उमेश कुलकर्णी

गेल्या वर्षी गाजलेल्या सर्वात महत्त्वाच्या डॉक्युफिक्शन निर्मितीमागचा प्रवास. गुन्ह्याची घटना ही साऱ्या देशाला बातमी म्हणून माहिती होती. दीड दशकानंतर त्याचा माग काढताना तो विषय किती संवेदनशील आहे, याची जाणीव झालेल्या चित्रकर्त्याने दोनतीन वर्षे केलेला खटाटोप आणि त्याची फलनिष्पत्ती…

Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

टकथाकार शमा झैदी एकदा म्हणाल्या होत्या की, ‘‘तुमच्या चित्रपटांमध्ये हिंसा हा विषयच तुम्ही टाळता, असं का होत असावं? तुमच्याकडे तेंडुलकरांसारखे नाटककार होऊन गेले आणि त्यांनी हिंसा या घटनेकडे किती वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी दिली.’’ अनेक व्यक्तींशी आपली संभाषणं होतात. त्यातली काही मनात घर करून राहतात. हे त्यातलचं एक.

आपण हिंसेकडे पाहायचं टाळतो का? हे एक पलायन आहे का? की ती आपल्याला दिसतच नाही. प्रत्येक फिल्ममेकर त्याला जग जसं दिसतं किंवा त्याला आजूबाजूचा भवताल जसा प्रतीत होतो, तसं ते मांडण्याचा प्रयत्न करतो. हे जगाकडे पाहणं अर्थातच पूर्ण आणि सर्वंकष कधीच असू शकत नाही. प्रत्येक कलाकृती हा जगण्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. जेव्हा अक्कू यादव प्रकरणावर ‘डॉक्यूसिरीज’ करायला आवडेल का, अशी ‘नेटफ्लिक्स’कडून विचारणा झाली, तेव्हा मला शमा झैदींच्या वाक्याची तीव्रतेने आठवण झाली. या सगळ्या प्रक्रियेत आपण हिंसा नावाची गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो असं वाटलं, आणि मी ही ‘डॉक्यूसिरीज’ करायला होकार दिला.

डॉक्युमेण्ट्री या प्रकाराशी माझी ओळख झाली ती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्यामुळे. त्यांच्याबरोबर अनेक वेगवेगळ्या विषयांवर माहितीपट करण्याच्या निमित्तानं धुळ्याजवळचे आदिवासी पाडे किंवा केरळचे दुर्गम भाग अशा विविध ठिकाणी प्रवास करता आला. चाकोरीतील जगण्यात कधीही भेटायची शक्यता नाही अशा अनेक माणसांना भेटता आलं. मला माणसांना भेटायला आवडतं. तऱ्हतऱ्हेच्या माणसांना भेटणं, त्यांचं जगणं अनुभवणं, त्यांच्याशी मैत्री करणं हे डॉक्युमेण्ट्रीच्या प्रक्रियेमध्ये मला सापडणारं गुप्तधन आहे.

फिल्म इन्स्टिटयूटमध्ये डॉक्युमेण्ट्रीचं वर्कशॉप घ्यायला रीना मोहन आल्या होत्या. त्यांनी केलेली कमलाबाई गोखलेंवरची फिल्म ही मला खूपच आवडलेली डॉक्युमेण्ट्री. वास्तव असं काही असतं का? एकदा का आपण कॅमेरा ठेवायचा निर्णय घेतला की आपण आपली राजकीय, तात्त्विक आणि सांस्कृतिक भूमिका कळत किंवा नकळतपणे कशी मांडत असतो. एखाद्या माणसाचं आयुष्य समजून कसं घ्यायचं? त्याचं चित्रीकरण करत असताना आपण स्वत:ला कुठले नीतिनियम आखून घेतले पाहिजेत? या सगळ्यावर त्या वर्कशॉपमध्ये बराच ऊहापोह झाला.

‘एफटीआयआय’नंतर ‘सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ इंडियन लँग्वेजेस’साठी ओवी, दशावतार, देवीचे उपासक या विविध विषयांवर डॉक्युमेण्ट्री करताना महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यांमध्ये, धनगरी पाड्यांवर, पंढरपूर, तुळजापूरच्या जत्रांमध्ये, गावागावांमधे फिरता आलं. माणसांच्या जगण्यातली संवेदना समजून घेणं ही किती विलक्षण गोष्ट असू शकते, याची जाणीव झाली. प्रत्यक्ष जगण्यातलं नाट्य हे काल्पनिक नाट्यापेक्षा जास्त भेदक आणि रंजक असतं याचा पडताळा आला. यातल्या अनेक अनुभवांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पडसाद आमच्या चित्रपटांमध्येही पडला. ‘वळू’मधली डॉक्युमेण्ट्री किंवा ‘विहीर’मधली धनगरी पालं अशी अनेक उदाहरणं…

पुण्यातल्याच एका कुटुंबावर केलेली ‘थ्री ऑफ अस’ नावाची डॉक्युमेण्ट्री जेव्हा अॅमस्टरडॅममधल्या आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सवात (आयडीएफए) दाखवण्यात आली, त्यावेळी मला डॉक्युमेण्ट्री माध्यमाचं विराट दर्शन घडलं. जगभर तयार होत असलेल्या अनेक डॉक्युमेण्ट्रीज् पाहताना या माध्यमाने ‘डॉक्युमेण्ट्री’ आणि ‘फिक्शन’ या दोन वेगळ्या कलाप्रकारांच्या सीमारेषा पुसून टाकल्या आहेत अस वाटलं.

नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामध्ये मी ‘कुंभ’ नावाची एक कलात्मक माहितीपट पद्धतीची फिल्म केली. मला खरं तर ‘डॉक्युमेण्ट्री’ किंवा ‘फिक्शन’ असे कप्पे आवडत नाहीत. यातली कुठलीही गोष्ट करण्यामागे माझा उद्देश एक अंतर्मुख अनुभव तयार करण्याचा असतो आणि त्यामुळे या दोन्ही प्रकारांना मी ‘फिल्म’ असच संबोधतो.

‘मर्डर इन अ कोर्टरूम’चं काम आम्ही सुरू केलं, तेव्हा आम्हाला इतक्या सगळ्या दिव्य अनुभवातून जायला मिळेल अशी कल्पना नव्हती. नागपूरमधल्या कस्तुरबानगर भागात २००४ मध्ये एक घटना घडली, त्याची ही गोष्ट. तिथल्या जिल्हा न्यायालयात अक्कू यादव नावाच्या गुंडाला खटल्याच्या सुनावणीसाठी आणण्यात आलं आणि त्यावेळी कस्तुरबानगरमधल्या काही महिलांनी भर कोर्टात त्याला ठेचून मारलं. या घटनेतल्या सगळ्याच गोष्टी आश्चर्यकारक होत्या. भर दुपारी! कोर्टात! महिलांनी! गुंडाचा निघृण खून केला!

मग प्रत्यक्ष नागपुरात जाऊन आणि इंटरनेट किंवा विविध संस्थांशी संपर्क करून सहा महिने माहिती मिळवण्याचा उपद्व्याप सुरू झाला. पण त्या भागात गेल्यावर संबंधित मंडळींशी संपर्क होत नव्हता. जरी झालाच तरी फोनवर बोलायलासुद्धा फारसं कुणी उत्सुक नव्हतं. त्यांना भेटून, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव समजून घेतल्याशिवाय ही डॉक्युमेण्ट्री करताच येणार नाही, हे तर उघड होतं. आमच्या शोधमोहिमेच्या शेवटच्या दिवशी इन्स्टिट्यूटमधला कॅमेरामन मित्र हर्ष वाघदरे याच्याकडे आम्ही जेवायला गेलो. त्याच्या आईचं तिथल्या सामाजिक चळवळीत फार महत्त्वाचं योगदान आहे. त्यांना आमची अडचण सांगितल्यावर पुढल्या दोन तासांत सिताबाई आणि रेशा या खटल्यासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या दोन बायकांना त्या रिक्षातून घेऊन आल्या आणि नव्हत्याचं होतं झालं. त्यांच्या मार्फत इतर अनेक महिला भेटल्या. त्या सगळ्यांना अशी डॉक्युमेण्ट्री करण्यामागचा आमचा उद्देश काय, यामुळे त्यांना पुढच्या आयुष्यात काही त्रास होणार नाही ना असे अनेक प्रश्न होते. वाघदरेंमुळे आणि आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या महिलांचं मतपरिवर्तन करण्यात आम्हाला थोडसं यश यायला लागलं. तरीही अक्कू यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर जो अत्याचार केला, तो इतका भयानक होता की तो पुन्हा एकदा सांगताना त्यांना मनात प्रत्यक्ष जगायचा होता. ही सोपी गोष्ट नव्हती. शुटिंग करताना आपला चेहरा जर जगाला दिसला तर आता ज्यांना पोरं-नातवंड आहेत ती काय म्हणतील? अशी भीतीही त्यांना वाटत होती.

प्रत्यक्ष घटना, त्याची पार्श्वभूमी आणि या घटनेचा उपोद्घात अशा वीस वर्षांच्या कालखंडाचं आम्ही संशोधन करत होतो. कस्तुरबा नगरची भौगोलिक, जातीनिहाय रचना, तिथले व्यवसाय, तिथली घरं, नागपूरचा इतिहास, तिथली दलित चळवळीची पार्श्वभूमी, छोट्या मोठ्या टोळ्यांतील नातेसंबंध, गुन्हेगारीचे प्रकार या सगळ्याच्या अनुषंगाने आम्ही तो काळ समजून घेऊ पाहत होतो.

या प्रकरणाशी संबंधित पत्रकार, पोलीस ऑफिसर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते, अक्कूचे मित्र, त्यावेळचे नामचीन गुंड, टोळ्या, यादव समूहातील मंडळी, जेलचे अधिकारी, फोटोग्राफर्स अशी अनेक मंडळी भेटत होती. त्यांच्याकडून नवनवी महत्त्वाची माहिती गोळा होत होती. त्या काळाचं आणि त्या घटनेचं रसभरीत रक्तरंजीत आणि गोंधळात टाकणारं वर्णन अनेकांकडून समजत होतं आणि प्रश्नचिन्ह सुटण्यापेक्षा वाढत होती.

अक्कूच्या घरची मंडळी चार महिने अथक प्रयत्न करूनही भेटली नाहीत. अक्कूच्या आई नव्वद वर्षांच्या होत्या. त्यांना भेटण्याची, त्यांना या सगळ्या प्रकरणात काय सोसावं लागलं, एक आई म्हणून त्या या सगळ्याला कसं सामोरं गेल्या हे समजून घेण्याची इच्छा होती. अक्कूची एक बहीण एका शाळेत शिक्षिका आहे. तिथे आम्ही धडकलो आणि आमच्या संशोधन चमूची प्रमुख निधी सालियन त्यांना शाळेत थेट जाऊन भेटली. त्यांना अक्कूशी असलेल्या आपल्या संबंधाबद्दल कुठेही वाच्यता व्हायला नको होती. त्यांची भेदरलेली स्थिती पाहून त्यांना त्रास होईल म्हणून आम्ही काढता पाय घेतला.

पोलिसांकडून अक्कू संदर्भातली रेकॉर्डस् मिळवणं हे आणखी एक दिव्य होतं. या प्रकरणात त्यांची पुरेशी नाचक्की झाली होती. त्याचबरोबर अनेक पोलीस हे अक्कूच्या दुष्कृत्यात सहभागीही होते अशीही एक वदंता होती. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, अक्कूला ज्यावेळी मारलं त्यावेळी त्याच्याबरोबर एकाच हातकडीमध्ये अजून एक गुंड होता. आता त्याला शोधण्याची मोहीम सुरू झाली. ज्याने अक्कूचा खून होताना एका फुटावरून पहिलं, त्याला त्यावेळी काय वाटत होतं? त्याची त्या वेळची अवस्था काय होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी होती. पण त्याचा कुठे मागमूसही नव्हता. वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये आत्ता आणि पूर्वी सक्रीय असणाऱ्या मंडळींना भेटून त्याच्याविषयी विचारणा केल्यावर साधारण महिनाभरानी त्याचा फोन नंबर मिळाला. त्याने आम्हाला नागपूर बाहेरच्या वस्तीत सकाळी सात वाजता भेटायला बोलावलं आणि तेही ‘एका डोंगराच्या कडेला छोटी शाळा आहे तिथे येऊन मला फोन करा’ अशी आज्ञा होती. तिथे तो भेटेल का? तिथे आमच्या टीममधल्या पंचवीस तिशीच्या लोकांना सुरक्षितता असेल का? आणि अंगरक्षक घेऊन तिथे गेलो आणि त्याने भेटायलाच नकार दिला तर काय असे अनेक प्रश्न. तिथल्या सुरक्षेबाबतच्या आमच्या भीतीवर मात करीत आम्ही तीन-चार जणांनी तिथे जायचं ठरवलं. सकाळी हा थरार अनुभवत त्या विविक्षित डोंगरापाशी जाऊन आम्ही त्याला फोन केला. तो तडीपार असल्यामुळे पोलिसांची झंझट नको म्हणून नागपूरपासून दूर येऊन राहिल्याचं त्यानं सांगितलं. त्याची दोन छोटी पोरं आजुबाजूला खेळत होती. राकट, मजबूत शरीरयष्टीच्या या राम नावाच्या व्यक्तीला मी गप्पांच्या ओघात विचारलं की, एक हाताच्या अंतरावर अक्कूला मारण्यात आलं त्यावेळी काय वाटत होतं? तेव्हा तो म्हणाला ‘‘मला खूप भूक लागली होती!’’

तो या लाईनमध्ये कसा आला, जेलमध्ये कशी मजा यायची, आई वडिलांनी जामिनासाठी पैसे भरायचं नाकारल्यामुळे तो कसा गुंड झाला अशा विविध गप्पा रंगल्या. तिथून परत आल्यावर सगळे सुन्नं बसून होते. या सगळ्या संशोधनामध्ये आतल्या-बाहेरच्या असंख्य घटना, त्यांचे कार्यकारणभाव ही सगळीच माहिती एकमेकाला छेद देणारी होती. नक्की खरं काय, हे सापडवण्यासाठी रात्रींचे दिवस होत असताना चित्रीकरणाचा दिवस येऊन ठेपला. अनेक महिला घरच्यांना काही खोटंनाटं कारण सांगून आम्हाला भेटायला येत होत्या. त्यामुळे त्यांच्या घरी शुटिंग करणं हे तर अशक्यच होतं. शिवाय या सगळ्या वातावरणात मुलाखती स्पष्ट ऐकू येणं आवश्यक होतं. म्हणून आम्ही त्यांच्या घरासारखे वेगवेगळे सेट तयार करायचं ठरवलं.

मग प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे, आम्हाला जे कंगोरे लक्षात आले आहेत त्याच्या आधारे आर्ट डिरेक्टर नीरज सिंग बरोबर आम्ही जवळजवळ ३० आराखडे तयार केले. रंगसंगती, प्रकाशाचा पोत, दृश्यरचनेतील प्रत्येक गोष्टीतून त्या मुलाखतीचा परिणाम बहुआयामी कसा करता येईल असा आम्ही प्रयत्न करत होतो. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी या बायका कॅमेरासमोर त्यांचे अनुभव नीट सांगतील का अशी आम्हाला भीती वाटत होती, ती त्यांनी फोल ठरवली. ते सगळं त्यांनी खोल अनुभवलं होतं आणि ते त्या पहिल्यांदाच कोणा तिऱ्हाइतासमोर प्रकट करत होत्या. त्यांची घटना सांगण्याची हातोटी, शब्दरचना, त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या जगण्याच्या धारणा, गोष्टींमध्ये एकाच वेळी असलेलं वैयक्तिक गुंतलेपण आणि त्याच वेळी त्यांकडे लांबून पाहण्याची त्यांची दृष्टी हे सगळं थक्क करणारं होतं. आपण आपल्या आयुष्यातल्या इतक्या खोल गाडलेल्या गोष्टी अशा मोकळेपणाने सांगू का? असा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या आमच्या चमूमधल्या प्रत्येकाला पडत होता. साध्या माणसांचं बोलणं किती ओघवतं असतं- ज्याला सत्याची धार असते ते शब्द उजळून जातात. कुठल्याही संवाद लेखकाला लिहिता येणार नाहीत, अशी वाक्यं साध्या माणसांच्या मुखातून प्रवाहीत होऊ लागतात.

अक्कूविषयी सांगताना त्याचा एक मित्र म्हणाला, ‘‘अक्कूला मारलं तेव्हा तो ३४ वर्षाचा होता. तसा तो खूप जगला. आमच्या लाईनमध्ये इतकं कोणी जगत नाही!’’ विनयभंग झाल्यानंतर घराची अब्रू घालवलीस, असं म्हणून मला आईवडिलांनी घराबाहेर कसं काढलं ही २० वर्षांपूर्वीची घटना सांगताना एकीला रडू आवरत नव्हतं. जिच्यावर विनयभंग झाला आहे अशा स्त्रीच्या नवऱ्याला ‘तिच्याशी संग करावासा वाटत नसे’ असं कस्तुरबा नगरमधला एक पुरुष सांगत होता. मानवी मन, मानवी धारणा आणि मानवी कृती यांच्या समग्र दर्शनाने कधी स्तंभित तर कधी नेस्तनाबूत व्हायला होत होतं. पंधरा दिवसांमधे जवळजवळ ४० जणांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. जवळजवळ १५० तासांचं फुटेज मिळालं! खरी कसोटी होती संकलनाची. मोनीशा बलदवा (संकलक), अनादी आठल्ये (सह-संकलक) आणि सहकारी अशी सहा जणांची एडिटींग टीम होती. मुलाखतींतून नेमकी वाक्यं निवडून त्यातून एक कथासूत्र बांधणे ही एक महाकर्मकठीण गोष्ट होती.

आता मुलाखतींना पोषक अशी दृश्यं चित्रित करण्याचं दुसरं फिक्शन शेड्युल करण्याच्या मागे आम्ही लागलो. दोनदा शुटिंग ठरलं आणि टाळेबंदीमुळे रद्द झालं. जे प्रत्यक्ष घडलं त्यातील सत्याच्या जवळ जाणारा आभास तयार करणं हे खूप आव्हानात्मक होतं. त्यासाठी आम्ही नागपूर जेलमधील सेल पासून ते सांडपाण्याचे ओढे, पोलीस स्टेशन, त्या काळची कस्तुरबानगरची रचना, घरांची तंतोतंत मांडणी, त्याकाळची वेशभूषा याचा कसून अभ्यास केला. कुठल्याही पद्धतीचा प्रत्यक्ष रक्तपात न दाखवता, अतिरंजित न करता त्या घटनांचा आंतरअनुभव तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. सप्टेंबर २०२१ ला हे शुटिंग पूर्ण झालं. या सगळ्या दोन वर्षांच्या धुमश्चक्रीत रणजित नायर, गौरव मोड, गंधार बेडेकर, अपूर्व ठाकर, अथर्व कार्वेकर, प्रवीण जाधव, भरत बाळ, अश्मीता गुहा हे माझे दिग्दर्शन विभागाचे सहकारी झोकून देऊन अथक काम करत होते. मंगेश धाकडे यांनी चपखल संगीत, मोहनदास यांनी उत्कृष्ट ध्वनिरचना आणि पंकज बांगडे यांनी उठावदार ग्राफिक्स तयार केले. २९ ऑक्टोबर २०२२ ला ‘मर्डर इन अ कोर्टरूम’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

दुसऱ्याच दिवशी आम्ही नागपूरमधे ज्या सगळ्यांनी आम्हाला मदत केली त्यांच्यासाठी एक स्क्रिनिंग ठेवलं. ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या सगळ्या महिला सजून धजून आपल्या कुटुंबासकट आल्या होत्या. स्क्रिनिंग सुरू झालं. या सगळ्या पहिल्यांदाच स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहत होत्या. त्या हसत होत्या, आश्चर्यचकित होत होत्या. त्यांना मधेच रडायला येत होतं. गहिवरून येत होतं. त्या सगळ्या काळात त्यांनी भोगलेल्या जगण्याचं एक वर्तुळ आज पूर्ण होत होतं.

‘वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’, ‘हायवे’ या मुख्यधारेतील व्यावसायिक मराठी चित्रपटांचा कलात्मक दिग्दर्शक ही ओळख. मात्र लघुपट आणि माहितीपट या माध्यमात फार पूर्वीपासून कार्यरत. ‘गिरणी’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार. ‘थ्री ऑफ अस’ या डॉक्युफिक्शनला जगभरातील विविध महोत्सवांत सन्मान.

aantarik@yahoo.com

Story img Loader