बालसाहित्य हे केवळ शालेय सुट्ट्यांच्या काळात चर्चा करावे असे माध्यम नाही. सद्या परिस्थितीत त्याची होत असलेली अवनती ही आपल्या एकूण वाचनसंस्कृतीच्या विघटनासही कारणीभूत ठरत आहे. नेमके असे काय झाले की नव्वदीनंतर लक्षणीय बालकुमार साहित्य किंवा त्यांतील नायक घडू शकले नाहीत? ते आले तरी लक्षवेधी का ठरू शकले नाहीत? इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढता कल किंवा टीव्हीवाहिन्यांचे आक्रमण या पारंपरिक उत्तरांपलीकडे आजच्या मराठी बालसाहित्याचे चुकते काय, याचा बालसाहित्याचा यंदाचा अकादमी पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ लेखकाने घेतलेला परामर्श. त्यासह त्यांच्या पुरस्कार विजेत्या पुस्तकाविषयीचे टिपण…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाल साहित्याचा विचार करताना बाल, कुमार-किशोर वयोगटाचा विचार करावा लागतो. लेखन करणाऱ्यांनादेखील हा विचार करणं गरजेचं असतं. निरीक्षण असं सांगतं की सद्या:स्थितीत बाल वयोगटासाठी विपुल प्रमाणात कविता तसेच गाणी लिहिली जात असून उत्तम स्वरूपात कवितांच्या पुस्तकांची निर्मिती होत आहे. मात्र, कुमार-किशोरांसाठी कादंबऱ्याचं लेखन होत नाही किंवा त्यांच्यासाठीची पुस्तके निर्माण केली जात नाहीत. म्हणजे, बालकांसाठी गाणी आणि कुमारांसाठी सहसा काही नाही. पोकळीच आहे, अशी परिस्थिती लक्षात येते. कुमार वयोगट उत्सुक वयोगट असतो. या वयात, रोमहर्षकतेचं मोठं आकर्षण असतं. रहस्य, रोमांच, साहस इत्यादींबाबत आणि वीररसाबाबतही उत्सुकता निर्माण झालेली असते. या मानसिक गरजांची पूर्ती करणारे, दीर्घ पल्ल्याचं लिखाण किंवा कादंबऱ्या मराठी भाषेत लिहिल्या – प्रसिद्ध केल्या जात नाहीत ही चिंतेची बाब. अद्भुतरसाला बाल-कुमार साहित्यातून आपण हद्दपार केलं आहे, हे एक निरीक्षण.

मराठी बालसाहित्यात संस्कार आणि मनोरंजन हे दोन घटक कधी परस्परांना समांतर जाताना दिसतात, तर कधी एकमेकांना छेदताना दिसतात. मुलांवर संस्कार केले पाहिजेत, असे ज्यांना वाटले असावे; त्यांना मराठी मुलांच्या भवितव्याबद्दल चिंता वाटत होती की काय, असे वाटते. उद्या अस्तित्व धोक्यात येणार आहे, असे वाटल्यामुळे एखाद्या कडव्या समाजाने आपल्या मुलांना लहानपणापासूनच तलवार चालविण्याचे शिक्षण द्यावे, अशा काही हेतूने नंतरच्या काळात संस्कारांच्या नावाखाली काही दुष्ट प्रयोग सुरू झाल्याचे दिसतात. अशा प्रयोगांमुळे मराठी बालसाहित्य सकस व सुदृढ न होता दूषित होऊ लागलेले आहे, असे मत नोंदविता येते. समाजाच्या दांभिकपणाने येथून दर्शन द्यायला सुरुवात केली आहे.

संस्कारक्षम बालवाङ्मय नावाचा प्रकार नक्की केव्हा सुरू झाला, हे सांगता येत नसले; तरी अशा संस्कारक्षम बालसाहित्याच्या प्रसरणामध्ये एक शिस्त मात्र दिसून येते. ही शिस्त कडक नियमांनी बांधलेली आहे. मनोरंजनापेक्षा देशप्रेम, धर्माचा अभिमान, वडीलधाऱ्यांना द्यावयाचा मान, पाठांतर, काहीएक नियमावलीचे अनुपालन, अशा गोष्टी त्यांच्या बालसाहित्यात प्रवेश करताना दिसतात. बालसाहित्यात मनोरंजनवाद्यांचादेखील एक भोंगळ असा गट अस्तित्वात होता. फारसे नियम न पाळता मुलांचे मनोरंजन करावे, इतकेच या गटाला समजते. मात्र, या गटाकडे संस्कारवाद्यांसारखी शिस्त नाही. संस्कारवाद्यांनी जादूगार, राक्षस, उडते गालिचे, उडते घोडे, चेटकिणी, राजपुत्राचे पराक्रम, जादूच्या तलवारी, सात समुद्रापार असलेले प्रदेश, निरागस व सुंदर सोनेरी केसांच्या राजकन्या, इत्यादी सर्व गोष्टींना अद्भुतरसासह बालसाहित्यातून केव्हाच नाहीसे केले. त्याचेच दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत.

जीवन एकात्म आहे, तत्संबंधीचा विचारही एकात्म आहे. साहित्यनिर्मितीमागील प्रेरणादेखील त्यामुळे एकात्म आहे. साहित्यनिर्मितीमागील प्रेरणादेखील त्यामुळे एकात्मएकजिनसी व अनुभवाच्या मुशीतून उतरलेल्या अशा असतात. मराठी समाजाने परदेशी बालसाहित्याचे अनुकरण भरपूर करून मराठी समाजाच्या एकूणच अनुभवविश्वाला कुंठित केले. त्यानंतर संस्कारवाद्यांनी हा प्रदेश आपल्या हाती घेऊन प्रबोधन इत्यादी शब्दांतून काही प्रतारणा चालविलेली आहे. प्रौढ साहित्यासाठी वेगळा विचार आणि बालसाहित्यासाठी वेगळा विचार देऊन जीवन पृथक आहे, विभाजित आहे, असा चुकीचा समज प्रस्थापित केला आहे. त्यामुळे इंग्रजी प्रभावानंतरचे आजचे बालसाहित्य कधीच सकस, प्रभावशाली व प्रतिभासंपन्न असे निर्माण झाले नाही. अलीकडच्या काळात ना पूर्वीसारखी रंगीत पुस्तके प्रकाशित झाली, ना चांदोबासारखी मासिके मराठीत प्रकाशित झाली, ना टिकली, ना अद्भुतरसाला पाचारण करण्यात आले, ना बालसाहित्यनिर्मितीकडे गांभीर्याने पाहिले गेले. ना बालसाहित्य ही चळवळ मानली गेली. ना संकलनाचे मोठे काम केले गेले. मराठी बालसाहित्याची दारुण अशी अवस्था आजपर्यंत अशीच राहिलेली आहे.

संस्कृतीतून माणसाचे जगणे शोधता येते. माणूस जे प्रसृत करतो ते सत्य तत्कालीन समाजाच्या विचारांचे, दांभिकपणाचे, स्वार्थाचे संवहनसुद्धा करत असते. बालसाहित्याला अशा दांभिकतेपासून सोडवून राजपुत्र, उडते घोडे या सगळ्यांना मुक्त करण्याची आवश्यकता आहे. बालसाहित्यात चेटकिणी, राक्षस, राजपुत्र, उडते घोडे या सगळ्यांना मुक्त सोडले पाहिजे आणि बालसाहित्यातून अद्भुतरसाची आराधना केली पाहिजे. उत्तम संस्कार ही आनुषंगिक अशी बाब असून मनोरंजनाच्या जोडीने संस्कारसुद्धा बालसाहित्यातून सहजच वावरू शकतील.

सुनील गंगोपाध्याय नावाच्या बंगाली लेखकाने असे विचार मांडले आहेत की ज्या भाषेतलं बालसाहित्य समृद्ध त्या भाषेत उत्तम वाचन-संस्कृती निर्माण होत असते. त्यांचे हे निरीक्षण अतिशय महत्त्वाचे आणि चपखल. म्हणूनच जाणीवपूर्वक बाल-कुमारांसाठीचे साहित्य निर्माण केलं पाहिजे. बंगाली भाषेत मुलांसाठीची ‘प्रातिनिधिक पात्रे’ निर्माण केली जातात आणि मान्यवर मंडळी बालसाहित्य  जाणीवपूर्वक लिहितात ही वस्तुस्थिती. आपल्याकडे ही परंपरा एकट्या ‘किशोर’ मासिकाने अनेक वर्षे पाळली. आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही.

मुलांची प्रातिनिधिक पात्रे बालसाहित्याला मिळाली; तथापि मराठी अस्सलपणा बालसाहित्याला मिळाला नाही. अनुकरण मात्र भरपूर मिळाले. वळून पाहताना असे अनुवाद, रूपांतरे व उसन्या घेतलेल्या प्रेरणा बालसाहित्याच्या इतिहासात ठळकपणे दिसतात. थोडक्यात, मराठीमध्ये इंग्रजी प्रभावाच्या काळात बालसाहित्याचा स्वतंत्र असा विचार नव्हता, असे दिसते.

मनोरंजनवाद्यांकडे सामग्री भरपूर असली तरी सकस असा विचार नसल्यामुळे, स्वातंत्र्यपूर्व काही वर्षे ते स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे आजपर्यंत सकस अशा कथारचना बालसाहित्यात निर्माण झाल्या नाहीत. मुलांना अद्भुतरसाची तहान स्वाभाविक असते, ही वस्तुस्थिती संस्कारवाद्यांनी जशी दुर्लक्षित केली; तशी मनोरंजनवाद्यांनी दुर्लक्षित केली नसली तरी, त्यांनादेखील अद्भुतरसाचा सकस व कल्पक असा प्रभाव बालसाहित्यातून प्रकट करता आला नाही. त्यामुळे आत्ताची मुले आज परदेशी प्रातिनिधिक पात्रांकडे आशेने पाहताना दिसतात. आजची मुलांची सुरू केलेली नियतकालिके विचित्र झालेली आहेत. ही नियतकालिके शुष्क व माहितीपर होऊ लागलेली आहेत. यामधून अद्भुतरस आटत चालला आहे.

बालमानसशास्त्रानुसार विशिष्ट वयात अद्भुतरसाचा संपर्क ज्या-ज्या मुलांशी होतो, ती मुले समृद्ध व विकसित अशा व्यक्तिमत्त्वाची होतात. त्यांची कल्पनाशक्ती तरल झालेली असते आणि त्यातूनच श्रेष्ठ प्रतिभेचे कलावंत व कल्पक असे शास्त्रज्ञ निर्माण होतात. मराठी समाजाला भावी पिढ्यांतून कलावंत निर्माण करावयाचे नसावेत, पोटार्थी विद्वान तयार व्हावेत, अशी पुरेशी सामग्री मात्र आजच्या बालसाहित्यात पेरलेली आढळते. प्रबोधन, संस्कार इत्यादी आवरणांखाली मुले गुदमरू लागली आहेत.

मराठी समाजाने आपले जगणे, आपल्या किरट्या व पोटार्थी आकांक्षा बाल-साहित्यावर नुसत्या लादल्याच नाहीत; तर प्रौढ साहित्याला नैतिकतेपासून मुक्ती देऊन बाल-साहित्याला मात्र नैतिकतेच्या आवरणात जखडून ठेवले आहे. मात्र, हे करीत असताना अनैतिक संदेश बाल-साहित्यातूनच प्रसृत करण्याचा समाजाचा दांभिकपणा दिसून येतो.

मराठीत ‘फास्टर फेणे’नंतर पोकळी तयार झाल्याचं निरीक्षण आहे. बाल- नायिकेचा तर पूर्ण अभाव आहे. माझ्या बाल-साहित्याच्या लिखाणातून मी काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करीत आहे.

उत्तम अशी बाल-कुमार साहित्याची निर्मिती आता अशक्य नाही. मात्र, प्रतिभावंतांनी कल्पनाशक्तीचे पंख पसरले पाहिजेत. अद्भुतरसाला सन्मानाने पुन्हा बोलावलं पाहिजे. चांगला संदेश आणि उत्तम मनोरंजन याचा समन्वय साधला पाहिजे. अशा साहित्याची विपुलता झाली तर उद्याचं मराठीतलं बाल-कुमार साहित्य समृद्ध होईल आणि वैश्विक पातळीवरसुद्धा जाईल. मी, त्याबाबत आशा बाळगून आहे.

bjsasne@yahoo.co.in

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang children literature reading culture a note about the award winning book amy