वीरधवल परब
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘घामाचे संदर्भ’ या किरण भावसार यांच्या कवितासंग्रहात प्रामुख्याने कामगार जगतातील आजच्या वास्तवाची जळजळीत नोंद घेतली गेली आहे. अर्थव्यवस्थेच्या खाजगीकरण- उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन आता पंचवीस वर्षे उलटली आहेत. जेमतेम पाव शतकाच्या अल्प कालावधीत वेगाने वाढत गेलेल्या या प्रक्रियेमुळे जीवनाची सर्व क्षेत्रे प्रभावित झालेली दिसतात. नफेखोर भांडवलशाहीला अनिर्बंधपणे पूरक असणाऱ्या, ‘अधिकाधिक खुल्या बाजारपेठा आणि सार्वजनिक उद्याोगांचे अधिकाधिक खाजगीकरण’ या गृहीतकाचा धोशा लावणाऱ्या ‘खाउजा’ या व्यवस्थेमुळे जगभरच आर्थिक विषमता निर्माण होऊन जग दोन गटांत विभागले गेल्याचे दिसते.
गावखेड्यातील उपजीविकेची तुटपुंजी साधने आणि बेभरवशाची शेती यामुळे महानगरांच्या दिशेने आशाळभूतपणे स्थलांतर करणे अपरिहार्य ठरत गेले. परिणामी आधीच मुजोर असलेल्या भांडवलशाहीला कमीत कमी व्यासाची जाळी टाकून श्रमाचे आणि अर्थसत्तेचे केंद्रीकरण करणे सोपे झाले. या अजस्रा यंत्रणेसमोर उरल्यासुरल्या कामगार चळवळी हतबल किंबहुना नेस्तनाबूत झाल्या. कामगार नोकरदार वर्गात संघटित आणि असंघटित कामगार/ नोकरदार अशी निर्माण झालेली फूट वाढत राहिली. यातून श्रमजीवी माणसांच्या कष्टसाध्य जगण्याचे संदर्भ बदलत गेले. हाताला काम मिळण्याची शाश्वती हिरावून घेतली गेली. काम मिळवण्यासाठी होऊ लागलेल्या जीवघेण्या स्पर्धांनी श्रममूल्य ग्रासून टाकले. कामगार म्हणजे एखाद्या वस्तूसारखा मोडतोड करत पिळून पिळून शोषला जाणारा भंगार तुकडा ठरला. कवी किरण भावसार यांनी ‘घामाचे संदर्भ’ या संग्रहातील कवितांमधून हे वास्तव थेटपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
असंघटित क्षेत्रात रोजंदारीवर अगदी अल्प वेतनावर नाइलाजाने कशी तरी रामभरोसे जगत राहणारी, कोणाच्याही खिजगणतीत नसलेली असंख्य माणसे या कवीच्या आस्थेचा विषय झालेली आहेत. त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तर आहेच, पण सततची असुरक्षितता आणि उपेक्षा यामुळे घाम गाळून त्यासाठी जिवाचे रान करून मिळवलेल्या घासभर अन्नाची चवही त्यांना जाणवेनाशी झाली आहे. आयुष्य केवळ तीन शिप्टमध्ये विभागले गेल्याचे निरीक्षण कवी नोंदवतो. आत्महत्या हाच पर्याय; पण तो स्वीकारता येत नाही म्हणून आपले माणूसपण गुंडाळून ठेवत कंपन्यांच्या गेटवर भरतीचे बोर्ड पाहत हताशपणे रस्ते तुडवण्याशिवाय माणसांच्या हाती काही उरले नाही, अशी हलाखी ‘घामाचे संदर्भ’मधून कवी आपल्यासमोर ठेवतो.
‘तुझ्या पायाखाली वीट/ तीच डोईवर माझ्या/ युगायुगांचा हा भार/ कसा वाहू विठू बोजा?’ किंवा ‘पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा धावपळीत जेवलाच नाहीय सकाळपासून’ अशी विरोधाभासात्मक वास्तविकता कवी तीव्रतेने मांडताना दिसतो.
गटाराच्या मॅन होलमध्ये गुदमरून जाणारे, फटाक्यांच्या कारखान्यात जीव गमावून बसणारे, जीवघेण्या उन्हात गारेगार कुल्फ्या विकणारे, भडकलेल्या बॉयलरला कोळसा भरवताना काळवंडून गेलेले, हॉटेलात उष्टी खरकटी विसळणारे, प्लास्टिक- बाटली- लोखंड- रद्दीचे भंगार उपसणारे अनेक स्त्री-पुरुष कामगार या कवितेतून समोर येतात. त्याचबरोबर काँक्रीट झालेली पाठ, स्क्रॅपयार्डात पिळून चोथा झालेल्या भंगार जिंदग्या, वेल्डिंग लागल्यासारखी बुबुळात सलत राहणारी रात्र, पुरुषी नजरांच्या विखारी डिटेक्टरखाली रोजंदारीवर काम करणाऱ्या बाया असे काही शब्द/ वाक्यबंध कवीच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात.
‘घामाचे संदर्भ’ – किरण भावसार, काव्याग्रह प्रकशन,
पाने- १०८, किंमत- १६०