‘महाराणी बायजाबाई शिंदे : दख्खनच्या सौंदर्यलतिका’, हे डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचं पुस्तक म्हणजे एका स्त्रीच्या शौर्याची गाथाच. घाटगे घराण्याची कन्या, महादजी शिंदे यांचे उत्तराधिकारी दौलतराव शिंदे यांच्या पत्नी बायजाबाई शिंदे यांची ही चरित्र कहाणी. शौर्य, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य यांचा अनोख मिलाफ म्हणजे बायजाबाई. पतीच्या पश्चात त्यांनी सहा वर्षे केलेला कारभार एका कर्तबगार स्त्रीची साक्ष देतो. हे पुस्तक म्हणजे पराक्रमी शिंदे घराण्याचा छोटेखानी इतिहास. यात बायजाबाई यांचे बालपण, विवाह, दौलतराव व बायजाबाई यांचे सहजीवन याविषयी वाचायला मिळते.
या पुस्तकात बायजाबाई यांचे ठळक व्यक्तिमत्त्व दिसते ते ‘बायजाबाईंचा राज्यकारभार’ या प्रकरणातून. पुढे त्यांच्या दरबारातील सरदार, बायजाबाईंची कारकीर्द वाचताना एका कर्तबगार स्त्री राज्यकर्तीची खूण पटते. बायजाबाई केवळ राज्यकारभारच पाहात होत्या असे नव्हे, तर सैन्याचे नेतृत्व, मोहिमांची आखणी व अंमलबजावणीही त्या करत होत्या. सैन्याच्या आखणीचे व मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण त्यांच्यात होते. इतिहासकारांनी बायजाबाईंवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपाचा उल्लेखही या पुस्तकात येतो. बायजाबाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा छोटेखानी आढावा घेणारे हे पुस्तक आहे.
‘महाराणी बायजाबाई शिंदे’ दख्खनच्या सौंदर्यलतिका, डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने-१७७, किंमत-२८० रुपये.