गणेश घुले
मोठ्यांसाठी लिहिताना मुलांसाठीदेखील आवर्जून बालसाहित्य लिहिणाऱ्या मराठी साहित्यिकांमध्ये भारत सासणे यांचे नाव जोडले जाते. नव्वदीच्या दशकात त्यांच्या दीर्घकथा महत्त्वाच्या दिवाळी अंकांतून गाजत होत्या, त्याच दरम्यान ‘अबब हत्ती’ आणि इतर बालक-युवकांसाठी निघणाऱ्या सजग मासिकांतही ते उत्साहाने लिहीत होते, हे अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांना ‘कुक्कुली बाळे’ गृहीत धरून उपदेश देणाऱ्या बालसाहित्य लेखनाच्या एकसुरी परंपरेला छेद देणारे असे सासणे यांचे लिखाण. फास्टर फेणे, गोट्या, धर्मा या बालकथा नायकांची परंपरा पुढे घेऊन जाणारा समशेर कुलूपघरे हा नवा नायक त्यांनी मराठी बालकथेला दिला. मराठी बालकथेत रहस्यकथा खूप कमी प्रमाणात लिहिली गेली. ‘समशेर आणि भूतबंगला’ या पुस्तकात एकूण तीन रहस्यकथा आहेत. छोटा डिटेक्टिव्ह असणारा समशेर कुलूपघरे हा धाडसी कथानायक. तर्कनिष्ठ विचार करणारा, सूक्ष्म निरीक्षण करणारा, गणितात हुशार , नियमित अभ्यास आणि व्यायाम करणारा अत्यंत बुद्धिमान.

या कथा बालमनाला, त्यांच्या बुद्धीला चालना देतात. त्यांची निरीक्षणशक्ती वाढवतात. त्यांच्यातली उत्सुकता ताणवतात. कथेतला कथानायक ज्या पद्धतीने रहस्यांची उकल करतो, त्यात विज्ञानाची जोड आहे. त्यांत सुसंगत घटनाक्रम आहे.

गोष्टी ऐकणे हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. यामुळेच तर अरेबियन नाइट्समधील अल्लाउद्दीन आणि त्याचा जादूचा दिवा, बाटलीतला राक्षस, अशासारख्या कथा पिढ्यान्पिढ्या, वर्षानुवर्षे बालसाहित्यामध्ये राहिल्या आणि अजरामरही झाल्या. आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकत ऐकतच अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पंचतंत्रातल्या प्राणिकथांपासून बालकथांची सुरुवात झालेली आढळते. बालसाहित्यातला फार मोठा भाग परिकथा आणि प्राणिकथांनी सुरुवातीपासूनच व्यापलेला. पंचतंत्रतातल्या प्राणिकथा तसेच वेदकाळातल्या रामायण-महाभारतातल्या प्राणिकथा याचे उत्तम उदाहरण.

एकूणच बालकथेचा विचार केल्यास असं लक्षात येतं की मराठी बालकथेवर पाश्चात्त्य बालकथांचा फार मोठा प्रभाव जाणवतो. पंचतंत्र आणि रामायण-महाभारतातील प्राणिकथा मराठी बालकथा मौखिक परंपरेत आढळत होत्या. पुढे लिखित परंपरेत मुद्रण कलेचा भारतात प्रसार झाला आणि पाश्चिमात्य इंग्रजी साहित्याच्या अनुवादाची लाट बालसाहित्यात आली. इंग्रजी बालसाहित्याची मोठ्या प्रमाणावर भाषांतरं झाली, त्यात बालकथांचा मोठा भाग होता.

आजघडीला आपल्याकडे विपुल प्रमाणात बालसाहित्य लिहिलं जातं, ही आनंदाची बाब असली तरी काही अपवाद वगळता काळानुरूप बालसाहित्य बदलताना दिसत नाही. बालसाहित्यात प्रयोगांचे प्रमाण अत्यल्प आहे. मुलांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या बुद्धीला चालना देणारे प्रयोगशील बालसाहित्य आजही बोटावर मोजण्याइतकेच. आजच्या काळात वाढणारी पिढी किती संवेदनशील आहे, काय विचार करते, तिचा भवताल काय आहे, तिच्या रोजच्या जगण्यात तंत्रज्ञानाने किती शिरकाव केला, त्यांत तिचे मन किती आणि कसे व्यापून गेले. याचा विचार करून, बालमानसिकतेचा अभ्यास करून लिखाण करणारे बालसाहित्य  लेखक खूप कमी आहेत. अजूनही जुन्याच चौकटीत विपुल प्रमाणात बालसाहित्य लिखाण होताना दिसते , हे खेदाने म्हणावे लागते.

सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या पुस्तकातल्या कथा रस्किन बॉण्ड यांच्या कथेशी नातं सांगणाऱ्या वाटतात. साहित्य हे वाचकमनाची एक प्रकारे जडणघडणच करते. यातूनच व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया होते. साहित्यातल्या घटनेचा, पात्रांचा, त्यांच्या भावविश्वाचा आपल्या मनावर अनेक अंगाने परिणाम होतो. बालसाहित्याच्या बाबतीत ही गोष्ट अधिक संवेदनशील आहे. बालसाहित्य वाचताना कथेमध्ये येणाऱ्या पात्रांचा, त्यांच्या वागण्याचा बालमन हे अनुकरण करू पाहते. यातूनच बालमनाच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण होत असते. भवतालात घडणाऱ्या घटनांचे, नातेसंबंधाचे त्यांच्या मनात कुतूहल असते. त्यांच्या अनुभवविश्वात घडणाऱ्या घटनेमागचा कार्यकारणभाव त्यांना समजून घ्यायचा असतो. या निसर्गाशी त्यांना समरस व्हायचे असते.

‘समशेर आणि भूतबंगला’ या पुस्तकातील रहस्यकथेतील नायक आणि त्याच्या सर्व मित्रांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, कुठल्याही घटनेकडे बघण्याची त्यांची तर्कशुद्ध दृष्टी, सूक्ष्म निरीक्षण यामुळे या कथेतून बालमनाच्या विचारप्रक्रियेला चालना मिळते. यातूनच व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे होते. या कथेतल्या समशेर या नायकाचे जे मित्र आहेत त्यांचे गुणविशेषदेखील या कथेबद्दलची गोडी अधिक वाढवतात. सांकेतिक भाषा वापरून संदेश पोहोचवणारा हरी असेल किंवा अवघड कामे लीलया करणारा शक्तिमान भीमू असेल, मोती नावाच्या कुर्त्याला जिवापाड जीव लावणारा गंपू असेल, रहस्य उकल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीची ध्वनिमुद्रित करणारी डॉली असेल, वडिलांच्या चित्रांची चोरी झाली म्हणून हळहळणारा गोट्या असेल आणि रहस्य उकलण्यामध्ये मदत करणारा पोलीस सबइन्स्पेक्टर नंदू भैया असेल ही पात्रं मानवी स्वभावाचे गुणविशेष घेऊन येतात, यामुळे वाचक या कथेमध्ये स्वत:ला बघू लागतो.

यातल्या सुंदर बोलक्या अभिनव चित्रांमुळे या कथा अधिकच रंजक झाल्या आहेत. नवी पिढी नव्या काळाची आव्हाने घेऊन जन्माला येते याची जाण बालसाहित्य लेखकांनी तरी आवर्जून ठेवली पाहिजे. हळव्या बालमनाचे मनोरंजन करणे, कुशाग्र बुद्धीला योग्य ती साधने पुरवणे, त्यांच्या विचारांना चालना देणे, त्यांना कार्यप्रवण, कृतिशील करणे हे बालसाहित्य लेखकाचं कर्तव्य. ते येथे पूर्ण झालेले दिसते.

मुलांना वाचायला चांगली पुस्तकं नाहीत किंवा आजची पिढी वाचतच नाही अशी ओरड आपण नेहमी करीत असतो, ऐकत असतो. गोट्या, चिंगी, फास्टर फणे यांना लोकप्रिय होण्यासाठी जे वातावरण आणि संधी मिळाली, तेवढी आज निव्वळ अशक्य. अशा दिशादर्शक नसलेल्या परिस्थितीत अकादमीने गौरवलेल्या या नायकापर्यंत अधिकाधिक वाचकांनी पोहोचणे आवश्यक आहे.

लेखक मराठी बालसाहित्यात पीएचडी करीत आहेत. त्यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या पुस्तकाला गेली दोन वर्षे साहित्य अकादमीसाठी बालसाहित्य विभागात नामांकन मिळाले आहे.

ghule.ganesh18@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang children mysteries bharat sasane in marathi literature amy
Show comments