वैष्णवी पाटील
सकाळी ७ वाजता शाळेत जायचं, तेही कडक इस्त्री केलेला गरम गरमच निळा पांढरा फ्रॉक घालून. शिवाय नवे पांढरे सॉक्स आणि चकचकीत केलेला काळा बूट घालून. कितीही नाही म्हटलं तरीही मातोश्रींकडून गणवेशावर सुद्धा गजरा घातला जायचा. या सगळ्या गोष्टींचं जास्त आकर्षण असायचं म्हणून तर मी २६ जानेवारी ची खूप वाट बघायचे. गावातून प्रभात फेरी निघायची, ग्रामपंचायती समोर सगळं गावं जमलेले असायचं त्यात आमचं लेझिम पथक आणि झांज पथक कवायती दाखवायचं. खरंतर आजही प्रजासत्ताक दिन म्हटलं की हेच आठवत मला. १५ ऑगस्ट दिवशी पण हे सगळं असायचं पण पावसाने साथ दिली तरच, नाहीतर केसातल्या गजऱ्या पासून गावकऱ्यांनी काढलेल्या रांगोळी पर्यंत सगळ्यावर पाणी.
आत्ता ही हे सगळं होतं गावाकडं. अजून ही गावभर जिलेबी असते या दोन्ही दिवशी, सगळ्यांच्या दारात रांगोळी असते. शाळेत पताका लावतात पोरं आणि गावं २६ जानेवारी, १५ ऑगस्ट सणा सारखा साजरा करतात.
गेल्या काही वर्षांत शिक्षणासाठी गावाबाहेर पडले. काही वर्षे तालुक्याच्या गावी ( इस्लामपूर) आणि आता पुण्यात आहे. प्रजासत्ताक दिन म्हटलं की डोळ्यांसमोर येणाऱ्या आठवणी आजही ह्याच आहेत पण त्या दिवसांविषयीच्या आकलनात आता जरा-जरा भर पडत चालली आहे.
मुळात माझा जन्मच २००२ चा त्यामुळे स्वातंत्र्य लढा, त्यानंतर देशात झालेल्या क्रांती, स्वातंत्र्यानंतरचा भारताचा राष्ट्र बांधणीचा काळ, जागतिकीकरण हे सगळंच मी अभ्यासक्रमात वाचलंय, चित्रपटांत पाहिलंय.
आमच्या पिढीने अनुभवली ती डिजिटल क्रांती, आपल्या देशात सोशल मिडीया जवळपास आमच्या वयाइतकाच मोठा आहे. आम्ही हाफ तिकिटाचे फुल तिकीट झालो तोपर्यंत स्मार्ट फोन गावात पण दिसू लागले होते. त्यामुळे जग आमच्या बोटावर जरा लवकरच आलं.
आणि सध्या AI चा बाळसं धरण्याचा काळ तर आपण सगळेच अनुभवत आहोत. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अनुषंगाने देश आणि नागरिक ही समज अजून परिपक्व होत आहे पण मागच्या दशकभरातले राजकीय बदल आणि त्याचे सामाजिक पडसाद मात्र माझ्या कळत्या वयातले आहेत.
आपण राहतो तो देश काय आहे? तो कसा चालतो? ह्या देशात राहणं आपल्याला आवडतं का? हे प्रश्न पडण्याच्या वयातला एक किस्सा नमूद करेन. २०११ चा वर्ल्डकप भारताने जिंकला तेव्हा भारताच्या क्रिकेट संघाने नक्की कोणता सामना जिंकला? राष्ट्रभावना काय? काही घेणं देणं नव्हता पण जणू मीच काहीतरी जिंकलेय असं वाटलं होतं. सगळ्यांनी फटाके फोडले, आमच्या घरापासून दोन गल्ल्या पुढे राहणाऱ्या निसारभईनीं ( निसार भैय्या ) आम्हा पोरांना साखर वाटली होती. या येवढ्या छोट्याशा आठवणीचा मोठा अर्थ नंतर लागत गेला. देश म्हणून आपण सगळे एक असण्याची ही भावना अशीच नाही रूजली आपल्यात. क्रिकेट च्या मॅच मधल्या विजया पासून ते देशाने कोणतीही महत्वाची कामगिरी केली तर तो खेळाडू काश्मीर चा असो की कन्याकुमारी चा त्याचा आनंद अख्खा देश साजरा करतो. असंख्य जाती-धर्मांना आपण एक असल्याची भावना वाटणं याचंच अप्रुप वाटायचं. ह्या आठवणीमुळे मात्र आपण एका सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष देशात राहतो म्हणजे काय हे समजलं आणि त्याचा नेहमीच अभिमान वाटतो.
पण आजकाल जरा वारं वेगळं दिसतंय,भारत जिंकला म्हणून साखर वाटणाऱ्या निसार भैय्यांना आपण इथे सुरक्षित आहोत. असं वाटत असेल का? असा प्रश्न मलाच पडतोय.
मी ज्या शहरात माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्या इस्लामपूर मधल्या माझ्या आठवणीत मोहल्ले पण तेवढेच सामील आहेत जेवढं बहे- बोरगांव येथील रामलिंग बेट आहे. एका विशेष मोहल्ल्यात मिळणाऱ्या अत्तराच्या कुप्या तर मी आज पण आवर्जून घ्यायला जाते. त्यामुळे या शहराबद्दलचा ओढा वेगळाच आहे. पण कधीकधी इस्लामपूरचं नावं बदललं जाईल अशी चर्चा ऐकते आणि या शहरासोबतच या नावाशी जोडलेल्या आठवणी गांगरून जातात.
अच्छे दिन ची जाहिरात लागायची तेव्हा मी प्राथमिक शाळेत होते. आता लाडक्या बहिणींच्या काळात मी देशाची मतदार बनलेले.त्यामुळे निवडणूका त्या ही येवढ्या मोठ्या देशात!! बापरे!!….इथं पासून भारतात गुप्त मतदान पद्धतीने आणि निःपक्षपाती निवडणूका कशा होतात याचा प्रत्यक्ष एक ताजा अनुभव देखील मिळाला. आणि आपण प्रजासत्ताक लोकशाही देशात राहत असल्याचा अभिमान वाटला.
देश म्हणून भारतावर माझं आणि माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणींच प्रेम आहेच. पण जेव्हा निर्भया ते कोपर्डी आणि त्यादरम्यानच्या आणि त्यानंतरच्या देखील घटना पाहते तेव्हा आपल्याला देश म्हणून सुधारणेला अजून खूप वाव आहे असं वाटतं. रक्षण शब्द जो हल्ली खूपदा कानी पडतोय तो इथे जास्त गरजेचा आहे, नाही का!
आम्ही जेन झी आहोत, तिकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलले की इकडे त्याच्या मिमस् पासून त्यावर प्रतिक्रिया असा पाऊस पाडतो आम्ही. म्हणजे खऱ्या अर्थाने ‘हे विश्वची माझे घर’ हे साक्षात अनुभवत आहोत. पण काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका पारलिंगी मैत्रिणीने आत्महत्या केली. तेव्हा आपल्या देशात तिला पोषक वातावरण आणि संधी नव्हत्या का? असा प्रश्न पडला. ‘दर्जाची व संधीची समानता’ जागतो का मग आपण? पण मग आपणच आपल्याला अर्पित केलेल्या संविधानाची आठवण होते. ज्याच्यामुळे आपण हा अमृत महोत्सव साजरा करू शकलो. ते ही एकसंध देश म्हणून. टोकाची भौगोलिक विविधता, प्रचंड भाषिक, सांस्कृतिक विविधता असलेले येवढे लोक बांधून ठेवणं शिवाय त्यांच्यात “We the people of India” ही भावना टिकवणं, वृद्धिंगत करणं सोप्पी गोष्ट नव्हे. देशासमोर प्रश्न खूप आहेत, सगळ्या जगाकडे ते आहेतच पण भारताकडे ते सोडवण्याची ताकद देखील आहे. भारताकडे संविधान आहे. प्रत्येक पिढीने वेगवेगळा काळ अनुभवला असला तरी तो एकाच कायद्याने अनुभवला ( अपवाद स्वातंत्र्यपूर्व काळ ). वेगवेगळे पंतप्रधान अनुभवले असतील पण ते देखील लोकशाही पद्धतीनेच.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मी पहिल्यांदा मतदान केलं. पहिल्यांदा असं वाटलं की माझे क्लासमेट्स सगळे या दिवशी सुट्टी मुळे मस्त बाहेर फिरायला जात असतील, पण संध्याकाळी सगळ्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शाई लावलेल्या बोटाचे फोटो पहायला मिळाले. आणि मी पण मग स्टोरीला पहिल्यांदाच शाई लावलेल्या बोटाचा फोटो ही टाकला आणि भविष्याच्या चिंतेबाबत सुटकेचा निःश्वास ही सोडला. जोवर इथली सरकारं आमच्या बोटाच्या शाईवर बनतील तोवर हे प्रजासत्ताक चिरायु असेल.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात, रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहेत.)