंद मालिका स्वीकारली, त्याच कारणांसाठी नंतरही मी ती भूमिका केली. त्यासाठी मला उत्तम मानधन मिळाले. पण शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मनासारखे काहीच होत नव्हते. पटकथेबाबत मला थोड्या अडचणी वाटत होत्या. दिग्दर्शकाशी काही मतभेद होत होते, पण मी तेरा भागांच्या मालिकेशी बांधील होतो. त्यामुळे ते संपताच मी पुन्हा त्या मार्गाला जायचे नाही हे पक्के केले. कारण त्यात नवे करायला दिग्दर्शकाने वावच ठेवला नव्हता. जसे पूर्वी काम केले, तसेच आताही करा असा त्यांचा धोशा होता. पूर्वीपासून मी नाटक आणि चित्रपटाकडे किंवा पत्येक माध्यमाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आलो. उदाहरणार्थ, ‘एक रूका हुआ फैसला’ चित्रपटातील भूमिका. आधी त्या नाटकात मी काम केले, तसेच मी सिनेमातदेखील वठवावे, असा बासू चटर्जी यांचा आग्रह होता. मला मात्र सिनेमात ती भूमिका नव्या पद्धतीने साकारायची होती. मनाला मुरड घालून मी ते काम केले. अनेकांना ती भूमिका आवडते, माझ्या महत्त्वाच्या कामांत लक्षात राहते. मी मात्र त्या व्यक्तिरेखेबाबत आजही समाधानी नाही.

‘ऑफिस-ऑफिस’चा शीण…

मी एकामागोमाग एक मालिका टीव्हीसाठी करीत होतो तेव्हा काही भूमिकांनी मला पूर्णपणे थकविले होते. ‘ऑफिस- ऑफिस’ मालिकेचे चार वर्षे २५० भाग करून झाल्यानंतर मला त्या मालिकेतून बाहेर पडायची तीव्र गरज निर्माण झाली. कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक माझे खूप चांगले दोस्त असल्याने, त्यांना मी सांगितले की, ‘‘तुमच्याबरोबर मी सिनेमा करीन पण आता या मालिकेतील तेच तेच काम नको.’’ कुठलीही भूमिका इतक्या मोठ्या काळपर्यंत वठवत राहण्याचा मला प्रचंड कंटाळा आला होता. ‘मकबूल’ आणि चित्रपटातील इतर लक्षवेधी भूमिका मी स्वीकारल्या त्या याच कालावधीत. त्यानंतर पुढे मी अशा प्रकारे सलग कामे करण्याचे टाळले. त्यामुळे स्वत:साठी अधिक वेळ काढला. मला सहसा रिकामपण येत नाही. मी सुट्टीवर जाणे पसंत करतो. जेवण बनण्यात माझी रुची सध्या वाढली असून मी स्वयंपाकात रमतो.

घरातील चर्चा कामापलीकडच्याच…

अभिनयाच्या किंवा कामाविषयी आमच्या घरात बिलकुल चर्चा होत नाही. माझी पत्नी देखील अभिनेत्री आहे, त्यामुळे ती एखाद्या भूमिकेसाठी काम करीत असताना कोणत्या विचारांतून जात असेल याची जाणीव मला असते. त्यामुळे आमच्या घरात चर्चा या कामापलीकडच्याच असतात. खाण्याच्या किंवा सुट्टीत कुठे जायचे, त्याबाबतच्या आराखड्यांच्या असतात. सुरुवातीच्या काळात एखादी भूमिका माझ्यासह घरात आली असेल, पण गेल्या काही वर्षांत मी त्याबाबत फारच दक्ष आहे. व्यक्तिरेखा स्टुडिओमध्ये किंवा माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी ठेवून मी घरी परततो. आमच्या घरात राजकारणावर अजिबातच चर्चा केली जात नाही. त्याबाबत माझे कुटुंब फारच कंटाळवाण्या प्रकृतीचे आहे. सकाळच्या चहाबरोबर वृत्तपत्र वाचले जाते आणि त्यातील मुख्य बातम्यांबद्दल सहज चर्चा-गप्पा होतात. पण मुख्य गोष्टी नाश्ता काय बनेल, याबाबतच्याच असतात.

दिग्दर्शनातही मला रुची, पण…

‘मौसम’ चित्रपटानंतर पुन्हा मी दिग्दर्शनाच्या फंदात पडेन किंवा नाही याचे आज मला उत्तर देता येणार नाही. अभिनय हे पहिले प्रेम असले तरीही लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही माध्यमांत मला रुची आहे. पण त्यासाठी निर्माता शोधण्याची धावपळ करायची माझी इच्छा नाही. संधी मिळाली आणि सारेच योग जुळून आले, तर मी पुन्हा दिग्दर्शन करेन. पण त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची माझी इच्छा नाही. दिग्दर्शकाची जबाबदारी आणि पैसा हा अर्थातच अधिक असतो. तरी प्रामाणिक अभिनेत्याचे कामदेखील चित्रपटाला उपयुक्त ठरतेच.

ओटीटी फलाटापासून लांब का?

आधीच असलेल्या पारंपरिक दृक्-श्राव्य माध्यमांत ‘ओटीटी’ची भर पडली. हे माध्यम उत्तमच आहे. ते सुरू झाल्यानंतर मला अनेक कामांसाठी विचारणा झाली. पण त्यात गरज नसताना सेक्स आणि हिंसाचाराचा वापर मला दिसू लागला. या मालिका-चित्रपटांमध्ये लैंगिक दृश्य आणि हिंसा यांत कथानकाची नैसर्गिकता संपली. कथा अनैसर्गिक किंवा कृत्रिम भासू लागली, त्यामुळेच बराच काळ या माध्यमांत भूमिका स्वीकारण्यास माझे मन धजावत नव्हते. या दरम्यान माझ्या भूमिकेमुळे ओटीटी फलाटात मला स्वारस्य नाही असा संदेशही पसरवला गेला. मात्र माझ्या अपेक्षांवर उतरलेल्या दोन चांगल्या मालिकांमध्ये मी काम केले. त्यातील एक येऊन गेली आणि दुसरी लवकरच पाहायला मिळेल. ओटीटी फलाटावरील ती कामे पाहून माझ्या प्रकृतीच्या भूमिका भविष्यात चालून येतील, अशी मला आशा आहे.

चित्रपट समाजाचे देणे लागतो…

माझी इच्छा अशीच आहे की चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक समूहाने कलात्मकतेशी फारकत घ्यावी, त्यात बिलकूल ढवळाढवळ करू नये. कल्पनांचे आणि बुद्धीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. चित्रपटांतून पैसा कमावण्याच्या विरोधात मी नाही. तोही एक उद्याोग आहे आणि त्यातून नफा अभिप्रेतच असतो, पण त्याचबरोबर चित्रपटाने समाजाला काही तरी देणे आवश्यक आहे, मनोरंजनाच्या नावाखाली काहीही उथळ खपवण्याचा प्रकार सिनेमाने करू नये. मनोरंजनाने मूल्यांचा, भविष्यातील समाजाच्या सकारात्मक बदलांचा पुरस्कार करावा.

मी फक्त भूमिका जगत गेलो..

माझ्या व्यक्तिरेखेतून मी कधीच एखादे विधान किंवा भाष्य करण्याचा अट्टहास ठेवला नाही. मी मिळालेल्या भूमिका जगत गेलो. त्या त्या विषयावरील व्यक्तिरेखा माझ्या प्रेक्षकांसाठी मी उभी करीत गेलो. जाणीवपूर्वक मी असे करायला गेलो असतो, तर माझ्या व्यक्तिरेखा जशा उभारल्या गेल्या तशा आल्याच नसत्या. पटकथेतील काही मुद्दे माझ्या मनाला भिडल्याखेरीज मी भूमिका स्वीकारत नाही. व्यक्तिरेखेबाबत माझ्या मनात काही सौंदर्यभान ठसले आहे. लिहिल्या गेलेल्या व्यक्तिरेखेतून मी आणखी काही उभे करण्याची शक्यता मला दिसते आहे का, तुम्ही ज्या कामासाठी प्रचंड मेहनत घेणार आहात, ती तशी सेटवर पुढे सरकणार आहे काय, अशा अनेक गोष्टी मी चित्रपट स्वीकारताना विचारात घेतो. पटकथेच्या पहिल्या वीसपंचवीस पानांत आपल्यासाठी या कामाला नकार द्यावा की होकार याची जाणीव व्हायला लागते. तरीही माझी पत्नी मला संपूर्ण पटकथा वाचल्यानंतरच निर्णय घेण्याचा आग्रह धरते. त्यामुळे नकार देण्यापूर्वीदेखील संपूर्ण पटकथा वाचूनच मी त्या निर्णयाप्रत येतो. मग त्यात मोठ्या मानधनाचा आकडा असला, तरी हरकत नसते.

‘मकबूल’ आणि मी…

टीव्हीसाठी बरीच वर्षे काम केल्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती सुधारली होती. या दरम्यान चांगल्या विषयांना घेऊन काही चित्रपट येत होते, ते मी केले. त्यातल्या भूमिका इतक्या गाजल्या की अमुकअमुक भूमिका माझ्या कारकीर्दीमधील ‘मैलाचा दगड’ वगैरे दर्शकांकडून ठरविली गेली. ‘मकबूल’बाबत साधारणत: हे मानले जाते. परंतु मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की, कुठलीही व्यक्तिरेखा मी कमीअधिक दर्जाची मानली नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये सारखाच जीव ओतला. ‘मकबूल’मधील भूमिकेसाठी मी विशाल भारद्वाज यांच्याइतकाच नसीरउद्दीन शाह यांचा खूप आभारी आहे, कारण नसीर यांनी ती भूमिका मला देण्यात यावी, असे विशालजींना सुचविले. तुमचे ऐकून घेणारा आणि तुम्हाला अत्यंत सहजतेने समजावून सांगणारा दिग्दर्शक उत्तम भूमिकेसह मिळणे ही दुर्मीळ गोष्ट असते. एकमेकांच्या क्षमतेबद्दल पुरेशी जाणीव असल्यास उत्तम काम समोर येते. मला मिळालेल्या भूमिकांबाबत हे कायम घडले. मग ते ‘मकबूल’असो किंवा कुठलाही चित्रपट. आयुष्यातील एका नव्या पर्वाला खरोखरीच ‘मकबूल’ने सुरुवात केली, पण त्याआधी ‘एक डॉक्टर की मौत’सारखे सिनेमे येऊन गेले होते.

शब्दांकन : पंकज भोसले