प्रवीण ठिपसे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चेन्नईमध्ये पहिल्यापासूनच बुद्धिबळासाठी पोषक वातावरण आहे. आंध्र पदेश आणि तेलंगणला बुद्धिबळाची समृद्ध परंपरा आहे. पहिली भारतीय बुद्धिबळ स्पर्धा आंध्रमध्येच झाली होती. संपूर्ण आंध्र, तेलंगण, तमिळनाडू विशेषत: चेन्नई येथे बुद्धिबळासाठी पोषक वातावरण असून, या खेळाची परंपराही आहे आणि मोठ्या प्रमाणात येथे बुद्धिबळपटू तयार होतात. हे वातावरण गुकेशचा खेळ बहरण्यास कारणीभूत ठरले असावे.
गुकेशने वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. सातव्या वर्षापासून तो बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊ लागला. परंतु अन्य मुलांच्या तुलनेत गुकेशमधील बुद्धिबळाची चमक पाहून त्याने वेल्लामल विद्यालयात प्रवेश घेतला. त्याच्यातील बुद्धिबळ खेळण्याचं कौशल्य पाहून शाळेनेही त्याला चौथीपासून शाळेत न येता फक्त परीक्षेला बसण्याची मुभा दिली. अर्थात अशी मुभा अनेक गुणी खेळाडूंना मिळते. मात्र गुकेशने या संधीचे सोने केले. या वेळेचा सदुपयोग त्याने बुद्धिबळातील नवनवे डावपेच शिकण्यासाठी केला आणि त्यात यश मिळवले. खेळात प्रावीण्य मिळवताना प्रशिक्षण आणि खेळासाठीचा खर्च याही महत्त्वाच्या गोष्टी असतात. तसेच तो लहान असल्याने स्पर्धांसाठी त्याच्याबरोबर जाणेही महत्त्वाचे होते. त्यासाठी त्याच्या वडिलांनी आपला डॉक्टरी पेशा सोडून गुकेशसोबत राहण्याचे ठरवले. दुसरीकडे त्याच्या आईने नोकरी करून त्यांची आर्थिक बाजू सांभाळण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या वडिलांच्या अनेक मित्रांनी त्यांना प्रायोजक मिळवून दिले आणि गुकेशचा बुद्धिबळपटू म्हणून प्रवास सुरू झाला.
गुकेशही आपला उत्तम खेळ खेळत समवयस्क प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उत्तरोत्तर प्रगती करत राहिला. वयाच्या तेराव्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला. अर्थात त्यापेक्षाही कमी वयात ग्रँडमास्टर बनण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. परंतु गुकेशमध्ये काही विशेष गुण होते. त्याला पाहून तेव्हाच लक्षात आले की, हा मुलगा फक्त ग्रँडमास्टरचा किताब मिळवून थांबणार नाही, तर तो कैक पावले पुढे जाईल.
२०१८ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत गुकेश आणि मी बाजूबाजूंच्या पटांवर खेळत असू. त्या वेळी बरेचदा माझी नजर त्याच्या डावांकडे जात असे. अनेकदा त्याच्या चाली समजणे खूप कठीण जात असे. त्याचा डाव खेळून झाल्यानंतर ‘अरे, या मुलाने अशी तयारी का केली होती,’ हे लक्षात येई. त्याच्याकडे बुद्धिबळाची नैसर्गिक प्रतिभा आहे. प्रतिभा, कल्पकता, सर्जनशीलता या त्याच्या गुणांमुळे त्याचे डाव अन्य खेळाडूंपेक्षा उठून दिसत. एक अत्यंत दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षीही हा मुलगा ‘योग्य खेळी’ आणि ‘अयोग्य खेळी’ असा समतोल बुद्धीने विचार करत होता आणि त्याप्रमाणे तो आपली पुढची चाल ठरवत होता. या वयात अनेक खेळाडू अगदी जोमाधीन होऊन झटकन खेळी करून मोकळे होतात आणि त्या भरात अनेक चुका करून बसतात. आपली चाल चुकली तर चुकली किंवा बरोबर आली तर ठीक, असा ‘विचार’ या वयातली बहुतेक मुले करतात. पण गुकेशचे मात्र तसे नव्हते. तो त्या वयातही संयमाने, विचारपूर्वक चाल खेळत होता.
या स्पर्धेत गुकेशच्या डावांशी माझी तोंडओळख झाली होती. त्याचे केवळ एक-दोन डाव मी बघितले होते. त्याच्या खेळाच्या शैलीचा आणि त्याच्या डावांचा खरा अभ्यास करायची संधी मिळाली ती २०२२ मध्ये. भारतीय बुद्धिबळ संघटनेचे तत्कालीन महासचिव भारत सिंग चौहान यांनी भारतात बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी सुमारे १०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. तसेच जागतिक बुद्धिबळ संघटनेला ८० कोटींची बँक गॅरेंटी द्यावी लागणार होती. अर्थात संघटनेकडे इतके पैसे नव्हते. परंतु अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे भारतातील खेळाडूंना खूप फायदा होईल असं चौहान यांचे म्हणणे होते. त्यासाठी ते नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मात्र त्वरित बँक गॅरंटी देऊन स्पर्धेसाठीची औपचारिकता पूर्ण केली. आता ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत हे नक्की झाले तेव्हा यजमान म्हणून भारताचे एकऐवजी दोन किंवा तीन संघ खेळणार हे कळले. ( जो देश यजमान पद भूषवितो एकापेक्षा अधिक संघ खेळण्याची संधी दिली जाते.) त्या वेळी स्वाभाविकच मानांकनाच्या निकषाप्रमाणे गुकेश आणि प्रज्ञानंद अशी तरुण खेळाडूंची नावे पुढे आली. त्या वेळी मी त्यांच्या डावांचा विशेष अभ्यास करायला सुरुवात केली. प्रज्ञानंदविषयी बरीच माहिती होती. तो अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळला होता. पण गुकेशने तेवढ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या नव्हत्या. पण २०२२च्या राष्ट्रीय स्पर्धेमधले गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांचा सामना आणि पराक्रम मी पाहिला होता. त्यात अर्जुन पहिला आला आणि गुकेश दुसरा आला होता. या दोघांचे राष्ट्रीय स्पर्धेतील डाव फार सुंदर होते. गुकेशच्या खेळाच्या शैलीचा अभ्यास केल्यावर हे लक्षात आले की, अनेक वर्षं जगज्जेता असलेला अनातोली कारपोव्ह आणि गुकेश या दोघांच्या खेळाच्या शैलीमध्ये खूप साधर्म्य आहे. गुकेशचा स्वत:च्या मनासारखे खेळण्याकडे जास्त कल आहे. कुठेतरी ‘ओपनिंगची खूप तयारी करायची आणि कॉम्प्युटरचा उपयोग करून ओपनिंगच्या तयारीप्रमाणे कॉम्प्युटर सांगतो तशी खेळी खेळायची, केवळ आपल्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहायचे’ हा सोपा रूक्ष मार्ग त्याला पसंत नसावा असं मला वाटले. गेल्या वर्षीपर्यंत अगदी या वर्षी जून महिन्यापर्यंतदेखील तो कधीही चेस प्लेइंग इंजिनचा उपयोग करत नसे. आज चेस प्लेइंग इंजिन म्हणजे कॅल्क्युलेटर झाला आहे. तुम्हाला गणित सोडवायचे असेल तर भरभर तुम्ही कॅल्क्युलेटरप्रमाणे चांगलं उत्तर शोधून काढू शकता. परंतु त्यामुळे तुम्ही गणितात प्रवीण झालात असे म्हणता येत नाही. ही जी बुद्धिबळ खेळणारी यंत्र आहेत ती तुम्ही डावाच्या वेळेस वापरू शकत नाही, याचे कुठेतरी भान असल्यामुळे आणि ओपनिंगची तयारी करण्यावर भर नसल्यामुळे गुकेश या इंजिनच्या कुबड्या वापरत नाही.
२०२२ ची ऑलिम्पियाड स्पर्धा जेव्हा झाली तेव्हा भारताच्या दुसऱ्या (‘ब’) संघासाठी गुकेश खेळत होता. प्रज्ञानंदसुद्धा याच संघात होता. ऑलिंपीयाड साठी जेव्हा जगजेत्ता मॅग्नस कार्लसन भारतात आला तेव्हा त्याने भारतीय संघ कसे आहेत हे बघायची इच्छा व्यक्त केली. गमतीचा भाग असा की, दिल्ली विमानतळावरच दोन्ही भारतीय संघामध्ये समावेश झालेल्या खेळाडूंची यादी बघून त्याने ‘‘भारताचा ‘ब’ संघ हा ‘अ’ संघापेक्षा उत्तम आहे.’’ असे विधान केले. कार्लसनच्या या विधानामुळे लोकांच्या मनातही या स्पर्धेविषयी कुतूहल निर्माण झाले. आणि प्रत्यक्षात कार्लसन म्हणाला तसंच झालं. या स्पर्धेत अकरावे सीडिंग असलेल्या ‘ब’ संघाला — ज्यात गुकेश आणि प्रज्ञानंद यांचा समावेश होता — कांस्य पदक मिळाले आणि दुसरं सीडिंग असलेल्या ‘अ’ संघाला मात्र चौथं स्थान मिळाले. खूप वर्षांनी भारताला पदक मिळवण्याचा हा मान मिळाला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या किंवा सर्वोत्तम पटावर वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गुकेशने सुवर्ण पदक मिळवले आणि त्याच पटावर मॅग्नस कार्लसनला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. (या स्पर्धेत पाच पट असतात आणि प्रत्येक संघातील जो सर्वोत्कृष्ट जो खेळाडू असतो तो पहिल्या पटावर खेळतो, कार्लसन आणि इतर दिग्गज खेळाडू या पटावर खेळतात). पहिल्या पटावर खेळताना आणि आपल्यापेक्षा अव्वल आणि लोकप्रिय खेळाडूंशी खेळताना गुकेशने पहिले आठ डाव जिंकले, तेव्हाच त्यांच्या खेळाची चुणूक दिसली. हा मुलगा अन्य खेळाडूंपेक्षा वेगळा आहे हे जाणवले. याची वाटचाल जगज्जेतेपदाच्या दिशेने आहे याची जाणीव झाली. २०२२ मध्ये लिहिलेल्या लेखात मी म्हटलेही होते की, २०२६ मध्ये बुद्धिबळात भारतीय खेळाडू जगज्जेता बनण्याची शक्यता खूपच अधिक आहे. कदाचित २०२६ आणि २०२८ मध्ये दोन्ही खेळाडू भारताचेच असतील. म्हणजे जगज्जेताही भारताचाच असेल आणि आव्हान देणारा खेळाडूही भारताचाच असेल. पण गुकेश माझ्या अपेक्षांपेक्षाही खूप पुढे गेला. माझ्या कल्पनेप्रमाणे तो २०२६ मध्ये जगज्जेता होईल अस वाटत होते. पण २०२४ मध्येच तो जगज्जेता झाला.
भारतीय तरुण खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळामुळे उत्तम प्रायोजक मिळतात. प्रशिक्षणाचा जो कोट्यवधी रुपयांचा खर्च असतो तोही ते करतात. युरोपमधले प्रशिक्षक कोट्यवधी रुपये घेतात. ते पैसे देण्यासाठी आपल्याकडे तगडे प्रायोजक असणे फार आवश्यक असते. गुकेशला चांगले प्रयोजक मिळाले आणि गुकेशने खरोखरच त्याचा पुरेपूर लाभ करून घेतला. तो हळूहळू एक एक शिखरं चढत गेला. २०२३ मधील वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये तो केवळ कार्लसनबरोबरच्या लढतीत पराभूत झाला.
गुकेशचा जगज्जेतेपदाकडे जाणारा मार्ग थोडासा खडतर होता. कारण जोपर्यंत कँडिडेट स्पर्धा म्हणजे आव्हानवीर ठरवण्यासाठी जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमधील खेळाडूंच्या यादीत गुकेशचे नाव नव्हते. तो लहान असल्याने त्याला तेवढे सरासरी रेटिंग नव्हते. तसेच २०२३ मध्ये झालेल्या अनेक निवड स्पर्धांमधून गुकेशची निवड झाली नव्हती. म्हणजे आठ कँडिडेट जागापैकी सात जागा आधीच भरल्या होत्या. परंतु चेन्नईची सुपर ग्रँडमास्टर स्पर्धा जिंकून कँडिडेटसाठी पात्र ठरलेला गुकेश हा शेवटचा खेळाडू ठरला. अशा प्रकारे या स्पर्धेसाठी त्याची शेवटच्या क्षणी निवड झाली.
कॅंडिडेट स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतरदेखील गुकेशचे सीडिंग पहिले किंवा दुसरे नव्हते. त्यामुळे या स्पर्धेत विजेतेपद पटकावून तो जागतिक विजेतेपद स्पर्धेसाठी आव्हानवीर होईल शक्यता कोणालाही वाटत नव्हती. विश्वनाथ आनंदपासून कस्पारोव्ह, कार्लसन कोणीही अशी अपेक्षा केली नव्हती. परंतु फेब्रुवारी २०२४ मध्ये टोरंटोमध्ये झालेल्या कँडिडेट स्पर्धेमध्ये गुकेशने सातत्याने खेळ केला आणि पहिले स्थान पटकावून तो जगज्जेते पदाचा आव्हानवीर ठरला.त्यांनतर काही महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये गुकेशने विजय मिळवला आणि तो जगातील सर्वात तरुण विश्वविजेता बनला. त्याने कुठले कुठले विक्रम केले ते आपण पाहूया.
बुद्धिबळातील जगज्जेतेपद हे वैयक्तिक अजिंक्यपद आहे. हे पद कमी वयात मिळवणारे- ज्यांना लिजेंडरी म्हणतो आणि त्यांचा आजही दबदबा आहे असे गॅरी कस्पारोव्ह १८ वर्षे या स्थानी विराजमान होते. ज्यावेळी १९८५ मध्ये कस्पारोव्ह पहिल्यांदा विश्वविजेता झाला,त्या वेळी तो अवघ्या २२ वर्षाचा होता होते. सुदैवाने मी आणि भारतीय संघ ही स्पर्धा पाहायला गेलो होतो. भारतीय स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाने आम्हाला ही मॅच बघण्यासाठी पाठवले होते. आम्ही सगळ्यांनी त्या मॅचेस अगदी जवळून बघितल्या. अवघ्या २२ व्या वर्षी गॅरी कस्पारोव्ह जगज्जेता झाला याचे सगळ्यांना अप्रूप वाटले होते. हा विक्रम पुढील तब्बल ३९ वर्षे म्हणजे २०२४ पर्यंत त्याच्या नावावर होता. गुकेशने वयाच्या १८व्या वर्षी हा मान मिळविला. सर्वात कमी वयात जगज्जेता होण्याचा विक्रम गुकेशने तब्बल चार वर्षांनी मोडला आहे. अॅथलेटिक्सच्या भाषेत सांगायचे झाले तर शंभर मीटरच्या धावस्पर्धेत बाकीचे धावपटू साडेनऊ सेकंद, दहा सेकंद घेतायत आणि एखाद्या खेळाडूने आठ सेकंदांमध्ये ती फेरी पूर्ण करावी असा हा अद्भुत पराक्रम आणि विक्रम आहे असे मला वाटते. विश्वनाथ आनंदनेदेखील सांगितले होते की, गुकेश जगज्जेता होणार, परंतु २०२६ किंवा २०२८ साली. आमच्या अंदाजाप्रमाणे त्याने खूपच जास्त आणि पटकन प्रगती केली आहे. २०२२ च्या ऑलिम्पियाडच्या वेळी मी असे म्हटले होते की, या मुलाचा खेळ आधीच्या डावांपेक्षा उत्तरोत्तर उत्तम होत जातो. त्याच्या खेळातील सातत्यामुळे दोन वर्षं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचे रेटिंग वर जात होते आणि तेच महत्त्वाचे होते. अर्थात यामागे त्याचे कठोर परिश्रम होते. गुकेशच्या आईच्या शब्दात सांगायचे झाले तर- त्याने स्वत:साठी मज्जामस्ती करण्यासाठी वा गमतीसाठी टीव्ही बघणे किंवा करमणुकीसाठी कोणतीही गोष्ट केलेली नाहीये. जो वेळ मिळेल तो केवळ आणि केवळ बुद्धिबळासाठी वापरायचा आणि अधिक चांगला खेळाडू बनण्यासाठी प्रयत्न करायचा हेच त्याच्या ध्यानीमनी असायचे. बुद्धिबळपटू होणे हेच त्याचे ध्येय आहे. आपल्याला काय आवडेल यापेक्षा उत्तम बुद्धिबळपटू होण्यासाठी काय करावे लागेल याचाच तो विचार करतो. अर्थात बुद्धिबळ खेळून त्याला अत्युच्च आनंद मिळतो हेही खरे आहे… या वयात सिनेमा, नाटक बघणे, माबाइलवर चॅट करणे असे अनेक मोह होतात. परंतु गुकेशने या मोहांवर मात केलेली आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व संतुलित असे आहे. तो धीरगंभीर आहे. हरला तरी दुसऱ्या वेळी तो प्रतिस्पर्ध्यावर पुन्हा डाव टाकण्यासाठी सज्ज असतो. त्याला आत्मविश्वास आहे, अति-आत्मविश्वास मात्र नाही. आपण काय करू शकतो याची त्याला जाणीव आहे. आणि तो जे काही करतो ते त्याच्या अपेक्षेप्रमाणे घडते. त्याला स्वत:बद्दल पूर्ण कल्पना आहे. स्वत:च्या सीमारेषा माहीत आहेत. आणि त्याप्रमाणे तो खेळ खेळतो. मला जगज्जेता बनायचे आहे, असे म्हणणारे हजारो खेळाडू असतात. परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा खेळाडू जे कठोर परिश्रम करतो, ते करणे सोपे नाही, मला वाटते सगळ्यांनीच त्याचा आदर्श घ्यावा. त्याने बुद्धिबळाला वाहून घेतले आहे आणि त्यामुळेच त्याला हे यश मिळाले. आता त्याच्यापुढे एकच लक्ष्य आहे- जगातला सर्वोच्च मानांकन असलेला खेळाडू बनण्याचे. कारण ते स्थान अजूनही मॅग्नस कार्लसनकडे आहे. गुकेश लवकरच जगातला सर्वोच्च मानांकन असलेला नंबर एकचा खेळाडू होईल, पुढच्या विश्वविजेत्या स्पर्धेतही यशस्वी हाईल आणि अनेक वर्षं जगज्जेता राहण्याचा विक्रम करेल अशी आपण सर्व आशा करूया!
(लेखक अर्जुन पुरस्कार विजेते आणि बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत.)
Pravinthipsay@gmail.com