डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विलायतेला उच्च शिक्षणासाठी पाठविण्यासाठी ज्या चौदा विद्यार्थ्यांची निवड केली होती त्यात डॉ. म. ना. वानखडे यांचे नाव होते. बुद्धिवादाच्या पायावर डॉ. वानखडे यांनी दलित साहित्याची विचार चौकट उभी केली. दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. वानखडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष, त्या निमित्ताने…
डॉ. म. ना. वानखडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील थुगाव येथे २० जानेवारी १९२४ रोजी झाला. विचारवंत, इंग्रजी व आफ्रो-अमेरिकन साहित्याचे गाढे अभ्यासक आणि दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते म्हणून त्यांची बदल्यांप्रमाणे भ्रमंती झाली. वानखडे यांची शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून गणना झाली. नागपूर येथील मॉरीश कॉलेजमधून इंग्रजी विषय घेऊन बी. ए. ऑनर्स परीक्षेत प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती खुद्द बाबासाहेबांनी केली होती. १९५१ ते १९६८ हा वानखडे यांचा या महाविद्यालयातील सेवेचा कालखंड. प्राध्यापक, इंग्रजी विभागप्रमुख ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नियुक्ती त्यांनी सार्थ ठरविली.
प्रखर बुद्धिमत्ता आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व ही त्यांची खासियत होती. म्हणूनच सातासमुद्रापार जाऊन त्यांनी शैक्षणिक जीवनात उच्चांक गाठला. युनायटेड किंगडम येथे उच्च शिक्षणासाठी भारत सरकारची ओव्हरसीज स्कॉलरशिप (१९६२-६६), इंग्रजीच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी फुटब्राइट – स्मिथ – मड स्कॉलरशिप (१९६२-६६), एम.ए. इंडियाना, यू.एस.ए. (१९६३), फ्लोरिडा विद्यापीठ (यू.एस.ए.) येथे इंग्रजी विभाग सहाय्यक. याच विद्यापीठातून पीएच. डी. (१९६५), वेस्टर्न हलिनॉस विद्यापीठ (यू.एस.ए.) येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक (१९६५-६६), मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे इंग्रजीचे अधिव्याख्याता (१९६६-६८), प्राध्यापक आणि इंग्रजी विभागप्रमुख, मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद, याच महाविद्यालयात १९५८- ६२ आणि १९६६-६८ या काळात प्राचार्यपद भूषविले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि साहित्य अकादमीचे ते सदस्य होते. १९७३ ते १९७८ पर्यंत डॉ. वानखडे हे महाराष्ट्र सेवा आयोगाचे अध्यक्ष होते.
इंग्रजी वाङ्मय, भाषा यावर प्रभुत्व आणि ब्लॅक लिटरेचरमधील क्रांतिकारकता, दाहकता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साहित्य विचार पुढे नेण्यासाठी कृतिशील झालेले हे एक वेगळे रसायन होते. बाबासाहेबांनी उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी ज्या चौदा विद्यार्थ्यांची निवड केली होती त्यात म. ना. वानखडे यांचेही नाव होते. मिलिंद कॅम्पसमध्ये त्यांचा फार दरारा होता. त्यांच्या पुढे जाण्याची शिक्षक, विद्यार्थी कोणाचीही हिंमत होत नसे. सर्वांच्याच मनात अशी आदरयुक्त भीती दाटून आलेली असायची. असे असले तरी शेकडो लोक केवळ वानखडे सरांना पाहण्यासाठी येत होते हे त्यांच्या नावाप्रमाणेच मनोहर वास्तव आहे, अशी त्यांची मोठी आणि चमकदार कारकीर्द आहे.
अमेरिकेतून निग्रो साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करून भारतात आल्यानंतर डॉ. वानखडे यांनी ब्लॅक पँथरची ओळख करून दिली. अमेरिकेतील ही संघटना वंशवादाविरुद्ध लढत होती. भारतातील दलित साहित्यिकांनीसुद्धा हातात शस्त्रे घेतली पाहिजेत असे वानखडे यांचे मत होते. दलित पँथरनेसुद्धा तशी पत्रके काढली होती. खेड्यांत, शहरांत अन्याय अत्याचार होतात त्याविरुद्ध आक्रमक भूमिका दलित पँथरने घेतली होती. निग्रोंनी स्वत:चे साहित्य आणि संस्कृती निर्माण केली. निग्रोप्रमाणेच या देशातील दलित, अस्पृश्य आपले स्वत:चे साहित्य निर्माण करू शकतात असा वानखडे यांचा ठाम विश्वास होता. म्हणून ‘दलितांनो, विद्रोही वाङ्मय लिहा’ असा उद्घोष त्यांनी १९६६ साली केला. त्यांचे असे म्हणणे होते की, काळे लोक हे गोऱ्या व्यवस्थेचा बळी आहेत, तर या देशातील दलित हे वर्णव्यवस्थेचा बळी आहेत. काळे लोक जर स्वत:ची निर्मिती करू शकतात तर दलित, अस्पृश्यांनीही आपली साहित्य निर्मिती केली पाहिजे असा विचार या देशात पहिल्यांदाच मांडला गेला.
डॉ. वानखडे हे कृतिशील विचारवंत होते. नुसता विचार मांडून ते थांबले नाहीत तर आपल्या विचाराला कृतीची जोड दिली. मिलिंद महाविद्यालय हे १९६० ते १९८० या काळात एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले. डॉ. वानखडे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आणि चळवळीचा वेध घेऊन समाजात सुरू असलेल्या मूल्य संघर्षाला अभिव्यक्ती मिळवून देण्यासाठी वैचारिक व वाङ्मयीन उपक्रमांना योग्य दिशा दाखवली. ‘अस्मिता’ त्रैमासिक त्यांनी सुरू केले. अस्मिताचे पुढे ‘अस्मितादर्श’ झाले. अस्मिताच्या पहिल्या अंकापासून दलित साहित्य चळवळीची चर्चा घडवून आणली. मिलिंद साहित्य परिषद, मिलिंद हस्तलिखित पाक्षिक, मिलिंद मॅगेझिन, अस्मिता त्रैमासिक यातूनच दलित साहित्य चळवळीचा पाया घातला गेला. अशाप्रकारे दलित साहित्याचे बीजारोपण, संस्थात्मक संरचना आणि साहित्य चळवळीचा उदय औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात झाला. हा इतिहास वानखडे सरांनी घडविला. डॉ. आंबेडकरप्रणीत वाङ्मयीन चळवळीचे, स्वातंत्र्योत्तर दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तन करणारे डॉ. वानखडे हे आंबेडकरांनंतरचे युगप्रवर्तक मानले जातात. दलित साहित्यावरील पहिली चर्चा त्यांनी घडवून आणली. ‘महाराष्ट्रातील आज उद्याचा सांस्कृतिक संघर्ष आणि समस्या’ ही दलित साहित्याची आद्याचर्चा होय. या चर्चेमुळेच ‘दलित साहित्य’ हा मराठीत चर्चाविषय झाला. या चर्चेमुळे दलित साहित्याच्या चळवळीला विद्रोहाची देणगी मिळाली. दलित साहित्य चळवळीला अधिष्ठान प्राप्त झाले. या सर्वच घडामोडीबाबत रा. ग. जाधव म्हणतात, ‘‘मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेन परिसरात ‘निळी पहाट’ होत होती. १९६०-७० च्या दरम्यान नागसेनवनात दलित साहित्य संस्कृतीचे एक सृजनशील पर्व उदयास येत होते. डॉ. म. ना. वानखडे यांनी त्या पर्वाला प्रतिष्ठा व प्रोत्साहन प्राप्त करून दिले.’’
डॉ. वानखडे यांची विद्रोहाबाबतही एक स्पष्ट भूमिका होती. विद्रोह म्हणजे बंड. दलित लेखनाचा विद्रोह आहे तो प्रस्थापित साहित्यिक व नैतिक मूल्यांविरुद्ध. कलेसाठी कलेविरुद्ध, सनातन रूढी, परंपरा, जातीयता याविरुद्ध. पण हा विद्रोह समाजाभिमुख असल्यामुळे, द्वेषावर आधारलेला नसल्यामुळे वांझ नाही. त्याचा गाभा आहे सामाजिक जाणिवा आणि लेखकाचे आदर्श म्हणजे जेवढे बंडखोर आहेत ते सर्व. मग ते साहित्यातील असोत वा इतर प्रांतातील… थेट चार्वाकापासून ते म. फुले, बाबासाहेबांपर्यंत! लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याचे कार्य लेखकच प्रभावीपणे करू शकतो. समाजातील अंत:प्रवाहाचे ज्ञान प्रथम लेखकालाच होते. तोच समाजातील आकलन आणि मूल्यमापन प्रथम करीत असतो. कारण तो समाजाचा ‘अँटीना’ असतो. आपण कुणासाठी लिहितो हे स्पष्ट झाले की लेखकाला कसे लिहावे हे कळते. डॉ. वानखडे यांच्या या प्रेरक विचारामुळेच दलित साहित्याची चळवळ वाढीस लागली, विकसित झाली. ही चळवळ मूलत: सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ आहे व म्हणून पारंपरिक भारतीय समाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेत तिचे कार्य महत्त्वाचे आहे. या चळवळीचे प्रेरणापुरुष म्हणजे डॉ. म. ना. वानखडे! डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते, ‘‘बाबासाहेबांच्या धार्मिक चळवळीत बाबासाहेबांच्या नंतर जे आनंद कौसल्यायन यांचे स्थान तेच जिवंत, स्फोटक आणि सजग स्थान बाबासाहेबप्रेरित वाङ्मयीन चळवळीत डॉ. वानखडे यांचे आहे.’’
mmbhaware@gmail.com