सध्याच्या मुलांचे भावविश्व वेगळे आहे. त्यांचा निसर्गापेक्षाही तांत्रिक गोष्टींकडे ओढा जरा जास्तच आहे. या मुलांना पुन्हा निसर्ग आणि निरागस भावविश्वाकडे आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मोहन काळे यांनी ‘एकदा आपणच व्हावे मोर’ या कवितासांग्रहातून हाच प्रयत्न केलेला दिसतो.
या कवितांमधून या पिढीतील लोप पावत चाललेली निरागसता स्पष्ट जाणवते. तसेच आपल्या पाल्याला आपल्या बालपणीच्या भावविश्वाशी जोडण्याचा प्रयत्न करणारा बाबाही दिसतो. निसर्गातील बदल टिपताना कवी म्हणतो,
पाऊस नाही आला तरी/ आता नाचतात नवे मोर/ जिवाला म्हणे आता ते/ लावीत नाहीत उगाच घोर!
या कवितांमधून निसर्ग डोकावत राहतो तसाच नव्या पिढीचं बदलतं भावविश्वही प्रकर्षानं जाणवत राहतं. तरीही कवी त्यांना पुन्हा निसर्गाकडे नेण्याचा प्रयत्न आपल्या कवितांमधून करताना दिसतो.
‘एकदा आपणच व्हावे मोर’, – मोहन काळे, ग्रंथाली, पाने-६३, किंमत-१२५ रुपये.