कामावरून सुटल्यानंतर घरी जाईस्तोवर किंवा काही कामच नसले तर दिवस सुरू होण्यापासून संपेपर्यंत तुमचा वेळ मोबाइलमधील अद्यायावत दृश्य-माहिती ओरपण्यात संपतोय? तर ‘रिल्शासन’ या नव्या भोगप्रकाराचे व्यसन तुम्हाला जडलेले असेल. करोना काळात फोफावलेल्या ‘यूट्यूबर’ आणि ‘इन्फ्लूअन्सर’ यांनी आबालवृद्धांना नादाला लावले. आभासी आनंदात वावरणाऱ्या आणि जगाला आपल्या मागे लावणाऱ्या या लोकांचे जग दिसते तितके खरेच चकचकीत आहे का? वरवर न्यारे वाटणाऱ्या, पण वखवखीने व्यापलेल्या विश्वात आपणदेखील शिरकाव करीत आहोत. तो कसा? याचा एका माध्यम विश्लेषकाच्या नजरेतून शोध. अन् भवतालच्या या परिस्थितीतही ‘सुजाण पालकत्व’ संकल्पनेपलीकडे जाऊन मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ नियंत्रित करता येऊ शकतो, हे दाखवून देणाऱ्या पालकाचे अनुभव…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जारा दर हे नाव मागच्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर खूप गाजतेय. जारा दर ही टेक्सासमधील यूट्यूबर असून ती अर्धभारतीय वंशाची आहे. जाराचे शिक्षण टेक्सासमधील प्रतिष्ठित टेक्सास विद्यापीठामध्ये झाले. तिने संगणकशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली, अन् ती काही काळ त्याच विषयामध्ये पीएचडीचे अध्ययनदेखील करत होती. मात्र जगरहाटी तिला लवकरच उमगली. तिला प्रकर्षाने जाणवले की, आपल्या स्वत:ला घडविण्यासाठी पारंपरिक शैक्षणिक व्यवस्थेपेक्षा आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि नवमाध्यमे यांचा वापर करता येईल. हे करून उत्पन्नदेखील मिळू शकते. यामुळे तिने पीएचडीचा अभ्यासक्रम चक्क सोडला. मग यूट्यूबवर STEM अर्थात Science (विज्ञान), Technology (तंत्रज्ञान), Engineering (अभियांत्रिकी), आणि Mathematics (गणित) या विषयांशी निगडित माहितीचे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. अर्थातच रिल्साशनातील जगाकडून मोठ्या प्रमाणावर यश आणि प्रसिद्धीदेखील मिळायला लागली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या जाराने समाजमाध्यमांत एक लक्षवेधी पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये तिने स्पष्ट केले, की जे STEM शी संबंधित व्हिडीओ ती यूट्यूबवर अपलोड करत होती, तेच व्हिडीओ ती एका भारतामध्ये प्रतिबंधित असलेल्या तसेच नैतिकदृष्ट्या वर्ज्य समजल्या जाणाऱ्या संकेतस्थळावर देखील डकवत होती. या संकेतस्थळावरून तिला यूट्यूबपेक्षा तिप्पट मानधन प्राप्त होत होते. यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओमधून प्रति दशलक्ष दृश्यांमागे तिला साधारणत: २९,४०२ रुपये इतकी रक्कम प्राप्त होत होती, तर त्या प्रतिबंधित संकेतस्थळावर अपलोड केलेल्या व्हिडीओमधून प्रति दशलक्ष दृश्यांमागे तिला साधारणत: ८६,४०७ रुपये मिळत होते.
तिच्या या दाव्याने सर्वच क्रिएटर्सना धक्का बसला. ऑर्कुट-फेसबुक-टिकटॉक-इंस्टाग्राम-यूट्यूब या मार्गे चालत आलेल्या समाजमाध्यमाचा प्रवास आता एका अजून आदिम वासनेद्वारे प्रेरित काळोखी अशी नवीन पायवाट उघडणारा ठरला आहे. सोशल मीडियाच्या अनेक जमेच्या बाजू आहेत, मात्र संपूर्ण जग आणि सोशल मीडिया चालवणाऱ्या कंपन्यांचे मालक हे सामाजिक आणि लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवण्याच्या मार्गावरच लागलेले दिसून येतात.
जसा जारा दर यांचा एक अकादमिक पांडिती ते यूट्यूबर आणि नंतर आदिम वासनांना आव्हान देऊन पैसा उत्पन्न करणारा प्रवास वेदनादायी आहे, तसाच या जगातील अनेक यूट्यूबर्सचाही आहे. स्वत:च्या मूल्यांचा विनाश करीत आणि एका व्यसनाप्रमाणे त्या प्रसिद्धीच्या आहारी ते जात आहेत. या झटपट प्रसिद्धीचा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या लोकांच्या वखवखीचा प्रत्यय आपल्याला आपल्या आजूबाजूलादेखील जाणवू लागला आहे.
एक काळ होता जेव्हा मुंबईमध्ये मरीन ड्राइव्हला संध्याकाळी लोक मन शांत करायला, समुद्रकिनारी बसून तिथला सुंदर सूर्यास्त अनुभवायला यायचे. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा घेऊन घरी जाण्यासाठी अनेक तास तिथे शांतपणे घालवू शकायचे. आता मरीन ड्राइव्ह ही यूट्यूबर्स आणि इंस्टाग्रामर्सची नवी फिल्म सिटी बनली आहे. जो परिसर एकेकाळी मन:शांती द्यायचा आता तिथे जाऊन मनस्ताप होईल इतका सावळागोंधळ चाललेला दिसतो. सतत नवीन यूट्यूब शॉर्ट्स बनवायची गडबड, त्यात तो सूर्यास्त आणि त्याचे सौंदर्य अनुभवण्याऐवजी कुठल्या अँगलने व्हिडीओ शूट केला तर अधिक व्ह्यूज मिळू शकतील या विचाराने वाढणारी अस्वस्थता येथे समुद्राच्या लांटाहून अधिक फसफसलेली असते. इंटरॅक्टिव्ह म्हणजेच संभाषणात्मक कंटेन्टला जास्त व्ह्यूज मिळतात म्हणून सतत अनोळखी लोकांना जाऊन बालिश प्रश्न विचारणाऱ्या केविलवाण्या क्रिएटर्सची धडपड पाहायला मिळते. यामुळे त्या मरीन ड्राइव्हचा आधी असलेला डामडौल नष्ट झालाय.
हे सारं असं का झालं? २००५ साली एक छोटा व्हिडीओ अपलोड करून निर्माण झालेले हे ‘सोशल मीडिया’ आज या जगातील सरकारं पाडू शकण्याएवढं मोठं व्यासपीठ कसं बनलं? यूट्यूबवरून खरंच एवढा महसूल उत्पन्न होतो का? हे यूट्यूब क्रिएटर्स म्हणजे काय? वरवर आनंदी आणि खंबीर दिसणारे चेहरे हिट्स-लाइकच्या लाटेवर आजाराइतपत गंभीर का होत आहेत? यूट्यूबचा ‘मेकर्स’ आणि ‘टेकर्स’च्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? एखाद्या क्रिएटरची आर्थिक गणितं कशी असतात? यूट्यूबचा सामाजिक आणि राजकीय पडसाद काय? याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
डोपामाइन-प्रेरित व्यवस्था
समाजमाध्यमांच्या अभूतपूर्व यशाच्या मुळाशी मानवी मनोविज्ञानाची कौशल्यपूर्ण हाताळणी आहे. डॅनिएल कानेमन यांच्या द्वि-प्रक्रिया सिद्धांतानुसार, प्लॅटफॉर्मची रचना आपल्या मेंदूतील ‘सिस्टम १’ विचारसरणीला – जलद, सहज आणि भावनिक ज्ञानात्मक प्रक्रियेला – लक्ष्य करते, तर ‘सिस्टम २’ च्या अधिक विश्लेषणात्मक दृष्टिकोनाला काळजीपूर्वक टाळते. प्रत्येक व्हिडीओ सूचना, नोटिफिकेशन आणि ऑटोप्ले वैशिष्ट्य मेंदूमध्ये डोपामाइनचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे वापरकर्ते सतत नवीन सामग्री शोधण्यास उद्याुक्त होतात.
ही यंत्रणा व्यसनाधीन वर्तनाशी साम्य दर्शवते. जशा प्रकारे मद्यापान हा एक मानसिक आजार आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे व्यसन हासुद्धा या जगाला जडलेला एक मानसिक आजार आहे. कदाचित सोशल मीडिया हे आधी मानल्या जाणाऱ्या भयानक गोष्टींपेक्षा देखील घातक व्यसन आहे, कारण इतर व्यसनांसाठी एखाद्या व्यक्तीला बरीच शारीरिक कृती करावी लागते, मात्र ‘सोशल मीडिया’ हे सतत तुमच्या खिशात तुमच्याबरोबर फिरत असते. सतत तुम्ही त्यावर अद्यायावत राहण्याच्या बहाण्याने वावरत (अॅक्टिव्ह) असता.
तुमच्याबरोबर कधी असे झाले आहे का, की काहीच कारण नसताना तुमचा हात तुमच्या मोबाइलकडे जातो, तुम्ही उगाच व्हाट्सअॅप किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूब उघडता. कुणाचा संदेश आला आहे का किंवा काय नवीन पोस्ट कोणी शेअर केली आहे हे बघून फोन परत खाली ठेवता? जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्या मनाचा ताबा ‘सोशल मीडिया’ने घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत.
याच व्यसनाधीन अल्गोरिदमचा वापर या कंपन्या त्यांच्या नफेखोरीसाठी करतात आणि त्यांना नफा मिळवून देण्यासाठी हातपाय मारणारे बहुतांश लोक दुसरे कुणीच नसून, तुमच्या-आमच्यासारखेच सोशल मीडियाच्या आहारी गेलेले तसेच झटपट प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याचा प्रयत्न करणारे क्रिएटर्स आहेत. याच अल्गोरिदमचे पर्यवसान पुढे कुठल्याही मार्गाने, अगदी नैतिकतेची पातळी सोडून कंटेन्ट उभा करण्यामध्ये होते. सध्या या सोशल मीडियामधला जगावर परिणाम करणारा सर्वात मोठा खेळाडू हा यूट्यूब आहे.
यूट्यूबचा अल्पइतिहास…
२००५ मध्ये ‘मी अॅण्ड द झू’ या साध्या व्हिडीओपासून सुरू झालेला यूट्यूब आज जागतिक माध्यम महासत्ता बनला आहे. २००६ मध्ये गूगलने त्याचे क्रांतिकारी सामर्थ्य ओळखून १.६५ अब्ज डॉलरमध्ये त्याचे अधिग्रहण केले. २००७ मध्ये पार्टनर प्रोग्रामची सुरुवात ही आणखी एक महत्त्वाची घटना होती, ज्यामुळे कंटेन्ट क्रिएटर्सना त्यांच्या कामाचे मोनेटायझेशन अर्थात त्यांच्या अपलोड केलेल्या कंटेन्टमधून पैसे मिळविण्याची संधी मिळाली.
दृश्यसांस्कृतिक बदल…
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती म्हणजे पारंपरिक सेलिब्रिटी संस्कृतीपासून आजच्या इन्फ्लुएन्सर अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास. १९८० आणि १९९० च्या दशकात सेलिब्रिटी जाहिराती एका ठरावीक पद्धतीने केल्या जात होत्या : पौला अब्दुल एल. ए. गिअर बूट घालून नृत्य करत असे, सिंडी क्रॉफर्ड पेप्सीचे कॅन दाखवत असे, आणि सेलिब्रिटी काळजीपूर्वक नियंत्रित केलेल्या दूरदर्शन जाहिराती आणि मासिकांमध्ये दिसत असत. हे पारंपरिक सेलिब्रिटी स्टुडिओ, रेकॉर्ड कंपन्या आणि दूरदर्शन वाहिन्यांसारख्या शक्तिशाली नियंत्रकांच्या व्यवस्थेचे उत्पादन होते.
२०००च्या सुरुवातीच्या काळात, ब्लॉग्स आणि यूट्यूबच्या लोकप्रियतेने बदलाची सुरुवात झाली. २००५ मध्ये यूट्यूबची सुरुवात आणि २००६ मध्ये गूगलने केलेले त्याचे अधिग्रहण यामुळे प्रसिद्धीचे नवीन मार्ग तयार झाले. जेना मार्बल्स, शेन डॉसन आणि जेफ्री स्टार यांसारख्या आद्या प्रवर्तकांनी दाखवून दिले की, सामान्य व्यक्तींना पारंपरिक माध्यमांच्या पाठिंब्याशिवायदेखील मोठा अनुयायीवर्ग तयार करता येऊ शकतो.
परंतु खरी क्रांती केव्हा घडली? जेव्हा नवीन स्टार किंवा तारांकित व्यक्ती फक्त सोशल मीडियातून उदयास आले. जस्टिन बीबर- जो यूट्यूब व्हिडीओ ंद्वारे शोधला गेला. हा सोशल मीडिया प्रसिद्धी आणि मुख्य प्रवाहातील यश यांच्यातील दरी यशस्वीरीत्या पार करणारा पहिल्यांपैकी एक ठरला. अलीकडेच, लमेका फॉक्स आणि यून यंग बे यांसारखे मॉडेल्स इन्स्टाग्रामवरून शोधले गेल्यानंतर प्रसिद्धीस आले, तर टिकटॉक कॉमेडियन हेली मॉरिस हिने तिच्या पुस्तकांसह बेस्टसेलर स्थान प्राप्त केले आहे.
या बदलाने प्रभाव कसा कार्य करतो याची मूलभूत रचना बदलली आहे. पारंपरिक सेलिब्रिटींकडून अंतर आणि रहस्यमयता राखण्याची अपेक्षा असताना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह वाटण्यात यशस्वी होतात. आधुनिक बाजारपेठेतील संशोधनानुसार, ब्रँड फॅमिलिअॅरिटी आणि विश्वास वाढवण्यात इन्फ्लुएन्सर्स पारंपरिक सेलिब्रिटींपेक्षा अधिक प्रभावी ठरतात.
आजचे सर्वात यशस्वी इन्फ्लुएन्सर्स, जसे की मिस्टर बीस्ट (ज्याने २०२२ मध्ये ५४ दशलक्ष डॉलर कमावले), दर्शवतात की शक्तीचे समीकरण कसे बदलले आहे. हे नवीन डिजिटल सेलिब्रिटी थेट प्रेक्षक सहभाग, प्लॅटफॉर्म अल्गोरिदमचे सूक्ष्म आकलन आणि सातत्यपूर्ण सामग्री निर्मितीद्वारे त्यांची साम्राज्ये उभारतात.
यूट्युबर्स आणि त्यांचे मानसिक आरोग्य
यूट्यूब कंटेन्ट क्रिएटर्स हे डिजिटल उद्याोजकांची नवीन श्रेणी दर्शवतात. जागतिक स्तरावर सुमारे ४६.७ दशलक्ष लोक स्वत:ची अर्धवेळ क्रिएटर म्हणून ओळख सांगतात. नॅनो-इन्फ्लुएन्सर्सपासून मेगा-इन्फ्लुएन्सर्सपर्यंत त्यांनी मनोरंजन, शिक्षण आणि मार्केटिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.
मात्र या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक क्रिएटरला अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागते. सतत नवीन कंटेन्ट तयार करण्याचा दबाव, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची तगमग आणि सोशल मीडियावरील टीकांचा सामना यामुळे अनेक क्रिएटर्स नैराश्य आणि चिंतेच्या विळख्यात सापडतात. अल्गोरिदममधील बदल, व्ह्यूज घसरण्याचे प्रकार किंवा नकारात्मक कमेंट्स यांमुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होतो.
विशेषत: तरुण क्रिएटर्सना या दबावाचा सामना करणे कठीण जाते. त्यांच्यासमोर दोन मोठी आव्हाने असतात. एक म्हणजे सतत नवनवीन कंटेन्ट तयार करण्याची गरज आणि दुसरे म्हणजे ऑनलाइन जगात आपली वेगळी ओळख टिकवून ठेवणे. यामुळे अनेकदा त्यांच्यात निद्रानाश, एकाग्रताक्षती, सतत चिंताग्रस्तता ही लक्षणे दिसू लागतात. काही क्रिएटर्स तर सोशल मीडिया व्यसनाच्या विळख्यात अडकतात. सतत आपल्या स्टेट्सचा तपासा, दुसऱ्या क्रिएटर्सशी तुलना आणि प्रत्येक कमेेंटला प्रतिसाद देण्याची सक्ती, ही सार्वत्रिक लक्षणे. (फेसबुक-व्हॉट्सअॅपधारक असलेले आपण देखील थोड्याफार फरकाने या चरक्यात अडकलेलो आहोत.)
नवी डिजिटल बाजारपेठ
क्रिएटर इकॉनॉमी ही जटिल नेटवर्क बनली आहे. जिथे प्लॅटफॉर्म, क्रिएटर्स आणि जाहिरातदार एकमेकांशी संबंधित आहेत. या व्यवस्थेत, क्रिएटर्स स्वत: सामग्री निर्माते आणि सूक्ष्म-प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करतात. ते जाहिरातदार, एजन्सी आणि त्यांच्या प्रेक्षक वर्गाशी संबंध व्यवस्थापित करतात. या सर्व जटिल व्यापातून ते स्वत:साठी किंवा स्वत:च्या संस्थेसाठी महसूल उभा करतात.
करोनाचा प्रभाव : त्वरित डिजिटल परिवर्तन
कोविड-१९ महासाथीने यूट्यूबच्या वाढीला अभूतपूर्व गती दिली. टाळेबंदीदरम्यान अनेक प्रदेशांमध्ये सोशल मीडिया क्रियाकलापांत ५० पटींनी वाढ झाली. केवळ भारतातच, टाळेबंदीच्या पहिल्या आठवड्यात दैनंदिन सोशल मीडिया वापर ८७ वाढला.
चुकीच्या माहितीचा प्रसार…
यूट्यूबचा प्रभाव व्यक्तिगत वापरकर्त्यांपलीकडे जातो आणि चुकीच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम बनतो. भारतातील एक प्रसिद्ध यूट्यूबर त्यांच्या लाखो फॉलोअर्सना वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे दावे करताना दिसतो. त्याच्या म्हणण्यानुसार, ‘येती’ सारख्या काल्पनिक प्राण्यांचे खरे अस्तित्व आहे, तसेच कित्येक काळी जादू सारख्या अंधश्रद्धा खऱ्या आहेत. हे लोकांना पटवून देण्याचा तो प्रयत्न करतो. दुर्दैवी बाब म्हणजे ज्या भूमीत आगरकर, रानडे यांसारखे थोर सुधारणावादी होऊन गेले त्याच भूमीतून हा यूट्यूबर कार्यरत आहे.
यूट्यूबच्या अनेक जमेच्या बाजू आहेत. यूट्यूबचे व्हिडीओ बघून अनेक मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. जुलियस येगो हा केनियाचा खेळाडू तर यूट्यूब व्हिडीओ बघून भालाफेक शिकला. त्यातून ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले. म्हणजे यूट्युबर्सने कित्येक एकलव्यही घडविले आहेत.
पण त्याचबरोबर यूट्यूबच्या अनेक पडत्या बाजूदेखील आहेत आणि सध्या तरी पडत्या बाजू अधिक कार्यरत होताना दिसत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर यूट्यूब आण्विक प्रकल्पासारखा आहे. त्याचा योग्य वापर केला तर ऊर्जा बनेल आणि वाईट वापर केला तर बॉम्ब!
आजाराची कल्पना नाही?
आपण समाजमाध्यमावर ‘अपडेट’ राहण्यासाठी धडपडतो तेव्हा आपण त्याचे अधिन झालोय, याची कल्पना निम्म्याहून अधिक वापरकर्त्यांना नाही. आहे मोफत इंटरनेट डेटा म्हणून ‘पाहा व्हिडीओ, रिल्स वाटेल तेव्हढे’, ‘करा व्हिडीओ शेअर वाटेल तेव्हढे’ हा प्रकार शहरांपासून दुर्गम गावातील लोकांमध्ये देखील वाढत आहे. टांझानियामध्ये बॉलीवूड गीतांवर नृत्य करणारे जोडपे दीड कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळवू शकतात. कुुठल्याही रंजकबाबींना व्हायरल करण्यात जगाची स्पर्धा लागली आहे.
काय हवे?
आता वेळ आलेली आहे ती दृश्य वखवखीला आपल्यातून बाहेर काढण्याची. उपयुक्त, शैक्षणिक व्हिडीओज पाहण्याच्या निमित्ताने देखील ‘रिल्साशना’च्या अवांतर जगात अडकण्यापासून स्वत:ला बाहेर काढण्याची. समाजात उग्र-क्रूर गुन्हेगारी, सातत्याने क्रोध-रागाच्या टोकाच्या अवस्था दिसण्याचे मुख्य कारण मेंदूची एकाग्रता हरवण्यात आहे. आपापला स्क्रीन टाइम नियंत्रित केला, तर ती सापडण्याची शक्यता अधिक.
इन्फ्लूअन्सर का वाढले?
गेल्या दहा वर्षांत आबालवृद्धांमध्ये अचानक यूट्यूबर किंवा इन्फ्लूअन्सर बनण्याची स्वप्ने वाढत आहेत. समाजमाध्यमे बाल्यावस्थेत होती, तोपर्यंत म्हणजे अगदी यूट्यूबच्या पहिल्या दशकापर्यंत हा उद्याोग होऊ शकतो, ही कल्पना नव्हती. २०१५ नंतर जोमाने इन्फ्लूअन्सर आणि यूट्यूबर्सची संख्या वाढली. करोनाकाळात घरी अडकलेला वर्ग, ऑनलाइन शिक्षणपद्धतीने अधिकाधिक मुलामुलींच्या हाती गेलेली गॅझेट्स यांनी इन्फ्लूअन्सर आणि यूट्यूबर्स वाढले.
उद्ध्वस्त मने…
वर्षाच्या आरंभीच छत्तीसगडमधील १९ वर्षीय इन्फ्लूअन्सरने प्रेमभंगानंतर मानसिक संतुलन बिघडल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या महिन्यात गुरगावमधील प्रसिद्ध आरजे आणि इन्फ्लूअन्सर सिमरन हिने तणावातून आत्महत्या केली. गेल्या जूनमध्ये केरळमधील बारावीत शिकणाऱ्या इन्फ्लूअन्सर मुलीने आत्महत्या केली. बातम्या शोधाल तर तुर्कस्तान, मलेशिया आणि कुठल्या कुठल्या प्रांतात सारख्याच आत्महत्याच्या कहाण्या सापडतील.
इतर जगात काय?
स्वीडन या प्रगत राष्ट्राच्या आरोग्य विभागाने पालकांना सजग करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सुचविली. दोन वर्षांच्या मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ शून्य राखण्याचे आवाहन त्यांनी केले. तीन ते पंधरा वर्षांच्या मुलांना तीन तासांपेक्षा अधिक काळ मोबाइल, टीव्ही, लॅॅपटॉप वापर टाळण्याचा सल्ला दिला. शाळांमध्ये पंधरा वर्षांखालील मुलांवर बंदी घालण्याचा विचार फ्रान्समध्ये केला जात आहे. ऑस्ट्रेलियात गेल्याच महिन्यात १६ वर्षांखालील मुलामुलींना समाजमाध्यमापासून दूर ठेवण्याची तरतूद करण्यात आली.
chintanthorat@protonmail.com
–