शांता गोखले हे अनुवाद कार्यासाठी परिचित नाव! ‘दुर्गा खोटे’, ‘स्मृतिचित्र’, ‘माझा प्रवास’, ‘धग’, खानोलकर – एलकुंचवार यांच्या नाटकांचा अनुवाद, इंग्रजी- मराठी रंगभूमीशी निगडित अभ्यासक आणि रसिक प्रेक्षक, अध्यापन – क्षेत्र, पटकथाकार, कला समीक्षक, द्विभाषिक लेखिका, सदर – लेखन आणि कादंबरीकार. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, साहित्य अकादमी पारितोषिक प्राप्त, अनेक संस्थांकडून सन्मानित, जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी आणि बरेच काही…
शांता गोखले यांच्या ‘ One foot on the Ground A life Told Trough the Body’ या इंग्रजी आत्मचरित्राचा अनुवाद ‘एक पाय जमिनीवर’ हा करुणा गोखले यांनी केला आहे.दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले असलेच पाहिजेत म्हणून ‘एक पाय जमिनीवर’ हे शीर्षक!
‘‘माझ्या शरीरानं मला जे काही दिलं होतं आणि जे दिलं नव्हतं त्या सगळ्यासाठी माझं माझ्या शरीरावर बेहद्द प्रेम होतं.’’ असं त्या म्हणतात. शरीराकडे बघण्याचा रुपकात्मक दृष्टिकोन टाकून त्याकडे प्रगल्भपणे पाहावे, शरीराकडे आनुषंगिक बाब म्हणून न पाहता एक मध्यवर्ती घटित म्हणून बघावं ही कल्पना त्यांना आवडली. स्वत:चं शरीर असं लख्ख प्रकाशात तळहातावरच्या आवळ्यासारखं निरखून पाहावं, म्हणजे त्यात पारदर्शकता येईल असं त्यांना वाटलं आणि त्यामुळेच या आत्म-चरित्राला अनोखेपण प्राप्त झालं.
यातील काही प्रकरणांची नावं दात, नाक, केस, डोळे, मेंदू अशी अवयवांवरून आहेत. एकेका टप्प्यावर या अवयवांनी कशी साथ दिली अथवा सोडली, कसे उपचार करावे लागले, त्यामुळे भावविश्वाची जडण-घडण कशी झाली याचा विचार यात मांडला आहे. कधी डॉक्टरांची बेफिकिरी कधी स्वत:चं दुर्लक्ष, यामुळे अनेक व्याधींना सामोरं जावं लागलं. मग चाचण्या, तपासण्या, विविध यंत्र- ती हाताळणारे अकुशल हात, त्या मागोमाग येणाऱ्या वेदना अशा बऱ्याच गोष्टी आल्या तरी ती आजाऱ्याची रडकथा होत नाही.
आपला सावळा रंग, नाक, दात यातल्या उणिवा असोत की रूढ अर्थाचं सौंदर्य नसो, त्यांना त्याची जाणीव आहे आणि त्या त्याची मिश्कीलपणे खिल्ली उडवतात. या गोष्टी खरोखरीच बीन महत्त्वाच्या असून, माणूस म्हणून व्यक्ती कशी आहे याचे महत्त्व त्या अधोरेखित करतात. शरीराबद्दल तटस्थपणे बोलत असतानाच त्या त्याचा आदरही करतात. शरीरभान हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. इतका की त्यांनी सुरुवातच अशी केली आहे की, ‘‘शरीराच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करते : माझा जन्म!’’
या आत्मचरित्रात आई-वडील पार्श्वभूमीला सतत सावलीसारखे दिसत राहतात. वडिलांनी आईला लग्नानंतर घेऊ दिलेलं शिक्षण, आईच्या भावंडांना शिक्षणासाठी घरी आणणं, शांता आणि निर्मल या आपल्या मुलींना मैदानी खेळ खेळायला, नृत्य करायला प्रोत्साहित करणं, मुलींच्या शिक्षणावर बारीक लक्ष ठेवणं, त्यांची बौद्धिक क्षमता जाणून एका वर्षात दोन इयत्ता करणं, त्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवणं, त्यासाठी आवश्यक ती आर्थिक आणि इतरही तरतूद करणं, युनिव्हर्सिटीची निवड करताना निकष लावण्याचा त्यांचा विशिष्ट दृष्टिकोन असणं, (उच्चार सुधारण्यासाठी संस्कृत श्लोक/ नित्यनियमाने म्हणायला लावणं,) वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं, मुलींना भरपूर आणि सकस आहार मिळावा याचा आग्रह असणं… ‘‘मी आणि तुझ्या वडिलांनी तुला जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तो तू आयुष्यात त्याचा उपयोग करावा म्हणून,’’ असं जेव्हा आई म्हणते; तेव्हा त्यांनी जागरूकतेने मुलींची जडणघडण केली आहे हे जाणवतं. या सर्वांतून त्यांचे आपसातले घट्ट भावबंध छान उभे राहतात.
लंडनमधली समृद्ध वर्षं, तिथली शिक्षण पद्धती, शिक्षक, तिथले बदलते ऋतू, नाटकं, सांगीतिका, आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहणं, मैत्रिणींबरोबर त्यांच्या घरी सण साजरे करणं, पुस्तकांची दुकानं पालथी घालणं, कँपिंग करणं यातून त्यांनी तिथली संस्कृती जाणून घेतली. डॉ. मकीनेस यांच्याबरोबरच्या चहापानामुळे त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या बाहेरच्या ज्ञानाचं आणि आनंदाचं नवीन दालनच उघडलं गेलं. ‘हॉस्केल’ यांच्या घरच्या मेजवानीमुळे खानदानी आणि तरल संस्कृतीचं दर्शन घडतं. अभिजन आणि सामान्यांच्या कृती-उक्तीतले फरक आणि वाइनचा आस्वाद घेण्याची धुंद करणारी रीतही कळली.
पुढे नौदलातल्या विजय शहाणेंवर प्रेम, त्या प्रेमातल्या गमती, लग्न, रेणुका-गिरीश यांचे जन्म आणि काही काळ फक्त संसाराच्या पूर्ण जबाबदाऱ्या. विजयचा एकलकोंडा स्वभाव, आर्थिक ढिसाळपणा, नंतर होणारा घटस्फोट, पुढे अरुण खोपकरांशी झालेली ओळख, विवाह आणि सोडचिठ्ठी अशा काही क्लेशदायक घटना त्यांच्या आयुष्यात घडतात, पण त्याही संयतपणे व्यक्त होतात. मुख्य म्हणजे त्या दोघांशी त्यांनी चांगले संबंध ठेवले आहेत.
आपली फजिती, प्रेमातला खुळेपणा, केलेल्या चुका असोत की सावळ्या रंगामुळे आलेले अनुभव असोत… त्यांचा नर्म विनोदाचा झरा कधी आटत नाही. व्ही. एफ. प्रकरणात मनाच्या आतल्या कप्प्यात आलेले विचार सांगताना, पुरुष देहाच्या कुतूहलाबद्दल, लहानपणाच्या लैंगिक अनुभवाबद्दल, वयात येतानाचे अनुभव सांगताना, लग्नातल्या अपयशाबद्दल व्यक्त होताना मोकळेपणा असला तरी कुठेही सवंगपणा येत नाही.
एकूणच या आत्मकहाणीतून पैशापेक्षा आव्हानात्मक कामाला महत्त्व असणं, वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणं, विवेकवादी, ईश्वर न मानणारी, काटेकोर आणि तत्त्वनिष्ठ, भगिनीभावाबद्दल आस्था, स्त्री- वादाची उत्तम जाण असलेली, उत्तम विनोद बुद्धीला सर्वाधिक महत्त्व देणारी मिश्कील स्त्री असं त्यांचं व्यक्तिमत्त्व उभं राहतं.
करुणा गोखले यांचे मनोगतही वाचनीय आहे. अनुवादिकेच्या अनुभवातूनही शांताबाईंचे व्यक्तिमत्त्व उभे राहते. कार्यपद्धतीतला काटेकोरपणा, शंकेचं निरसन करणं, ‘तुझा निर्णय अंतिम’ असं सांगून विश्वास दाखवणं, अनुवाद प्रक्रियेच्या काही पैलूंचं महत्त्व सांगणं आणि वागण्यातला समतोलपणा करुणा गोखले यांना जाणवला.
मिश्कीलपणा, नर्मविनोद, प्रांजळपणा आणि बहुश्रुत, व्यासंगीपणामुळे सहजगत्या येणाऱ्या अनेकानेक संदर्भांनी या लेखनाला श्रीमंती लाभली आहे.
‘एक पाय जमिनीवर : शरीराच्या भिंगातून उलगडलेला आयुष्याचा पट’ – शांता गोखले, अनुवाद : करुणा गोखले,
पपायरस प्रकाशन, पाने- २८०, किंमत- ४५० रुपये.
meenagurjar1945 @gmail.com