कलेचे आणि कलासमीक्षेचेही अभ्यासक्रम वाढले, शिष्यवृत्त्या अथवा परदेशी शिकण्याच्या संधींची उपलब्धता वाढली, हेही कलाबाजार वाढण्याला अप्रत्यक्षपणे मदत करत असतं. दिल्लीत भरणाऱ्या ‘इंडिया आर्ट फेअर’च्या यंदाच्या १६ व्या खेपेला धनाढ्य कला-खरेदीदार दिसत होतेच, पण समाधान होतं ते तरुणांच्या सहभागाचं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात यापूर्वीही कला-खरेदीदार होते. पण आता एखादी कलाकृती खरेदी करून ती संग्रहात ठेवणाऱ्या कला-संग्राहकांची संख्या इथे वाढते आहे,’ हे लंडनमधल्या बहुराष्ट्रीय ‘लीसन गॅलरी’च्या विक्री विभाग संचालिका कोर्टनी प्लमर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केलेलं मत महत्त्वाचं ठरतं; कारण उतावळे ‘खरेदीदार’ आणि घाई नसलेले ‘संग्राहक’ यांच्यातला फरक त्यातून स्पष्ट होतो. हा फरक यंदाच्या १६ व्या वर्षी नवी दिल्लीत भरलेल्या ‘इंडिया आर्ट फेअर’मध्ये थेट दिसतसुद्धा होता! हा अखेर दृश्यकलेचा व्यापारमेळाच. इथे खरेदीवरच भर असणार, हे उघड असतं. त्यामुळेच इथं स्टॉल घ्यायचे आणि ‘विक्रीयोग्य’ कलाकृती मांडायच्या, हाच खासगी मालकीच्या कलादालनांचा खाक्या असल्याचं वारंवार दिसायचं. अर्थात जगभरच्या कुठल्याही कला-व्यापार मेळ्यात अशीच गत असते म्हणा; पण ‘आर्ट फेअर’च्या त्या मेळ्यात कुठे ना कुठे शांत, आत्ममग्न अशी कामंही दिसतात- किंवा नामवंत (आणि म्हणून चटकन विकले जाणाऱ्या) कलावंतांच्या जोडीनं काही कलादालनांच्या स्टॉलवर नवोदित गुणवंतांनाही स्थान मिळतं… हे आता भारतातही होऊ लागलं, याची ग्वाही दिल्लीच्या ‘इंडिया आर्ट फेअर’नं दिली. ‘आर्ट फेअर’ म्हणवणाऱ्या दिल्लीच्या या कला व्यापार मेळ्यानं यंदा एक तृतीयांश हिस्सा (तीन मोठ्या तंबूंपैकी एक तंबू- १२० कलादालनांच्या स्टॉलपैकी ४२ स्टॉल) फक्त डिझायनरांसाठी राखीव ठेवला होता. हिरेमाणकांपासून लाकडी फर्निचरपर्यंत सगळंच इथं मिळत होतं. तरीही चित्र-शिल्पांकडेच खरेदीदारांचा- किंवा संग्राहकांचा- ओढा दिसला!

‘लीसन गॅलरी’चंच उदाहरण घ्यायचं तर याआधीच्या अनेक वर्षांत निव्वळ झगझगीत, चटकन आकर्षित करणाऱ्या आणि ‘अनिश कपूर’ वगैरे जगन्मान्य ब्रँडच झालेल्या कलावंतांच्या कलाकृती लीसनच्या स्टॉलवर होत्याच- पण या स्टॉलचा सुमारे ३५ टक्के भाग दाना अवार्तानी या मूळच्या पॅलेस्टिनी, जन्मानं सौदी अरेबियाच्या, पण आता अमेरिकावासी आणि जगप्रसिद्ध चित्रकर्तीच्या शांत कलाकृतींनी व्यापला होता. इस्लामी अतिरेक्यांनी किंवा या अतिरेक्यांचा बंदोबस्त करू पाहणाऱ्यांनी जागोजागी केलेला संहार हा या चित्रांचा विषय. झिरझिरीत कापडावर ‘रफू’सारखं हे काम, अत्यंत काटेकोरपणे केलेलं. कापडावर जे त्याच रंगाचे पण भरीव तुकडे दिसताहेत ते निव्वळ विखुरलेले नाहीत- संहाराचं नकाशावरलं स्थान जोखून, मापून त्या प्रमाणातच हे तुकडे इथं आहेत. त्यामुळे अमूर्तचित्रांना सराईतपणे दाद दिल्यासारखंही या कलाकृतींसमोर करता येत नाही. एकंदरीत, चित्रकर्ती कितीही नावाजलेली असली तरी ‘आर्ट फेअर’मध्ये हे काम विक्रीयोग्य ठरणं अवघडच. तरीही ते होतं. कदाचित विकलंही गेलं असेल. एकेका कलाकृतीच्या विक्रीचा तपशील कुठल्याही कला-व्यापार मेळ्यानंतर सहसा दिला जात नाही. स्टॉलवर मांडलेल्या कलाकृतींपैकी किती प्रमाणात विक्री झाली हे सांगितलं जातं. यंदा हे प्रमाण – वढेरा आर्ट गॅलरी : ९० टक्के (कलाकृतींच्या किमती सव्वादोन लाख ते अडीच कोटी रुपयांपर्यंत), नेचर मॉर्टे : ७० टक्के (यात सुमारे ८७ लाखांचीही एक कलाकृती), बाकीच्या कलादालनांच्या स्टॉलवरून पाच-सहापैकी किमान दोन वा एका कलावंताच्या कलाकृतींची विक्री… असं होतं. ‘गॅलरी स्के’ या बेंगळूरु आणि दिल्लीच्या कलादालनानं सव्वा लाख ते सव्वातीन कोटी रुपयांपर्यंतच्या कलाकृती विकल्या, यातून नव्या कलावंतांच्या किमती कमी असल्याचंही दिसत होतं.

ही लाख, कोटी रुपयांची चित्रं (किंवा शिल्पं) विकत घेतं कोण, असा मध्यमवर्गीय प्रश्न एव्हाना पडला असेलच, त्याचं उत्तर सहा फेब्रुवारीला- या फेअरच्या ‘व्हीआयपी प्रीव्ह्यू’मध्येच दिसलं होतं. फक्त दिल्लीचेच नव्हे तर अन्य शहरांतलेही धनाढ्य त्या वेळी इथं होते. भारतातली आर्थिक विषमता वाढते आहे वगैरे आपण नेहमीच ऐकतो; त्या विषमतेमुळेच ज्यांचं सुख वाढलंय असे हे लोक! उलट, ज्यांच्या कलाकृती कोटींना वगैरे विकल्या गेल्या ते सारेच कलावंत आजघडीला हयात आहेत असं नाही. कलाबाजार वाढतो तेव्हा कलावंतांचंही भलंच होत असतं हे सर्वसामान्य विधान आहे आणि ढोबळ अर्थापुरतंच खरं आहे. एरवी, तरुण कलावंतांना झगडावंच लागतं.

संघर्षातल्या वाढत्या संधी

तरुण कलावंतांच्या संघर्षाची तीव्रता जरा कमी व्हावी, त्यांच्यातल्या गुणवंतांना तरी चटकन पुढे येता यावं, त्यांच्या नव्या कल्पनांकडे लोकांचं लक्ष जावं, यासाठी आजघडीला अनेक संस्था काम करताहेत. दिल्लीच्याच ‘खोज’नं अशा कामाची सुरुवात २५ वर्षांपूर्वी केली. ‘खोज रेसिडेन्सी’द्वारे तरुण गुणवंतांना तीन महिने रहिवासी शिष्यवृत्ती देऊन पैलू पाडणं, या स्वरूपाचं काम ‘खोज’नं सुरू केलं. नंतर बेंगळूरुची ‘१, शांतिरोड’, ढाक्याची ‘ब्रिटो आर्ट रेसिडेन्सी’ या संस्थांनी सातत्यपूर्ण काम केलं, तर बाकीच्या अनेक संस्थांचे प्रयत्न उमलत/ विझत राहिले. रेसिडेन्सी, शिष्यवृत्ती, मग परदेशी फेलोशिपची संधी, अशा क्रमानं काही चित्रकार पुढे जात राहिले. भारतात परतल्यावर यापैकी काहींनी स्वत:हून इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतले- मुंबईची ‘कोना’ ही संस्था त्यात होती आणि ‘कॅम्प’ आजही आहे. आधी ‘क्लार्क हाउस’ आणि आता ‘स्ट्रेंजर्स हाउस’ यांनी पर्यायी कलादालनातून अनेकांना नावारूपाला आणलं. कलेच्या व्यापाराला तुच्छ न मानता, पण त्याला अवास्तव महत्त्वही न देता या सर्वांनी काम केलं. त्याचे परिणाम आज दिसू लागले आहेत. दिल्लीत इंडिया आर्ट फेअरची वेळ साधून उत्तमोत्तम कलावंतांची प्रदर्शनं भरतात (सुधीर पटवर्धन, गुलाममोहम्मद शेख आणि शिल्पा गुप्ता यांची प्रदर्शनं यंदा भरली होती; तर ‘खोज’नं संधी दिलेल्या आणि आता नामवंत झालेल्यांसह नव्यांचाही समावेश प्रदर्शनात केला होता), पण आता नव्या कलावंतांची प्रदर्शनंही भरू लागली आहेत- मुंबईत शिकलेल्या योगेश रामकृष्ण याचं एकल प्रदर्शन लाडो सराय भागातल्या ‘लॅटिट्यूड ट्वेंटीएट’मध्ये, तर छतरपूर भागातल्या ‘स्टीअर’मध्ये स्ट्रेंजर्स हाउसच्या पुढाकारानं ‘पॅनोरामा बियॉण्ड द कलर लाइन’ हे ३९ तरुण कलाकारांच्या सहभागाचं प्रदर्शन भरलं होतं. खुद्द व्यापारमेळ्यातही या संस्थांना किंवा निवडक तरुण कलावंतांना निराळे बूथ देण्याची पद्धत सुरू झाली आहे. एकंदर ‘पॉलिटिक्स ऑफ इन्क्लूजन’ला हे साजेसंच- पण या समावेशनाची खिल्ली न उडवता त्याकडे संधी म्हणून पाहणं अधिक उपयुक्त ठरेल, हेही सर्व संबंधितांनी ध्यानात घेतलं आहे.

याखेरीजही गेल्या काही वर्षांत दिल्लीत एक बदल घडलेला दिसतो. भरवस्तीपासून जरा लांब, पण ऐसपैस जागेत सुरू झालेल्या खासगी मालकीच्या कलादालनांचा ओढा विक्रीकडेच असला, तरी त्यांनी जरा दमानं घ्यायला सुरुवात केली आहे. या दमानं घेण्याचे प्रकार अनेक- कुणी दिल्लीतूनच ‘आर्ट हिस्टरी अॅण्ड क्रिटिसिझम’ची पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या तरुणांना आपल्या गॅलरीत गुंफणकार (क्युुरेटर) म्हणून संधी देतंय, कुणी तरुण कलावंतांसाठी बक्षीस ठेवतंय तर कुणी तरुणांना थेट परदेशी रेसिडेन्सीची संधी देतंय… याला गुंतवणूक लागते, त्यासाठी पैसाच हवा. तो दिल्लीत तरी आहे. म्हणजे मुंबईत पैसा नाहीच, असं नव्हे. पण मुंबईत पैशापेक्षाही गॅलरी-संचालकांकडे, कलेची जाण पूर्वापार अधिक आहे. हीना कपाडिया, अभय मस्कारा अशा गॅलरी चालकांनी हे दाखवून दिलंय. याचाही परिणाम तरुणांच्या संधी वाढण्यातच झालाय.

अखेर विक्रीसाठी, खरेदीसाठी जुन्या नामवंत कलावंतांनाच प्राधान्य मिळणार हे खरं, पण गेल्या काही वर्षांत नव्यांचे हुंकारही वाढताहेत. हे हुंकार आता खुद्द आर्ट फेअरमध्येही दिसताहेत. मग कुठल्याशा गुरुग्रामच्या ‘डॉटवॉक’ नामक गॅलरीसाठी प्रेमजीश अचारी या अभ्यासू गुंफणकारानं संधी दिलेला प्रियरंजन पुलकाइत असो, ‘क्लार्क हाउस’मध्ये कैक वर्षांपूर्वी संधी मिळून आता ‘गॅलरी स्के’पर्यंत (आणि पुढेही) पोहोचलेला बिरेन्दर यादव असो. महाराष्ट्रासाठी जरा समाधानाची बाब यंदा दिसली ती म्हणजे कलादालनांच्या सहकार्यातून एकेकट्या तरुण कलावंतांना फेअरच्या आवारात मोठी कलाकृती किंवा ऐन फेअरमधल्या ‘बूथ’मध्ये अनेक कलाकृती मांडण्याची जी संधी मिळते त्यांत भूषण भोंबाळे (स्ट्रेंजर्स हाउस- कुलाबा), योगेश बर्वे (आर्ट अॅण्ड चार्ली- वांद्रे पश्चिम), तेजा गवाणकर (साक्षी गॅलरी- कुलाबा) अशी महाराष्ट्रीय नावं आणि मुंबईकर कलादालनं होती. मोहित शेलारे हा मूळचा अमरावतीचा, पण आता दिल्लीवासी तरुण धडाडीनं ‘सांडपाणी (अ)व्यवस्था’ हा विषय चित्रांमधून मांडतो, त्याचं मोठं चित्र तर मुंबईच्या ‘गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड’च्या स्टॉलवर लक्ष वेधून घेत होतं.

थोडक्यात, मार्केट वाढणं आणि तरुणांसाठी संधी वाढणं यांचा एकमेकांशी थेट काही संबंध जोडता येणार नाही. पण हे दोन्ही एकाच वेळी होतंय हे खरं. त्यातून तरुणांचे हुंकार वाढताहेत, ही सर्वाधिक समाधानाची बाब!