अविनाश झरेकर

डवरी गोसावी या भटक्या समाजातला पहिला प्राध्यापक होण्याचा मान मिळवणारे नारायण भोसले यांचे ‘देशोधडी’ हे आत्मकथन अलीकडेच प्रकाशित झाले. मराठी साहित्यामध्ये आत्मकथनाची समृद्ध अशी परंपरा आहे. विशेषत: १९६० नंतर संघर्षांत्मक स्वरूपात अनेक आत्मकथनं आली. यात शोषित अंकित जनवादीची आपली एक वेगळी अशी शैली तयार झाली होती. त्यात वेदनेचा इतिहास होता. प्रत्येक आत्मकथनाचा जगणं मांडण्याचा बाज वेगवेगळा होता.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

वेदनेचे अनेक डंख सोसत तुमच्या-आमच्यासारख्या भौतिक सुविधांपासून कोसो दूर रोजचं जगणं-मरणं तळहातावर झेलत भाकरीच्या शोधात मैलोन्मैल राज्य आणि देशभर प्रवास करणारा एक समाज म्हणजे ‘नाथपंथीय डवरी गोसावी’ समाज. या मागासलेल्या जात वर्गीय समाजात एक तरुण जन्माला येतो! मिळेल ते, मिळेल तसं आपल्या समाजासोबत खातो, पितो, प्रसंगी उपाशी राहतो. परत गावोगावी देशभर भटकंती करतो.

शिक्षणाची आस मनात ठेवून उज्ज्वल भवितव्यासाठी, समाजाच्या उत्थानासाठीचं स्वप्न पाहतो, पुरोगामी विचार व्यवहाराच्या संपर्कात येतो, संघर्ष करतो, अनेक हालअपेष्टांना सामोरा जातो. परिस्थितीला शरण जावे लागत आहे म्हणून धाय मोकलून रडतो, पाचवीला सतत संघर्ष पुजलेला.. या सगळय़ा विपरीत आणि विषम परिस्थितीत हा तरुण स्वत: सावरतो. उभा राहतो. या सर्व विदारकतेतून बाहेर येतो. भावंडांना साभाळतो. त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या जगण्याच्या सर्व साधारण बाबींच्याही परिप्रेक्ष्याबाहेरील जिणं वाटय़ाला आलेलं असताना केवळ शिक्षणाच्या जोरावर हे जीवन बदलवून भक्कमपणे पाय रोवून हा तरुण या मातीत घट्टपणे रुजू पाहतो! ही फक्त रंजक कहाणी नाही, तर संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्फूर्तिदायक कहाणीच म्हणावी लागेल!

हे सर्व मांडताना भोसले यांनी भाषेचा सांभाळलेला बाज अर्थपूर्ण आहे. ओघवत्या बोली आणि प्रमाण भाषेत लिहिताना त्यांच्या जमातीच्या भाषेचाही त्यांनी खुबीने वापर केला आहे. इतिहासाचा विद्यार्थी आणि शिक्षक असल्याने त्यांचे, त्यांच्या कुटुंबाचे, त्याच्या जमातीचे आणि भटक्या विमुक्तांच्या इतिहासाचे तीन पिढय़ांचे अत्यंत सक्षमपणे रेखाटन यात आले आहे.

 भोसले यांनी आपला संपूर्ण जीवनसंघर्ष ‘देशोधडी- आडं, मेडी, बारा खुटय़ाची’ या पुस्तकात चितारला आहे. हे पुस्तक वाचताना जगण्याचे मूलभूत संदर्भ जसं की तहान, भूक, निवारा,  शिक्षण, लग्न, जन्म, मरण, गाव, देश, आब्रू या सर्व मध्यमवर्गीय व सरळ-धोपट जगणं जगणाऱ्या सर्व प्रकारच्या जाणिवांना पार उसवून टाकतं. उद्ध्वस्त करतं!

नारायण भोसल्यांच्या अनेक मित्रांच्या तगाद्याने हा चित्तथरारक प्रवास लोकांसमोर आणला ही मोठी गोष्ट आहे! निवाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलेलं ‘देशोधडी’चे ‘आडं, मेडी, बारा खुट्य्याची’ हे उपशीर्षक पुस्तकाला वेगळाच आयाम देवून जातं! अन्वर हुसेन यांनी साकारलेले बोलकं मुखपृष्ठ ही या पुस्तकाची जमेची बाजू होय! काळय़ाकुट्ट अंधारातून प्रकाशवाटा शोधणारा हा प्रवासी! संघर्ष हा घटक मानवाला जगण्याचं बळ देत असतो. सूर्यास्तामुळे  जीवनात पसरणारा काळय़ाकुट्ट अंधारातून चंद्रोदयानंतर सांडणारं आयुष्यातील शीतल चांदणं शोधत.. यामधली ‘झाकडवेळ’ धरून ठेवत आपला प्रवास सुरू ठेवतोय. फार कमी लोकांना साध्य होतं हे. जगण्याचा उत्सव साजरा करत असताना आयुष्यात आलेल्या उधाणामुळे जगण्याचे भान विसरत असताना नारायण भोसलेचा हा प्रवास अनेकांना दीपस्तंभासारखी वाट दाखवील यात शंका नाही.

आयुष्याचं झाड साकारताना जगण्याची पाळंमुळं शोधताना काळाची अक्षरे प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून अलवारपणे कशी दिशा देतात याचेही वर्णन या पुस्तकात येते. प्रवासात नारायणाला अनेक लोक भेटले. त्यांच्याशी आलेले अनुभव हे विस्तृतपणे अन् प्रांजळपणे मांडले आहेत. हा प्रवास मांडताना त्यांनी सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षण नोंदवली आहेत. भारतभरचा प्रवास, त्यातील भोगोलिक विविधता, तेथील संस्कृती, लोकधाटणी, स्वत:ची वेगळी ओळख जपत केलेली वाटचाल ही निश्चितच अभिमानास्पद आहे.

जीवन जगण्यासाठीची सर्वात मूलभूत गरज म्हणजे ‘पाणी’. हे पाणी मिळविण्यासाठी नारायणाचे आजोबा रेल्वे स्टेशन गाठतात. कुटुंबाच्या डोळय़ांदेखत आजोबांचा देह रेल्वेखाली चिरडला जातो. कापडाच्या गाठोडय़ात हे तुकडे भरून गोळा केले जातात. आजोबांच्या मरण्याचा हा थरार. पाण्यासाठीचा हा संघर्ष  काळजाचं पाणी-पाणी करून जातो.

उत्तर प्रदेशात वणवण भटकत असताना नारायणची आई नऊ महिन्यांची गरोदर होती. रोज पंधरा वीस किलोमीटरचा प्रवास.. त्यातच बाळंतकळा सुरू झालेल्या.. दर बारा कोसांवर वस्ती.. मरणप्राय प्रसवकळा सोसल्यावर कबिला जागेवर थांबवून लुगडय़ाचा आडोसा घेऊन मीराचा जन्म होतो. घरदार नसताना देशभरातील मैलोन्मैल प्रवास, सोबत एखादं गाढव, कोंबडय़ा, बकरी, गायी गुरं, तान्ही बाळं असा कबिला घेऊन ऊन, वारा, पाऊस झेलत, भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत अंगावर शहारे आणणारे अनेक प्रसंग नारायणाने वस्तुस्थिती समोर ठेवून मांडले आहेत. त्यात कौटुंबिक भांडणातून निर्माण झालेले अनेक प्रसंग वर्णिले आहेत.

पोटाची खळगी भरण्यासाठी झालेली अवहेलना, अगतिकता, बालपणी सोसलेल्या सर्व व्यथा, त्यातून निर्माण झालेल्या अनेक परवडी, त्यातून निर्माण झालेला शिक्षणाचा खेळखंडोबा, मुरादाबादचा प्रवास, शिक्षणासाठी वसतिगृहात मिळालेला प्रवेश, द्वितीय वर्षांत नापास होऊन आलेलं अपयश.. त्यातूनच उभारी घेऊन पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयात घेतलेला प्रवेश, तेथील वैचारिक बैठक, महाविद्यालयात तसेच वसतिगृहात जिवाला जीव देणारे मित्र! हा सगळा स्वप्नवत प्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू आणि फुले यांच्या विचारांशी नाळ जोडणारा आहे. हे आत्मचरित्र प्रत्येकाच्या संघर्षांला बळ देतंच. शिवाय वस्तुनिष्ठ स्वकथन कसे लिहावे याचा वस्तुपाठ शिकवते. तो व त्याच्या जमातीच्या जगण्याचे दस्तऐवजही निर्माण करते.

‘देशोधडी : आडं, मेडी, बारा खुटय़ाची’

– नारायण भोसले, मनोविकास प्रकाशन,

पाने – ३१२, किंमत – ३७५ रुपये